सुख वाटल्याने वाढतं म्हणतात. मला नाही ते पटत. एकतर त्या सुखद भावनेचं फिलिंग फार-फार तर २-३ दिवस राहतं आणि नंतर ते ओसरतं, सामान्य जीवन सुरु होतं. प्रमोशन मिळाल्याचा आनंद फारतर दोन दिवस टिकतो, पेढे वाटणे, एखादी पार्टी, घरच्यांबरोबर हॉटेलात जेवण ! संपलं उत्सवीकरण. नंतर आपण ते विसरूनही जातो. बरं आपलं सुख वाटलं तरी कितीजण सुखावतात- घरचे ४-५ आणि एखाददुसरा जिवलग ! मुळात सुख हीच शॉर्ट लिविंग संकल्पना असेल तर ती किती वाढेल आणि किती काळ टिकेल? कदाचित तोपर्यंत नव्या सुखाची चाहूल लागेल आणि आपण त्याच्या स्वागताला धावू- जुनं सुख मागे ठेवून ! बाकीच्यांना तोंडदेखला आनंद होत असेल पण तो खरा किती आणि कितपत खोलवर?
दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं.
म्हणून की काय गेल्या काही वर्षांमध्ये दुःखाच्या बाबतीतही शेअरिंग कमी झालेलं आढळतं. माझ्या परिचिताच्या घरी एका व्यक्तीचे निधन झाले, त्यावेळी मी आणि माझे एक नातेवाईक भेटायला गेलो होतो. घरातील मंडळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आपापल्या दुःखाला कुशीत घेऊन बसली होती. दोनजण बाहेर येऊन आम्हाला भेटले – जुजबी बोललो आणि आम्ही निघालो.
” काही होतंय का?” असं विचारलं की आजकाल सर्रास “नाही” एवढंच उत्तर येतं. होत असतं पण सांगणार नाही. ( वेगळ्या संदर्भातील कुसुमाग्रजांची ओळ – ” पण बोलणार नाही ! ” ) जो तो आपापल्या विवंचनेत, ताणतणावात आणि नाही सांगत इतरांना काही ! कदाचित तेवढी जवळीक नसेल असं म्हणावं तर बहिणी-भावंडांमध्येही काही वाटलं जात नाही. दवाखान्यातून घरी आल्यावर मग कळवलं जातं. ” आमचा प्याला दुःखाचा, डोळे मिटून प्यायाचा ! ” असं काहीतरी जाणवतं आसपास. प्रत्येकाचे कोष आणि प्रत्येकाचे कप्पे ! त्यांत इतरांना ” तुम्हांला कशाला त्रास ” असं वाक्य उच्चारून दारावरच अडवलं जातं.
बरेचजण आभासी माध्यमांमध्ये मोकळे होतात, त्यांत सांत्वन शोधतात. सगळेच “जी ए ” झालेत- कागदाला सांगणारे ! खरी नाती मग बाजूला / कोपऱ्यात ! एखाद्याची नोकरी गेली तरी ते परक्याकडून किंवा समाजमाध्यमातून कळते. इतरेजन तेव्हढे जवळचे नाहीत आणि भावनिक आधाराला आता तांत्रिक आधाराने सक्षम पर्याय दिलाय. खरं तर वाईट काळात सल्ल्यापेक्षा आणि RIP सारख्या जोडलेल्या हातांपेक्षा जवळचे खांदे हवेत. पण निवड व्यक्तिगत होत चालली आहे.
” वाटण्या ” वरचा ( फीलिंग आणि शेअरिंग या दोन्ही अर्थाने ) आता विश्वास उडालाय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply