गाण्यासोबत जगणं हे एक अलिखित समीकरण आहे.
जसं जगणं महत्वाचं तशीच जगण्यासाठी गाणीही महत्वाची…
किमान आमच्यासारख्या संगीत प्रेमींसाठी तरी… किती गाणी पहा बरं आपण अगदी सहज जाता जाता गुणगुणत असतो.. आजच सकाळी मुलाला शाळेला सोडायला जाताना किती गाणी भेटली… सांगू..
मेट्रो चं काम सध्या पुण्यात जोरात सुरु आहे. त्यासाठी बिचारे कामगार रात्रंदिवस कष्ट करत असतात. एक जण एक मोठाली दांडी उचलत होता. पण जड असल्याने त्याला ते काही सहज जमत नव्हते तर तिथल्या साईटवरच्या काही त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला हात लावला नि चौघांनी मिळून सहजच तो भार हलका केला. आणि चटकन या ओळी ओठी आल्या..
‘साथी हाथ बढाना… एक अकेला थक जायेगा मिलकर बोझ उठाना… साथी हाथ बढाना….!!
त्यानंतर एकाची बस सुटली ती तो धावत पकडत होता… अरे ए थांब!’ रुक जा ओ जानेवाली रुक जा, मै तो राही ‘तेरी मंजिल का’…
बरं का यात नंतरच्या पक्त्तींचा मतितार्थ अगदी भिन्न असला तरी सुरुवातीच्या ओळी मात्र अगदी चपखल बसतात.
जरा पुढे गेलो तर सुंदर सूर्योदय नजरेस पडला… दिवस असा प्रसन्न उलगडला त्या भास्कराच्या दर्शनाने
मग हमखास आठवणार प्रभातीचं गाणं ‘उठा उठा सकळिक वाचे स्मरा गजमुख…’ (यावेळेत अर्ध शहर जाग असलं तरीही )
तिथून पुढे मुलांची शाळा येते…’किलबिल किलबिल पक्षी बोलती ‘ पक्षी त्यांची पिल्लं त्यांची किलबिल बडबड हेच सगळं चित्र अगदी हुबेहूब समोर येतं.
शाळेच्या गेटवर एक खमकी सावळीशी बाई युनिफॉर्म मध्ये उभी असते. हातात दंडुका नि डोळ्यात करारीपणा… तीला पाहून वाटतं… मी रात टाकली… मी कात टाकली!!
नंतर सामोरं येतं ते पुण्याच भयानक ट्राफिक… तरीही त्यातूनही या ओळी सुचतातच…’ रुक जाना नही…तू कही हारके’..
पुढे सापडतो तो गच्च भाजी लादून आपल्या हातगाडा मार्केट हुन गावात नेणारा भाजीवाला… न जाणो अजून कित्येक मैलाने त्याचं गाव येणार असतं… त्याला म्हणावंसं वाटतं…’तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची? परवा बी कुणाची?’…
त्यापुढे अगदी श्रमिकांच्या वस्तीतुन जाणाऱ्या रस्त्यावर विसंगत दृश्यात एकटीच ललना धावताना दिसते. टाईट जॉगिंग ड्रेस घालून कानांत आपल्याच नादात चालणाऱ्या गाण्यावर चालणारी? कि धावणारी?
तिला ओरडून गावसं वाटतं ‘गं साजणी!!! कुण्या गावाची? कुण्या राजाची तू गं राणी… गंअअअअअअअ! आली ठुमकत नार लचकत मान मुरडत….’
एक जागा अशीही येते… जुन्या आठवणीतली….जिथे वेळ काळ न पाहता दोस्ती यारीचे अड्डे एकेकाळी जमवलेले असतात.. जाने कहा गये वो दिन…. किंवा मग दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिन! असो… नॉस्टॅलजिक का काय ते व्हायला होत मग.
एखादा गाडीवान आपल्याच मागे बराच वेळ येत असतो….आपण ते हेरलेलं असतं कोपऱ्यातून… तोच तो ‘ जहाँ मै जाती हू वही चले जाते हो वाला
मग पुढे एका मोठ्ठया सिग्नलला अनेक लोकं काही वस्तू विकताना दिसतात. त्यांची कामचलाऊ झोपडी तिथेच पदपथावर वसलेली असते… हेच ते… ना घर है… ना ठिकाणा वाले… बस्स! चलते जाना है!
मग हळूहळू आपली मंजिल म्हणजे घर जवळ येत जात…हुश्श आलं बाई एकदाच म्हणून आपण जीव टाकतो… तेव्हा आठवत… जिसका मुझे था इंतजार!
अशी गाणी तुम्हालाही आठवतात काहो… नक्की सांगा! आणि नसतील आठवत तर आठवून पहा अशा प्रसंगी… रोजचंच तेचं तेचं जगणं रुटीन डेली वर्क पण
तेही खूप मजेदार होईल नाही का? आणि आपल्या अतिशय अतिशय व्यस्त कामातूनही वेळ काढून मोठ्याने बरं का कानांत कोंबून नाही आपल्या आवडीची गाणी नक्की ऐका… ऐकवा ! अशीच ऐकून ऐकून नंतर ती अचानक आठवतात… आणि आपल्याला त्यांच्या आठवणीत रमवतात!
— वर्षा कदम – संगीतवेडी.
Leave a Reply