नवीन लेखन...

महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग १

पं. रामकृष्ण कवी यांनी रचलेले प्रस्तुत महिषासुरमर्दिनी स्तोत्र हे ‘देवी माहात्म्य’ वर आधारित असून त्यात मधु,कैटभ,महिषासुर तसेच शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करण्यासाठी देवीने घेतलेल्या दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या रूपांचा उल्लेख आहे. दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) या वृत्तात रचलेल्या व अनुप्रास अलंकाराने नटलेल्या या स्तोत्रात शब्दांची अत्यंत आकर्षक रचना असून एकच शब्द पुनःपुनः वेगवेगळ्या अर्थांनी उपयोजल्याने कवीची संस्कृत भाषेवरील विलक्षण पकड जाणवते.

काही अभ्यासकांच्या मते ही रचना आदि शंकराचार्यांची आहे. अत्यंत गेय असलेले हे स्तोत्र भाविकांमध्ये अतीव लोकप्रिय आहे. येथे देवीचे विविध पैलू – शौर्य,चातुर्य,विविध जाती जनजातीच्या योद्ध्यांना एकत्र करण्याचे कौशल्य, स्त्री सैनिकांची योजना, शक्तीचे विविध रूपात प्रकटीकरण, विविध कलांचा आविष्कार इ. दृष्टोत्पत्तीस येतात.

सुरुवातीला या स्तोत्रातील अनुप्रास, शब्द, अक्षरे आणि नादांच्या पुनरावृत्तीने मोहित होणारा भाविक ते पुनःपुनः ऐकल्यावर मंत्रमुग्ध होतो. अनेक कुटुंबांमध्ये (विशेषतः दाक्षिणात्य) नवरात्रात या श्लोकांचा परंपरागत जप केला जातो.


अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते
गिरिवरविन्ध्यशिरोऽधिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते ।
भगवति हे शितिकण्ठकुटुम्बिनि भूरिकुटुम्बिनि भूरिकृते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १ ॥

मराठी- हे पर्वताच्या कन्ये, जिने सर्व जगताला आनंदी केले आहे, जी या विश्वात स्वर्गीय क्रीडा करते, (शिवाचे वाहन) नंदी जिची स्तुती करतो, श्रेष्ठ विन्ध्य पर्वताच्या शिखरावर जी रहाते, जी विष्णूला आनंद देते, इंद्र जिची स्तुती करतो, देवी भगवती, जी नीलकंठाची अर्धांगिनी आहे, जिच्या कुटुंबात असंख्य लोक आहेत, जिने (भक्तांसाठी) खूप काही केले आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

गिरितनये, सुखदा जगता, जग मौज तुला, स्तुति नंदि करी,
घर तव विंध्य शिरी, हरि संगत तू कमला, स्तुति इंद्र करी ।
भगवति, शंभुशिवा गृहिणी, परिवार विशाल, सुयोग्य करी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०१


सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते
त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते
दनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ २ ॥

मराठी- जी देवांवर वरांचा वर्षाव करते, जिने दुर्धर व दुर्मुख या राक्षसांचा नाश केला, जी (निजानंदात) मग्न आहे, जी तिन्ही लोकांचे पोषण करते, शंकराला आनंद देते, पातकांचे हरण करते, घोर गर्जना करते, जी दानवांचा क्रोध दाबून टाकते, दैत्यांवर आपला राग काढते, राक्षसांचा माज उतरवते, जी (लक्ष्मी म्हणून) समुद्रातून उत्पन्न झाली आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणार्‍या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

बरसत देवगणां वर, दुर्धर दुर्मुख नाश, सहर्ष खरी
भरण तिही जगता, सुख शंभुस, पातक नाशन, घोष करी !
दडपुन दानव, दैत्य पराभव, माज खलास, रमाच खरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०२

टीप- येथे दुर्धर व दुर्मुख राक्षसांचा वध केलेल्या कथेचा संदर्भ देवी माहात्म्याच्या तिस-या अध्यायाशी आहे.


अयि जगदम्ब मदम्ब कदम्बवनप्रियवासिनि हासरते
शिखरि शिरोमणि तुङ्गहिमालयशृङ्गनिजालयमध्यगते ।
मधुमधुरे मधुकैटभगञ्जिनि कैटभभञ्जिनि रासरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ३ ॥

मराठी- हे सर्व जगताच्या आणि माझ्याही माते, कदंब वृक्षांच्या राईमध्ये राहणे जिला आवडते, जिला हास्य विनोद आवडतो, जी उंच हिमालयाच्या शिखरावर असलेल्या आपल्या घरात रहाते, मकरंदासारखी गोड असून जी मधु आणि कैटभ या राक्षसांचा तिरस्कार करते, कैटभाचा पराभव करून त्याला दूर पळवून लावते, (आणि त्या सगळ्या) गदारोळात जिला मजा येते, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

सदन कदंब वनी प्रिय, माय जगा, मजला, नित जी हसरी
भवन विराजत उंच हिमाद्रि शिरी, मधुरा मधु जेवि जरी ।
करि अपमानित कैटभ नी मधु, धाडित कैटभ दूरवरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०३


अयि शतखण्ड विखण्डितरुण्ड वितुण्डितशुण्ड गजाधिपते
रिपुगजगण्ड विदारणचण्ड पराक्रमशुण्ड मृगाधिपते ।
निजभुजदण्ड निपातितखण्ड विपाटितमुण्ड भटाधिपते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ४ ॥

मराठी- शत्रूच्या (सैन्यातील) प्रचंड हत्तींच्या सोंडा कापून टाकून त्यांच्या शरीरांचे शेकडो तुकडे करणार्‍या, (जिचे वाहन) सिंह आपल्या प्रबळ पराक्रमाने शत्रूच्या हत्तींची मस्तके विदीर्ण करतो, जिने आपल्या हातातील खड्गाने (चंड आणि मुंड राक्षसांची) मुंडकी तोडून टाकली, जी सैनिकांची प्रमुख आहे, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

गजपति शत्रु गजा चिरुनी शत खांड शरीर नि सोंड करी
प्रबळ हरी रिपु कुंजर मस्तक फोडुन हिंस्र विदीर्ण करी ।      (हरी- सिंह)
निज तळपे समशेर नि गर्दन छाटत नायक वीर खरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०४

टीप- तिस-या ओळीचा संदर्भ देवीमाहात्म्याच्या सातव्या अध्यायातील, देवीने कालीचे रूप घेऊन चंड आणि मुंड राक्षसांचा आपल्या तलवारीने शिरच्छेद केला या कथेशी आहे. यामुळे ती चामुंडा या नावाने ओळखली जाते.

तिस-या चरणात ‘ विपाटितमुण्ड ’ ऐवजी ‘ विपाटितभण्ड ’ असा पाठभेद आढळतो. तो घेतल्यास देवीने आपल्या भुजांनी भण्डासुराच्या सैनिकांना ठार मारले असा अर्थ होईल.


अयि रणदुर्मदशत्रुवधोदितदुर्धरनिर्जरशक्तिभृते
चतुरविचारधुरीणमहाशिवदूतकृतप्रमथाधिपते ।
दुरितदुरीहदुराशयदुर्मतिदानवदूतकृतान्तमते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ५ ॥

मराठी- हे मदोन्मत्त झालेल्या शत्रूंना युद्धामध्ये ठार मारणा-या, कधीही नष्ट न  होणा-या व असीमित शक्ती जिच्या ठायी एकवटल्या आहेत, अत्यंत हुशारीने विचार करण्यात चतुर असणा-या भूतांचा अधिपती शंकराला जिने आपला दूत बनवून पाठवले, वाईट इच्छा असणा-या, वाईट विचार करणा-या, वाईट बुद्धी असणा-या दैत्य दूताच्या प्रस्तावाचा अंत करणा-या, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

अधम रिपू वधण्यास असीम नि अक्षय धारण शक्ति करी
चतुर विमर्षक दूत धुरंधर शंभु नियोजत दैत्य घरी ।
असुर निरोप विचार, मती, नि मनोगत दुष्ट, नकार भरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०५

टीप- देवी माहात्म्य ८ व्या अध्यायात देवीने शुंभ आणि निशुंभ या दैत्यांकडे शंकराला दूत म्हणून पाठवल्याची, तसेच शुंभ आणि निशुंभाकडून आलेला प्रस्ताव नाकारल्याची कथा आहे.


अयि शरणागत वैरिवधूवर वीरवराभय दायिकरे
त्रिभुवनमस्तक शूलविरोधि शिरोऽधिकृतामल शूलकरे ।
दुमिदुमितामर दुन्दुभिनादमहोमुखरीकृत दिङ्मकरे
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ६ ॥

मराठी- हे, शरण आलेल्या वीर शत्रूंच्या पत्नींना अभय देणा-या, तिन्ही लोकांना मस्तकशूळ ठरणा-यांच्या विरोधात आपले शुद्ध त्रिशूळ हाती घेत त्यांच्या शिरावर रोखणा-या, पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे आनंदाने सर्व दिशांमध्ये पसरणारा दुमी दुमी असा दुंदुभीचा आवाज करणा-या, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

रिपु बलवान स्त्रिया तव आश्रय घेत तया भयमुक्त करी
सकळ छळी जगतास तया तव पावन रोखिसि शूल शिरी ।
ढुम ढुम ढोल करी तव शब्द जलासम सर्व दिशात भरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०६


अयि निजहुङ्कृति मात्रनिराकृत धूम्रविलोचन धूम्रशते
समरविशोषित शोणितबीज समुद्भवशोणित बीजलते ।
शिव ! शिव ! शुम्भ निशुम्भमहाहव तर्पितभूत पिशाचरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ७ ॥

मराठी- आपल्या केवळ एक हुंकाराने जिने धूम्रलोचन राक्षसाला धुरात शतशः विदीर्ण करून टाकले (भस्म केले), ज्याचे रक्त (भूमीवर पडले असता) नवीन रक्तबीजाच्या वेलीसाठी बीज बनते अशा रक्तबीज राक्षसाला शुष्क करून टाकले, शिव ! शिव !  जिने शुम्भ आणि निशुम्भ यांच्या (इतरेजनांना) हितकारक पवित्र आहुती देऊन भूत आणि पिशाच गणांना तृप्त केले, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

असुर धुरासम नेत्र, तया तव ‘ हुं ‘ ध्वनिमात्रच नष्ट करी
रुधिर महीवर, बीज नवे लतिके, पिउनी रणि रुक्ष करी |
हितकर आहुति शुम्भ निशुम्भ पिशाच गणांसहि तृप्त करी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०७

टीप- येथे आलेल्या विविध दैत्यांच्या कथांचा संदर्भ देवीमहात्म्यात आहे. धूम्रलोचनाची कथा अध्याय ६ मध्ये, रक्तबीजाची अध्याय ८, शुम्भाची अध्याय १०, निशुम्भाची अध्याय ९ व महिषासुराची अध्याय २ व ३ मध्ये आहे.


धनुरनुषङ्ग रणक्षणसङ्ग परिस्फुरदङ्ग नटत्कटके
कनकपिशङ्ग पृषत्कनिषङ्ग रसद्भटशृङ्ग हताबटुके ।
कृतचतुरङ्ग बलक्षितिरङ्ग घटद्बहुरङ्ग रटद्बटुके
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ८ ॥

मराठी- युद्धात क्षणोक्षणी स्फुरण पावणा-या हातातील धनुष्याच्या हालचालींबरोबर जिच्या हातातील कंकण नर्तन करते, जिचे सोनेरी तपकिरी बाण (अंगात घुसून) लोंबत असल्याने योद्धे जोरात आरोळ्या ठोकत आहेत, जिने (शत्रूसैन्यातील) बुद्दू (बुणगे) ठार मारले आहेत, जिने (शत्रूच्या) चतुरंग सेनेचे (रथ,हत्ती,घोडदळ आणि पायदळ) बळ खच्ची करून (जिने शत्रूला चारी दिशांनी वेढून खच्ची केले आणि), समरांगण किंचाळणा-या बुद्दूंच्या मंचात बदलून टाकले, (चतुरंग सेनेबरोबर लढताना अनेक छोट्या छोट्या शक्ति तुझ्यातून बाहेर पडल्या आहेत.) जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

झळकत कंकण बाहुवरी स्फुरत्या, धनु संगत नृत्य करी
शर पिंगट घुसता बुणगे मरती, बहु क्रंदत वीर परी ।
दल चहु ओर खचे, नि गणंग पटांगणि आरडती जबरी
कचरचना सजली, महिषा वधिले, गिरिजे जयकार करी ॥ ०८

टीप- वर कंसात दर्शविल्याप्रमाणे विविध अभ्यासकांनी दुस-या व तिस-या चरणांचे अर्थ वेगवेगळे लावलेले दिसतात. काही अभ्यासकांनी ‘ शृङ्गहता ’ चा अर्थ शृंग नावाच्या शस्त्राने ठार केलेले ’ असा केला आहे.


सुरललना ततथेयि तथेयि कृताभिनयोदर नृत्यरते
कृत कुकुथः कुकुथो गडदादिकताल कुतूहल गानरते ।
धुधुकुट धुक्कुट धिंधिमित ध्वनि धीर मृदंग निनादरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ ९ ॥

मराठी- स्वर्गातील ललनांचे तत था थैय्या थैय्या यासारख्या शब्दांनी युक्त भावमय नर्तन पाहण्यात रमून गेलेल्या, कुकुथ कुकुथ गदि धा यासारख्या तालांच्या विलक्षण गीतांचा आस्वाद घेणा-या, धुधुकुट धुक्कुट धिं धिं अशा मृदंगाच्या हळुवार आवाजात रंगलेल्या, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

सुर-रमणी तक थै तक थै पदन्यासहि रंगुन पाहतसे
तिरकिट धा गदि धा सह गायन ताल विलक्षण ऐकतसे ।
धुधुकुट धिं तग धिं हळुवार मृदंग सुनाद हि रंगतसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ ९

टीप- या स्तोत्राच्या काही उपलब्ध आवृत्तीमध्ये हा श्लोक समाविष्ट नाही.


जय जय जप्य जयेजयशब्द परस्तुति तत्परविश्वनुते
झणझणझिञ्झिमि झिङ्कृत नूपुरशिञ्जितमोहित भूतपते ।
नटित नटार्ध नटी नट नायक नाटितनाट्य सुगानरते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ॥ १० ॥

मराठी- (युद्धा अगोदर) जयजयकार करणा-या, (विजयानंतर) विजयाच्या आरोळ्या ठोकणा-या आणि त्यानंतर स्तुती करण्यात तत्पर असणारे जग जिला नमस्कार करते, जिच्या पायातील पैंजणांच्या झण-झण-झिम-झिम अशा किणकिणीने शिवशंभू आकर्षित होतो, जी नट-नट्यांचा नायक अर्धनारीनटेश्वराबरोबर वैश्विक नाट्याच्या उत्कृष्ट संगीतात रममाण होते, जिने सुरेख केशरचना केली आहे, अशा महिषराक्षसाचा वध करणा-या (हिमालय) पर्वताच्या कन्यके तुझा विजय होवो.

जयजयकार, जयोत्सव घोष, जिला जग सादर वंदितसे
झण झण झिंझिम पैंजण नाद सदाशिव मानस वेधितसे ।
प्रमुख नटेश्वर वैश्विक गायन नाट्य नटीसह रंगतसे
गिरितनये जय हो, महिषा वधिले कचबंधन शोभतसे ॥ १०

 

उर्वरीत भाग लवकरच…. 

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

3 Comments on महिषासुरमर्दिनी स्तोत्रम् – मराठी अर्थासह – भाग १

  1. अगदी नेमक्या शब्दात गेय भाषांतर!! फारच सुंदर. पुढील श्लोक कधी वाचायला मिळतील ? अतिशय सुरेख

  2. सुरेख समश्लोकी भाषांतर

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..