नवीन लेखन...

माझे शिक्षक – भाग ४ (आठवणींची मिसळ १८)

एम ए हायस्कूलबद्दलची आणखी एक हृद्य आठवण मला सांगितलीच पाहिजे.नाहीतर मी कृतघ्न ठरेन.माझ्या जन्माच्या सुमारास माझ्या वडिलांना स्थिर नोकरी नव्हती.वकिली न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि १९३४मधे बेळगावला कोचिंग क्लासेस काढले.त्यांत खूप नुकसान झालं.क्लासेसना चांगले दिवस यायला अजून वेळ होता.त्यानंतर बेळगावचं घर विकून, कर्ज फेडून ते मुंबईस आले.वसईचे वाघ हायस्कूल, लालबाग-परळचे सरस्वती हायस्कूल, खारचे एक हायस्कूल अशा अनेक शाळांमधे त्यांना तात्पुरती नोकरी मिळत असे.पण कायमस्वरूपी कधीच मिळाली नाही.मग त्यांच्या रहाण्याचे ठिकाणही सतत बदलत होते.भाडे देणे परवडले नाही की ते वसईत बहिणीकडे जाऊन रहात.आम्हाला बराच काळ आईबरोबर आजोळी सोडून येत. १९४१च्या सुमारास सामंत नांवाच्या एका एम. ए. हायस्कूलमधील सरांना चार महिन्यांची रजा हवी होती.शाळेने त्यांच्या बदली चार महिने शिक्षक द्यायची जबाबदारी त्यांच्यावरच टाकली.ते माझ्या वडिलांना ओळखत होते.मग माझे वडील चार महिने एम. ए. हायस्कूलचे शिक्षक झाले.रहाण्याचा प्रश्नही सामंत सरांनीच सोडवला.ते कांही शिकवण्या करत.त्यांत चाचड नांवाच्या, आम्ही नंतर जिथे राहिलो त्या वाडीच्या मालकांचीही मुलेही होती.त्यांच्या बैठ्या चाळीच्या दोन रिकाम्या खोल्या त्यांनी माझ्या वडिलांना दिल्या.रोख भाडे न देता मालकांच्या सात-आठ मुलांची शिकवणी घ्यायची असे ठरले.एम.ए.हायस्कूलमधील त्या चार महिन्यांच्या नोकरीच्या निमित्ताने आम्ही अंधेरीत स्थिरावलो.मी १९६५पर्यंत आणि माझा भाऊ १९७० पर्यंत तिथे रहात होता.त्यानंतर त्याने ती जागा मालकांच्याच एका मुलाकडे सूपुर्द केली.भरपूर पैसे घेऊन तिसऱ्यालाच जागा देणे शक्य असताना माझ्या भावाने जागा मालकालाच कांहीही न घेता परत केली.हाही अपवादच.

वर्तक सर हे अॉफीसचे काम बघत पण एखादे सर आले नसले तर ते तास घेत.त्या वेळी ते महाविद्यालयात शिकत होते.पुढे त्यांनी मराठींत एम.ए आणि पी.एचडीही केली.ते नासिकच्या महाविद्यालयांतून रिटायर झाले.त्यांनी मराठी साहित्यांत लेखक म्हणूनही नांव कमावलं.चार पांच वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.ते उत्तम शिक्षक होते.ते एखादा नाटकाचा प्रवेश असावा, अशा आवेशाने किंवा जो भाव दर्शविणे आवश्यक असेल तो भाव बोलण्यांतून व्यक्त करीत.आम्हां कांही मुलांना ते आवडीने मराठीचा जादा तास घेत.त्या तासाला टेक्स्ट बुक नसे.सर्व अलंकार, छंद, व्याकरण, इ. ची छान माहिती उदाहरणासहीत देत.एखादे मराठी नाटक, एखादा काव्यसंग्रह यावर ते बोलत.हा वर्ग ते एक वर्षच घेऊ शकले.मी म्हटल्याप्रमाणे हे सर्वशिक्षक तरूण होते.त्यावेळची एक आठवण दुस-या सरांनी मला एकदा सांगितली.गुजराती विभागाच्या एक शिक्षिका त्या काळच्या मानाने खूप फॕशनेबल होत्या.मुख्य म्हणजे त्यांचा पदर पांच-दहा मिनिटांनी घसरतअसे. एकदां गॕदरींगच्या मिटींगला तीन चार मराठी शिक्षक आणि त्या चर्चा करत होत्या. चर्चा सुरू होऊन पांच मिनिटे झाली नाहीत तोचत्यांचा पदर घसरला.तरूण मंडळीना ते अपेक्षित होतं.वर्तक पटकन् म्हणाले, “ढळला रे ढळला दिनू, सखया.”घाटे सरांना दिनू म्हणत असत.भा.रा. तांबेच्या सुप्रसिध्द”ढळला रे ढळला दिन सखया”ह्या ओळीतील ‘दिन’ चे ‘दिनू’ करून त्यांनी ती गोष्ट इतरांच्या लक्षात आणून दिली.सर्वांना हंसू आवरावं लागलं.त्या शिक्षिकेला अर्थातच कांही कळले नाही.महाविद्यालयांत ते नक्कीच विद्यार्थीप्रिय प्राध्यापक झाले असतील.मंत्री सरांचे अंधेरी रात्र विद्यालय जेव्हां मी सोडले, तेव्हां वर्तक सर मंत्री सरांच्या मदतीला म्हणून माझ्या जागी आले.तिथे एखादं दोन वर्ष त्यांनी काम केलं.त्याच अवधीत ते प्रथम एस.एन.डी.टी. मधे मराठीचे प्राध्यापक झाले.पुढे ते नाशिकला स्थायिक झाले.मला मराठी वाचन-लेखनाची आवड होतीच.वर्तक सरांनी ती शाळेत असतानाच आणखी फुलवली.

साठे सर हे कधी सायन्स शिकवीत तर कधी इतिहास.कांही महिने त्यांनी मराठी शिकवले.त्याची आठवण रहाण्यास एक कारण झाले.त्यांनी “आई” ह्या विषयावर निबंध लिहायला सांगितला होता.त्या काळी मराठी निबंधाला बारा किंवा जास्तीत जास्त चौदा मार्क देत असत.माझ्या “आई”वरील निबंधाला त्यांनी १७ मार्क दिले होते.वर्गामधे निबंधाची प्रशंसाही केली होती.ते उंच, गोरे होते.खाकी रंगाचा, दोन्ही बाजूला खिसे असलेला शर्ट घालीत.पण चेहरा कोरा असे.त्यांच शिकवणं यथातथाच होतं.मला वाटतं त्यांना शिक्षक होण्यात बिलकुल रस नव्हता.नंतर आम्हाला नववीला कांही दिवस इतिहास शिकवायला ते होते.इतिहासाच्या त्यांच्या तासाला इतिहासाच्या पुस्तकांतील चित्रांना सजवण्याचं, म्हणजे राण्यांना दाढीमिशा लावण्याचं आणि राजांचे मुकुट सुधारण्याचं आवडतं काम सर्वजण करत असत.ते एम.एस्सी. होते.पुढे त्यांना ए.सी.सी. मधे नोकरी मिळाली आणि राजे-राण्या अधिक विद्रूप होण्यापासून वाचल्या.

मंत्री सरांबद्दल मी “माझी करीअर” ह्या लेखमालेच्या पहिल्याच लेखांत लिहिले आहे.मंत्री सरांवर मी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे.अनेक प्रसंगी बोललेलो आहे.एक शिक्षक म्हणून ते अनेक कारणांनी विद्यार्थीप्रिय होते.त्यांचे मृदू, मधुर पण स्पष्ट सर्वाना ऐकू येईल अशा आवाजातलं बोलणंच सर्वाना आपलसं करून घेई.ते गोरे, नीटस बांध्याचे, मध्यम उंचीचे आणि हँडसम होते.ते आठवीत आम्हाला विज्ञान शिकवत.नववीपासून विज्ञान आणि गणित शिकवत.कठीण विषय सोपे करून सांगत.एकच उदाहरण सांगतो.एका कोळी मुलाने सरांच्या उत्तेजनामुळे विज्ञानांत पी.एचडी. केली आणि अनेक वर्षे महाविद्यालयांत प्रोफेसर म्हणून काम केलं.सरांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला आम्ही केलेल्या कार्यक्रमांत त्यानेच हे सांगितले.एम.ए. हायस्कूलमधे तीन विशेष गोष्टी होत्या.एक प्रचंड मोठ्ठं मोकळं मैदान.दुसरी प्रोजेक्टर असलेलं थिएटर आणि तिसरी एखाद्या महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेला लाजवेल अशी सुसज्ज विज्ञानाची प्रयोगशाळा.मंत्री सरांचे बहुतेक तास तिथेच असत.प्रयोगशाळा तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे सरांचा पिरियड असला की प्रयोगशाळेत मोक्याची जागा पकडण्यासाठी सर्व विद्यार्थी जिन्यावरून धांवत जात.त्यांत प्रयोगशाळेचं आकर्षण असायचं तसंच सरांच्या शिकवण्याचही.सर पुढे समर्थ विद्यालयाचे प्रिन्सिपाल झाले व तिथूनच रिटायर झाले.

मी १९५६ साली एसेस्सी झालो, त्याच वर्षी उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना मंत्री, घाटे आणि दाभोळकर या त्रयीने केली.त्यांच्याबरोबर निळकंठ जूकर हे सरांचे मित्रही होते.१९५७ साली संस्थेच्या पहिल्या रात्रशाळेंत मी शिक्षक म्हणून माझी करीअर सुरू केली.याचा उल्लेख माझी करीअरच्या पहिल्याच लेखांत आला आहे.१९५६ ते २०१६ ही ६० वर्षे सरांनी उपनगर शिक्षण मंडळाचे विश्वस्त म्हणून काम केले.त्यातील पंचावन्न वर्षे ते संस्थेचे सेक्रेटरी होते.वंचितांसाठी शिक्षण हे संस्थेचे ब्रीद आहे.आजतागायत संस्थेच्या सर्व शिक्षण संस्थात ॲडमीशनसाठी कोणतंही डोनेशन घेतलं जात नाही.सुरूवातीला आठ दहा वर्षे फक्त अंधेरी आणि सांताक्रूझ इथे दोन रात्रशाळाच संस्थेच्या वतीने चालत.पुढे अनेक अर्ज विनंत्यानंतर जूहू येथे संस्थेला शाळा उभारण्यासाठी सरकारतर्फे भूखंड देण्यात आला.अट होती की किंमत एक महिन्याच्या आत सरकारकडे जमा करायची.संस्थेच्या गंगाजळीत फारच अल्प निधी होता.मंत्री सर, दाभोळकर आणि निळकंठ जूकर, हे संस्थेचे विश्वस्त अक्षरशः झोळी घेऊन महिनाभर दारोदार फिरले.आणि मुदतीच्या केवळ एक दिवस आधी आवश्यक निधी सरकारी खात्यात भरला.संस्थेला हक्काची जागा मिळाली.मग इमारत बांधण्यासाठी निधी गोळा करणे सुरू झाले.

आता उपनगर शिक्षण मंडळ विद्यानिधी संकुलात १२ संस्थासह वटवृक्षासारखी जूहूला उभी आहे.दोन मोठ्या इमारती आहेत.एकात कमला रहेजा कॉलेज आॉफ आर्कीटेक्चर आहे.रहेजांनी देणगी दिली त्यांत हे नाव देण्याची अट होती.रहेजांनी सरांना खूप त्रासही दिला.६०वर्षे निष्कलंक असणाऱ्या संस्थेच्या विश्वस्तांवर (मंत्री सर आणि निळकंठ जूकर) आपल्या देणगीचा अपहार केल्याचा फौजदारी गुन्हा दाखल केला.पोलीसांनी सरांची उलटसुलट तपासणी करून, खूप त्रास देऊन, केस उभी केली.हायकोर्टाने पहिल्याच सुनावणीमधे त्यांना निर्दोष ठरवल्यावर रहेजांनी केस सुप्रीम कोर्टात नेली.सुप्रीम कोर्टात राम जेठमलानींचे पुत्र महेश जेठमलानी यांनी रहेजाच्या वतीने केस लढवली.तेव्हां सरांच वय होतं ८८.रहेजांची ही खेळी नेहमीचीच असावी.हॉस्पिटल्स शाळा यांना मदत करून संस्थेत शिरकाव करून घ्यायचा.प्रथम संस्था ताब्यात घ्यायची.मग ते भूखंड लाटायचे.ॲडमिशनसाठी भल्या मोठ्या रक्कमांच्या देणग्या घ्यायच्या.परंतु सुप्रीम कोर्टाने मुळावरच घाव घातला.रहेजांनी जाहिरात देऊन संस्थांना मदत देऊ केली होती, अर्ज मागवले होते.सरांनी ती जाहिरात संस्थेच्या दफ्तरांत ठेवली होती.सरांची संस्था केवळ एक अर्जदार होती.तिचाच विचार करण्याचे रहेजांवर बंधन नव्हते.रहेजांनी म्हटले होते की विश्वस्तांनी गोड गोड बोलून आमच्याकडून मोठी देणगी उकळली.रहेजांनी केलेल्या फसवणुकीच्या आरोपांत मुळीच तथ्य नसल्याची नोंद करून सुप्रीम कोर्टाने केस निकालांत काढली.सरांच निष्कलंकत्व झळाळून निघालं.

मी रात्रशाळा सोडल्यानंतरही माझा सरांशी कायम संपर्क राहिला.संस्थेच्या प्रत्येक महत्त्वाच्या कार्यक्रमाला ते मला निमंत्रण देत असत.मला नेहमी जाणे जमत नसे.विद्यानिधीची दुसरी इमारत तयार झाली.त्या इमारतीत तळमजल्यावर मोठा हॉल बांधला आहे.त्या हॉलचं अनावरण करण्यासाठी त्यांनी मला व माझ्या पत्नीला बोलावले.प्रमुख पाहुणा म्हणून त्या हॉलमधलं पहिलं भाषण करण्याचा मान त्यांनी मला दिला.निवृत्तीनंतर मला व्यक्तिमत्त्व विकासाच्या कार्यशाळा घेण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरचा ए. सी. हॉल अल्प भाडे घेऊन दिला.सर्व शिक्षकांसाठीही माझ्या कार्यशाळा नियोजित केल्या.सरांनी लिहिलेल्या चार पुस्तकांपैकी तीन पुस्तकांच्या प्रकाशनाला मी वक्ता म्हणून आमंत्रित होतो.त्यापैकी एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तत्कालीन मंत्री राम नाईक होते.विद्यानिधीत दरवर्षी शिक्षकांना वर्षाचे नियोजन करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेण्यात येतो.त्या कार्यक्रमाला शिक्षणक्षेत्रांतील एखाद्या मोठ्या व्यक्तीला निमंत्रित केले जाते.आवडता विद्यार्थी म्हणून तोही मान सरांनी मला दिला.मंत्री सर आणि निळकंठ जूकर ह्या दोन विश्वस्तांनी ५५ वर्षे अनुक्रमे सेक्रेटरी व खजिनदार म्हणून काम पाहिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यासाठी विद्यानिधीने मोठी सभा घेऊन सरसंघचालक मोहन भागवत यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले.त्या कार्यक्रमाला मी व माझे कांही मित्र गेलो होतो.सरसंघचालक तास दीड तास खूप कांही बोलले.परंतु संपूर्ण भाषणांत मंत्री आणि जूकर ह्यांच्या कार्याचा गौरव करणारे एक वाक्यही नव्हते.आमचे स्वयंसेवक निरपेक्ष कार्य करतात, हा त्यांच्या बोलण्याचा रोख होता.निरपेक्ष कार्याची सुध्दा नोंद घ्यावी, त्याला दाद द्यावी असे त्यांना वाटले नाही, हे आम्हां मित्रांना खटकले.सर आणि जूकर मात्र सरसंघचालक आले, ह्यातच खूष होते.विश्वास बसणार नाही परंतु सर किंवा जूकर दोघांनीही ५५ वर्षात कधीही मानधन घेतलं नाही की जाण्यायेण्याचा खर्च घेतला नाही.आजमितीस सर ९३ वर्षांचे आहेत.त्यांची प्रकृती अजूनही ठीक आहे.पण कमी ऐकू येणं आणि दृष्टीदोष यांमुळे त्यानी काम बंद केलं आहे.मंत्री सर एखाद्या टिपीकल संघ स्वयंसेवकापेक्षां एसेम जोशी आदींच्या प्रजासमाजवादी पक्षातील कार्यकर्त्यासारखे वाटतात.मी एकदा तसा उल्लेख केला तेव्हां सरांनी एसेम जोशी, प्रकाश मोहाडीकर आणि इतर प्रजासमाजवादी नेत्या/कार्यकर्त्यांबरोबर शिक्षण क्षेत्रांत काय काय कामे केली त्याची यादीच दिली.अंधेरीचे प्रजासमाजवादी नगरसेवक डॉ. भाल पाटील यांनी विद्या विकास मंडळ ही त्यांनी स्थापन केलेली शिक्षण संस्था आपल्यामागे मंत्री सरांनी सांभाळावी म्हणून त्यांच्या स्वाधीन केली, यांत त्यांच्या पक्षातीत शैक्षणिक कार्याचे खरे कौतुक झाले.मंत्री सर अनेक विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे स्फूर्तीस्थान आहेत.

आमचा गुजराती डिव्हीजनच्या शिक्षकांशी क्वचितच संबंध यायचा.हिंदी शिकवायला कधीतरी एक सर यायचे.शिवाय हिंदीच्या अवांतर परीक्षांचे वर्गही त्यांच्यापैकीच एकजण घेत असत.त्यामुळे कधीतरी एकत्रीत पी. टी. घेणाऱ्या पंडीत सरांशिवाय इतरांची विशेष माहिती नव्हती.एक गुजराती सर मात्र फार प्रसिध्द होते.ते अंधेरीतच रहात.सफेद धोतर आणि सफेद सदरा घातलेले ते सर सायकलवरून जाताना येताना आम्हाला दिसत.ते गणित शिकवत.त्यांनी पेपर काढला की बरीच मुलं नापास होत.एसेस्सीला सहामाहीला त्यांनी काढलेल्या बीजगणिताच्या पेपरला मला अवघे ४२ मार्क मिळाले.तर २/३ विद्यार्थी ३५ मार्कही मिळवू शकले नाहीत.आमच्या आधी अनेक वर्षे त्या सरांना कोणी तरी बोका हे टोपणनांव ठेवलं होतं.त्यांचा चेहरा बोक्यासारखा गोल होताच.पण ते शिकारीसाठी बोक्यासारखे दबा धरून बसायचे.परीक्षा चालू असताना ते वर्गावर सुपरवायजर असले की समोर वर्तमानपत्र धरून खुर्चीवर बसत.पण त्या वर्तमानपत्राला भोकं पाडलेली असत.सर पेपर वाचताहेत हा गैरसमज करून कोणी कॉपी करायला सुरूवात केली की सरांना भोकांतून दिसे.मग त्या मुलाला ते पकडत आणि आपलं टोपण नांव सार्थ करत.प्रिन्सिपाल दवेनी सुध्दा एसेस्सीला कांहीवेळा बीजगणिताचे तास घेतल्याचे आठवते.त्यांचे शिकवणे चांगले होते.मराठीही बऱ्यापैकी बोलत.संबंध मात्र कमीच आला.

एम. ए. हायस्कूलचं मैदान खूप मोठं होतं आणि अजूनही तसंच आहे.क्रिकेटसाठी उत्तम मैदान होतं.एम. ए. हायस्कूलची क्रिकेटची टीम होती.कोचही होता.बहुतेक गुजराती मुलंच टीममधे असत.एक दोन खरोखरी चांगली खेळणारी मराठी मुलं घेतली जात.एम.ए.हायस्कूलची क्रिकेट टीम आंतर शालेय सामन्यांमध्येही खेळत असे.पण नेहमी पहिल्या फेरीतच हरत असे.कायम पहिल्या फेरीत हरण्याचा रेकॉर्ड शाळेला मिळाला असता.पण एकदा मी पूर्वी उल्लेख केलेल्या किसन दळवी ह्याने ते होऊ दिलं नाही.तो अॉल राऊंडर होता.आणि बॕटींग आणि बोलींग दोन्हीमधे उत्तम खेळ करून एकदा त्याने कुठल्या तरी शाळेला पहिल्या फेरीत एकहाती हरवले.असं असूनही आमच्या शाळेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला योगदान दिले असं मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती वाटेल.तुमचा विश्वासच बसणार नाही.पण ते अगदी खरं आहे.अलिकडेच निवर्तलेला, आंंतरराष्ट्रीय कमेंटेटर, समीक्षक, इ. साठी गौरवण्यात आलेला सुरेश सरैय्या आमच्या बरोबरच पण गुजराती डीव्हीजनला होता.तो शाळेच्या क्रिकेट टीमचा कॕप्टनही होता.तो स्कूल आणि कॉलेज यांच्या टीममधून खेळण्यापेक्षा मोठी मजल मारू शकला नाही.पण त्याच्या क्रिकेटवरील प्रेमाने आणि क्रिकेटच्या ज्ञानाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे नांव मिळालं.

लोकल बोर्डाच्या शाळेत माझ्या शिक्षणाची पायाभरणी झाली तर हायस्कूलमधे माझ्यावर चांगले संस्कार झाले.मराठी आणि संस्कृत साहित्याची आवड निर्माण झाली.मी एसेस्सी नंतर नोकरी करू लागलो, तेव्हां ह्या शिक्षकांनी दिलेली शिदोरी मला काम समर्थपणे करायला पूरेशी झाली.इंग्रजी बोलण्याची किंवा समजण्याची अडचण आली नाही.कुठेही मला असहाय्यता किंवा कमीपणा वाटला नाही.सर्वांच्याबद्दल लिहिलेले लेख कमीच वाटले.आज ह्या शिक्षकांपैकी फक्त मंत्री सर हयात आहेत.लोकल बोर्डाच्या शाळेंतून चौथीनंतर हायस्कूलला आलेले बरेच मित्र आठवीत परत भेटले.पुष्कळांशी अजून संपर्क आहे.मंत्री सरांचा पंचाहत्तरावा तसेच नव्वदावा वाढदिवस आम्ही मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन साजरा केला.त्यावेळी वर्गातल्या तीसही मुलांची नावे सर्वांना आठवत होती.एका वृत्तपत्राने फोटो देऊन लिहिलं होतं,” नव्वदीतले गुरूजी आणि पंचाहरीतले विद्यार्थी”.शाळेंत वर्गात असलेले किंवा एखाद्या वर्षानी पुढे असलेले, आठ जण माझे घनिष्ठ मित्र झाले.एकजण, अनंत पाटील उर्फ नाना चार वर्षापूर्वी वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षी आम्हांला सोडून गेला.”दूर न पोहोचलेले सूर” हा लेख मी त्याच्यावरच लिहिला होता.आम्ही मित्र अजून एकत्र भेटत असतो.आता आमच्या बायकाही बरोबर असतात.त्यांचीही मैत्री झाली आहे.आयडीबीआय मित्र परिवारासाठी लिहिलेले हे लेख तेही वाचतात आणि पुनःप्रत्ययाचा आनंद घेतात.इतरही अनेकांपर्यंत हे लेख पोहोचतात.तुम्हीही हे कुणालाही पाठवायला माझी हरकत नाही.मला हे लिहिण्याचा आनंद तर मिळतोच पण सर्वांंच्या प्रतिक्रिया वाचून तो आनंद द्विगुणित होतो.त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.आता महाविद्यालयीन प्राध्यापकांविषयी पुढील लेखांत.

— अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..