धो धो पाऊस कोसळत होता विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होत होता विजांच्या प्रकाशात काही झोपड्या रात्रीच्या अंधारातही उजळून निघत होत्या. त्यातील एका झोपडीत नवरा – बायको छातीतून गळणारे पाणी छोट्या छोट्या भांड्यात जमा करण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांचा तो प्रयत्न थकल्यावर ते डोक्याला हात लावून गप्प बसले. त्यांचा समोरच कुडाच्या भिंतीला लागून असणाऱ्या मिणमिणत्या चिमणीच्या प्रकाशात एकाच लोखंडी खाटेवर चार पोरं म्हणजे तीन मुलगे आणि एक मुलगी वेडेवाकडे झोपले होते त्यांच्यावर एक प्लास्टिक बांधल्यामुळे त्यांच्यावर पाणी पडत नव्हते त्यामुळे ते गाढ झोपले होते पण अचानक त्या प्लास्टिक मधील पाणी खूपच जमा झाले आणि ते प्लास्टिक एका बाजूला कलंडले आणि त्या प्लास्टिक मधील पाणी धो धो करत त्यांच्या अंगावर पडले आणि आकाश कोसळल्यासारखे ते झोपेतून जागे झाले. क्षणभर त्यांना कळत नव्हते नक्की काय झाले आहे त्यांच्या आईने त्यांना अंग पुसायला टॉवेल दिला सर्व उगडे झाले आणि केस पुसून आईने जवळच पेटवलेल्या चुलीजवळ जाऊन उबेला बसले आईने चुलीवर चहा ठेवला तो झाल्यावर सर्वांनी काळ्या चहात बटर बुडवून खाल्ले त्यावेळी एक रुपयाला सोळा बटर मिळत त्यामुळे चहा बटर हे गणित व्यवस्थित जुळलेलं होतं. एव्हाना पाऊस थांबला होता आणि सकाळही झाली होती.सर्व अंघोळ करून तयार झाले. शाळेचे कपडे परिधान करून शाळेत गेले. त्यांचे बाबाही तयार होऊन त्यांच्या धंद्यांवर गेले आणि आई सर्व झाडलोट करून स्वयंपाक करायच्या तयारीला लागली. इतक्यात शेजारच्या बायका आल्या आणि घरात रात्री पाणी वैगरे आलं का याची चौकशी करू लागल्या सगळ्या सम दुःखी होत्या, नात्यातील होत्या आणि कोकणातील आजूबाजूच्या गावातील होत्या. त्यामुळे एकमेकींना शाब्दिक आधार देत होत्या. सर्वांचे नवरे दारुडे होते. रात्री कामावरून येताना सगळेच ढकलत यायचे. त्यातले काही भांडण झाल्यावर बायकोला मारायचे काही बायकोचा मार खायचे ! पण गरज पडल्यावर मात्र सगळे एकत्र यायचे ! एकमेकात भांडण व्हायची पण लगेच मिटायचीही ! आई वडिलांची भांडणे झाली तरी एक गोष्ट मात्र चांगली होती त्या भांडणाची सावली कधी ते त्यांच्या मुलांवर पडून देत नसत. ती चार मुलं आणि आजूबाजूची सर्वच मुलं अभ्यासात खूप हुशार होती. बहुतेक मुलांच्या नावात शेवटचे अक्षर श होते.मुलांच्या तुलनेत मुली कमी होत्या. पण सर्वजण कोकणातील असल्यामुळे येथे मुलींचे लाड जास्त होते. त्या झोपडीतील चार मुलांपैकी मोठा मुलगा म्हणजे मी होतो निलेश बामणे…सध्याचा एक कवी, लेखक आणि पत्रकार…त्यासोबत एका मासिकाचा संपादक !
येथे वर्णन केलेली झोपडपट्टी म्हणजे मुंबईतील गोरेगांव पूर्वेकडील संतोष नगर, श्रीकृष्ण नगर येथील झोडपट्टी आज त्या झोपडपट्टीच्या जागी तेवीस माळ्याची एस आर ए ची उंच इमारत उभी आहे त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून जेव्हा मी भूतकाळात पाहतो तेव्हा माझे मन भरून येते. पण डोळ्यात अश्रू येत नाहीत कारण मी आता पूर्वीसारखा हलवा राहिलो नाही. खरं तर येथे मला माझी गोष्ट सांगायची आहे पण माझ्या गोष्टीत अनेक पात्र आहेत त्या पात्रांचीही एक – एक वेगळी गोष्ट आहे. आज मला पाहिल्यावर कोणाला स्वप्नातही वाटत नाही की माझा भूतकाळ इतका खडतर असेल .मला तो कोणाला सांगायला आवडती नाही. पण माझ्या भूतकाळातच घडलाय खरं तर माझ्यातील एक संवेदनशील माणूस नाहीतर मी ही एक भोगात गुंतलेला सामान्य माणूस असतो…मी आज जसा आहे तसा का आहे ? याची उत्तरे माझ्या भूतकाळात दडलेली आहेत…मी आज जसा लोकांना वाटतो तसा मी कधीच नव्हतो…घमेंडी, माणुसघाण्या आणि एकळकोंड्या ! माझ्यातील उत्साहाचा झरा त्या झोपडपट्टीतच आटला कोठेतरी !
मी लहानाचा मोठा मुंबईतील या झोपडपट्टी झालो पण माझा जन्म मात्र मुंबईत झाला नव्हता. माझ्या भावंडांचा जन्म मुंबईत झाला होता पण माझा जन्म कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील देगांव या गावी झाला. माझे आई – बाबा त्या एकाच गावचे ! जेंव्हा माझा जन्म झाला तेंव्हा मी अतिशय नाजूक होतो माझ्या अंगावर दाट केस होते मी जगेन का याबद्दल लोकांना शंका होती. माझ्या आईने तेव्हा माझ्या अंगावरील केस काढून टाकण्यासाठी चण्याच्या डाळीचे वगैरे प्रयोग केल्याचे ती सांगते आज माझ्या अंगावर दाट केस नाहीत पण ते असावेत याची खात्री पटते.
मी तीन चार वर्षाचा असे पर्यत गावी असायचो. एक दिवस आई नदीवर कपडे धुण्यासाठी निघाली असता मी हट्टाने तिच्या सोबत गेलो. पण तिची नजर चुकवून मी नदीच्या प्रवाहात गेलो आणि वाहत असताना नदीवर कपडे धुणाऱ्या तरुणींनी मला पाहिले आणि वाचवले ! हे मला हल्लीच कधीतरी आईने सांगितले पण मला पाण्याची भीती का वाटते हे कोडे तेव्हा मला उलगडले. तेथील शाळेत मी काही दिवस गेलो होतो. या दरम्यान माझ्या धाकट्या भावाला पोलिओ झाला आणि आम्ही कायमचा मुंबईचा रस्ता धरला त्यांनतर माझ्या लहान भवाचा गणेशचा जन्म झाला आणि आम्ही या श्रीकृष्ण नगर मधील झोपडपट्टीत राहायला आल्यावर माझ्या बहिणीचा म्हणजे रुपलीचा जन्म झाला. आमच्या घराण्यात तेंव्हा एकच लहान मुलगी होती त्यामुळे त्यांना मुलगी हवी होती. जिथे लोकांना मुलांचा हव्यास असतो तेथे त्यांना मुलीचा हव्यास होता. फक्त मुलगी हवी म्हणूंन त्यानी मुलांना जन्म दिला. या बाबतीत मला माझ्या घराण्याचा खूप अभिमान वाटतो कारण आमच्या घराण्यात मुलींचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो नाहीतर आजही समाजात मुलगा पाहिजे म्हणून मुलींचा गर्भातच जीव घेतला जातो…आमच्या घराण्याला विचारांची बैठक ही परंपरेने आली होती.
माझे बाबा शालेय जीवनात खूप हुशार होते. शाळेत असेपर्यत त्यांनी पहिला नंबर त्यांनी कधी सोडला नाही पण गावी सातवी पर्यत शाळा असल्यामुळे त्यांनी शिक्षण सोडले त्यात आमचे आजोबा वारले ते मिल कामगार होते. त्यांना एकच व्यसन होतं बिडी ओढण्याचे पण ते बिडीही अर्धी मोडून ओढायचे त्यांची सर्व कमाई गावी घर बांधण्यात, माझ्या आत्याची लग्न आणि त्यांच्या आजारपणात खर्ची पडले. त्यांतर माझे बाबा मुंबईला आले सोळा – सतराव्या वर्षी ! मुंबईतील तीस चाळीस हॉटेलात एक दोन दिवस नोकरी केल्यावर ते दादरला एका लिंबाच्या व्यापाऱ्याकडे स्थिरावले. त्यानंतर त्यांचा माझ्या आईशी विवाह झाला. या दरम्यान ते दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले होते. माझी आई अशिक्षित होती. ती तिच्या लहानपणी शाळेत गेली असता शिक्षकांनी एकदा मारले म्हणून तिने हट्टाने शाळेचे तोंड पाहिले नाही पण आमच्या शिक्षणा बाबत ती फारच आग्रही होती. पुढे प्रौढ शिक्षण घेऊन ती थोडं लिहायला वाचायला शिकली होती पण ते तितकंच ! पण माझ्या बाबांना वाचनाची प्रचंड आवड होती. फक्त रस्त्यावरील वाचून ते इंग्रजी लिहायला वाचायला शिकले. त्यांचं अक्षर बघून तर मला त्यांचाही हेवा वाटायचा ते उत्तम चित्रकार होते. मी लहान असताना ते मला सुंदर रिक्षाचे चित्र काढून द्यायचे ! मला वाचायची आणि चित्रकलेची जी गोडी लागली ती कदाचित त्यांच्यामुळे पण मी कवी कसा झालो याचे उत्तर सापडत नव्हते तर नंतर कळले !
आमच्या घरात माझे चुलत आजोबा नवीन नवीन भजने गीत स्वतः तयार करून सादर करत त्यावेळी त्यामुळे त्यांचं आजूबाजूच्या गावात खूप नाव होते. माझ्या आजोबांच्या दोन बायका होत्या पहिली बायको एका मुलीला जन्म देऊन वारली. त्यानंतर आमच्या आजीने तिचा सांभाळ केला पण आमच्या घरात सावत्र हा शब्द कधीच उच्चरला गेला नाही. सावत्र वगैरे असं काही नसतं काही कोत्या मनाच्या लोकांनी नात्यात घुसडलेली ही भेसळ आहे. आमच्या आईच्या घरीही तसेच चित्र होते. जुनी माणसे खरंच मनाने खूप निर्मळ होती. पण दुर्दैवाने आताची माणसे तशी नाहीत. माझी आजी ज्या गावची त्या गावात स्वयंभू शंकराचे देवस्थान आहे. माझी आजी थोडी रागीट होती पण स्वाभिमानी होती. तिच्यापेक्षाही कित्येक पटीने जास्त स्वाभिमानी माझी आई आहे…
— निलेश दत्ताराम बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply