हे आज काय नवीन ?
असा प्रश्न मला तुमच्या चेहऱ्यावर स्वच्छ दिसत आहे .
त्याचं उत्तर देणारच आहे . पण त्यासाठी थोडं पाठी जायला हवं .
नेमकं साल सांगायचं तर १९८५ .
म्हणजे माझी पहिली कादंबरी पुस्तक रूपानं प्रसिद्ध झाली , ते वर्ष .
आयुष्यात अनेक वेळेला आपण अनेक गोष्टींची वाट पहात असतो .
माणसं , नाती , वेळ , संधी अशा अनेक गोष्टी …
१९८५ पासून माझ्या आयुष्यात या सगळ्याबरोबर आणखी एका गोष्टीची भर पडली .
ती गोष्ट म्हणजे वाचकांची पत्रे आणि ती घेऊन येणारे पोस्टमनदादा .
त्याचं आज काय एवढं ?
असं कुणालाही वाटेल . पण त्यासाठी माझ्या अंगी असणारा एक विशेष गुण माहीत करून घ्यावा लागेल .
अव्यवस्थितपणा !
हा तो गुण .
मला काही बाबतीत अव्यवस्थितपणा प्रचंड आवडतो .
म्हणजे कपडे कपाटात ठेवणे .
मी काही सेकंदात ते कपडे , कपाटात कोंबून भरू शकतो .
त्यात मजा आहे .कारण दार उघडल्यावर एकेक कपडा घरंगळून खाली पडत असतो आणि त्यात एक छान काव्य असतं . उत्सुकता असते . एखाद्या पदार्थाची रेसिपीच जणू .
हे आपलेच कपडे आहेत याचा नव्यानं शोध लागल्याचा निरागस , ताज्या भाजीचा सुवास . चुरगाळलेपणाचा मसाला , फोडणीत मोहरी , मिरच्या टाकल्यानंतर होणारा तडतड आवाज हा आपल्या पत्नीचा आहे , हे विसरण्याचा गनिमी कावा …
( ही रेसिपी आपल्या अनुभवातून अधिक सकस आणि रुचकर होऊ शकेल ).
खूप गंमत असते या अव्यस्थितपणात .
शिवाय जुन्या फॅशनचा नव्याने शोध लागतो ती गोष्ट वेगळीच .
( माझी एक जुनी जीन पॅन्ट , जिचा बॉटम २८ इंच होता , ती सापडत नव्हती . नंतर कळलं की दहा किलो धान्य आणण्यासाठी मी जी निळ्या रंगाची पिशवी वापरत होतो , ती माझीच सुप्रसिद्ध पॅन्ट होती ! )
असो .
हे अव्यवस्थितपणाचं आणि मैत्र पत्रांचं काय प्रकरण आहे , हे समजून घ्यायचं असेल तर आणखी एक अव्यवस्थितपणा सांगायला हवा .
माझ्या कपाटात असणारी पुस्तकं , पत्रव्यवहाराच्या फाईल्स हे सगळं मी कसंही रचून ठेवलं आहे .
हवं ते पुस्तक , हवा तो संदर्भ आणि वाचकांची आलेली पत्रं चटकन हाती लागली तर त्यात मजा नाही .
थोडी शोधाशोध , थोडा आरडाओरडा आणि मग हवी ती गोष्ट सौभाग्यवतीने वा मुलांनी शोधून दिली की जितं मया असं म्हणून ( मनातल्या मनात ) सुखवण्यात जी मजा आहे ती अचूकपणे पटकन वस्तू मिळण्यात नाही . जिज्ञासा नाही , आनंद नाही, समाधान नाही आणि जिवंतपणाचं लक्षण नाही .
आज असंच काहीसं वाटलं .
मनात आलं आपण १९८५ पासून आलेली वाचकांची पत्रं नजरेखालून घालू या .
आणि सगळे सोपस्कार पार पडून पत्रव्यवहाराच्या नेमक्या फाईल्स माझ्या हाती आल्या .
त्या फाईल्स बघताना लक्षात आलं की हे समाज माध्यमावरच्या माझ्या सुहृदांना वाचायला द्यायला हवं .
त्यासाठी हा प्रपंच !
आत्ताच्या काळातील लाईक्स , कमेंट्स , शेअरच्या जमान्यात फॅनमेल ही संकल्पना कालबाह्य वाटेल . पण याच वाचकांच्या पत्रव्यवहारावर आम्हा लेखकांची पिढी जोपासली गेली आहे .
असंख्य पत्रं .
स्तुती करणारी . टीका करणारी .
जिव्हाळा व्यक्त करणारी . राग राग करणारी .
ज्येष्ठांची , समवयस्क असणाऱ्यांची .
महाराष्ट्रातील . महाराष्ट्राबाहेरील वाचकांची . परदेशस्थित वाचकांची .
असंख्य पत्रं आहेत माझ्यापाशी .
त्यातील निवडक पत्रं तुमच्यासाठी सादर करणार आहे.
अर्थात आपल्याकडून प्रतिसाद अपेक्षित आहे .
एक वेगळं विश्व त्यातून अनुभवू शकाल तुम्ही . आणि हो , पोस्ट आवडली तर सर्वांना पाठवायला हरकत नाही , अर्थात नावासह . आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नव्या दमाच्या लेखकांना प्रेरणासुद्धा मिळू शकेल .
तुम्हाला काय वाटतं , ते कळवायला , प्रतिसाद द्यायला विसरू नका ..
———
— डॉ. श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी
९४२३८७५८०६
Leave a Reply