जेव्हा मी बँकेत जातो तेव्हां माझा भितीने थरकांप उडतो.
तिथल्या क्लार्कना पाहून माझी भितीने गाळण उडते.
तिथले काउंटर आणि खिडक्या मला भयभीत करतात.
तिथली मोठी टेबलं पाहून मला कांपरे भरते.
तिथली नोटांची बंडले पाहून माझी घाबरगुंडी उडते.
तिथली प्रत्येक गोष्ट मला घाबरवते.
ज्या ज्या वेळी मी बँकेचा उंबरठा ओलांडून आंत प्रवेश करायचा प्रयत्न करतो आणि कांही आर्थिक व्यवहार करायचा विचार करतो, त्या त्या वेळी मी एखाद्या बेजबाबदार माणसासारखा, अगदी मूर्खासारखाच वागतो.
हे सर्व मला आधीच पक्कं ठाऊक होतं तरीही माझा पगार आता वाढवला होता व दर महिन्याला पन्नास डाॅलर इतका झाला होता.
त्यामुळे मला वाटले की एवढे पैसे ठेवण्यासाठी बँक ही एकच योग्य जागा आहे.
म्हणून मी कसंबसं बँकेच्या दारातून आत प्रवेश करण्याचं धैर्य दाखवलं आणि तिथे बसलेल्या क्लार्क्सवरून एक भित्री नजर फिरवली.
माझी अशी कल्पना होती की ज्याला बँकेत अकाउंट उघडायचा असेल त्याला बँकेच्या मॅनेजरचा सल्ला घेण्यासाठी प्रथम त्याच्याशीच बोलले पाहिजे.
आंत एका टेबलावर ‘अकाऊंटंट’ असा बोर्ड होता.
मी तिथे गेलो.
अकाऊंटंट एक उंच, धिप्पाड आणि पक्का खवीस वाटत होता.
त्याच्या दर्शनानेच मी लटपटू लागलो.
माझा आवाज खोल गेला.
“मी मॅनेजरना भेटू शकतो ?” मी विचारले आणि पुढे गंभीरपणे एक शब्द जोडला, “एकटाच ?”.
माझे मलाच कळले नाही की मी “एकटाच ?” असें कां म्हणालो.
“जरूर.” अकाऊंटंट म्हणाला आणि मॅनेजरला तिथे घेऊन आला.
मॅनेजर हा एक अतिशय गंभीर आणि शांत माणूस वाटला.
मी एका हाताने माझे छप्पन्न डाॅलर्स चुरगाळलेल्या अवस्थेत एखाद्या चेंडूसारखे घट्ट खिशांत धरून ठेवले होते.
“तुम्ही मॅनेजर कां ?” मी विचारलं.
देवच सांगू शकेल की मला तसं म्हणायचं नव्हतं कारण मला त्याबद्दल कांही शंका नव्हतीच.
तो म्हणाला, “हो, मीच मॅनेजर आहे.”
मी विचारले, “मी तुम्हाला भेटू शकतो कां ? एकटाच ?”
पुन्हां मी ‘एकटाच’ कां म्हणालो कुणास ठाऊक पण तसं झालं हे खरंच.
मॅनेजर ताबडतोब सावध झालेला वाटला.
त्याला वाटले की मला कोणत्या तरी भयानक आणि गुप्त गोष्टीविषयी खलबत करायचे आहे.
तो म्हणाला, “माझ्यामागून आंत या” आणि तो मला आपल्या खाजगी खोलीत घेऊन गेला.
दोघे खोलीत गेल्यावर त्याने चावीने दरवाज्याचे कुलुप बंद केले.
“आता इथे आपल्याला कोणी त्रास द्यायला मधे येणार नाही. बसा.” मॅनेजर म्हणाला.
आम्ही दोघे बसलो आणि बराच वेळ दोघे एकमेकांकडे पहातच होतो.
कारण बोलण्यासाठी माझा आवाजच उमटत नव्हता.
“मला वाटते, तुम्ही पिंकरटनच्या माणसांतले एक आहांत ! हो, ना ?” मॅनेजर म्हणाला.
माझ्या गूढ की मूढ वागण्याचा अर्थ त्याने मी गुप्तहेर आहे असा लावला होता.
मला लक्षांत आले की त्याच्या मनांत काय विचार आला होता आणि मी आणखीच गोंधळून गेलो.
मी घाईघाईने म्हणालो, “नाही, नाही, मी पिंकरटनच्या माणसांपैकी नाही…”.
माझ्या संगण्याचा अर्थ मी पिंकरटनचा माणूस नव्हतो तर दुसऱ्या कुठल्यातरी गुप्तहेर संस्थेचा होतो, असा त्याने घेतला असेल म्हणून परत घाईघाईने म्हणालो, “खरं सांगायच तर..”
हे शब्द असे उच्चारले गेले की जणू मला त्याबद्दल खोटे सांगणेच भाग होते, “मी गुप्तहेर नाही.
मी बँकेत अकाऊंट उघडायला आलो आहे.
माझे सर्व पैसे ह्या तुमच्या बँकेत ठेवायचा माझा विचार आहे.”
मॅनेजर थोडा आश्वस्त झाला पण तरीही तो गंभीरच होता.
आता त्याचा समज झाला की मी एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा किंवा श्रीमंत सरदाराचा सुपुत्र होतो.
तो म्हणाला, “खूप मोठा अकाऊंट असणार, मला वाटतय.”
मी पुटपुटलो, “साधारण मोठा ! मी आज छप्पन्न डाॅलर डीपाॅझीट करू इच्छितो आणि नंतर दरमहा पन्नास डॉलर डीपॉझीट करायचा माझा विचार आहे.”
मॅनेजर ताडकन् उभा राहिला आणि त्याने दरवाजा उघडला.
त्याने अकाऊंटंटला हांक मारली, “मिस्टर माँटगोमेरी,” आणि तो कठोर आवाजांत म्हणाला, “ह्या सद्गृहस्थांना अकाऊंट उघडायचा आहे.
त्यांना छप्पन्न डॉलर्स डीपॉझीट करायचेत. नमस्कार, या आतां !”
मी उभा राहिलो.
बाजूलाच एक भला थोरला लोखंडी दरवाजा उघडा होता.
“नमस्कार, येतो.” असे म्हणून मी त्या मोठ्या तिजोरीत शिरलो.
मॅनेजर जोरांत ओरडला, “तिकडे कुठे चाललांत ? बाहेर या.”
मी तिथून बाहेर आलो.
मॅनेजरने मला दुसऱ्या बाजूचा अकाऊंटंटकडे जायचा रस्ता दाखवला.
मी अकाऊंटंटकडे गेलो आणि हातांची चपळ हालचाल करून एखाद्या जादूगाराने जशी जादू करून एखादी वस्तू काढावी, तशी मी छप्पन्न डाॅलर्सची पुरचुंडी खिशातून काढून त्याच्या टेबलावर ठेवली.
माझा चेहरा एकदम गोरामोरा झाला होता.
“हें घ्या.” मी म्हणालो, “तें डीपॉझीट करा.”
माझा स्वर असा होता की जणू कांही मी म्हणत होतो, “चला, लहर आली आहे तोंवर हें अप्रिय काम आपण पटकन् आटपून घेऊया.”
अकाऊंटटनी पैसे घेतले आणि दुसऱ्या क्लार्ककडे दिले.
त्याने मला ती रक्कम एका चिठ्ठीवर (स्लिपवर) लिहायला लावली व त्यावर आणि आणखी एका खतावणींत माझी सही घेतली.
आता मी काय करतोय ते माझं मलाच कळत नव्हतं.
बँक माझ्या डोळ्यांसमोर तरंगत होती.
“पैसे जमा झाले ?” मी जड स्वरांत विचारले.
अकाऊंटंट म्हणाला, “हो, जमा झाले.”
मी म्हणालो, “मग मला एक चेक काढायचा आहे.”
मला माझ्या नेहमीच्या वापरासाठी त्यांतले सहा डॉलर्स काढायचे होते.
कुणीतरी एका खिडकीतून एक चेकबुक माझ्या हातावर ठेवलं आणि कोण तरी एक क्लार्क मला चेक कसा लिहायचा तें सांगू लागला.
बँकेतल्या लोकांचा बहुदा समज झाला होता की मी एक विक्षिप्त आणि अर्धवट लक्षाधीश होतो.
मी चेकवर कांही तरी खरडलं आणि तो चेक त्या क्लार्कच्या हातांत ढकलला.
त्याने तो पाहिला, त्यावर लिहिलेली रक्कम वाचली.
तो आश्चर्याने म्हणाला, “काय तुम्हांला तुमचे सगळे पैसे परत काढायचे आहेत ?”
मग माझ्या लक्षांत आलं की मी चेकवर सहा डॉलर लिहायच्या ऐवजी चुकून छप्पन डॉलर्स लिहिलं होतं.
आता माझं डोकं चालतंच नव्हतं.
मला वाटलं की हे कसं झालं ह्याचं स्पष्टीकरण देणं आतां अशक्यच आहे.
सर्व क्लार्कस आपली कामं थांबवून माझ्याकडे पहात होते.
दुःखातिरेकाने बेपर्वा होत मी म्हणून गेलो, “हो, अगदी सर्व.”
“तुम्ही तुमचे सर्व पैसे बँकेतून काढून घेत आहांत ?”
“हो अगदी पूर्ण.”
“आणि तुम्ही परत पैसे जमाही नाही करणार ?” आश्चर्याने क्लार्क म्हणाला.
मी म्हणालो, “कधीच नाही.”
माझ्या मनाला वेडी आशा वाटली की त्यांना वाटेल की मी चेक लिहित असतांना कोणत्या तरी गोष्टीमुळें माझा अपमान झाला असावा आणि त्यामुळे मी माझा विचार बदलला असावा.
मी एक भयंकर तापट माणूस असल्यासारखा दिसण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला.
क्लार्कने मला पैसे देण्याची तयारी केली.
तो म्हणाला, “पैसे कसे हवेत ?”
“काय ?” मला कांहीच अर्थबोध झाला नाही.
“तुम्हांला पैसे कसे हवेत ?”
“अच्छा !” त्याच्या बोलण्याचा अर्थ माझ्या लक्षांत आला आणि विचार न करतां मी म्हणालो, “पन्नासच्या नोटामधे.”
त्याने मला द्यायला पन्नास डॉलर्सची नोट बाहेर काढली.
त्याने कोरडेपणाने परत विचारले, “आणि सहा ?”
“एकाच्या सहा” मी कसाबसा म्हणालो.
त्याने मला एकाच्या सहा नोटा दिल्या आणि मी तिथून पळ काढला.
बँकेचा मोठा स्प्रिंगचा दरवाजा माझ्या मागे झुलला आणि माझ्या माघारी पिकलेल्या मोठ्या हंशाचा, बँकेच्या उंच छताला भिडून आलेला प्रतिध्वनी मला ऐकू आला.
तेव्हापासून मी कधीही बँकेत पैसे ठेवत नाही.
मी रोख रक्कम माझ्या पँटच्या खिशांत ठेवतो आणि चांदीच्या डॉलर्सची बचत पायमोजामधे ठेवतो.
— अरविंद खानोलकर.
मूळ कथा – माय फायनान्शियल करीअर.
मूळ लेखक – स्टीफन लीकॉक (१८६९ – १९४४)
तळटीप– स्टीफन लीकॉक हा विनोदी लेखनासाठी त्या काळी फार लोकप्रिय होता.
त्याची त्या काळी गाजलेली ही एक गोष्ट.
कथा सांगणारा एक कनिष्ठ मध्यम वर्गीय आहे.
आपले पैसे जास्त तर वाटतात.
स्वतः सांभाळणंही कठीण वाटतय आणि बँकेकडे ठेवणंही त्याला कठीण वाटतंय.
बँकेचे दरवाजे, वातावरण, धिप्पाड अकाऊंटंट, उंच सिलींग, झुलता दरवाजा ह्या सर्व गोष्टी सामान्य माणसाला बँकेपासून दूर ठेवणाऱ्या आहेत.
मॅनेजर ज्या पध्दतीने त्याला वागवतो, त्यावरून बँकेला सामान्य माणसाची कांही किंमत वाटत नाही, हेच लेखकाने दाखवलं आहे.
शेवटी तो माणूस आपली सर्व रक्कम परत काढून घेतो.
त्या काळच्या बँकींगवर उपहासात्मक विनोद आहे.
त्या काळच्या बँकेच्या ग्राहकापेक्षा आजच्या बँकेच्या सामान्य ग्राहकाला बँकेची जास्त भिती वाटते की कमी ?
कमी जास्त नसेल तरी तेवढी नक्कीच वाटते, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल.
कारणे अनेक आहेत.
आज तंत्रज्ञानाने एकीकडे बँकिंग खूप सोपं झाल्यासारखं वाटत तर त्याच तंत्रज्ञानाच्या गैरवापराने बँकेच्या खात्यातील पैसे कोणीतरी लंपासही करू शकतो.
तसं होऊ नये म्हणून जी नियमावली केली जाते, त्याचा ग्राहकांनाच जास्त त्रास होतो.
केवायसी, म्हणजे आपली ओळख पटवण्यासाठी ग्राहकांना केविलवाणी धडपड करावी लागते.
पाच सहा फेऱ्या घालाव्या लागतात.
पुन्हां ती ओळख परेड ठराविक मुदतीनंतर परतही करावी लागते.
प्रत्येक बँकेला ओळख पटवावी लागते.
कर्ज परतफेड न करतां आलेल्या बुडीत कर्जांची रक्कम सतत वाढती असणं आणि त्यामुळे आपल्या ठेवींची चिंता वाटणं हे आज वाढलं आहे.
कथेतील बँक कर्मचारी त्या डीपॉझीटरला हंसतात, म्हणजेच तुच्छ मानतात.
आजही खूप मोठ्या पदावरच्या अधिकाऱ्यांना कर्ज घ्यायला येणाऱ्या (नंतर कदाचित बुडवणाऱ्या) उद्योगपतीचं जेवढं महत्त्व वाटतं तितकं सामान्य खातेदाराचं वाटत नाही.
ह्या कथेत तो सगळी रक्कम परत काढतो आणि त्याला त्याचे सर्वच्या सर्व म्हणजे.
छप्पन्न डॉलर्स परत मिळतात.
आज जर एखाद्याने ‘छप्पन्न’ डॉलरचे खाते बँकेत उघडून त्याच दिवशी बंद केले तर बहुदा क्लोजरनंतर त्याच्या हातांत सहाच डॉलर परत येतील आणि पन्नास डॉलर्स तीन महिने सरासरी बॅलन्स कमी पडल्याचा चार्ज, कॅश ट्रॅन्झक्शनचा चार्ज, कंपल्सरी डेबिट कार्डाचा चार्ज, अकाऊंट क्लोजर चार्जेस, जीएसटी, वगैरेसाठी कापून घेतले जातील.
एकंदरीत बँक ग्राहक लेखकाने दाखवल्याप्रमाणे आजही बँकेचा मिंधाच रहाणार आहे.
Leave a Reply