आज आमची बोटे मोबाईलच्या स्क्रीनवर ठोकून ठोकून बोथट झाली आणि कदाचित बुद्धीही ! आज आमचे डोळे आत गेलेत, डोळ्याखाली काळी वर्तुळे आली आहेत. आणि डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा चढला आहे. जेव्हा आयुष्यात मोबाईल, टी. व्ही. नव्हता तेव्हा आयुष्यात किती आंनद होतो. बालपण तर विचारायलाच नको ! तेव्हा आम्ही शाळेत जायचो शाळेतून आल्यावर एखादा तास अभ्यास करायचो आणि अंधार पडेपर्यत मातीत खेळायचो ! वीज आल्यावर तर रात्रीही कबड्डी खेळायचो ! पतंगीला कंदील बांधून उडवायचो. तेव्हा आमच्या खेळण्याची साधने फार विचित्र होती आता ती सारी स्वप्नवत आहेत. आमच्या लहानपणी आम्ही माचीसचे पत्ते खेळायचो म्हणजे तेव्हा माचीसचा बॉक्स फाडून त्याचे दोन वेगवेगळी चित्र असलेले पत्ते तयार व्हायचे एकाने पत्ता टाकला त्यावर दुसऱ्याने तो पत्ता टाकला तर ती दोन्ही पत्ते त्याचे मी खेळायचे बंद केले तेंव्हा माझ्याकडे दोन हजार पत्ते होते. त्या पत्त्यावरून आठवलं ते पत्ते मिळविण्यासाठी आम्ही अक्षरशः आमच्या झोपडपट्टीची कचरा टाकण्याची जी जागा होती तिथे ते पत्ते शोधायला जातो अक्षरशः कचरा वेचणाऱ्या मुलांसारखे माझी एक दूरची जवळ राहणारी मावशी होती. तिने आमच्या पडत्या काळात आम्हाला वेळोवेळी मदत केली होती. तिची मुलगी माझी मैत्रीण होती म्हणजे ती माझ्याहून पाच तीन वर्षांनी लहान होती मी हुशार असल्यामुळे तिचा अभ्यास घेत असे मी तिला नेहमी चित्र काढून देत असे निबंध भाषणे लिहून देत असे त्यात तिला बक्षिसेही मिळत पुढे ती कराटेत ब्लॅक बेल्ट झाली. आजही ती कराटे क्लास चालवते त्यासोबत माझी मावशी आणि आता तीही राजकारणात सक्रिय झाले आहेत.
आमच्या सोसायटीत चित्रकार म्हणून मी प्रसिद्ध होतो कारण शाळा सोडल्या नंतरही चार पाच वर्षे मी आजूबाजूच्या मुलांना रात्री बारा – बारा वाजेपर्यत जागून चित्रे काढून देत असे. माझ्या दडलेला चित्रकार आणि चावटपणा यांचे मिश्रण झाल्यावर मी एका अर्ध नग्न स्त्रीचे चित्र रेखाटले आणि रंगविलेही ! तेव्हा मी आता सारखा आधुनिक विचाराचा नव्हतो नाहीतर नक्कीच मित्रांना दाखविले असते पण नंतर ते ठेवायचे कोठे हा प्रश्न निर्माण झाला आणि मी हृदयावर दगड ठेऊन ते चित्र फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकले.
तो कचऱ्याचा डबा त्या कचऱ्याच्या ढिगावर मोकळा झाला आणि नेमक्या त्या ढिगात ती माचीसचे पत्ते शोधायला गेली तिला ते चित्राचे तुकडे भेटले तिने ते जोडले नशीब आता मी प्रत्येक कवितेखाली न चुकता माझे नाव लिहितो तसे चित्राखाली लिहीत नव्हतो. मी बरा चित्रकार होतो म्हणूनच माझ्या शेजारणीने मी रेखाटलेला साईबाबा पूजेला लावला होता. ते जोडलेले चित्र ती तडक ती माझ्याकडे घेऊन आली आणि मला विचारलं हे चित्र तूच काढलं होतंस ना ? आता मी कसं हा म्हणणार होतो. मी आत्मविश्वासाने खोटं बोललो ते मला आजही जमत. ते तिला खरं वाटलं असावं असं मला तेंव्हा वाटलं होतं पण आज माझ्यातील माणसे वाचणारा लेखक मला हे खात्रीने सांगतोय की तिला शंभर टक्के खात्री होती ते चित्र मीच काढलं होतं त्यांनतर तसा प्रयोग मी कधी केला नाही म्हणण्यापेक्षा त्यानंतर माझ्यातील चित्रकार हळूहळू मेला म्हणजे मी तो मारला. एक वेळ होती रंग विकत घ्यायला पैसे नव्हते एका वेळेला समोर कागदाचा ठीक होता रंगाचा पसारा होता पण माझ्यात चित्रकार राहिला नव्हता हल्लीच माझ्या पुतनीसाठी एक चित्र काढण्याचा प्रयत्न केला होता चित्र काढलेही पण ती मजा आली नाही. आता चित्र काढायला पूर्वी सारखा सराईतपणे हात वळत नाही. एक वेळ होती जेंव्हा मी चित्रकार होण्याची स्वप्ने पहिली होती. अशाच गप्पा मारताना माझ्या त्याच मावशीने मला विचारले होते निलेश तू मोठा होऊन कोण होणार आणि तेव्हा माझ्या तोंडून नकळत बाहेर पडून गेलं होतं ” लेखक ” माझ्या तोंडून अचानक माझ्याही नकळत बाहेर पडतात ती खरी होण्याची सुरुवात तेव्हाच झाली होती. पुढे तो अनुभव माझ्या संपर्कातील अनेकांना आला.
मी निबंध उत्तम लिहायचो पण तेव्हा माझं अवांतर वाचन फार नव्हतं. कवितेचीही मला विशेष गोडी नव्हती. त्यावेळी माझ्यावर इंग्रजीचे भूत होते म्हणजे किरणांच्या पुड्या बांधून आलेल्या इंग्रजी पेपरवर जे काही लिहिलेले असायचे ते मी वाचून काढायचो मी कमवायला लागल्यावर जर कोणते पुस्तक विकत घेण्याचा माझ्या मनात विचार आला असेल तर ते इंग्लिश स्पिकिंग कोर्सचे ! आता मी इंग्रजी वाचत नाही त्यामुळे आयत्या वेळी मला इंग्रजीचे बरेचसे शब्द आठवत नाहीत नाहीतर पूर्वी मी मराठी बोलताना एक शब्द मराठी आणि एक इंग्रजी असायचा ! त्यावरून एकदा एक विनोद झाला होता. मी माझ्या अशिक्षित आईलाही कधी कधी मॉम बोलवत असे एकदा आमच्या घरी एक अशिक्षित बाई बसली होती नेमका तेव्हा मी बाहेरून आलो आणि आईला म्हणालो, मॉम मला जरा पाणी दे ! लगेच त्या बाईचे कान आणि डोळे मोठे झाले. तिने नक्कीच मी आईला मॉम बोलतो हे गावभर सांगितले असेल त्यानंतर ते बंद झालं.
माझ्या शाळेत माझी अत्यंत हुशार, साधा – भोळा आणि सभ्य अशी प्रतिमा होती पण प्रत्यक्षात मी जमदग्नी होतो. कित्येकदा तर मी माझ्याहून वयाने मोठ्या असणाऱ्या मुलांशीही मारामारी केली होती. पण पुढे ते माझे मित्र झाले. माझ्याशी शत्रुत्व करणं कोणालाही परवडत नाही. माझ्या शत्रूंचा माझ्यापुढे टिकाव लागत नाही. एक वेळ येतेच जेव्हा माझ्या शत्रूंना माझ्या पायाशी यावे लागते.
पत्ते हा आमच्या खेळाचा भाग होता. म्हणजे अक्षरशः आम्ही जुगार खेळायचो असं म्हटलं तरी ते वावग ठरणार नाही. शाळेतून आल्यावर दुपारी तेव्हा आमची आई कामाला जायची तर कधी आमच्या घरात तर कधी जेथे सावली असेल तेथे आम्ही गोट्या सोडा बोटलचे बिल्ले लावून तीन पत्ता खेळायचो ! बऱ्याचदा त्यात मी जिंकायचो ! गणपतीत आमच्या सोसायटीत तेव्हा फक्त माझ्या मित्राकडे गणपती यायचा ! आम्ही बामणे मराठा असूनही संपूर्ण कोकणात फक्त आमच्याकडेच गणपती येत नसावा. एकाने आणला पण पुढे त्याला काही त्रास झाल्यावर बंद केला आमच्या आईकडे ती सुर्वे खानदानी मराठा त्यांच्याकडे गणपती येतो पण माझ्या आयुष्यात मी एकदाही कोकणातील गणपतीला उपस्थित नव्हतो. तर तेव्हा तो गणपती आम्ही सात दिवस जगवायचो ! जोडपत्ता आणि मेंडीकोट खेळून जोडपत्ता २५ पैशाचा डाव असायचा आणि मेंडीकोट खेळताना पार्ले बिस्कीटचे पुडे डावावर असायचे. डाव संपला की चहा बिस्किटची पार्टी व्हायची !
आता योगायोगाने टॉवरमध्येही माझा तो मित्र आमच्याच शेजारच्या घरात राहायला आला. मी जेथे वास्तव्यात असतो तिथे जवळ देऊळ असतेच आमच्या घराजवळ संतोषी मातेचे मंदिर होते. मधल्या काळात जिथे भाड्याने राहायला गेलेलो तेथे शंकराचे मंदीर होते. आता आमच्या इमारती जवळ गणपतीचे मंदीर आहे. पण माझा गावच्या घराजवळ मंदीर नाही म्हणूनच कदाचित मी आमच्या गावातील घरात फार वास्तव्यास राहू शकलो नाही मी ज्या इंडस्ट्रीत कमला जातो त्याच्या बाहेरही शंकराचे आणि हनुमानाचे मंदीर आहे . मी जिथे शिकवू पत्रकार म्हणून ज्या साप्ताहिकात होतो त्या वर्तमानपत्राचे कार्यालयच कोडीयार मातेच्या मंदिरात होते. तसे असले तरी मी नेहमीच निर्गुण निराकार देवाचा भक्त होतो आणि आहे.
क्रमशः
— निलेश बामणे.
मो. 8692923310 / 8169282058
२०२, ओमकार टॉवर, जलधारा एस आर ए,
बी – विंग, गणेश मंदिर जवळ, श्रीकृष्ण नगर,
संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – ४०० ०६५.
Leave a Reply