नवीन लेखन...

माझे शिक्षक – भाग ६ (आठवणींची मिसळ २०)

युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक.
*मुंबई विश्वविद्यालयाला किंवा मुंबई युनिव्हर्सिटीला एकशे साठ वर्षांचा इतिहास आहे.१८५७ च्या जुलै महिन्यांत युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बेची स्थापना झाली.लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की १८५७च्या मेमधेच पहिला स्वातंत्र्यसंग्राम झाला होता.युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची शिफारस १८५४ मधे करण्यांत आली होती आणि ब्रिटीश पार्लमेंटने त्याला संमती दिली होती.सुरूवातीला युनिव्हर्सिटीचे अॉफीस टाऊन हॉल, म्हणजेच रिझर्व्ह बँकेजवळील एशियाटीक लायब्ररी बिल्डींगमधे होते.१८७८ला राजाबाई टॉवर झाला.इतर अनेक बांधकामांप्रमाणेच ब्रिटीशांनी लंडनमधल्या बांधकामाची नक्कल केली.बिग बेन ह्या लंडनमधल्या सुप्रसिध्द टॉवरप्रमाणेच पण त्यापेक्षा लहान असा राजाबाई टॉवर तयार झाला.आतां तिथे युनिव्हर्सिटीचे वाचनालय आहे.युनिव्हर्सिटीची कामकाजाची आंखणीही युनिव्हर्सिटी ऑफ लंडनप्रमाणेच करण्यांत आली.परंतु १९०४ पर्यंत परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे आणि पदवीदान करण्याचेच काम युनिव्हर्सिटी करत होती.युनिव्हर्सिटीच्या बऱ्याच आधीपासून एल्फिन्स्टन कॉलेज आणि ग्रांट मेडीकल कॉलेज आपापल्या पदव्या देत असत.परंतु १८५७पासून ते काम युनिव्हर्सिटीने आपल्याकडे घेतलं.१८५९ साली मॕट्रीकच्या पहिल्या परीक्षेला २१जण पास झाले, त्यांत समाजसुधारक न्या. महादेव गोविंद रानडे हे होते.मुंबई युनिव्हर्सिटीतून पदवीधर होऊन पुढे राजकारण, समाजकारण, शिक्षण, इ. मधे उत्तम नांव कमावणारांची यादी महात्मा गांधीच्या नांवाने सुरू होते आणि खूप मोठी आहे.जे मुंबईतील कॉलेजांतून शिकून पदवीधर झाले, त्या सर्वाना पदवीदान मुंबई युनिव्हर्सिटीच करते.१९०४ पासून युनिव्हर्सिटीने उच्च शिक्षण द्यायला आणि संशोधन करायला सुरूवात केली.

मी १९५९-६१ दोन वर्षे युनिव्हर्सिटीच्या फोर्टमधल्या जुन्या इमारतीत एम.ए. च्या लेक्चर्सना जात असे.एम.ए. इकॉनॉमीक्सचे वर्ग फक्त तिथेच असत.त्या काळी डॉ. दातवाला, डॉ.हजारी, डॉ. मिस रणदिवे, डॉ.लकडावाला, डॉ.ब्रह्मानंद, डॉ.शहा, प्रोफेसर गायतोंडे, प्रोफेसर गंगाधर गाडगीळ, प्रोफेसर लाड अशी त्याकाळची नामांकित मंडळी अर्थशास्त्र विभागांत होती.त्यांच्या मतांचा त्याकाळी विचार, आदर केला जात असे.ह्या सर्वांची राजकीय मते कांहीही असली तरी ते प्रचलित राजकारणावर बोलत नसत.आपापसातील विचार विनिमयानंतर वाढत्या महागाईवर उपाय सुचवीत.माझ्या आठवणीप्रमाणे SEMIBOMLA (FULL FORM आठवत नाही) म्हणून महागाई व भ्रष्टाचार ह्यावर एक उपाय त्यांनी सुचवला होता. प्रत्येक नोटेवर छपाईची तारीख द्यायची. दरवर्षी त्या नोटेची किंमत साधारण १०% कमी करायची. नोटा साठवणे लोक आपोआप बंद करतील. ही स्कीम भारतासारख्या प्रचंड देशांत आजच्या तांत्रिक प्रगतिनंतरही व्यवहार्य नाही.थोडक्यांत शिक्षण आणि संशोधन ह्याच गोष्टींना ते प्राधान्य देत.शाळा किंवा कॉलेजमध्ये जसे कांही शिक्षक अवांतर गप्पा मारत, तसे कधी ह्या लेक्चर्सना झालं नाही.ह्यापैकी ब्रह्मानंद, लकडावाला आणि प्रोफेसर गायतोंडे ह्यांचे विषय मी घेतले नव्हते.त्यामुळे त्यांची लेक्चर्स मला नव्हती.

युनिव्हर्सिटीतील बऱ्याच वर्गामधे पायऱ्या होत्या.प्रत्येक पायरीवर तीन लांबलचक डेस्क असत.एकावर तीन चार विद्यार्थी बसू शकत.अशा दहा-बारा पायऱ्या असत.प्रोफेसरांसाठी तीन फूट उंचीचा मंच असे.तिथून त्यांना सर्व विद्यार्थी दिसत.त्या मंचावर त्यांच्या टेबलाच्या खाली रोल कॉल असे.हजर असणाऱ्याने त्यावर सही करून आपली हजेरी नोंदवायची असे.आमचे वर्ग साधारण संध्याकाळीच असत.नोकरी करणाऱ्यांच्या सोयीसाठी एवढे व्यस्त असणारे प्राध्यापक संध्याकाळी सहाचा वर्ग घेत.परंतु तरीही बऱ्याच विद्यार्थ्याना हजर रहाणं कठीण जाई.त्यांच्या सह्या मात्र त्यांचे मित्र त्या रोल कॉलवर करत.एकही प्रोफेसर रोल कॉलकडे पहात नसे.त्यामुळे अलिखित नियमाप्रमाणे वर्ग सुरू व्हायच्या सुमारास हजर नसणाऱ्या सर्वांच्या सह्या त्यांचे मित्र करत.रिझर्व्ह बँकेच्या आम्हा मित्रांचा पांच सहा जणांचा गृप होता.आम्हा सर्वांची कागदोपत्री हजेरी जवळजवळ १००% भरली असेल.कधी कधी एखादा पांच पांच सह्या करत असे.

प्रोफेसर गंगाधर गाडगीळ यांच नाव तेव्हां मराठी वाङमयात विनोदी लेखक म्हणून गाजत होतं.त्यांच्या बंडूच्या कथा दिवाळी अंकात सुध्दा असत.त्यावरून त्यांच्या व्यक्तीमत्वाचा कोणीही असा अंदाज बांधला असता की ते विनोदी, लीबरल, असतील तर तो पूर्ण चुकीचा ठरला असता.त्यांच्या लेक्चरमधेही विनोद नसे आणि स्वभावातही दिसत नसे.संपूर्ण लेक्चर एकसुरी पाठांतरीत आणि मध्यम गतीत असे.सर्वांत तापदायक गोष्ट म्हणजे ते शिस्तीला महत्त्व देतांना अतिरेक करीत.ते बरोबर वेळेवर वर्गात येत.कांही सेकंदात लेक्चर सुरू होई.त्यानंतर कोणी वर्गात आलेल त्याना खपत नसे.उशीरा वर्गाच्या पायऱ्या चढणाऱ्याला अत्यंत परखड आणि सभ्य (खडूस) शब्दांमधे ते फटकारत.”Gentleman, will you please keep out of my class.”त्यांच्या या कर्णकटु शब्दांवर कांही बोलण्याची शक्यताच नसे.विद्यार्थी आल्या पावली मागे फिरत असे.ते आपले एकसुरी लेक्चर चालू ठेवत.मला कधी असा प्रसंग आला नाही.उशीर झाला तर मी जातच नसे.कांही विद्यार्थ्यांनी त्यांना सांगून पाहिले की नोकरी करणारे विद्यार्थी अनेकदा अपरिहार्यतेने पांच दहा मिनिटे उशीरा येत, तेव्हां त्यांना संपूर्ण लेक्चरपासून वंचित ठेवू नये.पण त्यांनी आपल्या शिस्तीलाच महत्व दिले.इंटरनॕशनल ट्रेड ह्या विषयाची थिअरी शिकवत.एकसुरी बोलण्यामुळे लेक्चर कंटाळवाणे होत असुनही बरेच विद्यार्थी त्यांच्या लेक्चरला हजर रहात.मीही त्यांच्या ३५-४०% लेक्चर्सना हजर राहिलो असेन.

प्रोफेसर (मिस रणदिवेनी) दोनदा अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांमधून एम.ए. करून डॉक्टरेट केली होती.त्यांच्या विद्वत्तेमुळे सर्व त्यांना वचकून असत.त्या बऱ्याच उंच आणि बारीक होत्या.काळ्या फ्रेमचा चष्मा लावत.नीटनेटक्या असत.तरीही त्यांचे बाह्य व्यक्तीमत्त्व तसं खूप छाप पाडणारं नव्हतं.परंतु त्या अर्थशास्त्राबद्दल बोलू लागल्या की त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे पैलू दिसू लागत.त्यांचे वाचन दांडगे होते.एखादा विषय मांडला, किंवा एखादा मुद्दा मांडला की त्याच्या समर्थनासाठी त्या भराभर इतके संदर्भ देत की ऐकणारा अचंभित व्हावा.एकाच गोष्टीची विद्यार्थ्यांना अडचण वाटे, ती म्हणजे त्या फारच जलद बोलत.मिनिटाला १५०हून अधिक शब्द त्या बोलत असाव्यात.त्यावेळी एके फॉर्टीसेवन नव्हती, पण त्यांतून सुटणाऱ्या गोळ्यांप्रमाणे, फैरी झाडल्याप्रमाणे त्यांच भाषण असे.त्याही आम्हाला इकॉनॉमिक्सची मूलभूत तत्त्वे शिकवत असत.त्यांचे भाषण ज्याला समजून घ्यायचं असेल, त्याने त्या शिकवणार असलेल्या भागाबद्दल आधीच वाचन करणं आवश्यक होतं.

मी अर्थशास्त्राचे चार पेपर घेतले होते तर चार पेपर अॕग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचे घेतले होते.अर्थशास्त्राच्या थिअरीसंबंधी लेक्चर्स संध्याकाळी असत तर ॲग्रिकल्चरल ईकॉनामिक्सची दुपारी असत.दुपारचं लेक्चर अटेंड करायचं तर खूपच कसरत करावी लागे.सव्वाबारा साडेबाराला घरून आलेला डब्बा संपवून, आम्ही अक्षरशः धावत वर्गात पोहोचत असूं.एक ते दोन लेक्चरला हजर राहून परत येईपर्यंत सव्वादोन अडीच वाजत.म्हणजे लंचटाईम दोन तासाहून जास्त होत असे.मी आणि माझ्या सेक्शनमधलाच आणखी एक असे आम्ही दोघे दुपारी जात असू.आमच्या अॉफीसरचा आम्हाला पाठींबा असे.आमचे काम कधीही अपूर्ण ठेवत नसू.दुपारचे ॲग्रिकल्चरचे बरेच तास प्रोफेसर डॉ. शहाच घेत असत.ते हुशार असतील, मेहनती असतील पण चांगले प्राध्यापक नव्हते.त्यांचे बोलणे अस्पष्ट आणि पुटपुटल्यासारखे असे.इंग्रजी वाक्ये तुटक तुटक वाटत.बरीच वाक्य मधेच सोडत.ह्या सर्वामुळे त्यांचे लेक्चर कंटाळवाणे होई.सुरूवातीला खूप प्रयत्न करूनही कांही कळेना, तेव्हां त्यांची लेक्चर्स अटेंड करण जवळजवळ बंदच झालं.संध्याकाळी पब्लिक फायनान्स शिकवणारे प्रोफेसर लाड यांचीही लेक्चर्स कंटाळवाणी वाटत.त्यांचे उच्चार साफ होते.पण विषय समजावायला ते फार कमी पडत.संध्याकाळी शिकविण्याचा फायदा होऊन त्यांच्या लेक्चरला उपस्थिती ठीक असे, एवढेच.मी त्यांच्याही खूपच लेक्चर्सना गैरहजर राहिलो.

दुपारी इंडीयन अॕग्रिकल्चर अँड डेव्हलपमेंट या विषयावर डॉ. दातवाला यांची लेक्चर्स असत.त्यांचे लेक्चर मी सहसा चुकवले नाही.विषय अतिशय सोपा करून साध्या शब्दात मोठमोठ्या गोष्टी कशा मांडाव्यात हे त्यांच्याकडून शिकावं.ते त्यावेळी प्लॕनिंग कमिशनचे सदस्य होते.प्रत्यक्ष पंतप्रधानांबरोबर बोलण्याची संधी त्यांना मिळे.प्लॕनिंग कमिशनच्या एका समितीवरही ते होते.ते तेव्हां पन्नाशीच्या आसपास असावेत.ते बारीक होते.सदैव खादीचा सफेद बुशशर्ट आणि खादीची सफेद पँट वापरत.त्यांच्या लेक्चरचा शब्द न शब्द मी एकाग्रतेने ऐकत असे.त्याकाळी शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची टक्केवारी खूपच मोठी होती.एक मत असं होत की इतर अनेक देशांप्रमाणे वीस टक्क्याहून कमी लोक शेती करून संपूर्ण देशाची अन्नधान्याची गरज भागवू शकतील.उरलेले ऐंशी टक्के इतर व्यवसायांत काम करू शकतात.यासाठी मोठ्या प्रमाणांत गांवच्या लोकांच स्थलांतर व्हायला हवं.शहरीकरण हा आपल्या सर्व समस्यांवरचा तोडगा वाटत होता.दातवालांचेही हेंच मत होते.त्याकाळी ते पटण्यासारखेही होते.आजची शहरांची वाढ आणि समस्या बघून आणि खेडीच नष्ट होण्याच्या मार्गावर तंत्रज्ञानाने आपल्याला आणून सोडलेलं असताना अनेक शंका मनांत येतात.अर्थशास्त्राचे नियम सांगताना नेहमी वापरले जाणारे शब्द म्हणजे”Other things being equal”.प्रत्यक्षात इतर गोष्टी तशाच बिलकुल रहात नाहीत.मग अर्थशास्त्रज्ञांची भाकिते चुकली असे वाटते.डॉ. दातवालांच्या कामाचं महत्त्व त्याने कमी होत नाही.मला खात्री आहे त्यांनी अनेक विद्यार्थ्यांनाही घडविले असेल.

डॉ. दातवाला यांच्याइतकाच आदर मला डॉ. हजारी यांच्याबद्दल वाटतो.डॉ. (मिस) रणदिवेप्रमाणेच हजारींचही अर्थशास्त्रज्ञ म्हणून नांव होतं.त्यांची लेक्चर्स संध्याकाळी असत.पर्फेक्ट काँपिटीशन, फ्री मार्केट, मोनोपलीज इ. बद्दलचा तात्विक भाग ते आम्हाला शिकवत.कायम पांढरा बुश शर्ट आणि पँट अशा साध्या वेशांत ते येत.अतिशय सुस्पष्ट बोलणं, सोप्या शब्दांतली मांडणी ह्यामुळे किचकट थिअरी ते सोपी करून सांगत.रोजच्या व्यवहारांतली उदाहरणे देऊन वेगवेगळ्या आर्थिक व्यवस्थांमधले फायदे तोटे अगदी सहज समजावून देत.त्यांच्याकडून त्या काळांत शिकलेले अर्थशास्त्रीय नियम आजही मला आठवतात.त्यांची लेक्चर्स मी कधीच चुकवली नाहीत.त्यांच्या तासाला क्लास गच्च भरलेला असे.१९६९ साली त्यांची रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली.१९७७पर्यंत ते आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर होते.१९७१ पासून रीफायनान्स डीपार्टमेंट त्यांच्याकडे असताना माझ्याकडची रिफायनान्स प्रपोजल्स त्यांच्याकडे जाऊ लागली.त्यांनी रिफायनान्समध्ये घडवलेल्या बदलांबद्दल मी पूर्वीच सांगितले आहे.युनिव्हर्सिटीत बुशशर्ट पँट हा वेश असणारे डॉ. हजारी, रिझर्व्ह बँकेत सुटांत येत असत.१९७७नंतरही अनेक महत्त्वाच्या कामांत त्यांचा सहभाग होता.त्यांच्याकडून अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या भागाचे धडे घेतां आले हे माझं भाग्यच.

युनिव्हर्सिटीत मैत्री होण्याची शक्यता कमीच होती.एका तासासाठी संध्याकाळी एकत्र आलेले विद्यार्थी तास संपताच आपापल्या मार्गाने भराभर निघून जात.परंतु रिझर्व्ह बँकेतच काम करणारे आणि एम. ए. करणारे आम्ही सात-आठ जण होतो.ह्यापैकी एक्सचेंज कंट्रोल डीपार्टमेंटपासून ओळखणारा आरोळे होता.आम्ही दोघे अॉफीसमधून बरोबरच बाहेर पडत असू.भूक लागलेली असल्यामुळे वाटेत वडा-सांबार, इडली-सांबार असे कांहीतरी खात असू आणि वेळेवर युनिव्हर्सिटीत पोहोचत असू.आमच्याबरोबर कधी कधी प्रभुदेसाई किंवा यु. डी. राव असत.राव यांची पध्दत अशी की बील आले रे आले की ते आपलं सोल्जर्स कॉन्ट्रीब्युशन त्या ताटलीत टाकत.ना दुसऱ्याला आपलं बील देऊ देत, ना आपण दुसऱ्याच देत.पुढे बोरीवलीला आम्ही चौघेही एकाच सोसायटीत २५ वर्षे एकत्र राहिलो.ह्या तिघांशिवाय सहस्रबुध्दे, कोल्हटकर आणि भंडारी हे ही अर्थशास्त्रांत एम. ए. करत होते.एसीडीतील एकजण आमच्याच बरोबर होता.पण त्याचा माझा परिचय नव्हता.कधीकधी मी युनीव्हर्सिटीच्या लायब्ररीमधे जाऊन बसत असे.तिथे एक एकदम हँडसम विद्यार्थी नेहमी दिसे.तो पुढे डायरेक्ट रीक्रूट म्हणून रिझर्व्ह बँकचा ऑफीसर झाला.त्याचं नांव सुनील बेंद्रे.सुनीलची माझी प्रत्यक्ष ओळख बरीच उशीरा झाली.ती विलास गोडबोलेमुळे.कफ परेडला असताना कुलाब्याच्या रिझर्व्ह बँक बिल्डिंगमधल्या सुनीलच्या फ्लॕटवर मधून मधून संगीताचे सुंदर कार्यक्रम होत.सुनील आणि त्याची पत्नी सर्व श्रोत्यांची आस्थेने खाणे, चहापान याचीही व्यवस्था करत.सुनीलला फार पूर्वीपासून कीडनीसाठी डायालीसीस करून घ्यावं लागत असे.तो इतरांना ह्याचा पत्ता लागू न देता सरबराई करण्यांत आनंद मानी.शेवटी रीटायर होण्यापूर्वीच त्या आजाराने तो गेलाच.

माझी करीअरमधे म्हटल्याप्रमाणे मी थोडा फार अभ्यास करून एम. ए. चे दोन पेपर्स दिले.पण त्यांत सेकंड क्लासचे गुण मिळणार नाहीत असे वाटल्याने एक वर्ष ड्रॉप घेतला आणि त्यानंतर परत कधी एम.ए. च्या परीक्षेला बसलोच नाही.माझ्याबरोबरचे आरबीआयचे सर्व मित्र एम.ए. झाले.त्यांतील सहस्रबुध्दे आयआरएस करून इन्कम टॕक्स अधिकारी झाला.भंडारी टाटा गृपचा इकॉनॉमिक ॲडव्हायजर झाला.बाकी सर्व रीझर्व्ह बँकेत जीएम, सीजीएम झाले.मी जरी एम.ए. झालो नाही तरी माझ्या ज्ञानात भर पडली.नामांकीत प्राध्यापकांकडून ऐकलेल्या अनेक गोष्टी मनांत ठसल्या.त्याशिवाय त्या निमित्ताने अर्थशास्त्रावरची बरीच पुस्तकं वाचली गेली.माझ्या मावशीचे यजमान डॉ. सामंतही इंडस्ट्रीयल इकॉनामिक्सवर युनिव्हर्सिटीत लेक्चर्स घेत असत.त्यांच्या घरच्या ग्रंथालयात ७००-७५० अर्थशास्त्रावरची पुस्तके होती.मला त्यातले कुठलेही पुस्तक वाचायला घेऊन जायची मुभा होती.मी त्याचा बराच फायदा घेतला.त्यांचा मुलगा बी.ए.ला, एम.ए.ला अर्थशास्त्र घेऊन फर्स्ट क्लास फर्स्ट आला होता.तो आयएएसलाही पहिला आला होता.मी वाचायला घेतलेल्या प्रत्येक पुस्तकांत त्याने पट्टी घेऊन पेन्सिलने अंडरलाईन केलेला भाग मी पहात असे.तेवढाच भाग वाचला तरी तो चॕप्टर समजत असे.अर्थशास्त्र घेऊन मी नोकरी करून बी.ए. दुसऱ्या वर्गात पास झालो, तेव्हां माझ्या दोन मामांनी मला पत्र लिहून कळवले,”तू नोकरी सोडून पूर्ण वेळ अभ्यास कर. तुला मिळणाऱ्या पगाराइतके पैसे मी तुला पाठवीन. एम.ए. करून पुढे मावसभावासारखाच यश मिळव.”मी नोकरी सोडली नाही.तेव्हा नोकरी करूनही एम.ए. करता येईल, क्लास मिळवता येईल, असे वाटत होते.नाही जमले.पुढे सुदैवाने आयडीबीआयमधे झालेली माझी प्रगती पाहायला माझे हे दोन्ही मामा हयात होते.आयडीबीआय बँकेच्या ब्रँच उदघाटन सोहळ्यासाठी दोघेही आले आणि खूष झाले.आयुष्य वळणं घेत असतं.एम.ए. झालो असतो तर कदाचित आरबीआय सोडली असती. आयडीबीआयला पोहोचलो नसतो.कांही असो.माझे फॉर्मल शिक्षण तिथे संपले आणि त्याबरोबरच “माझे शिक्षक”चे लेख पूर्ण करतो.

–अरविंद खानोलकर.

1 Comment on माझे शिक्षक – भाग ६ (आठवणींची मिसळ २०)

  1. तुमचा ब्लॉग असेल तर मला कळवा

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..