ते दिवसच खूप मजेचे होते. शाळा मनात घर करून बसायला लागलेली होती. मुलं, मित्र मंडळी तयार होऊ लागलेली होती. काही तरी पाठ करून म्हणून दाखवल्यावर शाबासकी मिळते, प्रश्नांची उत्तरे दिल्यावर लोक आपल्याला चांगलं म्हणतात. या शाबासकीची ओढ लागण्याचा तो काळ होता.
कुणीतरी मुद्दामहून बोलवून वेगवेगळे प्रश्न विचारणार, आपण त्यांना उत्तरे देणं. . असे संवाद होणार हे सारं खूपच विलक्षण वेड लावणारं होतं. घर आणि शाळा यातला फरक हळू हळू स्पष्ट करणारे वेगवेगळे अनुभव येत होते. शाळेतली शिस्त, वेळेचे भान, अभ्यासाच्या सवयी, शिष्टाचार हे सगळं नवखं होतं. ते लवकर अंगवळणी पडत नव्हतं. इतर मुलांकडे पाहून काही शिकणं चालू होतं. खेळायला बागडायला मिळायचं म्हणून शाळा खूप आवडायची. कधी कधी तर रविवार देखील समजायचा नाही. सकाळीच लवकर उठून तयार होऊन दफ्तर घेऊन शाळेच्या व्हरांडयात मुलांसोबत काही तरी खेळ खेळत बसायचं. खूप वेळ झाल्यावर कळायचं कुणी तरी सांगायचं आज शाळा नसते आज रविवार आहे. खरं म्हणलं तर ही शाळेची ओढ होती. पण ही काही शिकण्याची, अभ्यासाची ओढ होती असे म्हणता येणार. कारण शाळेत जायचं ते गंमती जंमती आणि खेळ खेळायला मिळायचे म्हणून. थोडावेळ रटाळ अभ्यास असायचा पण जास्तीत जास्त मजाच असायची. पोरांच्या त-हा तर फारंच भारी होत्या. . बस नुसते बघत रहावे. कोणी शेंबडे असायचे, तर कोणी गेंगाणे, गेंगाणे म्हणजे बोबड्या आवाजात नाकातून बोलणारे. हे सगळं नैसर्गिक होतं, जसं आहे तसं होतं.
कृत्रीम जीवन तर जीवनात पुढे पहायला मिळालं. म्हणजे कसं एखाद्याच्या नावाने न हाक मारता ये देशपांडे, जोशी, किंवा शिंदे, लोंढे असं . पण तेंव्हा तर आम्ही एकमेकांना राम्या, मारत्या, हणम्या, देईद्या, लिंब्या, परल्या, रम्या, असंच बोलवत असंत. कोणालाच त्याचं काही वाटत नसायचं. अजून गोष्ट अशी की खेळतांना अगदी मन लावून खेळ चालायचा. कशाचंही भान रहायचं नाही. तहान भूक हरवून चालायचं सगळं. . .
बरं खेळ तर असे अफलातून असायचे की बस. खो-खो, कब्बडी, क्रिकेट तर नंतर मोठं झाल्यावर खेळायला लागलो. पण तेंव्हा आवडता खेळ म्हणजे गिरणी. . गिरणी. ओट्याच्या दोन दगडांच्या सामटीतून माती सोडायची. . मातीची धार खाली पडत रहायची . . तीच आमची गिरणी. एक जण खाली पिठ बारीक येतंय की जाड ते हाताच्या बोटावर चोळून पाहणार. . . वर माती सोडणा-याला सांगणार. ह्या पांढ-या मऊ मऊ. . मातीचं फार कौतुक वाटायचं. यात मातीनं अंग सगळं भरुन जायचं नाक पुसून पुसून काळं व्हायचं. कधी कधी तर अंगातले शर्ट काढून त्यात माती भरायची देखील कधी लाज वाटायची नाही. असा मजेशीर खेळ खेळत खेळत आम्ही मोठे होत होतो. . .
दुसरा एक मजेशीर खेळ म्हणजे दोघं मुलांना बैल म्हणून त्यांच्या हाताला दोरी बांधायची अन् त्यांच्या हातात एक काटूक म्हणजे जणू गाडीचे जू असायचे मग त्यांना दीsरं दीsरं करत मागून एका काटकाला दोरी बांधून चाबूक केलेला असायचा, त्यांनं हाणंत गाडी पळायची. . . बैलं उधळायचे. . . कधी तर जवळ आलेल्या पोराला ढुसण्या द्यायचे. . . तोंडाने काही आवाज काढायचे . . टाॅक टाॅsक. . किंवा ओठ मिटून एक पम्s असा आवाज काढला की बैलांनी थांबायचं . .
खेड्यात विशिष्ट प्राण्याला विशिष्ट भाषेत बोललं जातं जणू ही भाषा त्या प्राण्याला कळते अन् आपण त्याला बोलत असतो. जसे म्हशीला बोलतांना हाsल्या. . हाsल्या . . तर गायीला वुई s . . वुsई तर शेळीसाठी थिssर . . थिssर कुत्र्याला हाsड. . हाsड हे सगळं खूप छान वाटायचं. वेगवेगळे खेळ, त्यातली रंगत ही भारी होती. खूपंच गंमतीशीर वाटायचे. . . बैलं धूणे, पाणी पाजणे, कडबा टाकणे हे सारं व्हायचं. यावरुन एक गोष्ट लक्षात येते की हे खेळ नव्हते तर ते ते ख-या खु-या जीवनाचं प्रतिबिंब असायचं.
आज हे खेळ राहिले नाहीत. . . कुठेच. मुलांच्या बालपणातही दडपणाने शिरकाव केलेला आहे. टिव्ही, मोबाईल, गेम याकडे आकर्षित झाली आहेत मुले. खूप हुशार असलेली ही पिढी मात्र प्रचंड तणावाखाली दिसत आहे. यांना भरकटत जाण्या अगोदर त्यांच्यातल्या सर्जनशीलतेला समृद्ध करण्यासाठी जाणीव पूर्वक भयमुक्त वातावरण निर्मितीची आवश्यकता आहे. . .
— संतोष सेलूकर
परभणी
७७०९५१५११०
मित्रवर्य श्री संतोष जी सेलूकर सर
आपण जुन्या शाळेतील व त्या वयातील मित्रांसोबत
खेळाचा आनंद लुटलेल्या सर्व आठवणी जागृत केल्या मस्तच…!
***दिलीप चारठाणकर,परभणी