बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे , दि.१५ नोव्हेंबर २०२१ कार्तिक शु. एकादशीला अनंतात विलीन झाले. एक चालता, बोलता, धगधगता इतिहास शांत झाला. ‘जिवेत शरद: शतम् ‘ अर्थात ‘शतायुषी व्हा ‘ या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेच्या शुभेच्छाचा मान राखत त्यांनी वयाच्या शतक वर्षात पदार्पण करूनच या जगाचा निरोप घेतला. आपण अगदी कुणाच्याही बाबतीत एक पर्व संपलं असं सहज म्हणून जातो. परंतु बाबासाहेब हे खरंच एक पर्व होतं.
ही दुःखद बातमी ऐकताच माझं मन खूप मागे, भूतकाळात गेलं , जेव्हा मी एक शाळकरी मुलगा होतो. आमच्या घरात वाचनश्रीमंती असल्यामुळे पुस्तकांना पहात, हाताळत आणि पुढे त्यांच्या प्रेमात पडत गेलो. घरात चित्रपटापेक्षा नाटकांची आवड अधिक होती. माझ्या थोरल्या भावंडांच्या शाळेत सानेगुरुजी विद्यालयात शारदीय नवरात्रोत्सव साजरा व्हायचा. अनेक उत्तमोत्तम वक्ते, शास्त्रीय, सुगम संगीत गायक यांना ऐकण्याचा योग तिथे आला. तो काळच फार सुंदर होता. सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव , साहित्यिक सप्ताह अशा सण, उपक्रमातून अनेक ज्येष्ठ, थोर, व्यासंगी वक्त्यांना आमंत्रित केलं जायचं. त्यांच्या वैचारिक भाषणातून श्रोत्यांची बौद्धिक भूक भागली जायची. आयोजक अशा दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी रसिकांसमोर आणायचे आणि रसिकही त्याचा प्रचंड उपस्थितीने मनमुराद आस्वाद घ्यायचे.
असेच एक वर्षी शारदीय नवरात्रौत्सवात एक दिवस ब. मो.पुरंदरे यांचं इतिहासातील एका घटनेवर व्याख्यान आयोजित केलं होतं. उपस्थित प्रेक्षक उत्सुकतेने रंगमंचावर येणाऱ्या त्या वक्त्यांची वाट पहात होते. ही साधारणपणे १९६७-६८ सालातली गोष्ट आहे. शाळेचे प्रमुख श्री.प्रकाशभाई मोहाडीकर यांनी ओळख करून दिली, “आजचे आपले वक्ते आहेत शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे.”
आणि एक तरतरीत, काळेभोर कुरळे केस, दाढी राखलेले, कुर्ता पायजमा घातलेली एक तरुण व्यक्ती हात जोडत रंगमंचावर अवतीर्ण झाली. त्यांनी शिवरायांवरील एक प्रसंग घेऊन त्यावर बोलायला सुरावात केली. आणि अगदी काही मिनिटातच ते सभागृह त्या ऐतिहासिक विश्वात रंगून, गुंगून नव्हे तर मनाने त्या काळात कधी जाऊन पोहोचले हे कुणालाच कळलं नाही. एक एक संदर्भ, घटना अगदी आताच घडल्यासारख्या त्यांच्या मुखातून समोर येत होत्या. फक्त ते देत असलेल्या सनावल्यामुळे हे इतिहासात घडलेलं आहे असं मानावं लागत होतं. अन्यथा ती प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर मूर्तिमंत उभी रहात होती. बाबासाहेब इतिहासात पूर्णपणे शिरलेले होते , आणि त्यांच्यासोबत होतो आम्ही सगळे प्रेक्षक. अहो, माझ्यासारखी शालेय जीवनातील , वर्गात इतिहासाच्या तासाला सतत चुळबुळ करणारी मुलंही स्थिर बसून, फक्त कान आणि डोळे उघडे ठेवून त्या इतिहास कथनाचा मनापासून आनंद घेत होती. दोन अडीच तासांनी तो ऐतिहासिक शब्दप्रवास थांबला आणि ते संपूर्ण सभागृह वर्तमानात आलं. हा माझा बाबासाहेबाना ऐकण्याचा पहिला समृद्ध अनुभव.
त्यानंतर, दादरच्या अमरहिंद मंडळात त्यांच्या सात किंवा दहा दिवसांच्या ऐतिहासिक मालिका ऐकण्याचे अनेक योग आले. आणि प्रत्येक वेळी त्यांच्या कथानातून मिळणारा तो आनंद कित्येक पटींनी वाढतच गेला.
१९७१ मध्ये आम्ही ठाण्याला राहायला आलो. ठाण्यात घंटाळी नवरात्रोत्सव मंडळातर्फे दर वर्षी नऊ दिवस फार सुंदर कार्यक्रम आयोजित केले जात असत. आमच्या घरापासून अगदी दोन चार मिनिटांवर देवीचं देऊळ आणि कार्यक्रमाचं पटांगण होतं. एका वर्षी नऊ दिवसातील एक दिवशी बाबासाहेबांचं व्याख्यान होतं. खूप आनंद झाला मला. आधीच जाऊन पुढे जागा अडवली होती. त्यावेळी भारतीय बैठकच असायची. या मंडळाची एक शिस्त होती. कार्यक्रम अगदी नियोजित वेळी सुरू होत असे. बाबासाहेबांचं व्याख्यान अगदी वेळेवर सुरू झालं. पुन्हा एकदा तोच दिव्य अनुभव, तोच शब्दानंद आणि इतिहासातले प्रसंग ऐकताना तोच सरसरून अंगावर उभा राहणारा काटा या सगळ्याचा पुन:प्रत्यय आला. यावेळी घडलेली एक गोष्ट आजही माझ्या स्मरणात आहे. पटांगणाच्या बाजुलाच घंटाळी देवीचं मंदिर आहे. नवरात्र असल्याने भाविक सतत दर्शनाला येत असायचे. भाषण सुरू असताना कुणीतरी देवळातली घंटा वाजवली आणि इतिहासात तन मनाने शिरलेल्या बाबासाहेबांची एकाग्रता ढळली. त्यांनी आपली मान हलवली आणि एकदम म्हणाले ,
“थांबवा , थांबवा.” आधी कोणालाच काही कळलं नाही , पण लक्षात येताच स्वयंसेवक धावले आणि सगळं स्थिरस्थावर होऊन पुन्हा तो शब्दप्रवास सुरू झाला.
पुढे बाबासाहेबांची काही पुस्तकं वाचनात आली. राजा शिवछत्रपती पुस्तकाचे दोन जाडजूड खंड वाचून काढले. छत्रपती शिवाजी महाराज हे तर बाबासाहेबांचं दैवत. त्यांच्याबद्दल बोलताना त्यांची वाणी हळवी आणि ओघवती व्हायची.
बाबासाहेबाना बोलताना फक्त ऐकणं यापेक्षा पाहाणं अधिक आनंदाचं असायचं. त्यांचं संपूर्ण शरीर श्रोत्यांशी संवाद साधत असायचं. शब्दकळेला एक सुंदर लय असायची. प्रत्यक्ष इतिहासात रमणारी ही थोर व्यक्ती स्वतःला इतिहास संशोधक न म्हणता शिवशाहीर म्हणवून घेण्यात धन्यता मानणारी होती…… होती म्हणजे भूतकाळ.
अगदी नुकतीच आणि शेवटची त्यांची सुधीर गाडगीळनी घेतलेली मुलाखत मी ऐकली. ती ऐकतानाही ही व्यक्ती शंभरीच्या घरात आली आहे असं कुठेही जाणवत नव्हतं. चेहऱ्यावर थकवा नव्हता आणि बोलताना, त्या काळातले संदर्भ देताना ते दोन डोळे तसेच चमकत होते. मुखातून येणारी शब्दकळा तशीच ओघवती वहात होती, स्मरणशक्ती कुठेही कमी झाल्याचं जाणवत नव्हतं.
आपला ज्वलंत इतिहास आपल्यासमोर उलगडून आमची आयुष्य , आमची मनं आणि आमचं जीवन भरून आणि भारून टाकणारी , आयुष्यभर एक ध्यास घेतलेली ही थोर व्यक्तिमत्व. आपण फक्त नतमस्तक व्हायचं त्यांच्यापुढे.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply