म्हातारी कमरेत पार वाकली होती .
काठीच्या आधारानं , लटपटत्या पायांनी , शेजारच्या डबक्यात साठलेलं पाणी , गळणाऱ्या भांड्यातून आणत होती .
चार दिवसांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले , पाच मृतदेह , माती बाजूला करून कुणीतरी वर आणून ठेवले होते .
त्या सडत चाललेल्या प्रत्येक मृतदेहावर , म्हातारी पाणी ओतून स्वच्छ करीत होती .
म्हातारा नवरा , मुलगा , सून , नातवंडं मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्यावर , त्या देहाकडे बघताना , खाचा होत चाललेल्या डोळ्यांतलं पाणी केव्हाच आटून गेलं होतं .
ऐंशी वर्षाचा तिचा सुरकुतलेला देह अधिकच आक्रसून गेला होता .
पाण्यानं ते सडलेले मृतदेह धुण्याचं तिचं काम सुरूच होतं
समोर बघ्यांची गर्दी , हातातल्या मोबाईलवर त्यादृश्याचा व्हिडीओ काढण्यात गर्क होती .
चॅनलवाले शूटिंग करीत होते. म्हातारीचा बाईट घेण्यासाठी धडपडत होते .
त्यांचे प्रश्न तयार होते .
– या बॉडी कडे बघताना आता मनात काय भावना आहेत ?
– नातवंडं कशी ओळखली ?
– घर गाडलं जात असताना , त्या प्रसंगाकडे कसं बघता तुम्ही ?
– समाजाला काय सांगाल ?
एक ना दोन , अनेक प्रश्न तयार होते , पण म्हातारी त्यांच्याकडे बघत नव्हती .
त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता .
रिकामटेकडे बघे मात्र चर्चा करीत होते .
थोड्या वेळाने म्हातारीने एक पितळी डबा हाती घेतला . त्याच डबक्यातल्या पाण्याने धुतला . आणि उघडून बघ्यांच्या गर्दीतल्या सर्वांसमोर धरला .
त्यात पाचशेच्या दहाबारा नोटा होत्या .
एक सोन्याचं मंगळसूत्र होतं . आणि चांदीचे चार वाळे होते .
” हे घ्या सोनं , चांदी आणि होते नव्हते ते पैसे . तुम्हाला या मदतीची गरज आहे ! यातून तुम्हाला नवीन मोबाईल घेता येईल , प्रसिध्दी मिळेल आणि फेसबुक की कायसं असतं ना , त्यावर टाकता येईल . हे घ्या . मला आता याचा उपयोग नाही . टिव्ही वाल्यांना पण द्या . ”
म्हातारीनं सगळ्यांसमोर डबा ठेवला . पाठी वळली .
गर्दीतल्या बघ्यांच्या माना खाली झुकल्या होत्या . मोबाईल बंद झाले होते. चॅनल वाल्यांचे बूम बंद पडले होते . आणि कॅमेरा वाल्यांनी अँगल बदलला होता .
आता मात्र खाली झुकलेल्या प्रत्येकाला जाणवत होतं…
– आपले पाय मातीनं जरा जास्तच बरबटले आहेत …!
– श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६
——–
कथा नावासह शेअर करायला माझी काहीच हरकत नाही .
मात्र कथेतील आशयावर चिंतन जरूर करा .
Leave a Reply