माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो मोठा होऊन कर्ता पुरुष होईपर्यंत, त्याचं कुटुंबातील सर्वजण ऐकत असतात. त्यावेळी तो म्हणेल ते ऐकणाऱ्यांचं प्रमाण, हे १००% असतं. त्यात कुणाचीही भागीदारी नसते. त्याला घरात मानाचं स्थान असतं. आई-वडिल, भाऊ-बहीण त्यांच्या म्हणण्याला मान देत असतात.
यथावकाश त्याचं लग्न होतं. संसार सुरु होतो. गृहलक्ष्मीच्या आगमनानंतर त्याचं ऐकणाऱ्याचं प्रमाण, निम्यावर. म्हणजे ५०% वर येतं. कारण तर त्याची पत्नी, त्याच्यातील ५०% ची भागीदारीण होते. तिला सुद्धा तिची मतं मांडण्याचा अधिकार प्राप्त होतो. घर चालविताना तिच्या मतांनाही प्राधान्य द्यावं लागतं.
गृहास्थश्रमात काही वर्षांनी त्याला पुत्रप्राप्ती होते. मुलं झाल्याऩंतर त्यांच्या संगोपनात हा हा म्हणता, पंचवीस वर्षे निघून जातात. सहाजिकच त्याचं ऐकणाऱ्यांचं प्रमाण मुलांमध्ये विभागलं जाऊन ते २५% वर येतं. मुलं मोठी झाल्याने त्यांनाही, त्यांची स्वतःची मतं असतात.
मुलांना नोकरी लागते, त्यांची लग्न होतात. दोन मुलांच्या दोन सुना आल्यावर, त्याचं ऐकणाऱ्यांचं प्रमाण त्यांच्या सुनांमध्ये विभागले गेल्यामुळे ते १५% वर येतं. घरात गोकुळ नांदत असतं. हा आता नोकरीतून निवृत्त झालेला असतो. आता त्याच्याशी बोलायला कुणाकडेही वेळ नसतो. त्यामुळे त्याचं, ऐकणाऱ्यांचं प्रमाण, शून्यावर आलेलं असतं.
थोडक्यात, साठीनंतर माझंच खरं किंवा आपलं कुणी ऐकेल, ही अपेक्षा कधीही ठेवू नका. आणि हे जर वेळीच समजलं तर आनंदाने जगाल. यावेळी तुमचं ऐकणारे फक्त तुमचे जवळचे मित्र व मैत्रिणीच असतील, त्यांच्या सहवासात मजेत जगा. त्यांच्याशी तुमच्या खाजगी गोष्टी शेअर करा. सहलीला जा, करमणुकीचे कार्यक्रम पहा. जुन्या आठवणींना उजाळा द्या. हेच खरं हक्काचं ’बोनस लाईफ’!!
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२९-५-२२.
Leave a Reply