महाराज म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनांत आठवतात, ते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्याबद्दल लिहायला सुध्दा पात्रता लागते, ती मी मिळवलेली नाही. पण महाराज हे विशेषण इतरही कांही जणांसाठी वापरलं जात. विशिष्ट प्रकारचा मसाल्याचा चहा आणि बरोबर फाफडा बनवून विकणा-यांनाही महाराज म्हणतात. गुजरात मारवाडमधे स्वयंपाक्यांनाही महाराज म्हणतात. पण त्यांच्याबद्दलही मला आता लिहायचं नाही. राजे महाराजे लोकशाही जमान्यात वाहून गेले. त्यातले कांही कोणत्या तरी पक्षाच्या आधाराने टिकून आहेत. पण अशाही कुठल्या महाराजावर लिहायच नाहीय. मला लिहायचय आमच्याकडे लहानपणी येणा-या एका साधु महाराजांबद्दल.
◼
आमच्याकडे वर्षातून दोन तीन वेळा एक साधु महाराज येत असत. ठराविक मुदतीने ते येत नसत. कधीतरी अचानक हजर होत. संपूर्ण भगवा वेष. म्हणजे भगवं धोतर आणि वर भगवं उत्तरीय. दाढी मिशा वाढलेल्या आणि काळ्या भोर केसांचा गुंडाळा करून डोक्याच्या मधोमध बुचडा बांधलेला. एका हातांत कमंडलु. पाणी पीण्यासाठी असावा. फक्त सिनेमा-नाटकांत मात्र तो हातावरून पाणी सोडून एखाद्याला शाप देण्यासाठी तो असतो. एका हातात साधुंची विशिष्ट अर्धी काठी. काय बरं म्हणतात त्याला? हं, छाटी. कांखेत झोळी. तीही भगवीच. गळ्यांत, मनगटाला रूद्राक्षाच्या माळा. कपाळाला भस्म फांसलेले. असे अगदी टीपीकल बैरागी साधु होते ते. तेच आमचे महाराज. जाडे नव्हते आणि अशक्तही नव्हते. मध्यम प्रकृतीचे होते. चेह-यांवर हास्य असे.
◼
माझे वडील त्यांना महाराज म्हणत. ते हिंदीच बोलत. त्यांच्या हिंदी उच्चारांवरून ते मध्यप्रदेशातले किंवा उत्तरेतले असावेत. वडीलांनी एकट्याने केलेल्या कोणत्या तरी यात्रेत त्यांची ओळख झाली असावी. ते घरापासून वीस फूटांवर असतांनाच “भगत”, “आत्माराम” अशा नांवानी माझ्या वडीलांना पुकारत. माझ्या वडीलांना त्यांच्या ‘आत्माराम’ या नांवाने हांक मारतांना मी इतर कधीच कुणाला ऐकले नाही. मग वडीलांनी बाहेर जाऊन ‘ या महाराज’ म्हटलं की ते घरांत येऊन स्थानापन्न होत. अगदी लहानपणी साधु महाराज आले म्हणजे आम्हाला खूप मोठी गोष्ट वाटायची. घर लहान असल्यामुळे आम्ही तिथेच बसलेलो असायचो. महाराज वडीलांबरोबर काय गप्पा करत ते सर्व आता आठवत नाही. परंतु वडील बरंच ऐकण्याचं काम करीत आणि महाराज सांगण्याचं. महाराज मराठी बोलत नसले तरी महाराजांना मराठी समजत असावं. असा संवाद जास्त असे. महाराज आपण केलेल्या यात्रांबद्दल सांगत. अर्थातच त्यांत कठीण यात्रांच वर्णन जास्त असे. त्यांच्या गप्पांवरून त्यांचा संचार हिमालयापासून रामेश्वरपर्यंत असावा.
◼
ते येत तेव्हां प्रत्येक वेळी एखादी नवी वस्तु घेऊन येत. कधी एखादा रूद्राक्ष असे. तर कधी एखादा शंख असे. मग ते त्याची महती सांगत. तो कसा क्वचितच प्राप्त होतो ते सांगत. रूद्राक्षाचे प्रकार आणि प्रत्येकाचं महत्त्व समजावून सांगत. बरेचदां ती वस्तू देऊन जात. एकदां कसल्यातरी बिया घेऊन आले होते. मनुकांमधे असतात तशाच बिया होत्या त्या. परंतु त्यांचा आकार बराचसा शंकराच्या पिंडीसारखा होता. महाराज ती निसर्गनिर्मित शिवलिंगे आपल्या मोजक्या भक्तगणांना देत होते असावेत. अशा वस्तु किती दुर्मिळ असतात आणि त्यांचा प्रभाव किती असतो हेही ते सांगत. पण ते हे फसवण्यासाठी सांगताहेत असं मुळीच वाटत नसे. कारण त्यांचा स्वतःचा तसा ठाम विश्वास असे.
◼
महाराज कधी जेवत नसत. शिधा चालत असे त्यांना. पण खरं तर पैसेच हवे असत. ते कुठे रहात, कुठे खात, कुठे झोपत हे कांही माहिती नव्हतं. परंतु ते वसई-वज्रेश्वरीकडून कुठून तरी येत असावेत. तिथे त्यांच्यासारख्या इतर साधूंचीही वस्ती असावी. पूर्वी साधूंना कोणी तिकीट विचारत नसे. महाराज तिकीट काढतही नसत. मात्र ते कधी प्रवाशी बाकांवरही बसत नसत. ते दरवाजापाशी खालीच बसत. देशांत कुठेही असाच प्रवास करत असत. जर एखादा अगदीच खत्रूड टी. सी. आला आणि त्याने वाटेतच उतरवलं तरी त्यांना खंत नसे. त्यांचे सर्व सामानही एका झोळींत मावेल एवढेच असे. त्याकाळांतील बहुसंख्य लोक, सर्वधर्मीय लोक, साधु/बैरागी, फकीर यांचा आदर करीत. संसार-त्याग करणे, निःसंग बनणं हे सोपं नाही याची लोकांना जाणीव होती. आतांच्या दिवसात भीक मागण्याचा एक प्रकार समजून ब-याच साधूंची अवहेलनाच होते. तर कांही साधू राजकीय नेत्यांचे गुरू होतात. किंवा मोठे आश्रम काढतात. आमचे महाराज मोठ्या लोकांच्या शोधांत नसत. त्यांच्या गरजा खरंच कमी होत्या. तुमचे दोन, पांच/दहा रूपये त्यांना खूप होतं.
◼
आमचे वडील वारल्यानंतरही महाराज आमच्याकडे येतच असत. पुढे मी बोरीवलीला रहायला गेलो. तर माझा भाऊ आणखी दोन वर्षे तिथेच होता. महाराज भावाकडे येत राहिले. माझा भाऊ त्यांना आदराने वागवी. ते त्याला भगतका बेटा असे म्हणत. माझा भाऊ भाविक असल्यामुळे त्यांनी आणलेल्या वस्तु तो ठेऊन घेई. मात्र त्या त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूजेत ठेवत नसे. तो त्या एकत्र एका डब्यात ठेऊन देई. कधी कधी ते कुठल्यातरी देवदेवतेचा अंगारा घेऊन येत. एकदा भावाला एक नैसर्गिक लांबट गोल खडा आणून दिला. तो एखादा डोळा असावा असा दिसत होता. वेगळ्या प्रकारचा शाळीग्रामच म्हणा ना. शंकराचा तिसरा डोळा म्हणून त्याची पूजा करा असे महाराज म्हणाले होते.
◼
ह्या सर्व वस्तु देतांना ते ह्याची पूजा केल्याने तुमची भरभराट होईल असे सांगत. भाऊ देईल तेवढे पैसे घेत असत. पण अधिक मागत नसत. कमी झाले म्हणून तक्रार करत नसत. समाधान दर्शवून ” भगवान तुम्हारा बहुत भला करेगा.” “भगवान आपको बहुत देगा,” असा भरघोस आशीर्वाद देत. प्रसन्न वाटेल असं बोलतं. अर्धा-पाऊण तास बसत. हातात पैसे पडले की मग उगाचच फार वेळ बसत नसत. त्यामुळे त्यांचा त्रास असा वाटत नसे. भाविक माणसाला त्यांचे येणे शुभ वाटे. आता कधी कधी कुंभमेळा किंवा इतर कांही कारणांने साधुंची जी प्रतिमा समोर येते तसे ते मुळीच नव्हते. त्यांचा तसा कोणाला त्रास नव्हता. अर्थात इतरत्र ते कसे वागत, त्यांचा समुदाय ( आता झुंड) कसा वागे ह्या विषयी कांही माहिती नव्हती. खरं म्हणजे त्यांच्याबद्दल असे प्रश्न त्या वयांत कधी पडलेच नाहीत.
◼
पुढे भावानेही अंधेरीचे घर सोडले. तो गोरेगांवला नव्या जागेंत रहायला गेला. आमच्या वाडीत पुढेच वाण्याचे दुकान होते. भावाने गोरेगावला जाताना आपला नवा पत्ता वाण्याकडे ठेवला आणि त्याला महाराज आले की त्यांना तो द्यायला सांगितला. त्याच्याकडून पत्ता घेऊन महाराज यथावकाश भावाकडे गोरेगावच्या घरी येऊ लागले. गोरेगावच्या सोसायटीचा गुरखा त्यांना आंत जाऊ देत नसे. महाराज भाऊ बाहेरून यायच्यावेळी गेटशी येऊन बसत व त्याच्या बरोबरच घरांत जात. भाववाढ, पगारवाढ होत होती, तसा भाऊ महाराजांच्या हातावर ठेवायची रक्कमही स्वतःहूनच वाढवत गेला. त्यांना कधी मागायला लावले नाही. तेही येताना आतां वस्तु जरा ठसठशीत आणू लागले. मोठा उजवा शंख, डावा शंख, गणपतीसारखे वाटणारे सुंदर दगड, एकमुखी रूद्राक्षांची माळ, अशा विविध वस्तू ते आणू लागले. त्यांनी दुकानातल्या वस्तू कधी आणल्या नाहीत.
◼
महाराज भरपूर आशीर्वाद देत पण कधीही अध्यात्म, परमार्थ ह्याविषयी मोठ्या मोठ्या गप्पा मारत नसत. त्यांनी भगवी वस्त्रे कधी आणि कां परिधान केली होती कुणास ठाऊक! संसाराला कंटाळून? भवभय म्हणजे संसारांतील आपत्तींच्या भीतीने? अत्यंत गरीबीमुळे? सिध्दी प्राप्त करण्यासाठी की अध्यात्म अथवा परमेश्वर यांच्या शोधांत? बहुदा फार लहानपणीच त्यानी भगवी वस्त्रे परिधान केली असावीत. पण त्या भगव्याबरोबर येणारं वैराग्य ब-याचं प्रमाणात त्यानी स्वीकारलं होतं. गृहस्थाच्या घरी शिजलेलं अन्न ते खात नसत. मिळालेल्या पैशातून विकत घेऊन, किंवा शिध्यातून आलेले धान्य वापरून ते स्वतःच्या हाताने जेवण तयार करूनच ते भूक भागवत. आवश्यकतेपेक्षा जास्त पैसा ते जमवत नसावेत. तसेच त्यानी कधी हुक्कापाणी किंवा इतर नशीले पदार्थ घेतले असतील असं वाटत नाही. त्यांच वागण सभ्य असे, बोलणं सभ्य असे. ठराविक घरी ते आपल्या मर्यादित गरजा भागविण्यासाठी दक्षिणा घ्यायला जात. बदल्यांत आशीर्वाद देत. आपण चमत्कार करतो असंही कधी त्यांनी भासवलं नाही. भाऊ मात्र मला म्हणाला होता की महाराज अचानक कधी तरी येतात पण ते यायच्या आधीच बहुदा मला त्यांच्या येण्याची सूचना मिळते. एकदा त्याला स्वप्नांत येऊन चपला मागितल्या. चार दिवसांनी महाराज आले आणि म्हणाले, “आते आते रास्तेमे मेरी चप्पल टूट गयी.” भावाने आधीच नवीन चप्पलजोड आणून ठेवला होता, तो त्यांना दिला. योगायोग? बहुतेक योगायोगच. ध्यानी, मनी ते स्वप्नी. भावाला त्यांना चांगल्या चपला द्यायची इच्छा असणार. जरी त्यांची चप्पल तुटली नसती, तरी भावाने त्यांना नव्या चपला दिल्याच असत्या. एकदा त्यांनी भावाला विचारलं की वडीलांनी त्याच्याकडे स्फटीकाची माळ दिली आहे कां? भावाने सांगितले, ” वडीलांकडे आम्ही कोणी कधी स्फटीकाची माळ पाहिली नाही. वडीलांच्या वस्तूमधेही अशी माळ नव्हती.” महाराज स्वतःच म्हणाले, ” भगतने किसी औरको दी होगी.” पुढे भावाने तेही घर बदलले. तेव्हाही त्याने आपला नवा पत्ता ठेवला होता. त्याला आता बरीच वर्षे झाली. पण महाराज नव्या घरी आले नाहीत.
◼
महाराजांना पत्ता मिळाला नाही म्हणून ते आले नाहीत की काय ते कधी कळलं नाही. कदाचित लोकलने प्रवास करणे त्यांना अशक्य झाले असेल. महाराज आमच्या लहानपणी घरी येत तेव्हां त्यांच वय काय असावं ते नक्की कळत नसे. दाढी, मिशा आणि केस यांच्या रंगावरून फार तर चाळीशीच्या आसपासचे वाटत. महाराज योग वगैरेच्याही गोष्टी करत नसत. भावाकडे २००२ च्या सुमारास ते अखेरचे आले. त्यावेळीही ते तसेच दिसत. किंचित वाकले होते. पण त्यांचे केसही बरेचसे काळेच होते. तेव्हा ते आपले वय १२५ म्हणून सांगत. ते कांही आम्हाला खरं वाटत नसे. तरीसुध्दा गेली पन्नासहून अधिक वर्षे आम्ही त्यांना पहात होतो आणि ते साधारण ८५-९०ला नक्कीच पोंचले असावेत. पण त्या मानानेही ते वृध्द वाटत नव्हते. माझीच तेव्हा साठी उलटली होती आणि केस पांढरे झाले होते. पण त्यांच्या वयाचं गूढच राहिलं. त्यानंतर ते आलेच नाहीत. आता मात्र अचानक परत आले आणि त्यांनी आपलं वय १४० सांगितले तर मी डोळे मिटून विश्वास ठेवीन.
अरविंद खानोलकर
Leave a Reply