सकाळचा अभ्यास करुन आम्ही दोघे रोज धावण्यासाठी व व्यायामासाठी बाहेर पडत असू. साधारण दोन एक मैल आम्ही धावत व्यायाम करावयाचा. रस्त्याने वा शाळेच्या मैदानावर चकरा मारायचे.
एक गोष्ट गमतीची घडत असे. अचानक आठवली. शाळेच्या शेजारील शेतामध्ये, प्रासंगीक छोटी छोटी पिके लावली जात होती. त्यांत भुईमुगाच्या शेंगा, चवळी, टहाळ ( हरबरा ), मका, असायचे. ही पिके येऊ लागताच, आम्ही आमच्या व्यायामाची घोडदौड त्या दिशेने घेऊन जात असु. व सकाळच्या प्रहरी, शांत वातावरणात, कुणीही बघत नाही याचा कानोसा घेत,चक्क तेथे तारे खालून शिरुन शेतात जात असू. ते पिक आमच्या पोटाच्या क्षमते प्रमाणेच खात असू. आनंद घेत असू. ज्यांमध्ये इतर भावना, जसे भय, निर्लजापणा, दुसऱ्याचे पिक हडपणे, हे सारे बाल सुलभ दुर्गुण भरलेले होते. आज जेव्हा त्या आठवणी येतात, थोडीशी गम्मत वाटते, थोडीशी खंत वाटते. परंतु वयाचे पांघरुण त्या घटनावर चांगलेच आच्छादले जाऊन, दिलासा देत दुर्लक्ष करण्यास सांगते.
शाळेचे पटांगण हे अतिशय सुलभ, योग्य, असे साधन त्या काळांत आम्हास मिळाले होते. जेथे आम्ही मित्र मंडळी खेळत असू. एक घसरगुंडी होती. सुरपारंबा, आम्ही खेळत असू. घरांत दिलेली रींग, बॉल, बँट, रँकेट, शटल फुल, फुटबॉल हे सर्व सामान्य खेळ होते. क्रिकेट त्या काळी तेथे नव्हते. विटी दांडू हे खेळ होते. मारुतीनेच मला सायकल चालवण्याची कला व बँलेंस शिकवले.
आम्ही दोघे एकाच वर्गांत व एकाच शाळेत. जिल्ह्याचे ठिकाण बीडचे. असे ऐकले की बीडचे पुर्वीचे नाव चंपावती नगरी होते. तेथेच चंपावती विद्यालय ही शाळा स्थापन झाली होती. त्याच शाळेंत आम्ही दोघे आठवीच्या वर्गांत होतो. त्या वेळी तोच शाळेमधला सर्वांत मोठा वर्ग समजला जाई. नंतर जस जसे आम्ही पुढील वरच्या वर्गांत जाऊ लागलो, शाळेलाही वरचावर्ग स्थापन करण्याची शासकीय मान्यता मिळत गेली. आज तर ती संस्था फार मोठी झालेली कळते. चंपावती शाळेच्या व्यवस्थापनेत नवीन शिक्षकांची भरती होतच होती. शाळेच्या संस्थापनेच्या संबंधीत कांही शिक्षक मंडळी होती. माझ्या माहितीप्रमाणे व आज मला आठवते, ते होते, श्री. ना. के. महाशय गुरुजी. ते ही आम्हास शिकवायचे. तसेच घारपुरे गुरुजी, पांडे गुरुजी. तेथेच नवीन गुरुजी त्यावेळी आले ते मुकुंद घनशाम कुलकर्णी. ते सोलापुरचे होते. एका शब्दांत जर टिपणी करयची, तर खऱ्या अर्थाने माझ्या संपुर्ण शैक्षणिक क्षेत्रामधील अतिशय उत्तम, आदर्शवादी, शिक्षक म्हणून मी त्याना प्रथम प्राधान्य देईन. जीवनाची इमारत जर पायावर आधारीत असते, तर माझ्या शैक्षणिक जीवनाचा पाया जबरदस्त पक्का व मजबुत बनविताना श्री. मुकुंद घनशाम कुलकर्णी गुरुजींचा प्रमुख सहभाग त्यांत होता. त्यानी पुस्तकी ज्ञान, अभ्यास क्षेत्र, व्यायाम, ह्या प्रांतामध्ये शिक्षकी मार्गदर्शन केले. तसेच ते सतत जीवन म्हणजे काय, जीवनाला कसे सामोरे जावे, जीवनातील यश मिळवणे हेच कोणतेही शिक्षण घेण्याचे सार असते. ध्येय असावे लागते हे सांगत. अनेक सामान्य विषयांची चर्चा करीत. आमच्या विकसीत होऊ पाहणाऱ्या बुद्धीला सतत चालना व चैतन्य देत असत. अनेक छोटी छोटी उदाहरणे, सांगुन थोरा मोठ्यांच्या यश्स्वी जीवनाच्या कथा वर्णन करीत. अभ्यास, ज्ञान, आणि जीवन या तिन्ही गोष्टी यशस्वी करण्यावर त्यांचा भर होता. अनेक वेळा सांज समयी ते फिरावयास जायचे, त्याच वेळी मारुती व मी ती वेळ हेरुन त्यांच्या बरोबर जात होतो. त्यांच्या सहज वा सामान्य बोलण्यातच आम्हाला कित्तेक विषयांच्या गम्मती कळत असते. एक प्रेमळ गुरु शिष्य नाते होते. शाळेमध्ये त्यानी अनेक नव्या नव्या योजना राबवल्या. मारुती व मी, आम्हा दोघाना ते विशेष महत्व द्यायचे. आम्ही पण सारे मन लाऊन ती कामे पुर्ण करण्याचा प्रयत्न करीत असे. दोन योजनांचा मी प्राथमिकतेने उल्लेख करु इच्छीतो.
शाळा तशी खुपच लहान होती. परंतु त्यानी तीचे नांव बीडच्या परिसरांत व जिल्ह्यांत दुरपर्यंत नेऊन ठेवले. त्याच शाळेत त्यानी ज्ञान विकास ह्या नावाचे हस्त लिखीत मासिक सुरु केले होते. मासिक फक्त विद्यार्थ्यांचे व विद्यार्थ्यानीच चालविलेले हेते. सारी सकल्पना कुलकर्णी गुरुजींचीच. सर्व विद्यार्थ्याना लेखनाची गोडी निर्माण करणे हा प्रमुख हेतू. मला म्हणजे भगवान ह्या विद्यार्थ्याला “ संपादक ज्ञान विकास “ म्हणून निवडले गेले.
आज ज्येष्ठ वयाच्या वळणावर, त्या घटनेबद्दल खूप आनंद व समाधान वाटते. त्या क्षणी मला फक्त आनंद वाटला होता. कारण समाधानाचा संबंध योग्यतेशी, क्षमतेशी असतो. आणि त्याचे तसे विश्लेशन, त्यावेळी कसे असणार. अर्थात “न धरी शस्त्र करी मी “ ह्या भगवंताचा वचनाप्रमाणे कुलकर्णी गुरुजी सतत पाठीशी होते. सर्व विद्यार्थ्याचे लेख कविता जमाकरणे, वाचून संपादन करणे, चांगला वा वाईट म्हणून त्यावर टिपणी करणे, हे काम मजवर सोपविले होते. शेवटी कुलकर्णी गुरुजी त्यावर मत देऊन लेख निकाली काढीत. सर्व लेख श्री कुलकर्णी गुरुजीनी स्वतःहाच्या हातानेच लिहीले होते. त्याकाळी छपाई करणे हे मार्ग फार दुर्मिळ होते.
ज्ञान विकास हस्त लिखीत मासिक संपादक भगवान नागापूरकर वर्ग ८ वा. आज त्याची खुप गम्मत वाटते. येथेच माझी एक फजीती झाल्याची आठवण येते. माझा मित्र मारुती याने एक लेख लिहून मासिकासाठी दिला. त्यानी नांव दिले होते “ मुऱ्हाळी “
मला त्याचाच अर्थ माहीत नव्हता. त्याचा बोध मला झाला नाही. ते सारे क्षुल्लक समजुन मी तो ‘अस्विकृत” अशी टिपणी करुन बाजूस टाकला. सर्व लेखांचा गठ्ठा मी कुलकर्णी गुरुजीकडे दिला. दोन दिवसानंतर तोच गठ्ठा मला परत देण्यांत आला. माझे लक्ष वेधले गेले ते मारुतीच्या मुऱ्हाळी ह्या लेखावर. गुरुजीनी लाल शाईने पहील्या पानावर लिहीले होते
“ उत्तम लेख प्रथम क्रमांक “ मी खजील झालो. कुलकर्णी गुरुजीनी मला बोलाऊन सांगितले. “ मुऱ्हाळी ही भावनिक व्यक्तीरेखा आहे. हा प्रेमळ भाऊ असतो. तो आपल्या लग्न झालेल्या बहीणीकडे जातो. तीला दिवाळीसाठी तीच्या माहेरी म्हणजे आई वडीलांकडे घेऊन येण्याचा प्रचत्न करतो. हा अतिशय भावनापुर्ण व प्रेमळ प्रसंग असतो. मारुतीने त्यावरच बहीण भाऊ प्रेमाचा नैसर्गिक धागा धरुन, सुंदर प्रकाश झोत टाकला. तु पण असेच लिहीत जा. “
मारुतीचे हेही वेगळे स्वरुप माझ्या ध्यानी आले. त्यावेळी मला माझ्या विषयी खंत व लज्जा वाटू लागला. मारुतीने दिलेल्या शिर्षकाचे मुऱ्हाळी या शब्दाचे अवलोकनच झाले नव्हते.
गुरुजीनी दुसरी अशीच योजना फार यशस्वी केली. त्याच शाळेंत प्रदर्शन भरऊन. मारुतीला ह्या योजनेमध्ये प्रमुख केले गेले होते. त्याच्या बरोबर आम्ही आठजण इतर मित्र मंडळी होतो. गुरुजींचे मार्गदर्शन होते. मारुती सारी योजना कामे आमच्याकडून करऊन घेत असत. चित्रकला, हस्तकौशल्य, वैज्ञानीक प्रयोग, अनेक चित्र विचीत्र गोळा केलेले पदार्थ, रांगोळ्या, दैनंदीन जीवनामधील प्रात्यक्षीके, ईत्यादी अनेक अनेक दालनानी त्या प्रदर्शनांत खपच भव्यता, दिव्यता आणली होती. मारुती व मी दोघेही, त्या प्रदर्शन निर्मीती मध्येखुपच प्रयत्नशील व यशस्वी ठरलो. अर्थात कुलकर्णी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली.
पुढचा भाग पुढील अंकात—
डॉ. भगवान नागापूरकर
Leave a Reply