दिव्यत्वाचा ध्यास जेव्हा मनास माझ्या घेरुन टाकतो
वेड्यासारखा मी पुटपुटतो
माझा भारत, माझा भारत ॥ १ ॥
तुझ्यावर जगणारी पाहून
टोपीखालची बांडगूळं
मी उगा विव्हळतो
माझा भारत, माझा भारत ॥ २ ॥
तुझ्या वेदनेची कळ
माझ्या काळजात उठते
माझ्या जीवनाचा मंत्र तेव्हा
माझा भारत, माझा भारत ॥ ३ ॥
तूच माझा जिव्हाळ्याचा
एकमेव अर्थ जगण्याचा
सत्ताधांना मग का न कळावा
माझा भारत, माझा भारत ॥ ४ ॥
अर्थ दुबळेपणाचा नसतो
तुझ्या सोशिक शांततेला
जिथे ज्योतीतही सामर्थ्य वणव्याचे
तो माझा भारत, माझा भारत ॥ ५ ॥
इथे असते गार सावली
-भव्य हिमालयाच्या छातीची
इथे सौंदर्याला येतो-
-गंध मोहक पावित्र्याचा
इथे निष्पापतेला जोड असते
–समर्थ अशा निर्भयतेची
इथे शांतिपूजक तुम्हां कवटाळतो
–माझा भारत, माझा भारत ॥ ६॥
परकी-संस्कार छायेतल्यांना
उमगत नाही भारताचा गाभा
अखंड इथे पाझरवतो वात्सल्यझरा
माझा भारत, माझा भारत ॥ ७।।
गुलामगिरीच्या निशाण्या अन्
बाळगिती, म्हणती निर्लज्जतेने
ज्ञानकक्षा की हो रुंदावल्या
हजारो अनामिक हुतात्म्यांचा
अपमान पाहून व्यथित होतो
माझा भारत, माझा भारत ॥ ८॥
गलिच्छ डाग पारतंत्र्याचा
पुसला अपुल्या रक्ताने
त्यांच्याशी कायम कृतज्ञ
माझा भारत, माझा भारत ।। ९ ।।
झगमगाटाहून दूर एकांती
स्मरतो भक्तीभावाने लोकमान्यांना
‘मोडेल पण वाकणार नाही’
माझा भारत, माझा भारत ॥ १० ॥
माझ्या काळजाचा तुकडा
विसावा जेव्हा त्याच्या जखमेला
तेवढ्यानेही तो गद्गद्तो
माझा भारत, माझा भारत ॥ ११ ॥
शत्रूलाही ‘सांभाळणाऱ्या खुर्चीचे
का न कळे, न जुळे आपल्याच मातीशी
पुकारतो दोन्ही हाती त्यांना
माझा भारत, माझा भारत ॥ १२ ॥
वैयक्तिक स्वार्थ जेव्हा तुडवतो
हजारो निष्पाप आशाआकांक्षा
अन्यायाने पेटून उठतो
माझा भारत, माझा भारत ॥ १३ ॥
माझ्या भारताला पोहोचतो
टाहो त्याच्या, कणाकणाचा
भरल्या नयनी तो तळमळतो
माझा भारत, माझा भारत ॥ १४॥
माझ्या भारताला आज-
गरज समर्थ हातांची
या शक्तींनो देऊ शाश्वती–
उज्वल उद्याच्या भवितव्याची
हाक तुम्हाला, तुमच्यासाठी-
आसुसलेल्या देशाची
माझा भारत, माझा भारत ॥ १५ ॥
सुवर्णधूर निघो हजार वाटा
हजार हातांनो अविरत झटा
समर्थतेच्या कळसास नेऊ या
माझा भारत, माझा भारत ॥ १६ ॥
कृष्णाची करांगुली कुणी मला द्या
ज्याने नेईन मी हा गोवर्धन
पुन्हा वैभवशिखरी विराजमान
माझा भारत, माझा भारत ॥ १७॥
— यतीन सामंत
Leave a Reply