ब्रम्हदेशातील नदी किनारी वसलेल्या प्रदेशातील मोनलोक म्हणून ओळखला जाणारा हा गणेश “व्यापारी विघ्नहर्ता” म्हणून प्रसिद्ध आहे. ही मूर्ती ६व्या शतकातील असावी. श्याम वंशाच्या कोणा आयुथीयान कारागिराने ही बनविलेली असावी. ह्या गणेशाला महापियेन अशी संज्ञा आहे.
ब्रम्हदेशातील इतर गणेश मूर्ती ओबड धोबड स्वरूप आढळतात. परंतू ही मूर्ती मात्र रेखीव ( ताठ बसलेली ) असून कंबोडिया गणपती प्रमाणे महाराजा लीला मुद्रा आहे. उंच आसनावर स्थानापन्न झालेल्या ह्या मूर्तीचा उजवा पाय उंच वर केलेला व डावा पाय आसनावर बसण्यासाठी दुमडलेल्या अवस्थेत आहे. मस्तक व सोंड फार रेखीव असून डोळे गोल व एकटक लावून पाहणारे, मस्तकावर करंड मुकुट, पूढील भाग किरीटासारखा व मागे चक्राकार उंच व निमुळता टोकदार आहे. एक हात कोपरापर्यंत व नंतर दोन हात हे गणेशाचे वैशिष्टय. दंडात व पायात दागिने व दोन संपूर्ण सुळे हे ह्या गणेशाचे दुसरे वैशिष्टय. गळ्यात सर्पाचे यज्ञोपवीत व मुद्रेच्या अवस्थेत ठेवलेला डावा हात हे बौद्ध पंथाचा प्रभाव दाखवितो. यावरून भारतीय, ब्राम्ही, कोम्बोडीयन बौद्ध कलेचा व संस्कृतीचा संगम झालेला दिसून येतो.
आज पर्यंत परदेशातील श्रीगणेश मूर्तीत गणेश वाहन म्हणून उंदीर आढळलेला नाही किंवा संशोधकांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही. परंतू या मूर्तीच्या उजव्या बाजूला उंदीर दाखविण्यात आळा आहे. हे एक आश्यर्यकारक वाटते. येथे भारतीय संस्कृतीचा जास्त प्रभाव असावा असे वाटते.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply