महाकवी महर्षी वाल्मिकी; ज्यांनी हिंदू संस्कृतीचा प्राण असलेल्या अजरामर रामायण या महाकाव्याची रचना केलेली आहे. त्यांच्या जन्माच्या तारखेची नोंद कुठेही आढळत नाही.प्राचीन भारतात त्रेता युगातील काळात त्यांचा जन्म व निर्वाण केव्हा झाला, या संबंधी निश्चित माहिती आढळत नाही.
महर्षी वाल्मिकीचा जन्म महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात असलेल्या वालझरी या गावी झाला, असे मानले जाते.वालझरी हे गाव चाळीसगावच्या दक्षिणेस पाच किलोमीटर अंतरावर चाळीसगाव-पाटस या रस्त्यावर आहे. या क्षेत्राच्या पूर्वेस गायमुखी ही नदी वाहते आणि या क्षेत्राच्या पायथ्याशी एक डोह आहे. या तीर्थस्थानाच्या पूर्वेस पाण्यापर्यंत जाता येईल, अशी सोय केलेली आहे.या डोहाचे पाणी पवित्र असल्याचे मानले जाते. या ठिकाणी महर्षी वाल्मिकीचे एक लहान देऊळ आहे. येथे भगवान शंकराचे मंदिर असून, त्यात जुनी शिवपिंड आहे.हे मंदिर अतिशय पुरातन आहे. राम- लक्ष्मणाची मूर्ती असलेले एक लहान मंदिर आणि गोरखनाथ व वाल्मिकी यांच्या मूर्ती असलेली लहान स्वतंत्र देवळे याच भागात आहेत. येथे पूर्व व पश्चिमेकडे एक मोठा वटवृक्ष आहे, जो महाकवी वाल्मिकी यांच्या काळातील असल्याची लोकांची श्रद्धा आहे.
स्कंद पुराणानुसार, महर्षी वाल्मिकी यांचा जन्म त्रेता युगात आश्विन पौर्णिमा या तिथीला सुमती नामक ब्राह्मण कुटुंबात झाला. त्याचे बालपणीचे रत्नाकर हे नाव होते. त्याचे वृध्द आई-वडील त्याला एका किराताजवळ ठेवून, तपश्चर्येला निघून गेले. दुष्काळ पडल्यामुळे रत्नाकर कामानिमित्त जंगलात गेला. तेथे तो भिल्ल जातीत वाढला. त्यामुळे त्याने भिल्ल परंपरा स्वीकारली आणि कुटुंबाच्या उपजिविकेसाठी तो लुटमार करू लागला. नंतर तो कुख्यात चोर,डाकू बनला. एकदा त्याने सप्तषvना घेरले आणि त्यांना लुटायचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून त्याला विविध उपदेश, बोध मिळाला. तसेच एके दिवशी देवर्षी नारद मुनी जंगलातून जात असताना डाकू रत्नाकरने त्यांना लुटमारीसाठी अडवले आणि बांधून ठेवले. तेव्हा नारद मुनींनी रत्नाकरला विचारले की,तू अशी पापे कशाला करतोस? त्यावर त्याने उत्तर दिले की, मी माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे सर्व करतो. त्यावर नारद मुनी म्हणाले, “ज्यांच्यासाठी तू ही पापे करीत आहेस, तर ते तुझ्या या पापात भागीदार होणार आहेत का?” तेव्हा त्याने उत्तर दिले की, “हो. ते नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणार.” यावर नारदमुनी म्हणाले की, एकदा तू तुझ्या कुटुंबीयांना विचार. असे झाले, तर मी तुला माझी अर्धी संपत्ती देईन.” तेव्हा डाकू रत्नाकरने आपल्या नातेवाईकांना व मित्रांना विचारले की, माझ्या कार्यात आपण मला साथ देणार का? असे विचारल्यावर सर्वांनी त्याला नकारच दिला. याचे त्याला खूप वाईट वाटले.
नारद मुनींनी डाकू रत्नाकरला ‘राम राम’ या मंत्राचा जप करण्याचा उपदेश केल्यामुळे त्याला उपरती झाली. त्यामुळे त्याने चोरी व लुटमारी करणे, सोडण्याचा निर्णय घेतला आणि तपश्चर्येचा मार्ग निवडला. रत्नाकरने राम राम या मंत्राचा जप करायला सुरुवात केली. पण अज्ञानामुळे चुकून राम राम ऐवजी तो मरा मरा असा जप बराच वेळ करू लागला. त्यांनी इतकी आराधना केली की, त्याचे शरीर अशक्त झाले आणि मुंग्यांनी त्याच्या अंगावर मोठे वारुळ बांधले. तरीही त्याला काहीच कळाले नाही.जेव्हा सप्तर्षी परत आले आणि त्यांनी हे वारुळ बघितले, तेव्हा त्यांनी डाकू रत्नाकरला वाल्मिकी अशी उपाधी दिली.वाल्मिकी म्हणजे मुंग्याचे वारुळामध्ये सिध्दी प्राप्त झालेला मनुष्य! त्यांनी आपल्या कठोर तपश्चर्येने ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. परिणामी, त्यांना ब्रह्मदेवाकडून दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि महाकाव्य रामायण लिहिण्याची त्यांना क्षमता प्राप्त झाली.
एकदा वाल्मिकी ऋषी गंगा नदीच्या काठी तपश्चर्येसाठी गेले होते. तेव्हा क्रौंच पक्षाचे जोडपे प्रणयलीला करण्यात मग्न झाले दिसले, त्याचवेळी एका शिकाऱयाने बाण मारून, नर पक्षाला ठार मारले. तेव्हा मादी आक्रोश करू लागली. हे विदारक दृश्य त्यांना सहन न झाल्याने, त्यांनी त्या शिकाऱयास शाप दिला. तो नकळतपणे छंदबद्ध स्वरूपात त्यांच्या मुखाद्वारे आपोआपच एक श्लोक बाहेर पडला.तो पुढीलप्रमाणे होता :-
मां निषाद प्रतिष्ठा त्वमगम: शाश्वती समा: ।
यत्क्रौंचमिथुनादेवकम् अवधी: काममोहितम् ।।
अर्थ :- ज्या दुष्टाने हे घृणास्पद कृत्य केले, त्याला जीवनात कधीही सुख मिळणार नाही. त्या दृष्टीने प्रेमात पडलेल्या पक्षाच्या जोडीपैकी एकाचा वध केलेला आहे.
अशाप्रकारे सृष्टीतील पहिल्या छंदबद्ध काव्याची निर्मिती वाल्मिकी ऋषीद्वारे झाली. या जगात काव्य परंपरा इथपासून सुरू झाली,असे मानले जाते.भारतीय साहित्य व संस्कृतीचे महान लेखक व आद्य कवी म्हणून वाल्मिकी ऋषींना मान्यता आहे.तसेच जगातील पहिल्या काव्याचे आणि संस्कृतमधील पहिल्या श्लोकाचे रचयिता त्यांना मानले जाते.
वाल्मिकी ऋषींनी त्यानंतर रामायणाची रचना केली; ज्यात 7 कांड असून, 24,000 श्लोक आहेत. अनुष्टुभ छंद या शास्त्रीय संस्कृत छंदात रामायणाची रचना केली गेली आहे. असं म्हणतात की, ही रचना राम जन्माच्याही आधीची आहे. त्यानंतर जे रामायण घडले,ते याबरहुकूमच घडले.रामायण हे काव्यात्मक सुंदरता आणि साहित्यिक समृद्धता यासाठी प्रसिद्ध आहेच, पण यामध्ये तत्त्वज्ञान आणि नैतिकता यांचे यथार्थ दर्शनही आहे. वाल्मिकी रामायणाचा भारतीय माणसावर मोठा प्रभाव आहे. परंपरा, नैतिकता यांचा आदर्श हजारो वर्षे प्रस्थापित करणारा भारतीय मानसिकतेचा, संस्कृती व नितिमूल्यांचा आणि धार्मिक मान्यतांचा आधारभूत असा हा ग्रंथ आहे. प्रभू श्रीराम यांचे जीवन, वनवास, सीतामैय्याचे अपहरण, रावणाचे अधार्मिक वर्तन, हनुमानाचा पराक्रम, रावणाशी म्हणजेच अधार्मिकतेशी युद्ध, धर्माचा विजय, वनवासी मंडळींचे संघटन इत्यादींचे वर्णन या महाकाव्यात आहे.
महर्षी वाल्मिकी यांनी रामायणात राम जन्माच्या वेळच्या आणि अन्य घडलेल्या घटनांच्या वेळच्या ग्रहताऱयांच्या स्थितीबद्दल माहिती दिलेली आहे. आजच्या संशोधनानुसार,ती एकदम अचूक अशी आहे असे म्हणतात. त्याकाळी ग्रहतारे माहिती असणे आणि त्यांची हालचाल, त्यांच्या भ्रमण कक्षा, त्यांच्या स्थितीनुसार काळ आणि ऋतू इत्यादी यांची माहिती असणे म्हणजे एक अप्रुपच! म्हणूनच महर्षी वाल्मिकी यांना प्रथम खगोलशास्त्रज्ञ म्हणूनही ओळखले जाते. अर्थात पाश्चात्य मंडळी हे मानत नाहीतच! मध्यंतरी निलेश गोरे नावाच्या एका अभ्यासकाने काही व्हिडिओ तयार केले होते. त्यात रामायणातील सीतामातेच्या शोधाचे वर्णन आहे. सुग्रीवाने मातेच्या शोधासाठी सर्व पृथ्वीवर आपली माणसं (वानर) पाठविले आणि त्यांना कुठल्या भागात गेलात तर काय असेल, काय काळजी घ्याल, तिथे कसे हवामान आहे, कशी माणसे राहतात, निसर्ग कसा आहे वगैरेचे वर्णन सांगितलेले आहे. या वर्णनावरून हुकूम आजच्या जगातील कोणत्या खंडातील कोणता भाग आणि त्याचे तंतोतंत वर्णन याचे विवेचन श्री निलेश गोरे यांनी केलेले आहे आणि हे सर्व हजारो वर्षांपूर्वी महषvनी लिहिलेल्या रामायणातील वर्णन यात साम्य आहे. आपल्या पूर्वजांना समस्त पृथ्वीची खडानखडा माहिती त्या काळीही होती,याचा आणखीन पुरावा काय हवा?यावर अधिक संशोधनाची आज गरज आहे.
महर्षी वाल्मिकी हे केवळ कवी, दार्शनिक होते असे नाही. त्यांना अस्त्र-शस्त्र शास्त्रांचे उत्तम ज्ञान होते. माता सीता यांच्याच आश्रमात राहिली होती. त्यावेळी लव-कुश यांचा जन्मही त्यांच्याच आश्रमातला! या लव-कुश यांना संस्कारित करणे,वेद विद्येत पारंगत करणे,गायन व विज्ञानात पारंगत करणे आणि याचबरोबर अस्त्र- शस्त्रयुक्त अजिंक्य योद्धा बनविण्याचे कार्यही भगवान वाल्मिकी यांनीच केले आहे. या वाल्मिकी महषvचे कुळ लावणारा समाजही तसाच गौरवशाली कामगिरी करणारा आणि पराक्रमीच असेल, नाही का? खरंय! संपूर्ण भारतात या महषvचे कुळ गौरवाने सांगणारा मोठा समाज आजही आहे.
भगवान महर्षी वाल्मिकी यांची मंदिरं सुद्धा भारतभर आहेत. निरनिराळ्या भागात निरनिराळ्या नावाने ओळखला जाणारा हा समाज वाल्मिकी,नायक, बोया, मेहतर इत्यादी नावांनी! पंजाबमध्येसुद्धा आज शीख पंथाची दीक्षा घेतलेली मंडळीही वाल्मिकी असल्याचे म्हणतात. हा एक लढवैय्या समाज म्हणून प्रसिद्ध होता.समाज रक्षणाचे ब्रीद घेतलेला पराक्रमी समाज!हिंदू सनातन धर्माचा अभिमान बाळगणारा हा समाज!दुर्दैवाने आज या समाजाची परिस्थिती काय आहे? एके काळी अत्यंत प्रगत,पराक्रमी आणि सुससंस्कृत असलेला हा समाज,आज काय अवस्थेत आहे? इंग्रजांनी या समाजाला अपमानित केलं आणि साफसफाई वगैरे कामे जबरदस्तीने त्यांच्या माथी मारली. काही शतके या समाजाला हिंदुत्व प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न केला, या समाजाला अस्पृश्य ठरविले. दुर्दैव हे की, त्यावेळी हिंदू समाज या मंडळींच्या मागे समर्थपणे उभा राहिला नाही आणि त्याची परिणीती म्हणजे एकेकाळी प्रगतिशील आणि पराक्रमी असलेला हा समाज आज अत्यंत हलाखीच्या अवस्थेत जगतोय!
भगवान महर्षी वाल्मिकी यांनाच मानून हिंदू धर्माशी नाळ टिकवून आहेत. परंतु यांना फसवून, भुलवून अन्य धर्मीय त्यांच्या परिस्थितीचा फायदा उठवू पाहत असतील, तर दोष कुणाचा? त्यांचा कमी आणि माझा आणि तुमचा जास्त!
या समाजाला आपल्या मूळ प्रवाहात सामावून घ्यायची जबाबदारी आपलीच आहे. हिंदुत्वाची नाळ सांगणारे अनेक समूह/समाज आज दैन्यावस्थेत आहेत.त्यांचीही जबाबदारी आपल्याला घ्यायलाच हवी. खरंय ना? राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रामायण रचियता महान ऋषींना आणि त्यांचे कुळ आजही अभिमानाने मिरवणाऱया बंधूंना सादर प्रणाम!
।। जय श्रीराम ।।
-प्रा. विजय यंगलवार – नागपूर
विश्व हिंदू परिषद आणि नचिकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित श्री रामार्पण या खास ग्रंथातून साभार
Leave a Reply