एका मोठ्या कारखान्याचा मालक,
भासत होता छोट्या विश्वाचा चालक
लाखो रूपयाची उलाढाल रोज होत होती,
मागणी, पूरवठा, उत्पन्न याचा बनला होता त्रीकोण
उत्पन्नानी घेतला होता उंची वरचा कोन,
लक्ष्मी मालकावर प्रसन्न होती,
खातां आलं असतं तर प्रत्येक जेवणांत पाव किलो सोनं आणि तोंडी लावायला चार हिरे
पण नशीब दुर्दैवी बिचारे,
मधूमेह आणि रक्तदाब होता त्याला,
वर्ज्य केल होत साखर व मिठाला
नाचणीची भाकरी व उकडलेल्या अळणी भाज्यांमधून शोषित होता जीवन सत्व.
जगण्यासाठी आहार नियंत्रण
समजला होता हे तत्व. वात पित्ताची प्रकृती त्याची. थंड पाणी थंड हवा यांचे पासून दूर राहण्याची. लाकडाच्या टणक फळींचा केला होता खास पलंग,
कारण मऊ गादीमुळे ठणकत होते त्याचे अंग,
आणि त्याच पलंगावर बसून नैसर्गिक हवा व प्रकाशामध्ये, कंपनीच्या लाखो रूपयाच्या Balance Sheets वर व चेक्सवर स्वाक्षऱ्या करित होता.
पाने मागे पुढे चाळीत होता, मध्येच मान वर करून बघत होता, विचारत होता, समजल आहे हे दाखवित होता, हिशोब तपासनीस, सेक्रेटरी, पर्सनल मॅनेजर सारे उभे होते सभोवताली.
माना त्यांच्या झुकत होत्या, शब्द त्याचे ते उचली,
कसला तरी आंतरीक अभिमान अहंकार चेहऱ्यावर चमकत होता.
आपल्या एका स्वाक्षरीमध्ये लाखो रूपयाच्या उलाढाली सहजगत्या होण्याची ताकद आहे ह्या जाणीवेने, मध्येच थांबून सेवकाने टेबलावर ठेवलेले लिंबू सरबताचे घोट पित होता… सरबत…. स्वच्छ निर्मळ पाणी त्यांत लिंबाचा रस. साखर मिठ वर्ज्य असलेले,
हा भोगत होता आणि इतर उपभोगात होते,
तरी देखील हे सारे माझे आहे, हीच खोलवरची जाणीव त्याला जगवीत होती..
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सुंदर, सहज, चटकन अर्थ सांगून जाणारे शब्द, तुमच्या साऱ्याच कविता अप्रतिम आहेत.