आमची आई आमच्या शिक्षणाबाबत प्रचंड आग्रही होती म्हणूनच तिने आमच्यासाठी गुरुकुल विद्यालय या खाजगी शाळेत प्रवेश घेतला होता तिला काय माहीत पुढे जाऊन नियतीचे फासे कसे उलटे पडणार होते. मी सहावीत जाईपर्यत आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बरी होती. सहावीत माझा वर्गात तिसरा नंबर आला होता पण मी सातविला गेलो आणि अचानक बाबांनी त्यांचा लिंबाचा व्यवसाय बंद केला आणि आमच्याच विभागात धंदा करण्याचा निर्णय घेतला त्यात त्यांचे दारूचे व्यसन बळावले,आमच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाचा खर्चही वाढला होता. त्या काळात त्यांनी अनेक उद्योग केले ज्यात मी मोठा मुलगा म्हणून माझीच फरफड होत होती. कधी नारळाचा, तर कधी कांदा लसणाचा तरी कधी बुर्जी पाव असे एक ना अनेक उद्योग केले. एका ताडीच्या दुकाना बाहेर चणे विकण्याचा धंदाही मी केला त्यापूर्वीही आम्ही भावंडांनी घरात अनेक छोटी छोटी कामे केली होती. या दरम्यान घराची डागडुजी करण्यासाठी आईने तिचे दागिने विकून टाकले. शाळेच्या फी भरण्यासाठी कित्येकदा फंडातून पैसे उचलले या दरम्यान विजेचे बिल न भरल्यामुळे वीज कापून गेली त्यावेळी नातेवाईकांनी केलेली लबाडी मला आजही विसरता येत नाही.
जेंव्हा कोणताच मार्ग उरला नाही तेव्हा माझ्या आईने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या पगारात आमचं घर कसंतरी चालू लागलं पण घरासाठी कष्ट करणाऱ्या माझ्या आईवर दारूच्या नशेत बाबा तिच्या चारित्र्यावर संशय घायचे ते ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात जायची आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विवाह संस्थेवरचा माझा विश्वास उडायला सुरुवात झाली होती. आजूबाजूच्या जवळ जवळ सर्वच घरात हीच परिस्थिती होती. मी अभ्यासात हुशार असतानाही मला त्याकडे दुर्लक्ष करावं लागतं होतं. दहावीच्या परीक्षेला जायला माझ्याकडे साधे नवीन कपडेही नव्हते. माझ्या आग्रहाखातर एक जोड कपडे बाबांनी घेऊन दिले मला आजही आठवते परीक्षेला जाण्यासाठी घरी बसलाही पैसे नव्हते तेव्हा आमच्या शेजारणीने चार रुपये दिले होते. त्याही परस्थिती अभ्यास करून मी दहावीला त्रेसष्ट टक्के मिळवून पास झालो. पण तेव्हा पेढे वाटायलाही आमच्याकडे पैसे नव्हते. माझा बाबा मला म्हणाले, तू आता काम कर !तुझ्या आईला झेपत नाही ! सगळे शाळेत जातात त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला हवे ! मी तेव्हाही होकार भरला पण मला काय वाटतं ! मला काय करायचंय ? मला काय व्हायचंय ? हे विचारणारा कोणीच नव्हता. वयाच्या सोळाव्या वर्षी माझ्या बाबांनी आमच्या कुटुंबाचा भार माझ्या खांद्यावर टाकण्याचा विचार केला. कारण त्याच वयात त्यांनीही तो पेलला होता. पण तो पेलताना त्यांची स्वप्ने नव्हती पण त्यांनी माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केली होती. माझी सर्व स्वप्ने त्यांच्या स्वप्नांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती. मी पण कुटूंबातील मोठा मुलगा म्हणून तो त्याग हसत हसत केला. माझ्या स्वप्नाची माती झालेली पाहून आतल्या आत कुडत झगडत जीवन जगता जगता जगता माझ्यातील मी कधी मेला ते कळलंच नाही. हळूहळू मी सर्वांपासून दूर जाऊ लागलो आणि एक क्षण आला जेव्हा मी स्वतःला एकटा समजू लागलो. माझ्याकडे आज सर्व काही होत, सर्व नाती होती, पद, प्रतिष्ठा, मानसन्मान तरीही मी स्वतःला एकटा समजत होतो.
माझा दहावीचा निकाल लागला आणि माझ्यासाठी माझ्या बाबांनी कामाची शोधा शोध सुरू केली तेव्हा एका लोके आडनावाच्या इसमाने त्याच्याच बाजूच्या नव्याने सुरू झालेल्या अभियांत्रिकी कारखान्यात माझ्या कामासाठी विचारणा केली. मी बाबांसोबत त्या कारखान्यात गेलो. त्या कारखान्याच्या मालकाने माझी मार्कशीट पाहून मला कामावर ठेऊन घेतले. त्यावेळी त्या कारखान्यात त्यावेळी जावळे आडनावाचे एक गृहस्थ टर्नर म्हणून काम करत होते. त्या कारखान्यात सोने- चांदी वजन करायचे बुलीयचे तराजू आणि वजने तयार होत होती. त्यावेळी त्या कारखान्यात अभियांत्रिकी कारखान्यात असणाऱ्या जवळ – जवळ सर्व मशिन्स होत्या उदा. कटिंग, ड्रीलिंग, शिपिंग, टर्निंग, ग्रांडिंग, टॅपिंग, इन्ग्रेविंग, पंचिंग ही सर्व कामे करणाऱ्या! त्यावेळी त्या मशिन्स पाहून मला खरं तर घाम फुटला होता पण त्यावेळी येथे आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल या आशेने मी तेथे कामाला राहिलो. तेव्हा मला तिथे तीस रुपये रोज ठरला होता.
मी तेथे झाडू मारून कामाला सुरुवात केली. त्यावेळी माझे बाबाही धंदा बंद करून नोकरीला लागले होते. आई घरीच होती. माझ्या आयुष्यात मी हाताळले सर्वात पहिली मशीन होती कटिंग मशीन त्या मशीनवर पाटे कापण्यात मी पटाईत झालो. त्यानंतर मी रात्र महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घेतला. पण का कोणास जाणे माझं मन अभ्यासात पूर्वीसारखं रमत नव्हतं. म्हणजे माझ्या आमच्या कुटुंबावर पैशा अभावी जे अपमान सहन करण्याचे प्रसंग आले होते ते मला स्वस्थ बसू देत नव्हते त्यावेळी मी कमालीचा नास्तिक आणि विज्ञानवादी होतो. त्यामुळे मी खूप मेहनत करून मोठा माणूस होईन वगैरे फिल्मी विचार माझ्या डोक्यात होते. पण प्रत्यक्षात तसे काही झाले की नाही हे मला अजूनही कळत नाही.
आमची मुख्य कंपनी गिरगावला होती आणि मी गोरेगावच्या कारखान्यात होतो. मी कारखान्यात सर्वांच्या अगोदर जात असे त्यामुळे कारखान्याची चावी माझ्या हातात दिली. टेलिफोन उचलण्याचे कामही माझ्याकडे आले , चहा लिहिणे, चलन सही करून देणे ही कामेही माझ्याकडे असली म्हणजे कारखाना उघडण्यापासून ते बंद करण्यापर्यंतची वरची सर्व कामे मला करावी लागत. त्या कारखान्यात नंतर जुन्या कारखान्यातून एक जाधव आडनावाचे इसम आमच्या ह्या कारखान्यात कामाला आले ते प्रचंड हुशार होते. त्या क्षेत्रातील सर्वात हुशार माणूस म्हणता येईल. त्यांनतर त्या क्षेत्रातील बऱ्याच हुशार कारागिरांसोबत मी मदतनीस म्हणून काम करत होतो.
बारावीला मी दोन विषयात मी नापास झालो त्या वर्षी म्हणजे १९९७ ला त्या दोन विषयात सत्तर टक्के विद्यार्थी नापास झाले होते. पण मी नापास होण्याला मला अभ्यास करायला वेळ मिळाला नव्हता किंवा माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. पुढे ऑक्टोबरला मी त्या दोन्ही विषयात पास झालो. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी खूप अट्टहास केला पण ते शक्य झालं नाही. आणि एक क्षण असा आला की मला वाटू लागलं की फक्त ती कागदी डिग्री घेऊन काही उपयोग नाही कारण त्या डिग्रीमुळे मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा कितीतरी पट अधिक ज्ञान आता आपल्याकडे आहे.
— निलेश दत्ताराम बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply