पुढे मी त्या कारखान्यातील कामाकडे लक्ष केंद्रित केले आणि एका एका यंत्रावर स्वार झालो. या दरम्यान मला वाचनाची गोडी लागली कारण जाधव आणि जावळे रोज कारखान्यात येताना वर्तमानपत्र आणत आणि मी ही त्यावेळी आमच्या बसमध्ये वर्तमान पत्र वाचणारा मी एकटाच होतो. मी तेव्हा पासून म्हणजे १९९७ पासून ते आज २०२१ पर्यत सकाळ पेपर वाचतोय ! जावळे नावाकाळ वाचायचे आणि जाधव लोकसत्ता दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत डबा खाऊन झाल्यावर ते झोपायचे आणि मी पेपर वाचत बसायचो ! मला वाचनाची आणि लिहिण्याची गोडी तर होतीच पण ती गोडी या कारखान्यात आणखी वाढली. त्या व्यतिरिक्त मी इतर मिळेल ते साहित्य वाचायचो त्या वाचण्याला कोणत्याच विषयाचे बंधन नव्हते.
२००० साली मी लिहिलेल्या दोन प्रेमकथा “नवाकाळ” या दैनिकात प्रकाशित झाल्या. २००१ साली सकाळचे युवा सकाळ हे खास युवकांसाठीचे दैनिक सुरू झाले होते. त्या दैनिकात माझे वेगवेगळ्या विषयावरील पत्रे, मतं आणि लेख प्रकाशित होऊ लागले आणि माझ्यातील पत्रकार खऱ्या अर्थाने जागा झाला त्यांनतर मी ‘मालाड टाइम्स’ या स्थानिक हिंदी साप्ताहिक वृत्तपत्रात शिकाऊ पत्रकार म्हणून काम केले त्या साप्ताहिकाचे संपादक राजेश शिर्के हे माझे पत्रकारितेतील गुरू त्यांच्यामुळेच मला पत्रकारितेचे धडे मिळाले. त्यामुळे पुढे वृत्त मानस या दैनिकात माझे अनेक लेख प्रकाशित झाले. वेगवेगळ्या दिवाळी अंकात माझ्या कथा लेख आणि कविता प्रकाशित होऊ लागल्या .
सिद्धी फ्रेंड्स पब्लिकेशनचे सुभाष कुदळे आणि विनोद पितळे याच्या सहकार्याने माझा 2009 साली कवितेचा कवी आणि २०१० साली प्रतिभा हा कविता संग्रह प्रकाशित झाला. मे २०११ ला माझ्या साहित्य उपेक्षितांचे या मासिकाचा जन्म झाला. नवीन लेखकांना संधी देण्याच्या उद्देशाने ! माझा लिखाणाचा प्रवास एका नोंदणीकृत मासिकाचा संपादक होईपर्यत पोहचला होता. त्या मासिकाचा पसारा मला फार काही वाढवता आला नाही पण दखल घेण्याजोगे काही अंक नक्कीच प्रकाशित होत राहिले. त्यात मला माझे दुसरे गुरू आणि मार्गदर्शक डॉ. शांताराम कारंडे यांचे सहकार्य लाभले आणि आजही लाभत आहे.
आता लिखाणाचं, वाचनाचं मध्यम बदललं. अनेक वेबसाईट आल्या अँप आले आणि मी डिजिटल मीडियाच्या प्रेमात पडलो आणि फेसबुक व्हाट्स अँप यावर मी रमू लागलो. हातातला कागद पेन नाहीसा झाला आता मोबाईलच्या स्क्रीनवर बोटातून शब्द उतरू लागले. माझ्या शब्दांना किंमत आली माझ्या लिखाणाची दखल घेतली जाऊ लागली. माझ्या विचारांना महत्व आले. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक मित्र आणि मार्गदर्शक भेटले. पण मी त्याही क्षेत्रात फार काही नेत्रदीपक असं काही करू शकलो नाही असं मला स्वतःला वाटतं कारण मी त्या क्षेत्रात अजून बरच काही करू शकलो असतो पण माझी आर्थिक परिस्थिती नाही पण आर्थिक जबाबदारी आडवी येत होती. माझं कुटुंबातील मोठेपण मला आयुष्याच्या या वळणावरही आडवं येत होतं. माझा उपयोग अनेकांना होत होता मला मानसन्मान मिळत होता पण आर्थिक बाजू मात्र माझी स्वतःची लंगडी झाली होती. मला खूप वाटायचं म्हणजे वाटतं की आपण समाजासाठी काहीतरी करावं पण स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मला आजही झगडावं लागतंय !
आजही मी एकटाच त्या कारखान्यात घाम गळतोय ! त्या कारखान्यातील सर्व कामगार कारखाना सोडून गेले आहेत. मी आहे म्हणून कारखाना सुरू आहे. त्या कारखान्याची आर्थिक स्थिती बरी नाही म्हणजे सारं टुकू टुकू चाललंय ! म्हणजे मी चालवतोय ! मला माझे बाबा आणि भाऊ नवीन उद्योग सुरू कर म्हणून मागे लागले आहेत. म्हणजे आता ते सगळे बऱ्यापैकी पैसेवाले झाले आहेत मी बारावी झालो त्यानंतर माझे बाबा आध्यात्मिक मार्गाला लागले त्यांनी दारू सोडून दिली. त्यानंतर माझा धाकटा अपंग भाऊ त्याला मी कर्ज काढून तेव्हा संगणक शिकविला. तो त्यात पटाईत झाला. तो स्वतःच्या पायावर उभा राहावा म्हणून मी त्याला बी. कॉम पर्यत शिकविले. आणि दोन कॉम्पुटर च्या मदतीने त्याने कॉम्प्युटर क्लास सुरू केला. मी त्याच कॉम्प्युटरवर सारं काही शिकलो. वाटलं नव्हतं कधी आपण स्वतःच कॉम्प्युटर घेऊ पण झालं.
माझा लहान भाऊ तो ही बारावी झाल्यावर एल आय सीत डी.ओ. कडे कामाला राहिला. बहीण १२ वी होताच तिचा प्रेमविवाह करून दिला. मधल्या काळात आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती आम्ही चारचाकी घेऊ शकतो इतकी मजबूत झाली. पण त्यात माझे योगदान नव्हते याची मला स्वतःला आज खंत वाटते. एका कुडाच्या झोपडीतून आम्ही टॉवर मध्ये राहायला आलो. याचा खूप आनंद होतो. मधल्या काळात लहान भावाचा प्रेमविवाह झाला. त्याला दोन मुलं झाली बहिणीला दोन मुलं झाली आई बाबांना चार नातवंड मिळाली. आता लहान भाऊ वेगळा राहतो म्हणजे जागेची समस्या ! तरीही आम्ही दोघे म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ अविवाहित आहोत याच शल्य आई बाबांना आहेच ! माझ्या आयुष्यात अनेक स्त्रिया येऊनही मी अविवाहित का आहे ? हे जगाला न उलगडलेले कोडे आहे.
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ) , मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply