नवीन लेखन...

सर्व महिलांना… ‘महिलादिना’च्या हार्दिक शुभेच्छा ….!

सर्व महिलांना… ‘महिलादिना’च्या हार्दिक शुभेच्छा ….!

आजच्या या दिवशी मला दिसत आहेत …. मुंबईसारख्या शहरातून नोकरी करणा-या महिला. आज खूप जण इतिहासात किंवा इतर क्षेत्रात यशस्वी झालेल्या स्त्रियांबद्दल लिहितील. पण मला मुंबईसारख्या महानगरात नोकरी करणारी प्रत्येक स्त्री वंदनीय वाटते.

मी गेली ३३-३४ वर्ष मुंबईत नोकरी करतोय. रोज ऑफिसला जाता येता नोकरीसाठी प्रवास करणाऱ्या हजारो स्त्रिया दिसत राहातात. सकाळच्या मुलाबाळांच्या तयाऱ्या …. त्यांचे डबे, शाळेचं दफ्तर, त्यांना स्कुलबस, रिक्शाला सोडणं … आणि …. नवरयाचा डबा….. मग स्वत:ची तयारी अशा अनेक फ्रंटवर लढून मग धावत रिक्शा .. बस पकडून स्टेशन …. मग ट्रेन … त्यातली कल्पनेपालिकडची गर्दी …. उतरल्यावर परत बस टॅक्सी …. रोजचा असा चार साड़े चार तासांचा जीवघेणा प्रवास …. एवढं करून ऑफिसच्या वेळेच्या आत पोचायचं …. नाहीतर मस्टरवर क्रॉस मिळणार …. साहेब काहीतरी टोचून बोलणार ….दहा मिनिटं लवकर निघायचं ना? मग दिवसभर काम ….पब्लिक सेक्टरमधले दिवस कमालीचे बदलले आहेत…. अधिकारी असेल तर कामाचं परत कल्पनेपालिकडचं प्रेशर …. भीती …. संध्याकाळी सहा वाजता वेळेवर जरी निघालं तरी परत बस, ट्रेन, रिक्शा पकडून घरी पोचायला आठ सव्वा आठ (अधिकाऱ्यांना सहा वाजता वेळेवर निघायला कधीच मिळत नाही).

ठाणे, बोरीवली, डोंबिवली ही शहरं प्रमाणाबाहेर वाढली आहेत. ठाणे तर खूपच. वस्ती पार कासारवडवली पर्यंत पोचल्येय. खरं त्याही थोडं पुढेच. ठाण्याला उतरून बसने घरी पोचायला सहज सव्वा दीड तास लागतो. ज्याना घरचं कुणी त्याच वेळी बरोबर असेल तरी स्कुटरने अर्धा पाऊण तास लागतोच. पण एकटी स्त्री असेल तर ट्रेनमधून उतरल्यावर देखील तिला घरी पोचायला प्रचंड संघर्ष करावा लागतो. हे जे लिहिलंय ते वर्षातल्या इतर वेळी. पावसाळ्यात तर हालांना पारावार नाही. ठाण्याला उतरल्यावर पाऊस असेल तर रिक्षाला एवढी लांब रांग …अशा वेळी रिक्षावाले गायब असतात … बसमध्ये तुंबळ गर्दी … स्त्री नाही शिरु शकत बसमध्ये …. अशा मरणाच्या गर्दीत…. शक्यच नसतं…. आईची आतुरतेने वाट बघणारी मुलं… मग तिची पूर्ण हताश… असहाय्य … पराकोटीची अस्वस्थ अवस्था. अशा वेळी ठाण्याला उतरल्यावर देखील दीडेक तासात घरी पोचली, तर नशीब. आणि घरी गेल्यावर जेवण करणं … मुलांचा अभ्यास …. रोजच्या इतर काही आवश्यक गोष्टी …. परत दुसरया दिवशी हाच दिनक्रम. घर जर वसई, विरार, अंबरनाथ, बदलापूरला असेल तर खरंच मुंबईबाहेरचे कोणीही स्त्रीच्या या रोजच्या संघर्षाची कल्पना देखील करू शकत नाही.

आम्ही दोघं गेल्या दोन वर्षाच्या वर हैदराबादला ट्रांस्फर झाल्याने नोकरी करत आहोत. इथे मुंबईसारखा रोजच्या जीवनातला संघर्ष नाहिये. मुख्य म्हणजे भयानक गर्दी असलेल्या ट्रेनचा प्रवास नाहिये. इथे आल्यावर जर कुठची गोष्ट कळली असेल तर ती म्हणजे मुंबईत राहणाऱ्या लोकांचा भयानक संघर्ष. त्यातही स्त्रियांचा.

जेव्हा काही जण विचार न करता शहरातल्या स्त्रियांविषयी सहज रिमार्क्स देतात तेव्हा मला खूप वाईट वाटतच पण प्रचंड राग येतो. आज मुंबईत नोकरी करणारी स्त्री हे सगळं तिच्या घरासाठीच करते ना? तिच्यातली आई, बायको तिला स्वस्थ बसू देत नाही. रोज एवढा शारीरीक …. मानसिक संघर्ष करूनही ती पूर्वीच्या न नोकरी करनार्य बायका जे जे म्हणून घरी करत, त्या सगळ्या गोष्टी करते. सुट्टीच्या दिवशी मुलांकरता… नवरयाकरता खास पदार्थ मोठया आवडीने करते. त्यांना प्रेमाने खावू घालते. घरच्या सगळ्या परंपारिक गोष्टी … सणवार … देव दिवाळी … आचार विचार कसोशीने पाळते. आणि एवढं करून नवरयाच्या बरोबरीने घराला आर्थिक भारही लावते.

सध्या बरेच पुरुष घरी आपल्या बायकोला मदत जरूर करतात. पण मदत करतात, मुख्य कामं तिच करत असते. हे सगळं बघितल्यावर एक नक्की …. पुरुषापेक्षा… निदान मुंबईसारख्या शहरात राहाणारी स्त्री ही शारीरीक आणि मानसिक दृष्टीने नक्कीच कितीतरी जास्त समर्थ आहेच. तिची ही समर्थता … तेज … आवाका … प्रेम … कितीतरी गोष्टी वंदनीय अशाच आहेत. या स्त्रियांबद्दल मला नेहेमीच खूप आदर वाटतो. खरं तर त्यांच्या बद्दल अजून कितीतरी लिहिता येईल ….. जे लिहिलंय हिमनगाचं नुसतं टोक वाटेल इतकं त्रोटक आहे ……अशी संघर्ष करणारी प्रत्येक स्त्री ही आभाळाएवढ्या कर्तृत्वाची आहे …. आपल्या घराकरता ती असामान्यपणे मोठ्या व्यक्तिमत्वाची आहे. आज महिलादिनाच्या निमित्ताने अशा सर्व स्त्रियांना मनापासून शुभेच्छा…..!

(आज सकाळीच मला फोन आला आणि माझ्या त्या स्नेह्याने बोलता बोलता सहज अशी कॅज्युअल कमेंट केली … त्यावर मी त्यांना सांगितलं की माझी आई जे करायची … ते सगळं माझी बायको करतेच … वर रोज साडेचार तासांचा महाभयानक प्रवास करते … ती उच्च अधिकारी असल्याने ऑफिसमध्ये विश्वास बसणार नाही एवढं काम आणि प्रेशर असतं …तरीही रोज ऑफिसला जातांना पोळी भाजीचा डबा देते … घरी आली की गरम पोळ्या करते … आई करायची त्यापेक्षा अधिक इंटरेस्ट घेऊन सगळे सणवार करते … नाना प्रकारचे सगळे पदार्थ घरी करते … हॉटेलात जायला लागत नाही ….मग असं सध्याच्या स्त्रियांबद्दल लुजली बोलणं एकदम चुकीचं आहे … वगैरे … अजून एक गोष्ट आठवली … २००६साली जेव्हा मुंबईत प्रचंड पाऊस पडला होता … तेव्हा दोन रात्री ऑफिसमध्ये राहावं लागलं होतं … दुसऱ्या दिवशी मी ऑफिसकामासाठी एका कार्यालयात फोन केला … ती स्त्री नेहेमीच्या कामामुळे ओळखीची होती … ती म्हणाली नवऱ्याचा फोन लागत नाहीये … आणि मुलगा ८ वर्षांचा आहे … एकटा आहे …. टीव्हीवर सांगत आहेत की बदलापूरला पूर आलाय .. दोन मजल्यापर्यंत पाणी चढलंय … मी काहीही झालं तरी जाणार आहे … माझा जीव गेला तरी चालेल … मी म्हटलं अहो, शेजारी काळजी घेतील तुमच्या मुलाची … तुम्ही असं गेलात तर तुम्हालाच धोका आहे … त्या गेल्या नाहीत … शेजाऱ्यांनी मुलाची काळजी घेतली होती … त्या वेळी बदलापूरला पोचायला दोन तासांऐवजी पन्नास तास लागले …. ही गोष्ट सहज सांगितली …. मुंबईत नोकरी करणाऱ्या बाईच्या संघर्षाची … मुलासाठी जीव गेला तरी चालेल .. अशी पराकोटीची अस्वस्थता झालेल्या आईची…. मी त्यावेळी महाराष्ट्र टाइम्समध्ये या बाईंची ही गोष्ट सांगितली).

(सोबत एक व्हिडीओ दिलाय … म्हणजे मुंबई बाहेरच्या लोकांना कल्पना थोडी तरी कल्पना येईल)

https://www.youtube.com/watch?v=y3lV_kbS2dE

— प्रकाश पिटकर

प्रकाश पिटकर
About प्रकाश पिटकर 43 Articles
मी आय.डी.बी.आय. बँकेत गेली ३४ वर्ष नोकरी करतोय. सध्या AGM म्हणून हैदराबाद इथे पोस्टेड आहे. मला ट्रेकिंग, फोटोग्राफी, प्रवास, दूरवरचे स्वतः वाहन चालवत प्रवास, वाचन अशा आवडी आहेत. मी गेली सतरा वर्ष महाराष्ट्र टाइम्सचा फ्री लान्स कॉलमनिस्ट आहे. माझे आता पर्यंत सहज दोन हजाराच्यावर लेख प्रसिद्ध झाले आहेत. मी मुख्यतः ठाण्याचा रहिवासी आहे. प्रवास वर्णन, व्यक्ती-संस्था चित्र, ऐतिहासिक वास्तू, निसर्गातले अनेक विषय.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..