महाभारतात संजय शेवटी प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावर पोहोचला, तेच कुरुक्षेत्र, जेथे महाभारतातील निर्णायक युद्ध संपले होते; आपल्याला प्राप्त झालेल्या दिव्यदृष्टीने ज्याचे वर्णन त्याने धृतराष्ट्राला केले होते. प्रचंड विध्वंस झालेल्या त्या रणभूमीवर त्याला एकदा यावंच लागणार होतं.
‘का झाले हे युद्ध ? हे खरंच अटळ नव्हते का ? एवढा प्रचंड नरसंहार एवढ्या कमी दिवसांत का केला गेला ..?
मी जे पाहत होतो ते खरंच घडलंय का ..?’
याची शहानिशा करायला त्याला युद्धभूमीवर येणं भाग होतं.
त्याने चहूदिशांना पहिले, ‘खरंच एवढं मोठं युद्ध झालं? हीच ती रणभूमी ज्यावर रक्तामांसाचा खच पडला होता ? फक्त अठरा दिवसांत भरतखंडातील 80 टक्के पुरुष वंश नामशेष? हीच ती भूमी जिथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनासह उभे ठाकले होते?’
“ यामागील सत्य तुला कधीच समजणार नाही,” एक वृद्ध कंपित आवाज ऐकू आला. संजयाने वळून पाहिले तो धुळीच्या लोटातून भगव्या कपड्या तील एक वृद्ध योगी प्रकट झाला!
“मला माहित आहे, तू इथे का आला आहेस, परंतु हे युद्ध कळण्यासाठी खरं युद्ध कोणाशी असतं ते तुला समजून घ्यावे लागेल!”
वृद्ध योगी गूढपणे म्हणाला,
“काय आहे खऱ्या युद्धाचा अर्थ?”
संजयाने तात्काळ विचारता झाला. त्याच्या लक्षात आले कि तो एका महान, ज्ञानी माणसाच्या सहवासात आहे.
” महाभारत ही एक अतिभव्य, अभूतपूर्व वस्तुस्थिती असेलही, पण त्यामागे एक तत्वज्ञान आहेच आहे.”
वृद्ध योग्याच्या उद्गारांनी संजय अधिक प्रश्न विचारायला प्रवृत्त झाला.
“महाराज, आपण मला सांगू शकाल का काय आहे हे तत्वज्ञान?”
“नक्कीच, ऐक तर,”
वृद्ध योग्याने सांगायला सुरुवात केली.
“पाच पांडव म्हणजे आपली पंचेंद्रिये, ‘नयन जे पाहतात, नाक ज्याने वास येतो, जीभ जी चव घेते, कान जे ऐकतात व त्वचा जी स्पर्श जाणते. आणि आता सांग बरं कौरव म्हणजे काय?” वृद्ध योग्याने डोळे किलकिले करत विचारले.
संजयाने मानेने नकार दर्शवला.
“कौरव हे शेकडो विकार व दुर्गुण आहेत जे तुमच्या पंचेंद्रियांवर रोज हल्ला करत असतात, पण तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकता, कसा माहित आहे?”
संजयाने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
“तेंव्हाच जेंव्हा भगवान श्रीकृष्ण तुमचा रथ हाकत असतात!”
वृद्ध योग्याच्या डोळे लकाकले आणि संजय या रूपकाने अवाक झाला!
“भगवान श्रीकृष्ण म्हणजे दुसरं कोणी नाही तर हा आहे तुमचा आतील आवाज, तुमचा आत्मा, तुमचा मार्गदर्शक आणि जर तुम्ही स्वतःला त्याचा हाती सोपवलं तर तुम्हाला काहीही काळजी करायचे कारण नाही.”
संजय बावचळून गेला पण त्याने लगेच प्रतिप्रश्न केला, “महाराज, जर कौरव हे दुर्गुण वा विकारांचे प्रतीक आहेत तर मग द्रोणाचार्य आणि भीष्म हे कौरवांच्या बाजूने का बरं लढत होते?”
वृद्ध योग्याने दुःखी स्वरात सांगितले,
” याचा अर्थ हाच की जसे तुमचे वय वाढते तसा तुमचा वडील माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
तुमच्यापेक्षा वडील माणसं, जी लहानपणी तुम्हाला परिपूर्ण वाटत असतात ती परिपूर्ण असतीलच असे नाही, ते काही बाबतीत कमकुवत असू शकतात. आणि एक दिवस तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो की ती तुमच्या हिताची आहेत का नाहीत.? आणि मग एके दिवशी तुम्हाला लक्षात येते की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यांच्याबरोबर झगडावे लागणार आहे!
मोठं होण्यातला हा सर्वात कठीण व अपरिहार्य भाग आहे आणि म्हणूनच भगवद्गीता अतिशय महत्वाची आहे.”
संजय पूर्णत: लीन झाला, ज्ञानाच्या या पैलूने, पण लगेच हळुवार स्वरात विचारता झाला, “मग कर्णाबद्दल काय?”
“वा!”
वृद्ध योगी उद्गारला, “वा! अप्रतिम प्रश्न, शेवटी राखून ठेवलास तर!”
“कर्ण आहे तुमच्या पंचेद्रियांचाच बांधव, तो आहे आसक्ती, तो तुमचाच एक भाग आहे पण वावरतो मात्र तुमच्या दुर्गुणी विकारांसह. त्याला कळत असतं की आपण चुकतोय, परंतु सबबी सांगत रहातो सर्वकाळ विकारांची सोबत करण्यासाठी..!’
संजयनं सहमतीदर्शक स्मितहास्य करत नजर खाली झुकवली, डोक्यात हजारो विचारांचा कल्लोळ उठला होता.
पुन्हा एकदा वाऱ्याची वावटळ उठली. थोड्या वेळाने स्वतःला सावरत त्याने वर पहिले तर तो वृद्ध योगी अंतर्धान पावला होता, जीवनाचे तत्वज्ञान थोडक्या शब्दांत मांडून..!
Leave a Reply