महालय श्राद्धात आपण आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे स्मरण –पूजन पिंडरूपाने करतो.यामध्ये आपले दिवंगत आई- वडील, आजी, आजोबा , पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ-बहिण , काका-काकू, मामा-मामी, मावशी , आत्या ,सासू-सासरे, व्याही, विहीण अन्य नातेवाईक या सर्वाना उद्देशून पिंडदान करतो. आपण विविध गुरूंकडून आयुष्याभर काही ना काही शिकत असतो, आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे असे आपले गुरु आणि शिष्य जे निधन पावले असतील त्यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त , आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तीना उद्देशून आपण हे श्राध्द करतो. अनेक लोकांवर निधनानंतर कोणताही संस्कार केला जात नाही. त्यांच्याप्रतीही आपण कृतज्ञता व्यक्त करतो .आपल्या नकळत झाडे तोडली जातात, कीड-मुंगी-कीटक आपल्या हातून नकळत मारले जातात . त्यांचीही आठवण आपण यावेळी करतो.सारांश,आपल्या जवळचे असोत वा दूरचे असोत, हे विश्वचि माझे घर या न्यायाने आपण सर्वच दिवंगत लोकांचे स्मरण महालय श्राद्धात करतो. चारही दिशांना असलेल्या ज्ञात अज्ञात अशा सर्वासाठी श्रद्धेने पुष्प अर्पण करण्याचे हे दिवस. तसेच माझया कुटुंबाचा “वंशवृक्ष” आठवण्याची संधी. त्यानिमित्ताने कुटुंबाचेही संघटन !
ज्या काळात समाजात विधवा महिलांचे स्थान हे निम्न दर्जाचे होते त्या काळात पती जिवंत असताना सुवासिनी असताना मृत्यू येणे हे महिलेच्या सामाजिक आयुष्यात फार महत्वाचे होते. त्यामुळे अर्थातच सवाष्ण गेलेल्या महिलेसाठी अविधवा नवमीचा स्वतंत्र दिवस योजला गेला असावा.
जसे गणपती, गौरी यानिमित्ताने सर्व घर एकत्र येते त्याचप्रमाणे श्राद्धविधीच्या निमित्ताने सर्व कुटुंबीय एकत्र येतात. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तींच्या एकत्र स्मरणाने आपल्याला आपला वंशवृक्ष समजतो. त्यानिमित्ताने आपण कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांची माहिती करून घेतो. त्यांनी केलेली विशेष कामे, समाज व कुटुंबासाठीचे त्यांचे योगदान याबद्दल आपल्याला माहिती मिळते. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीने आपलाही आत्मविश्वास वाढतो व आपल्या पूर्वजांनी केलेल्या चांगल्या कामातून आपल्यालाही प्रेरणा मिळत राहते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण ज्या सामाजाची मदत घेत असतो त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही यानिमित्ताने व्यक्त करण्याची संधी आपल्याला मिळते. निसर्गातील पशु-पक्षी, झाडे यांचेही निसर्गचक्रात महत्वाचे स्थान असते. त्यांच्यामुळेही आपल्या नकळत का होईना आपण चांगल्या गुणवत्तेचे आयुष्य जगत असतो. त्यांच्याविषयी आपुलकी व्यक्त करण्याचे माध्यम म्हणूनही महालयाकडे पाहता येऊ शकेल.
आधुनिक काळातही असे अनुभवास येते की या काळात सोन्याची खरेदी, घराची खरेदी या गोष्टी करणे पितृपक्षात शक्यतो टाळले जाते. शुभकार्याची चर्चाही या काळात केली जात नाही. खरं म्हणजे आपले दिवंगत पूर्वज या काळात पृथ्वीलोकात येवून आपल्या सर्व गोष्टींचे अवलोकन करीत असतील तर आपल्या कार्याला त्यांचे आशीर्वाद लाभले आहेत असा विचार का करू नये ?
भारतातील संस्कृती ही कृषी आधारित आहे. त्यामुळे शेतीची कापणी’ होऊन पहिले पीक हाती आल्यावर मगच कदाचित कृषीवलाला आर्थिक स्थिरता मिळे ज्यामुळे तो काही आवर्जून खरेदी करू शकत असे. पण ज्या काळात पिके अजून शेतातच कापणीसाठी वाट पाहत उभी आहेत त्या काळात खरेदी करणे टाळणे इष्ट असावे. त्यातूनच कदाचित या काळात खरेदी करू नये असा संकेत रूढ झाला असावा.
ज्यांच्यामुळे आपले अस्तित्व आहे त्या आपल्या पूर्वजांचे आपल्या वंशजांसाठी आशीर्वाद असावेत असा सकारात्मक विचार आपण करायला हवा. श्राध्द म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण . त्यामुळे पितृपक्षात सर्व दिवंगत पूर्वजांच्या सामूहिक स्मरणाची संधी अवश्य घ्यावी आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.
आधुनिक वेगवान काळात महालय श्राद्ध विधीपूर्वक करणे शक्य झाले नाही तरी आपल्या कुळातील तसेच ज्ञात अज्ञात अशा दिवंगत व्यक्तींच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना गरजूला दान देणे, समाजाच्या आणि पर्यावरणाच्या हितार्थ उपक्रमाला हातभार लावणे किंवा आपल्या शक्ती बुद्धीनुसार आणि आवडीनुसार कोणत्यातरी विधायक उपक्रमाला हातभार लावण्याची संधी श्रद्धापूर्वक अवश्य घ्यावी.
— आर्या आशुतोष जोशी
Leave a Reply