चिकूचे शास्त्रीय नाव Acharas sapota (family Sapotaceaae) आहे. यास Manilkara zapota (family Z apotaceae) असेही नाव आहे. सुमधुर फळाबद्दल परिचित असलेल्या या मध्यम आकाराच्या (सु. ८–१० मी. उंचीच्या) वृक्षाचे मूलस्थान मेक्सिको असून आता उष्ण कटिबंधातील सर्व प्रदेशांत तो लागवडीत आहे. महाराष्ट्रात कुलाबा व ठाणे या जिल्ह्यांत आणि गुजरातच्या दक्षिण भागात व सौराष्ट्रात अधिक पिकवितात. महाराष्ट्रातील डहाणू येथील चिक्कू प्रसिद्ध आहेत. तेथे दरवर्षी चिक्कू महोत्सव भरतो.
चिकू हा दीर्घायू, सदाहरित वृक्ष आहे. याची वाढ सावकाश होत असून तो सरळ वाढतो. मोकळ्या जागेत, घरगुती बागेत हा वृक्ष ३-४ मी. पर्यंत उंच वाढतो तर वनांमध्ये तो सुमारे ३० मी. वाढतो. पाने सदाहरित, चकचकीत, एकाआड एक आणि दुभागलेल्या फांद्यांच्या टोकाला गुच्छाने येतात. ती आकाराने लंबवर्तुळाकार, टोकांना टोकदार व ७-१२ सेंमी. लांब असतात. फुले पांढरी, चटकन नजरेत न भरणारी व लहान घंटेच्या आकाराची असून दलपुंज ६ दलांचे असते. मृदुफळे गोल, अंडाकृती, ५-१० सेंमी. व्यासाची, किंचित फिकट तपकिरी रंगाची असतात. बिया २-५, काळ्या चकचकीत व किंचित चपट्या असतात. फळातील मगजाचा (गराचा) रंग किंचित पिवळसर ते तपकिरी असतो. पिकलेले फळ गोड आणि चवदार असते. कच्चे फळ कडक असून त्यात सॅपोनीन हा टॅनिनासारखा एक पदार्थ असतो. चिकूच्या झाडाला फुले वर्षभर येत असली तरी फळे वर्षातून दोनदा येतात. फळे झाडावरून उतरवून ठेवल्याशिवाय पिकत नाहीत.फळ गोड, खाद्य व पौष्टिक आहे. कच्चे फळ कडक असून खरवडल्यास त्यातून टॅनीनयुक्त चीक येतो. या झाडाच्या सालीतूनही चीक येतो. दक्षिण मेक्सिकोत व मध्य अमेरिकेत झाडाच्या खोडावर तिरप्या त्याचा खाचा पाडून चीक गोळा करतात. हा चीक गाळून, गरम करून व कुसकरून त्याला इष्ट आकार देतात. याला व्यापारात चिकल गम असे नाव आहे. एका झाडापासून दरसाल दोन-तीन किग्रॅ. चीक मिळतो. च्युइंग गम बनविण्यासाठी चिकल गम हा पूरक घटक म्हणून वापरतात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दरवर्षी मेक्सिकोतून सु. २,००० टन चिकल गमची आयात होते.
चिकूच्या १२-१३ जाती भारताच्या निरनिराळ्या भागांत लागवडीखाली असल्या, तरी त्यांचा आपापसातील फरक अजून स्पष्ट झालेला नाही. निरनिराळ्या जातींच्या झाडांवर मुख्यतः गोल आणि अंडाकृती फळे येतात. दोन्ही प्रकारची फळे एकाच झाडावर एकाच वेळी किंवा वर्षांतील निरनिराळ्या ऋतूंमध्ये आढळतात. पश्चिम किनाऱ्यावर आढळून येणाऱ्या निरनिराळ्या जातींपैकी ‘काळी पत्ती’ जातीची फळे उत्कृष्ट असतात. त्यांचा आकार लंबगोल आणि मगज खोड व स्वादिष्ट असतो. याच भागातील ‘छत्री’ या दुसऱ्या जातीची फळे लंबगोल असून काळी पत्तीच्या खालोखाल चांगली असतात. ‘क्रिकेट बॉल’ किंवा ‘कलकत्ता मोठी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जातीची फळे क्रिकेटच्या चेंडूसारखी मोठी, मध्यम प्रतीची, दाणेदार मगजाची व मध्यम गोड असतात. या जातीची झाडे समुद्रसपाटी पासून ३०० मी.पेक्षा कमी उंचीवरील कोरड्या हवामानाच्या प्रदेशात चांगली वाढतात. दक्षिण भारतात वाढणाऱ्या जातीत ‘द्वारापुडी’ या जातीची फळे क्रिकेटच्या चेंडूसारखीच पण आकाराने लहान असतात. ‘किर्तवर्ती’ या आंध्र प्रदेशातील लोकप्रिय जातीच्या फळाचा आकार लंबगोल, साल खरखरीत व चव गोड असते. आंध्र प्रदेशातील व्यापारी दृष्ट्या महत्त्वाच्या ‘पाला’ या जातीची फळे गोल लंबगोल, लहान, पातळ सालीची आणि स्वादिष्ट असतात. भारतात चिकू सर्वत्र लोकप्रिय आहे.
हवामान : चिकूची लागवड उष्णकटिबंधीय हवामानात समुद्रकिनारपट्टीतील जमिनीत, १५०–३०० सेंमी. पर्जन्यमानाच्या प्रदेशांत करतात. दक्षिण भारतातील उष्ण आणि दमट हवामानातही समुद्रसपाटीपासून १,००० मी. उंचीवरील प्रदेशातसुद्धा चिकू चांगला वाढतो. झाडाला अतिशीत हवामानापासून अपाय होतो आणि ४३•३° से.पेक्षा जास्त उष्ण हवामानात फुले व फळे करपतात.
जमीन : चिकूला निरनिराळ्या प्रकारची जमीन चालते. त्याचा मुळवा खोल नसतो. समुद्रकिनारपट्टीतील रेताड, सच्छिद्र, तांबडी पठारावरील गाळवट दख्खनमधील खाली मुरूम असणारी पाण्याचा निचरा होणारी मध्यम काळी जमीन चिकूला चांगली असते.
लागवड : गुटीची अथवा भेट कलमे लावून लागवड करतात. भेट कलमे खिरणीच्या खुंटावर करतात. लागण नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ६०× ६०× ६० सेंमी. मापाच्या खड्ड्यांत करतात. खड्डे भरपूर पावसाच्या प्रदेशात १०–१२ मी. आणि कोरड्या क्षेत्रात ७-८ मी. चौरस अंतरावर काढतात. कलमे पावसाळ्याच्या आधी किंवा नंतर ऑक्टोबर ते जानेवारी या मुदतीत लावतात. कलमाजवळ काठी रोवून त्याला आधार देतात.
छाटणी : चिकूच्या झाडाला निसर्गतः योग्य जागी फांद्या फुटून त्याला समतोल आकार मिळतो. त्यामुळे सुरूवातीला छाटणी करण्याची आवश्यता नसते. मात्र कलमाच्या जोडाखाली खुंटावर फुटणाऱ्या फांद्या नियमितपणे काढाव्या लागतात. पुढे झाडावर वाळलेल्या फांद्या दिसल्या, तर त्याही छाटून काढतात.
फळे : कलमाला साधारणपणे चौथ्या वर्षी फळे येऊ लागतात. व्यापारी दृष्ट्या चिकूचे आयुष्य ४० वर्षे धरतात, पण जुनी ७५ वर्षांची भरपूर फळे देणारीही झाडे आढळतात. चिकू सदापर्णी असून त्यावर वर्षभर थोड्या थोड्या दिवसांनी नवीन पालवी आणि मोहोर फुटतो. फळ पक्व व्हावयाला ४-५ महिने लागतात. जरी वर्षभर थोडी फार फळे येत असली, तरी भरपूर फळे डिसेंबर ते फेब्रुवारी आणि मे ते जून या काळातच येतात. दक्षिण भारतात जानेवारी ते जून आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात भरपूर फळे येतात. फळे झाडावरच पूर्ण पिकू देत नाहीत कारण पक्षी अशा फळांची नासाडी करतात किंवा ती झाडावरून पडून नुकसान होते. तयार झालेल्या फळावर फिकट पिवळा नारिंगी किंवा तपकिरी रंग येतो आणि सालीवरून तपकिरी भुकटीसारखा थर निघू लागतो. नखाने खरवडल्यास सालीचा रंग पिवळसट दिसतो व सालीतून चीक निघत नाही. पूर्ण वाढ झालेली फळे देठासकट एकएक हाताने तोडून लगेच उबदार जागेत ठेवतात. ती नरम व खाण्यास योग्य होण्यासाठी पाच-सहा दिवस लागतात.
उत्पन्न : चौथ्या वर्षी चिकूच्या दर झाडापासून सरासरीने २०० पर्यंत फळे मिळतात. ही फळसंख्या दरवर्षी वाढत जाऊन सात-आठ वर्षांनी ७००–८०० व २० वर्षांनी १,५००–२,००० पर्यंत जाते. काही जातींच्या दर झाडापासून २,५००–३,००० पर्यंत फळांचे कमाल उत्पन्न मिळू शकते.
विक्री : जरी निश्चित प्रमाण ठरलेले नसले, तरीसुद्धा चिकूच्या फळांची त्यांच्या आकारमानाप्रमाणे मोठी फळे ५ सेंमी. किंवा त्यापेक्षा जास्त व्यासाची, मध्यम ३-५ सेंमी. व्यासाची आणि लहान ३ सेंमी. पेक्षा कमी व्यास असलेली अशी प्रतवारी करण्यात येते. गोल व लांबट फळांची वर्गवारी निरनिराळी करतात. विक्रीसाठी पाठविण्याची फळे तोडून घेतल्यावर लगेच बांबूच्या करंडीत भाताचा पेंढा किंवा गवत यांच्या थरांत बसवून करंडी बंद करतात व पिकलेली पण चांगली जुन झालेली कठीण फळे १०° ते १३° से. तापमानात साठविल्यास ५-६ आठवडे चांगल्या प्रकारे टिकू शकतात.
चिक्कूचे व्यावसायिक उपयोग :
चिकू फळाचे आरोग्यदायी घटक –
खनिजे (Minerals), जीवनसत्वे (Vitamins)
सोडियम : ०% व्हिटॅमिन ए : १%
पोटँशियम : ५% व्हिटॅमिन सी : २४%
मॅंग्नेशियम : ३ % व्हिटॅमिन बी ६ : ०%
कोबालमिन : ०%
चिकू हे फळ त्याच्या गोड चवीमुळे सर्वाचेच आवडते आहे.
१. बालकांना अभ्यास व खेळण्यामुळे शारीरिक व मानसिक थकवा आल्यानंतर चिकू खायला दिल्याने त्यांच्यात नवा उत्साह व शक्ती संचारते. त्यामध्ये फलशर्करेच प्रमाण अधिक असल्याने ती रक्तात मिसळून लगेचच थकवा घालवते.
२. चिकूच्या झाडातून चिकल नावाचा डिंक बाहेर निघतो तसेच त्याच्या सालीमधून चिकट दुधी रंगाचा रसचिकल नावाचा डिंक काढण्यात येतो. वस्तू चिकटवण्यासह या डिंका पासून च्युइंगमही बनवण्यात येते.
३. ताप आलेल्या रुग्णांचं जर तोंड बेचव झालं असेल तर चिकू खावा. त्याने तोंडास रुची निर्माण होऊन उत्साह निर्माण होतो.
४. चिकू पासून चिकू स्क्वॅश, चिकू जॅम, चिकू शेक,चीकू आईस्क्रीम व चीकू वाईन बनवतात.
५. मिठाईत चिकू हलवा, पेढे यांचा समावेश आहे.
चिकूचे औषधी उपयोग :
१. कॅन्सर : चिकू फळात फायबर आणि अँटिऑक्सिडेन्ट भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपला कॅन्सर सारख्या रोगापासून बचाव होतो. ह्यात व्हिटॅमिन बी व व्हिटॅमिन ए देखील भरपुर प्रमाणात आहे. ह्यात व्हिटॅमिन ए असल्यामुळे आपल्याला तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.
२. मानसिक आरोग्य : चिकू खाण्याचे फायदे चिकू फळाचे सेवन केल्याने आपले मानसिक आरोग्य चांगले राहते. ह्या फळाच्या सेवनाने शरीरातील थकवा व मानसिक ताणतणाव कमी होण्यास मदत होते. ज्यांना झोपेचा त्रास आहे किंवा कोणत्यातरी चिंतेनेग्रस्त असलेल्या पीडित लोकांना चिकू फळाच्या सेवनाने आराम मिळतो.
३. केसांसाठी : केसातील कोंडा घालवण्यासाठी चिकूंच्या बियांची पेस्ट बनवा त्यात एरंडी तेल मिक्स करा हे मिश्रण केसांच्या त्वचेवर लावा आणि केस दुसऱ्यादिवशी सध्या पाण्याने धुवून काढा त्यामुळे आपल्या केसांतील कोंडा निघून जाईल. तसेच चिकू खाण्याने केस चमकदार होतील.
४. डोळ्यांसाठी : चिकू फळ आपल्या डोळ्यांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांची बघण्याची शक्ती वाढते.तसेच वयस्कर लोकांना होणारे आजार मोतियाबिंदू व रातांधळेपणा सारख्या होणाऱ्या समस्या कमी होतात.
५. गरोदर महिलांसाठी : चिकू खाण्याचे फायदे गरोदर महिलांसाठी देखील खूप आहेत. कॅल्शियम ,आयरन, फॉस्फरस ची मात्रा भरपूर प्रमाणात असते . गर्भावस्थेत लागणारे कार्बोहैड्रेट ह्या फळात असल्यामुळे व तसेच गरोदरपणात उलट्या होणे, चक्कर येणे, मन चलबिचल होणे या सारख्या समस्यांवर आराम मिळतो. त्यामुळे चिकू या फळाचे सेवन करणे गरोदर महिलांसाठी फायदेशीर आहे.
६. रोग प्रतिकारकशक्ती वाढवते : ह्यामध्ये अँटिऑक्सिडेन्ट,व्हिटॅमिन सी, अँटिव्हयरल आणि अँटीबॅकटेरियल गुण असल्यामुळे आपल्या शरीरात पसरणारे व्हायरस आणि विषाणूंना नष्ट करतात . ह्यात असणारे पोटॅशियम, आयरन आणि फोलेट आपली पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. चिकू मध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते. सद्धया कोरोनाच्या काळात त्यामुळे यास फार महत्व प्राप्त झाले आहे.
७. हाडांच्या वाढीसाठी : चिकूमध्ये कॅल्शियम, आयरन आणि फॉसफरस भरपूर प्रमाणात आहेत जे आपल्या हाडांसाठी खूप आवश्यक आहे. ह्यात असणाऱ्या कॅल्शियम,फॉसफरस आणि आयरन मुळे आपल्या हाडांची वाढ चांगल्या प्रकारे होते. व आपली हाडे मजबूत होतात. त्यामुळे चिकू ह्या फळाचे सेवन करणे आपल्याला खूप लाभदायी आहे
८. त्वचेसाठी फायदेशीर : चिकू खाण्याचे फायदे आपल्या त्वचेसाठी देखील भरपूर आहेत. कारण चिकू ह्या फळात अ जीवनसत्व सोबत व्हिटॅमिन बी आणि इ मुबलक प्रमाणात असतात. चिकू मध्ये व्हिटॅमिन इ तत्व मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्वचा चांगली व चमकदार राहते.
सावधानता –
कच्चे चिक्कू खाऊ नयेत, कारण हे चिक्कू बेचव असतात व त्यामधील चिकामुळे तोंड कोरडे पडते तसेच मलावरोध व पोटात दुखणे या तक्रारी दिसून येतात. पिकलेला चिक्कू स्वच्छ धुऊन खावा. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी सहसा चिक्कू खाऊ नयेत किंवा कमी प्रमाणात खावेत.
चिकू हे फळ मराठी म्हणीं मद्धे बदनाम असले तरी त्याचे फायदे पाहिल्यास हि म्हण खोटी ठरेल.
— डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
Very nice and useful article!