गेली पंधरा मिनीटे ती पियानो वाजवत होती
वाजवता वाजवता ती मधेच थांबली..
तिने अचानक विचारलं
‘काही आठवलं का रे तुषार?’
तुषार हसला..
‘आठवलं सारा..! वीस वर्षे झाली पण विसरलो नाही..
चाॕपीन चे नाॕक्टर्न होतं..सी शार्प मायनर’
सारा ही गोडशी हसली..ती म्हणाली
‘परफेक्ट..! तुझी मेमरी खरंच ग्रेट आहे..
त्या दिवशीच भेटलो आपण..पहिल्यांदा..
आणि त्यानंतर नाॕक्टर्न मी कधीच वाजवल नाही एवढ्या वर्षात..पण तु तरीही लक्षात ठेवलेस रे तुषार..’
‘तुझ्या बाबतीतली कोणतीही गोष्ट मी विसरु शकत नाही सारा..’
‘आणी मलाही आठवतं तुषार..त्यादिवशी तुझं फेलिसिटेशन होतं..नॕब तर्फे.. तुझ्या बासरी वादनासाठी उदयोन्मुख संगीत सितारा अवार्ड मिळाला होता तुला’
‘तुलाही आठवतय अजून सगळं सारा?’
‘हो कशी विसरेन मी ती संध्याकाळ..? माझा लाईफ पार्टनर त्या दिवशी मला भेटला होता ना..!’ ती खट्याळ हसली
‘चल.. मग इसी बातपे..आज एक डुअल करुयात का?’ तुषारने विचारले..
‘बाय आॕल मिन्स..!’ सारा उत्तरली..
पुढचा बराच वेळ सारा पियानो वाजवत होती..
तुषार तिला बासरीची साथ देता होता..
एक अपूर्व अशी मैफील रंगली होती..
ज्याचे फक्त दोनच साक्षीदार होते..
‘चल निघूयात आता तुषार..?’ ब-याच वेळाने सारा म्हणाली
‘हो..थांब तु..मी तिथेच आलो..थांब सारा..आलोच हं..’
असे म्हणत तुषारने आपली पांढरी काठी हातात घेतली, डोळ्यावर काळा गाॕगल चढवला व सावधपणे पुढे जाउन व्हिलचेअर वरच्या साराला घेउन तो तिच्या सांगण्या प्रमाणे सावकाश त्या आॕडिटोरीअमच्या बाहेर पडला..
संध्याकाळ झाली होती..
दूरवर क्षितीजावरही आकाश व धरतीचे मिलन होत होते.. तिथेही विविध रंगांची मैफील सजली होती..
-सुनील गोबुरे
Leave a Reply