मलाच वाटे – –
जग मजलाच हांसते
विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।। धृ ।।
वेगांत चालते जग, क्षुल्लक तुमचा सहभाग
ह्या अथांग जनसागरीं, कुणी न पुसती तुम्हांपरी
आपल्यातच जग जगते
विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।। १।।
प्रत्येकांचे प्रश्न निराळे, गर्क आहेत सोडविण्या सगळे
उगाच होई भास मजला, मनाचा हा खेळ जहाला
बघण्या तुमचेकडे, वेळ नाही कुणाते
विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।।२।।
श्रीमंतीची कुठे झलक, गरीबीत उघडी अनेक
गाण्याच्या तालावरी नाचती, दुःखीता समोर कांही रडती
कोण जाणतो, शेजारीच काय घडते
विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।।३।।
संकल्पित कार्ये प्रचंड पुढती, धांवतो प्रत्येक पूर्ण करण्या ती
कोठून मिळेल अवधी त्यास, करण्या दुजांची विचारपूस
वाहून जातो, जीवनाच्या प्रवाहाते
विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।।४।।
एक इच्छा राही मनीं, तुलना करावी यशाची कुणी
डोकावतो किंचित् इतर जीवनीं, परत वाचतो आपलीच कहाणी
बघतो “परंतु क्षणिक” इतराते विचार करिता कळले — जगास फुरसत नसते ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply