नवीन लेखन...

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग २ – जांभूळ

सध्या जांभळाचा सिझन आहे. रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यावर असलेल्या करंडीत आकर्षकपणे लावलेली जांभळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

ह्या जांभळाच्या फळांची माहिती घेऊ.

याचे शास्त्रीय नाव Syzygium cumini आहे

मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते.

महाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. महाराष्ट्रात जांभूळ वृक्ष हा समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णीय वृक्षगटाचा अविभाज्य घटक आहे. अजनी, पिसा, हिरडा, आंबा या वृक्षांच्या जोडीला हा वृक्ष उगवतो. महाराष्ट्रात महाबळेश्वर, माथेरान, भीमाशंकर, वासोटा, कोयना परिसर, सावंतवाडी-आंबोली परिसर या ठिकाणी उल्लेखिलेली अरण्ये आहेत. माकडे, वटवाघळे, फलाहारी पक्षी यांचा हा आवडता वृक्ष आहे. फुलांचे परागण, बियांचे विखुरणे व पुनरुज्जीवन यांच्यामुळे होते.

नैसर्गिक लागवड बियांपासून होते. झाडाचे रोप लावल्यानंतर साधारणपणे ६-८ वर्षांमध्ये फळे येतात. तर संकरित जातींची लागवड कलम पद्धतीने करतात. त्याला फळे ५-६ वर्षात येतात. मुख्य जाती म्हणजे मधुर फळाचा वृक्ष उर्फ ‘राजजम्बू’ व लहान आकाराच्या, कमी गराच्या फळांचा वृक्ष म्हणजे ‘क्षुद्रजम्बू’ किंवा ‘काष्ठजांभूळ’. माथेरानला सर्वत्र वाढणारी ‘लेंडीजांभूळ’ दुसर्‍या प्रकारात मोडते.

मुख्यत: उष्ण कटिबंधीय देशांतून वास्तव्य असलेला हा वृक्ष सरळसोट १५० फुटांपर्यंतसुद्धा वाढतो, खडकाळ भूमीत मात्र यास ठेंगणे रूप प्राप्त होते. पाने सुवासिक ग्रंथियुक्त असतात. ती चकचकीत चामड्यासारखी दिसतात. या पानांचे वैशिष्ट्य म्हणजे पानांच्या कडेने स्पष्ट असणारी शीर पानाच्या खालपासून टोकापर्यंत जाते व इतर सर्व शिरांशी संयोग करते. या शिरेस ‘इंट्रामार्जिनल व्हेन’ अशी संज्ञा शास्त्रज्ञांनी दिलेली आहे.

जांभळाच्या झाडाची फुले नाजूक हिरवट, पांढरी सोनेरी रंगाची असतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोहर येतो व अंती फळ तयार होते. फळे अंडाकृती, प्रथम परिपक्व झाल्यावर तांबूस-वांगी रंगाची तर अतिपक्व झाल्यावर गर्द जांभळ्या रंगाची होतात. या फळाची गणना ‘मृदुफळांत’ होते व ते साधारण २-२ १/२ इंच लांबीचे, लांबोड्या आकाराचे असते. फळात एकच बी असते. गर हा पांढऱ्या व जांभळ्या रंगाचा असतो. कृष्णगिरी ही जांभळाची जात कोइंबतूर भागात प्रसिद्ध आहे.

जांभूळ वृक्षाचे लाकूड टणक, टिकाऊ असून ते पाण्यात कुजत नाही, रंग साधारण भुरकट तपकिरी असून त्याच्या प्रत्येक घन फुटाचे वजन २०-२२ किलो भरते. लाकडाचा उपयोग घर बांधणीसाठी, छोटी अवजारे बनविण्यासाठी करतात. फांद्या,खोड यांचा उपयोग जळणासाठी व पाल्याचा उपयोग गुरांच्या चारासाठी होतो. चांगली वाढलेली जांभूळ झाड शेतकऱ्यास वर्षात ५० किलो उत्पन्न देते.

औषधी उपयोग –

१. हा पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा ठरतो. जांभळाचे फळ उद्दीपक, पाचक व यकृतोत्तेजक आहे.
२. हे मधुमेहावरती उत्तम औषध आहे. जांभूळ रसाच्या, तसेच बीच्या भुकटीत मधुमेहाला नियंत्रित करण्याचे औषधी गुणधर्म आहेत. बियांचे चूर्ण ही उपयोगी आहे पण ते तज्ञ वैद्द्यांच्या सल्ल्यानेच घ्यावे. भारतामध्ये मधुमेही व्यक्तींचे प्रमाण गेल्या दशका पासून वाढत आहे. त्यांच्या मागणीमुळे गेले ५-६ वर्षात जांभळाचे व त्यापासून बनवलेल्या औषधाचे दर अस्मानाला भिडले आहेत.
२. जांभूळ रक्तशुद्धीकारक आहे. चेहर्‍यावरच्या मुरूम व पुटकुळ्या जांभळीच्या बिया उगाळून लेप केल्याने जातात.
३. जांभूळ हे पाचक आहे असेही मानले जाते.
४. याच्या नियमित सेवनाने केस लांबसडक व मजबूत होतात. यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने शरिरास आवश्यक ते पोटॅशियम याचे सेवनाने मिळते. अग्निमांद्यात याचे रसाचे सेवन लाभकारी आहे.
५. सुगंधी पाने व गुणकारी बीज,फळे,फुले असलेल्या या वृक्षाचा उपयोग प्राचीन काळी व सध्या सौंदर्य प्रसाधनांसाठी (फेस पॅक) करण्या करता होतो.
६. मुखशुद्धीसाठी बियांचे चूर्ण तर शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी आणि पाने व फळांचा उपयोग केशकलपासाठी होतो.
७. हा वृक्ष जरी वन्य असला तरी बऱ्र्‍याचशा उद्यानातून, उपवनातून, देवळाभोवती व देवरायांतून लावलेला असतो. गणेश, शिव, कृष्ण या देवतांना जांभळाची फुले प्रिय असतात असा समज आहे. काही ठीकाणी जांभळाच्या पानाचे तोरण मंगल समयी दाराला लावण्याची प्रथा आहे.
असा हा सर्व गुण संपन्न जांभूळ वृक्ष सर्वांना प्रिय आहे.

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 78 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

4 Comments on महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग २ – जांभूळ

  1. सुंदर.अभ्यासपूर्ण व उपयुक्त माहिती. असेच इतरही वनस्पतीबद्दल लिहा

  2. It is really a valuable information by
    Dr. DK Kulkarni, Sr.Principal Scientist
    ( Rtd) frome NCL, Pune. Thanks to him
    for sharing.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..