बरीच महान व्यक्तिमत्वे अल्पायुषी झाली.आपले दैवत शिवाजी महाराज अवघ्या पन्नासाव्या वर्षी स्वर्गवासी झाले.सर्व शत्रूंचा बिमोड करून हिंदवी स्वराज्याला उर्जितावस्था येणार आणि त्याचवेळेस राजे स्वर्गवासी झाले.काय हा दैवदूर्विलास!त्याचे कर्तृत्व बहरतानाच हे असे व्हावे,आपले नशीबच फुटके झाले.
अस काही महाराजांच्याच बाबतीत झाले असे नाही.भारताच्या इतिहासात अशी बरीच उदाहरणे दिसून येतात. विवेकानंद,आगरकर,सुभाषचंद्र बोस,थोरले बाजीराव,माधवराव पेशवे वगैरे अशी अनेक उदाहरणे मिळतील.या सर्व व्यक्तींचे कर्तृत्व अफाट,त्यांच्या कर्तृत्वाने देशाला उर्जितावस्था आली असती,पण काळाने त्यांच्यावर अवेळी झेप घेतली आणि त्याना देशबांधवांपासून तोडले.आता “त्याना आणखी आयुष्य लाभले असते तर…”असे म्हणण्याची पाळी आपल्यावर आली.
ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली त्यामुळे समाज त्यांच्या सत्संगतीस मुकला.त्यानी समाधी घेऊन समाजाचा त्याग केला.त्यानी वयाच्या एकविसाव्या वर्षीच समाधी घेतली.त्यानी समाधी का घेतली याचे महत्वाचे कारण सांगण्यात येते ते असे.आता आपले या जगातील कार्य संपले आता जगाचा त्याग करणे बरे असे त्याना वाटले,म्हणून ते समाधीस्थ झाले असे म्हणतात.लहानपणापासून समाजाने त्यांची बरीच छळवणूक केली.आपले नाणे खणखणीत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याना चमत्काराचा आसरा नाइलाजास्तव घ्यावा लागला.आपले अलौकिकत्व सिद्ध झाल्यावर त्यानी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.त्यात भक्तीमार्गाबरोबर सदाचरणाचा मंत्र दिला.पण बहुसंख्य समाजाने भक्तिमार्गाला प्राधान्य दिले आणि तो अधिकतम आत्मसात केला.मग झाले काय सदाचाराची शिकवण मागे पडली,भक्तिमार्गामुळे अनंतपापराशी क्षणात लयाला जातील हा विचार बळावला.भक्तिमार्ग श्रेष्ठ वाटू लागला.
त्यामुळे सदाचाराची शिकवण समाजात दृढ करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी जगात राहणे गरजेचे होते.त्याच्या आवाहनाला लोकानी मान दिला असता असे वाटते,कारण त्यांचे ग्रंथ ज्याप्रमाणे समाजाने प्रमाण मानले त्याचा विचार करता त्यांच्या आवाहनाला परिणामकारक प्रतिसाद मिळाला असता असा माझा आशावाद.म्हणून त्यानी समाधी घ्यायला नको होती असे उगाचच मनात येते,उगाचच म्हणतो कारण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही.
सदाचाराची वाट|असावा जीवनाचा थाट|
घालावा त्याचा घाट| भक्तीमार्गाआधी ||
अर्थ- सदाचाराची वाट अनुसरणे हा जीवनाचा मुख्य हेतू असावा.देवभक्ती करण्याआधी सदाचार आत्मसात करणे महत्वाचे.
–शरद प्रभुदेसाई.
Leave a Reply