मज मिळे कोणी
जेव्हा माझिया जातीचे
भक्तीस वाचा फूटे
अनंतकाळ
जीव कासावीस होई
भेटण्या सदा
अशा जातीयांचे मेळे
बरेच घडती…
अर्थ–
आपल्या आवडीची आवड असणारा जेव्हा भेटतो तेव्हा विषयांना, गप्पांना उधाण येते. येथे जातीचे म्हणजे जातधर्म अपेक्षित नसून, आवड असलेली गोष्ट अपेक्षित आहे. बऱ्याच दिवसांनी भेटलेला आपला मित्र किंवा एखाद्या स्त्रीला बऱ्याच वर्षांनी भेटलेली तिची मैत्रीण ही एखाद्या विषयाला हात घालून मग त्यातून अनेक विषय हे उलगडत जातात आणि मग गप्पांचा फड रंगतो.
आपल्या धावपळीच्या आयुष्यात, रोजच्या कामाच्या व्यापात किंवा व्यवसायाच्या व्यापात मग्न असताना जेव्हा आपल्या आवडीच्या विषयातील एखादा व्यक्ती भेटतो तोच आपल्या साठी दिवाळी दसरा असतो.
मग दोन भटके भेटणे, दोन सख्या भेटणे, दोन लंगोटी मित्र भेटणे, दोन चहाबाज भेटणे, किंवा दोन भक्त भेटणे ( येथे अंध किंवा रुग्ण दोन्ही चालतात) अथवा दोन सोमरस प्राशन करणारे भेटणे यांना एका जातीचे मानले आहे.
अशा एका जातीचे मेळावे ठिकठिकाणी बघायला मिळतात आपल्याला, सध्या कोरोना मुळे प्रत्यक्ष नाही पण वेगवेगळ्या माध्यमांनी अशा जातिवंतांना एकत्र जोडले आहे. तेव्हा शोधावे आपल्या जातीचे मग गप्पांचे फड जमतील.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply