नवीन लेखन...

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

Bad Choices makes good stories प्रमाणे content is king मग तो कसाही असो,  उदात्तीकरणाचा trend काही नवीन नाही. नेपोलियनवर ५ लाख पुस्तके विविध देशांत निघाली.  ‘Mein Kemh’ आत्मचरित्र गाजलं. उद्या विजय मल्ल्या, निरव मोदी रांगेत असतील. विशिष्ट गट, समुदाय आपल्या नेत्याचं, चाहत्याचं, हिरोचं उदात्तीकरण करतातच. समाजानं, कोर्टाने दोषी ठरवलं तरीही त्याचं ते दैवत असतं. आसाराम बापूचे गोडवे गाणारे, आश्रम चालवणारे, आजही मोठ्या संख्येने आहेतच. काही खलनायक काहींसाठी नायक आहेत, तर काही नायक काहींसाठी खलनायक आहेत.

गुन्हेगारीचं उदात्तीकरण करुन सहानुभूती मिळवणं काही नवीन नाही. सलमानने दारुच्या नशेत एकाला चिरडले, काळविटला मारले, पण  being human स्थापन करुन सहानुभूती मिळवली. Being Unhuman असून त्याचं उदात्तीकरण होत आहे. असे नायक १०० कोटीच्या पुढे कमाई करत आहेत.

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.

मुन्नाभाईसारख्या लोकांना मोहनदासचा भास झाला तरी परिस्थिती सुधारेल. टपोरी मुन्नाभाईचं सर्कीट, शॉर्टसर्कीट होणार नाही. लगे रहो मुन्नाभाईच्या निमित्ताने तरुणाईला लगे रहो हा संदेश पोहचला तरी पुरे. आपलं काम, यश प्रतिष्ठा, यासाठी लगे रहो. आमचे दिग्दर्शक मसाला भरण्याच्या नादात वैचारिक उंची गाठू शकत नाहीत. मुन्नाभाईमध्ये गांधीचा वापर तोंडी लावण्यासाठी केला असे वाटते.

महात्मा गांधीवर बोलणारे पुष्कळ आहेत, पण त्यांच्यासारखे वागणारे कमी आहेत. खादीचा पेहराव करणारे बरेच आहे, पण प्रत्यक्षात जीवनातल्या खेळीत त्यांची प्यादी वेगळीच आहेत. म. गांधी म्हणजे ब्लॅक अॅन्ड व्हाईट चित्रपट, त्यांच्या जीवनाची ब्लॅक सुरुवात होती. एखाद्या ब्लॅक जीवनाची अखेर व्हाईट असू शकते, इंद्रधनु असू शकते, हे आपण त्यातून घ्यायला हवं. एखाद्या चित्रपटातून एखाद्या व्यक्तीनं वरवरचं तत्वज्ञान व त्यातून त्यांना समजण्याची प्रेरणा आजच्या पिढीला मिळाली तरी पुरेसे आहे. म. गांधी आजच्या अभ्यासक्रमातून, जीवनातून झिरपत नाहीत.

एक मुन्नाभाई तयार झाला की दुसरा संजू, सलमान लोकप्रिय होतोय, पण एक महात्मानंतर दुसरा का तयार होत नाही? सोयीस्कररित्या वापरायची पायरी म्हणजे गांधी तत्वज्ञान, जमलं नाही तर उडी मारायची. उच्च राहणी व साधी विचारसरणी आजचं चलतं नाणं झालं आहे. थोरांचे ठसे, अनेकांसाठी पाऊलवाट ठरते. जयंती, पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वतःच, पक्षाचं, जातीचं, उखळ पांढरं करत शक्तीप्रदर्शने हे आजचं तंत्र आहे. गांधींच्या फोटोला हार घालण्याची संधी साधून, हवी ती आंधी निर्माण करायची, जीवनाचे श्रेय आणि सार्थकता स्वराज्य, सत्याग्रह आणि स्वदेशी या त्रिसूत्रीत आहे. गांधीचा उद्देश केवळ देशाची सेवा करण्याचा, सत्य शोधण्याचा आणि त्यानुसार आचरण करण्याचा आहे. कित्येक पुस्तके वाचल्यानंतर गांधीची मते बनली आहेत. आजच्या मुन्नाभाईला (संजूला) भाईगिरी करायची, खोटं बोलून प्रेयसी मिळवायचीय. वरवरचं उथळ वाचून टपोरी बोलायचंय आणि तेच समाजात रुजतंय, संस्कृती संक्रमण फार भयानक गोष्टीचं होतय. ३००च्या वर मुली पटवणं नाही, तर भोगणं ही अभिमानाची गोष्ट ठरतेय. बॉक्स ऑफिस व टीआरपीचं यश हे लोकप्रियतेचे मापदंड ठरत आहेत. यशाचे चुकीचे पायंडे यशाचे भास निर्माण करतात.

ज्या देशात यशश्री खेचून आणावी लागत नाही, मॅनेज केली जाते. तिथे मुन्नाभाईच निपजणार व त्यांचीच चलती राहणार. चित्रपटापुरते मुन्नाभाईचं गांधीवादी होणं तेही अधूनमधून सोयीस्कररित्या ठिक आहे, पण चित्रपट पाहून आल्यानंतर ते मुन्नाभाईच राहत असतील तर ते दुर्देवी आहे. जो मुन्नाभाई आधीच बॉम्बस्फोट खटल्यात फसला आहे, तो तरी कुठे सुधारलाय. ‘संजू’ सिनेमासाठी त्याने १० कोटी घेतले. त्याच्या पुढच्या ७ पिढ्यांची सोय केली. मग तो चित्रपट संस्कार करणारा असो, की विकृती पसरवणारा असो.

गुन्ह्यावर पडदा टाकून यशाचा झिम्मा खेळला जात आहे. ‘श्यामची आई’ आता इतिहास जमा झाला. आता ‘संजूचे बाबा’ आदर्श आहेत. आपल्या गुन्हेगार, व्यसनी मुलांसाठी जीवाचे रान करणारे संघर्ष करणारे पितामह. देशभक्ताचे चित्रपट चालत नाहीत पण देशद्रोह्याचे चालतात. माडगुळकरांनी म्हणलच आहे….

पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा.
वेश्येला मणिहार, अजब तुझे सरकार..!

आजच्या तरुणाईने चित्रपटातून व्यसनाधिनता, गुन्हेगारीच तेवढी उचलू नये. नको त्या वयात नको त्या गोष्टी अंगळवणी पडत आहेत. प्रेम हा तारुण्यातला अविष्कार, पण शालेय पातळीवरच प्रेम, पोरगी पटवणं, शरीरसंबंधाच्या मागे लागलेली पिढी, व्यसन, गुन्हेगारीच्या मागे लागलेली पिढीचं भवितव्य काय? चार वर्षाच्या मुलीवर अल्पवयीन मुलाचा बलात्कार ही बातमी येऊन ठेपलीय. जे जे दिसतं ते टिपकागदाप्रमाणे टिपलं जातय. शोषलं जातय, ‘दाग अच्छे होते है’ हे अभिमानाने म्हटलं जातय. दाग पडू नये याची शिकवण नाहीच. आजची आजी म्हणजे, Surf Excel आहे ना ‘डागाची काळजी नको’?   वैचारिकता नसेल तर ठिक आहे, वैचारिक दारिद्रयता नको. एखादे भिकार कथानक अभिनय, दिग्दर्शनमुळे तरुन जातं. नाविन्य आहे पण तर्कसंगती नाही, चित्रपटापुरती तर्कसंगती गुंडाळावी लागते ते खरं असलं तरी ती आणता येते. गांधीच्या तत्वज्ञानातलं अजून बरंच घेता आलं असतं, पण मग गल्लाभरुन मसाला टाकता आला नसता. दिग्दर्शक, चित्रपट चांगला असेल तर समीक्षकाचीही बोलती बंद होते. गांधीच्या संदर्भात आजही काही प्रश्न मनात निर्माण होतात, त्यासाठी गांधीना पत्र लिहिण्याचा मोह आवरत नाही.

आदरणीय महात्माजी

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, भव्य दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट आहे.  ‘आपले पुतळे पाडून नथूरामाचे उभारा’ असंही म्हटलं गेलं. आपली आदर्श समाजाची कल्पना ‘रामराज्य’ अवतरेल का? सर्वोदय होईल का? रामराज्यापेक्षा राममंदिर महत्वपूर्ण बनलं आहे. नवनवीन नेतोदय रोज होत आहे. राजकारणात नसलेले कारणाशिवाय राजकारणात येत आहेत. सोनियाचा दिवस येईल यावर लोकांची अटळ श्रध्दा आहे. निवड प्रक्रिया उपचार ठरत आहे. निवडीचे सोपस्कार पाळले जात नाहीत, कायदा न पाळल्यामुळे हे घडत आहे, काय द्याचं बोला हे महत्वपूर्ण ठरत आहे, गुंडांनी गुंडांकरवी गुंडांसाठी ठोकशाही चालविली आहे, कमी, भ्रष्ट निवडणं एवढंच लोकांच्या हाती आहे,

निवडणुकीला उभारणारे बहुतांश भ्रष्ट असतात किवा नंतर होतात, युतीची आताशा भिती वाटत आहे, अभद्र युती होत आहे, शत्रूंची युती होत आहे, मित्रांची भीती वाटत आहे, मित्र व शत्रूचे शब्दकोशातले अर्थ सोयीनुसार बदलले जात आहेत, सत्तेसाठी युतीच्या दावणीला कुणालाही बांधलं जात आहे.

व्यक्तीमत्व हा ज्याचा प्रांत, पण राजकारणात व्यक्तीमत्वं विरघळून चाललीत, तत्वांसाठी प्रसिध्द असलेले पक्ष सत्तेसमोर लोटांगण घालत आहेत. आदर्शचा कित्ता गिरवायचा असतो, सत्ताप्राप्ती हाच आदर्श झाल्यामुळे कित्ता गिरवायचा कुणाचा? ते देशाचे राजकारण ठरवत आहेत. लाट हीच या देशाच्या ललाटात लिहिली आहे. राजकारणाचा चेहरा मोहराच बदलत चालला आहे. आपण सत्याचे प्रयोग केले. आज राजकारण म्हणजे असत्याचे प्रयोग, हे समीकरण रुढ होत आहे. राजकारण म्हणजे सेवा करण्यासाठी नसून मेवा खाण्यासाठीच सामान्यातून उदयाला आलेले. आपले असामान्य व्यक्तीमत्व अनेक सामान्यांना प्रेरणा देणारं आहे. आपल्या आयुष्यातील अनेक क्षण आपले नव्हतेच, दुसर्‍यांसाठी आपण ते खर्च केले. शिक्षणाचे धिडवडे उडाल्यातच जमा आहेत. शिक्षणाने स्वावलंबन अपेक्षित आहे. पण शिक्षक व विद्यार्थ्यांचे परस्परावलंबन वाढत आहे. चारित्र्यसंवर्धन करण्यात शिक्षक अपयशी ठरत आहेत. तणावाचे संबंध होत आहेत, विद्यार्थी भावी आयुष्याच्या तणावाखाली, वर्तमानातल्या ओझ्याखाली दबत आहेत. अभ्यासक्रम कठिण, तणाव यामुळे मुले आत्महत्या करीत आहेत. चारित्र्यसंवर्धनाचे बालेकिल्ले ढासळल्यातच जमा आहेत. चारित्र्यावरुन पूर्वी माणसं ओळखली जायची. आता कपडे बदलावीत त्याप्रमाणे चारित्र्य बदलत आहे. माणसे सरड्यापेक्षाही जलदगतीने रंग बदलत आहेत. सकाळचं विधान दुपारी बदलत आहेत. ‘कणकण मे है भगवान, फिर भी मंदिर यही बनायेंगे’, हे कसं काय? चारित्र्यवान व्यक्तीचा मक्ता  सध्या फक्त पुतळ्यांनीच घेतला आहे.

आपली तुलना संजूशी होत आहे. लहानपणी व्यसन, संघर्ष, यश, आपल्या यशाला नैतिकतेची झालर आहे. संजूला गुन्हेगारीच अस्तर आहे. आपण ‘महात्मा’ झालात, संजू आता संजू ‘बाबा’ झालाय. Surf Excel आहे पण संस्कार नाही. शिस्त, संयम, वळण, चारित्र्य नाही. आजच्या प्रेमकथा वासना कथा होऊन संपतात. उदात्तप्रेम अस्तंगत झालं. उदात्तीकरण करा, सहानुभूती मिळवा व ‘जगा आणि जगू द्या ’ हेच आजच ब्रीदवाक्य आहे.

यशोगाथेचे  biopic  पेक्षा गुन्हेगारीचे उदात्तीकरणाचे  biopic चालतात. डॉ. तात्याराव लहाने वरचा  biopic    किती चालला? आशयापेक्षा विषयाला महत्व येत आहे. नायकाने किती स्त्रिया पटवल्या, भोगल्या ही अभिमानाची बाब बनत आहे. स्त्रिया भोगलेले संत, मनुष्यहत्या, प्राणीहत्या करणारे  नायकच लोकांना हवे असतील तर तुम्ही आम्ही काय करणार? समुहाच्या तार्किकतेपुढे मानसशास्त्र थिटे पडत आहे. अफवेवरुन लोक जनावरांसारखे नाहक मारले जात आहेत. अपराधीकरणाचे निरपराधीकरण करणाऱ्या यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. तोपर्यंत संजू, सलमानला मरण नाही.

 

— डॉ. अनिल कुलकर्णी 
मोबा. नं. ९४०३८०५१५३
ई-मेल – anilkulkarni666@gmail.com
अे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 36 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..