‘कौसल्या’ स्वतःचा खर्च स्वतः चालवण्याला समर्थ होती. कारण ‘कौसल’ देशाचं उत्पन्न तिच्या मालकीचं होतं असं म्हणतात. रामाला ‘कोसलपती’ हे नाव कौसल्येकडून मिळालेल्या राज्यामुळे पडलं असावं. स्त्रियांचा माहेरावरचा अधिका विवाहानंतरसुद्धा शाबूत राहात असावा. ‘नल’ राजानं जंगलात एकटीलाच सोडून दिल्यानंतर दमयंती आपल्या माहेरी परतते. नलराजाला परत मिळवण्याकरताच का होईना, पण दोन मुलं असताना पुन्हा स्वयंवराची घोषणा करू शकते आणि तिच्या स्वयंवराला जाण्यासाठी नलाचा आश्रयदाता राजा सिद्ध होतो ही गोष्ट त्यासाठी पुरेशी बोलकी आहे. स्त्रियांच्या या वारसाहक्कालाच बदलत्या संस्कृतीचं वेगळं रूप आलं असावं.
वडिलांच्या संपत्तीतील वारसा लग्नाच्या वेळी मुलीला दागदागिने, कपडेलत्ते, भांडीकुंडी, रोख रक्कम वगैरे स्वरुपात देण्याची पद्धत सुरू झाली आणि ‘तुझा वाटा तुला देऊन टाकलाय’ याचीच दुसरी बाजू ‘आता या घरावर तुझा हक्क नाही’ या स्वरुपात पुढे आली.
आई-वडिलांचीच मानसिकता अशी बनली की मुलीला एकदाच जे द्यायचं ते देऊन टाकलंय. आता आम्ही असेपर्यंत आम्हानंतर भाऊ वर्षातनं एकदा माहेरपण, चोळीबांगडी करतील तेवढंचं तिचं. त्यामुळं साहजिकच भावाची मनःस्थिती ‘घर तर माझे तसू तसू’ अशी बनली तर त्यात आश्चर्य नाही.
पण लग्नातच हे सारं देण्यामधलं नुकसान आपल्या लक्षात आलं नाही. मुलीचं लग्न थाटात करायचं, तिला दागिने, कपडेलत्ते द्यायचे या हट्टासाठी कधीकधी जमीन, घर यासारखी स्थावर संपत्ती विकली जाते. मुलींचा वाटा मुलीसाठी खर्च होतो. पण तिला आर्थिक पाठबळ, सुरक्षितता मिळत नाही. लग्नात लाखानं केलेल्या खर्चात प्रत्यक्ष तिला काय मिळतं? याउलट, तीच संपत्ती तिच्या नावावर असेल तर आयुष्यात तिला स्थिरता मिळणार नाही का?
ज्यांच्या घरात मुलीला देण्यासाठी काहीतरी आहे त्यांनी ही पद्धत सुरू केली. पण समाजातल्या वरच्या वर्गाचं अनुकरण खालचा वर्ग करीत असतो, या समाजशास्त्रातल्या नियमाप्रमाणं ज्यांच्याकडे मुलीला देण्यासाठी काही नाहीच त्यांनी कर्जबाजारी होऊन हे सारं देण्याची पद्धत स्वीकारली. कधीकधी वरपक्षाकडून ती त्यांच्यावर लादली गेली. आणि मग वडिलांची जबाबदारी ती मुलाची या नात्यानं स्वतःच्या संसारात अडचणी सोसून भावानं बहिणीला देत राहायचं असं सुरू झालं आणि मग भाऊ आपल्या बायकोच्या माहेरकडून अशाच ‘येण्याची’ अपेक्षा करूं लागला.
आर्थिक हितसंबंधांची ही कसली गुंतागुंत !
पण खरंच, कुठल्या तरी समजूतदार, संवेदनाशील मुलीला ‘माहेर’ म्हटलं की तिथली संपत्ती आठवत असेल का? तसं असतं तर श्रीमंताघरी पडलेल्या मुलीला माहेरचं साधंसं गरीब घर ओढ लावू शकलं नसतं. पण प्रत्यक्षात ती ओढ असते. कारण त्या घरावरच्या आर्थिक हक्काशी तिला कर्तव्य नसतं. ज्या घरात तिचं बालपण जपलं गेलं, जिथे तिला मोकळेपणानं श्वास घेता आला त्या घराशी तिचं मानसिक नातं असतं. ते जपलं जावं एवढीच तिची अपेक्षा असते. कारण एका वळणावर ते घर तिला सोडावं लागलं आणि एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटून गेली ही कल्पना त्या गोष्टीबद्दल ओढ वाढवते, नाही का?
Leave a Reply