नवीन लेखन...

महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

गेल्या काही वर्षातील घटनांवर नजर टाकली तर देशातील महानगरात महिलांवर बस-रिक्शा-टॅक्सी चालकांकडून होणाऱ्या अत्याचारांत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे दिसून येते. आज महानगरातील जीवनमान लक्षात घेता स्त्रियांना नोकरी-व्यवसायानिमित्त दिवस-रात्र घराबाहेर राहणे गरजेचे झाले आहे. ‘सातच्या आत घरात’ हे दिवस केंव्हाच मागे पडलेत. स्त्रियांची जागी झालेली महत्वाकांक्षा, कुटुंबाच्या वाढत्या गरजा, नोकरीतील अशाश्वतता या साठी महिलांना घडाळ्याकडे बघून चालत नाही ही आजची वस्तुस्थिती आहे. कॉल सेन्टर, बिपिओ, हॉस्पिटल्स हि ठिकाणे दिवसाचे २४ तास चालू असतात व यात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियाही नोकऱ्या करीत आहेत. यामुळे या संस्थांनी उपलब्ध केलेल्या वाहनांवर वा बस-रिक्शा-टॅक्सी, लोकल ट्रेनवर स्त्रियांना विसंबून रहावेच लागते. आता हे खरय की, अशा घटना सर्रास सर्वच वाहन चालकांकडून होत नाहीत पण होणारही नाहीत याची काहीच शाश्वती नाही हे अलीकडे घडलेल्या काही घटनांवरून दिसते. या सर्वच ठिकाणी गणवेशधारी पोलीस उपलब्ध करणे आदर्श असले तरी व्यवहार्य नाही. पुन्हा पोलीस हा गणवेशधारी ‘पुरुष’च आहे व तो अत्याचार करणार नाही याची शाश्वती देता येणार नाही हे काही वर्षापूर्वी मरीन ड्राईव्ह किनाऱ्यावर घडलेल्या घटनेवरून दिसून येते. म्हणजे तिथेही पूर्ण विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही.

राजधानी दिल्लीत घडलेली ‘उबेर’ फ्लीट टॅक्सीत एका महिलेवर झालेल्या बलात्काराची घटना अगदी ताजी आहे. ही घटना झाल्या झाल्या सरकारने अशा सर्वच टॅक्सी वर बंदी घालण्याची घोषणा केली हा प्रकार न समजण्या पलीकडचा आहे. याचा अर्थ लोकल ट्रेन मध्ये स्त्रियांवर अत्याचार झाल्यास ट्रेनवर किंवा पोलिसांकडून बालात्क्क्लर झाल्यास पोलीस यंत्रणा बाद करण्याचाच प्रकार झाला. खरे तर बंदी घालून काहीच साध्य होत नाही हे आज वर घातलेल्या अनेक बंदिन वरून दिसून आले आहे. मग काय करता येईल ?

स्त्रियांनी अश्या रात्री-अपरात्री प्रवास करताना स्वतःची काळजी घेणे हा सर्वात चांगला उपाय. हल्ली सर्वांकडेच कॅमेरे असलेले मोबाईल फोन व नेटपॅक असतातच. येत जाता सर्वचजण त्या मोबाईल मध्ये डोळे व डोकं खुपसून चालताना दिसतात. स्त्रियांनी रिक्शा-टॅक्सीत बसताना त्या वाहनाचा व वाहनचालकाचा फोटो काढून जरी आपल्या घरच्या माणसाकडे व्हाट्सअॅप केला व फोन करून सांगितले की मी निघालेय आणि अमुक एका वेळेपर्यंत घरी पोचतेय, तरी त्या वाहन चालकाच्या मनात भीती उत्पन्न होऊन त्याच्याकडून असा प्रकार होण्याची शक्यता खूप कमी होईल. दुसरा उपाय पुरुषांनी आपली मानसिकता बदलणे, पण याला खूप काळ जावा लागेल

मला यावर एक अगदी वेगळा उपाय सुचतोय तो मी आपल्यापुढे मांडतोय. अर्थात हा उपाय अगदी प्राथमिक स्तरावरचा असून यावर समाजात चर्चा घडून येणे आवश्यक आहे. चर्चा झाल्याशिवाय कोणतीही गोष्ट चांगली अथवा वाईट आहे असे ठरवता येणार नाही.

महिलाच्या सुरक्षीतते साठी देशातील ‘तृतीयपंथी’ लोकांचा विचार का केला जाऊ नये असे असा विचार मला मांडावासा वाटतोय. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने नुकताच ‘तृतीयपंथी’ किंवा स्वेच्छेने लिंग बदल केलेल्या व्यक्तींची नोंद ‘स्त्री’ अथवा ‘पुरुष’ अशी न ‘थर्ड जेन्डर’ म्हणून करावी असा ऐतिहासिक व आपल्या समाजाला एक पाऊल पुढे नेणारा निर्णय दिला आहे. ‘थर्ड जेन्डर’ या संज्ञेत ‘शारीरिक कमतरतेमुळे’ पुरुषत्व नसलेले, ज्यांना आपण सर्व सामान्य भाषेत ‘हिजडे’ म्हणतो असे वा स्वतःची मानसिक गरज लक्षात घेऊन स्वेच्छेने लिंगबदल केलेले स्त्रीपुरुष ( ट्रान्सजेन्डर ) असे दोनही घटक समाविष्ट आहेत. नुकत्याच झालेल्या २०१४ च्या जन गणनेनुसार आपल्या देशात ‘स्त्री’ वा ‘पुरुष’ या व्यतिरिक्त ‘इतर लिंग (थर्ड जेन्डर)’ म्हणून स्वतःची नोंद केलेले एकूण ५ लाख लोक आहेत. इथे एक लक्षात घेण्यासारखे आहे की सदरचा आकडा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्या अगोदरचा म्हणजे थर्ड जेन्डर ला कायदेशीर मान्यता मिळण्या पूर्वीचा आहे. एक अंदाज असाही आहे की अधिकृतरित्या थर्ड जेन्डर म्हणून नोंद केलेल्या लोकांपेक्षा हा आकडा कमीत कमी पाच पटीने जास्त असावा. म्हणजे जवळपास २० ते २५ लाख लोकसंख्या तृतीय पंथी म्हणून आहे असे गृहीत धरण्यास हरकत नाही.

‘तृतीय पंथी’ म्हटले की सर्वांच्याच मनात भीती उत्पन्न होते. बाह्य रूपाने पुरुषांसारखा राकट असून स्त्रीवेष धारण केलेला असल्यामुळे त्यांच्या नडला भले भले लागत नाहीत. मागे कधीतरी काही बँकांनी त्यांच्या थकबाकी वसुलीसाठी तृतीय पंथीयांचा रिकव्हरी एजंट म्हणूनही उपयोग केल्याचे मला स्मरते व त्याचा त्या बँकांना उपयोगही झाल्याचे ऐकिवात आहे. पूर्वी मुघल बधाहांच्या वा राजे-रजवाड्यांच्या जनानखान्याची सुरक्षा तृतीय पंथीय लोकांकडेच असायची हे इतिहासात नोंदलेलं आहे. त्यामागे जनानखान्यातील स्त्रियांवर प्रेमाचार वा अत्याचार होऊ नये हाच दृष्टीकोन होता. स्त्रीवेषधारी पुरुष हा प्रथम दर्शनीच भीतीदायक दिसतो. परंतु मला समजायला लागल्यापासूनचे माझे निरीक्षण आहे की हे ‘भीतीदायक’ लोक मुंबईच्या लोकल ट्रेन मधून सर्रास महिलांच्या डब्यातून प्रवास करत असतात. त्यांनी महिलांवर कधी अत्याचार जाऊदे साधी छेड काढल्याची घटना ऐकिवात नाही. तसेच महिलांनीही त्यांना त्यांच्या डब्यात प्रवेश करण्यापासून रोखले आहे असेही कधी वाचण्या-ऐकण्यात नाही. उलट माझ्या पत्नी सहित काही महिलांशी मी या विषयावर बोललो असताना असे जाणवले कि संध्याकाळी गर्दीची वेळ गेल्यानंतर लोकल मधून प्रवास करताना त्यांचा एक प्रकारे आधार वाटतो. मुळात ते महिलांना काही त्रास देत नाहीत. उलट ते महिलांच्या डब्यात असताना त्या डब्यात अपप्रवृत्तीचे लोक शिरण्याची शक्यता कमी असते. पुरुषांचा देह व शारीरिक ताकद धरणाऱ्या या व्यक्ती मानाने स्त्रीच असतात व आपल्या ताकदीचा व भीतीदायक दिसण्याचा उपयोग ते इतर स्त्रियांच्या रक्षणासाठी सहज करू शकतात.

आज ही आपल्यासारखीच असलेली मनसे केवळ त्यांच्या शरीर आणि मनातील विसंवादामुळे  समाजाच्या मूळ प्रवाहापासून दूर उपेक्षित जीवन जगत आहेत. त्यांना माणूस म्हणून गृहीत धरलेच जात नाही. त्यांनाही आपल्यासारख्याच भावना आहेत व आपल्यासारखीच रोजी रोटीची गरज आहे हे आपण संजून घेत नाही. वागण्यात व शिक्षणात कुठेही कमी नसूनहही त्यांना प्रतिष्ठित ठिकाणी नोकऱ्या मिळणे अवघड जात आहे व म्हणून नाईलाजाने त्यांच्यावर स्त्रीवेष धारण करून इतराच्या अंगचटीला जात नाईलाजाने भीक मागायची वेळ आली आहे.

दिसायला पुरुषांसारखेच परंतु मानाने स्त्री असलेले हे लोक स्त्रियांकडे कधी वाकड्या नजरेने बघत नाहीत. लोकल मध्ये महिलांच्या डब्यातून ते प्रवास करताना स्त्रिया आश्वस्त असतात असे म्हणण्यास जागा आहे. त्यांची शारीरिक ताकद व त्यांचा स्त्रीवेष हे बघूनच त्यांच्या भानगडीत पडायला कोनोही धजावत नाही. अगदी पोलीसही त्यांच्याशी पंगा घेण्यास नाखूष असतात तर गुंडांची काय कथा..! अर्थात त्यांच्यातही काही अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. हल्ली ‘पुरुष’ही स्त्रियांचा वेश धारण करून ‘खोटे’ तृतीय पंथी म्हणून भीक मागताना दिसतात. खऱ्या तृतीय पंथीयांचा त्यांना मोठा विरोध आहे परंतु त्यांना समाजाने नाकारल्यामुळे समाजात स्वतःचा असा आवाज नसल्याने ते त्यांची कैफियत कुठे मांडू शकत नाहीत.

मला असे सुचवावेसे वाटते कि, जर या तृतीय पंथीयांचे आवश्यक ते शारीरिक व मानसिक परीक्षण करून त्यांना ‘महिला सुरक्षा रक्षक’ म्हणून नेमणूक केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. अर्थात, त्यासाठी योग्य ते नियम व कायदे तयार करणे गरजेचे राहील. याचा फायदा स्त्रियांना तर होईलच परंतु समाजाच्या एका दुर्लक्षित घटकाला मुख्य प्रवाहात आणल्याचे कार्यही होईल. खर्या ‘थर्ड जेन्डर’ना मानाने रोजगारही मिळेल. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन व ‘महिला सुरक्षा रक्षक’ अशी ओळख देऊन मुंबई सारख्या महानगरातील लोकल ट्रेन मध्ये पुरुष पोलीसापेक्षा  त्यांना नेमल्यास ते आनंदाने व जबाबदारीने नोकरी करतील.  लोकल मधला पोलीस हा शेवटी ‘पुरुष’ असतो व एका बेसावध क्षणी त्याच्यातील अपप्रवृत्ती जागी होण्याची शक्या नाकारता येत नाही. त्यापेक्षा तृत्रीय पंथी मानसिक दृष्ट्या स्त्री पण ताकदीच्या  दृष्टीने  पुरुष असल्याने ते हे काम अतिशय जबाबदारीने करू शकतील. एक प्रयोग म्हणूण हे करण्यास काही हरकत नसावी असे मला वाटते. जर या प्रयोगात यश मिळाले तर पुढे महिलांसाठीचे बस-रिक्शा-टॅक्सी ड्रायव्हर  म्हणून काम करण्याची परवानगी देता येऊ शकेल जेणे करून एका दुर्लक्षीत समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य देखील होईल व महिलांची सुरक्षितताही साधली जाईल. अर्थात हा अगदी प्राथमिक स्तरावरचा विचार मांडलाय व यावर समाजात चर्चा होणे आवश्यक. समाजातील विचारवंत, डॉक्टर्स, प्रशासक, मानस शास्त्रज्ञ, महिला संघटना यांनी यावर गंभीरपणे विचार करावा अशी माझी विनंती आहे. प्रथम प्रायोगिक तत्वावर मुंबई पुरता विचार केला जावा व त्यात यश मिळते असे वाटल्यास देशातील सर्वच महानगरात हा पॅटर्न लागू करता येऊ शकेल.

-गणेश साळुंखे
93218 11091
salunkesnitin@gmail.com
३०२, त्रिमूर्ती सोसायटी,
डॉ. भांडारकर मार्ग,
दहिसर ( पश्चिम)
मुंबई – ४०००६८.

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

1 Comment on महानगरातील महिला सुरक्षा: एक वेगळा विचार..

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..