ज्ञानेश्वरांनी परमिट दिलेच आहे की,
‘राजहंसाचे चालणे | जगी झालिया शहाणे ||
म्हणुनी काय कवणे | चालोची नये ||’
त्याच चालीवर आपले महाराष्ट्राचे लाडके दैवत म्हणतात नेपोलियन बोनापार्ट सारखी थोरामोठ्यांची चरित्रे जगात झाली असतील म्हणून आमच्यासारख्या कारकुनाने चरित्र सांगू नये की काय??? तर गुरूंची पडत्या फळाची आज्ञा मानून प्रवासवर्णन लिहिण्याच्या फंदात पडले. असतील अनेक थोर मंडळी!! अभूतपूर्व ‘अपूर्वाई’ लिहिणारे ‘पु. ल. देशपांडे’ किंवा ‘डॉक्टर मीना प्रभू’ यांसारखे ज्या देशात जातील तिथे आपल्या लेखनशैलीने वाचकाचे बोट धरून त्यांना देशाचे पर्यटन करवणारे, तिथल्या रीतीरिवाज यांची आपला परिचय करवणारे आणि वाचकांचे प्रचंड प्रेम आणि आदर मिळवणारे म्हणून मी पामराने प्रवास वर्णन लिहूच नये की काय?? हे दोन लेखक माझ्यासाठी गुरुतुल्य आहेत त्यांना सादर प्रणाम करून मी हे धाडस करत आहे आणि वर गुरूंनी दिलेल्या उक्तीप्रमाणे माझी परदेशवारी लिहिण्याचे प्रामाणिक प्रयत्न करते.
माझ्या लेखनात त्यांचे काही शब्द किंवा वाक्य जसेच्या तसे येण्याची शक्यता आहे. कारण मी मुळात लेखक नाही. मराठी तर अजिबात चांगले नाही. मराठीत केवळ टक्केवारी घसरू नये म्हणून थोडे जास्त मार्क्स बहाल केलेली मी. माझी स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण लेखन शैली नाही. जर का काही साधर्म्य आढळले तर वाचकांनी माफ करावे. साधर्म्य सापडण्याचे एकच कारण की त्यांची प्रवासवर्णने ही मनात इतकी रुजली आहे कि ते सौंदर्य अनुभवताना त्यांच्या लेखना पलीकडे दुसरा विचार सुचला नाही. असो!
हा माझा लेखनाचा पहिला प्रकल्प मी माझ्या पहिल्या वहिल्या विमान आणि परदेश इंग्लंड वारीने सुरू करते!! मला माहित आहे, मी जे अनुभवले, सर्व सुरळीत होईपर्यंत मनाची घालमेल चालू होती ती आता कदाचित वाचताना बालिश वाटेल कारण आजकाल बहुतेक सर्वजण वर्षातून एक किंवा दोन वर्षातून एकदा पर्यटनासाठी विदेशी जात असतात. पण काही वर्षांपूर्वीपर्यंत परदेश गमन हे गोड स्वप्न होते आणि बहुतांश लोकांची इच्छा होती की हे स्वप्न सत्यात उतरावे मुलगा किंवा मुलगी फॉरेनला जाणे ही मध्यमवर्गीयांसाठी कॉलर ताठ करणारी अभिमानास्पद गोष्ट होती त्यातून स्वखर्चाने न जाता कंपनीने पाठवणे हे एक वेगळेच कौतुक!! त्यामुळे यातले काही प्रसंग किंवा भावना खुळचट वाटल्या तरी तेव्हा त्या तइतक्या सच्चा आणि प्रामाणिक होत्या. मी इतकं का जस्टिफिकेशन देत आहे? मला आता त्या खुळचट वाटत आहेत का? असो!
लिहिणाऱ्याने लिहीत जावे… कोणी वाचेल??… कोणाला आवडेल??… याची पर्वा करू नये असे आपले गुरूच सांगतात.
— यशश्री पाटील.
Leave a Reply