नवीन लेखन...

माकडाचा पंजा (संक्षिप्त रूपांतरीत कथा १४)

बाहेर कडाक्याची थंडी पडली होती.
बंगल्यातील सर्व खिडक्या बंद होत्या.
बापलेक शेकोटीजवळ बुध्दीबळ खेळत होते.
बापाने वजीराची अत्यंत चूकीची हालचाल केली, तें जवळ बसलेल्या त्याच्या पत्नीच्याही लक्षांत आले.
मुलाच्या ते लक्षांत येऊ नये म्हणून मिस्टर व्हाईट म्हणाले, “वाऱ्याने उच्छाद मांडलाय.”
मुलगा म्हणाला, “मी ऐकतोय” आणि पटावर आपली चाल खेळत तो म्हणाला, “शह”.
“तो आज येईल असं मला वाटत नाही.”
वडिल हात बोर्डाकडे नेत म्हणाले.
मुलगा म्हणाला, “मात.”
मिस्टर व्हाईट चढ्या स्वरांत म्हणाले, “आपली ही जागा अगदी बेकार आहे.
रस्ता चांगला नाही.
लोक काय म्हणत असतील कुणास ठाऊक !”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “जाऊ दे. पुढचा डाव तुम्ही जिंकाल.”
मिस्टर व्हाईटनी पत्नीकडे रागाने पाहिलं पण कांही बोलायच्या आधीच त्यांच्या लक्षांत आलं कीं मायलेक दोघं हंसताहेत, तसं त्यांनाही हंसू आलं.
“ते पहा, ते आलेच.”
हर्बर्ट व्हाईट म्हणाला.

फाटक जोराने आपटल्याचा व घराकडे येणाऱ्या बूटांचा आवाज ऐकूं येत होता.
मिस्टर व्हाईट पाहुण्याचे स्वागत करायला उठले.
पाहुण्याला ते आत घेऊन आले.
पाहुणा उंच, डोळ्यात चमक असलेला, लालबुंद चेहऱ्याचा आणि धिप्पाड होता.
त्यांनी पाहुण्याची ओळख करून दिली, “हा सार्जंट मेजर माॅरीस”.
सार्जंट मेजरने सर्वांशी हस्तांदोलन केलं व शेकोटीजवळ खुर्चीत बसला.
तोपर्यंत मिस्टर व्हाईटनी व्हीस्कीची बाटली आणि ग्लास समोर ठेवले.
तिसरा प्याला रिचवतांना पाहुण्याचे डोळे अधिकच चमकू लागले आणि तो ह्या कुतूहलाने ऐकणाऱ्या छोट्या श्रोतृमंडळाला दूर देशांतल्या सुरस, आश्चर्यकारक घटना, प्लेग, युध्द आणि चमत्कारिक लोकांच्या गोष्टी सांगू लागला.

मिस्टर व्हाईट म्हणाले, “एकवीस वर्षांपूर्वी हा बोटीवर गेला तेव्हां एक शिडशिडीत तरूण होता आणि आता बघा.”
“त्यात कांही वाईट घडलेलं दिसतं नाही.
मलाही भारतांत जायला आवडेल, भारत पहायला.”

मिसेस व्हाईट म्हणाल्या.
मान हलवून नकार देत पाहुणा म्हणाला, “तुम्ही आहांत तिथे बऱ्या आहांत.”
रिकामा प्याला खाली ठेवत त्याने पुन्हा एकदा नकारात्मक मान हलवली.

मिस्टर व्हाईट म्हणाले, “मला जुनी देवळे, बैरागी, गारूडी बघायला आवडेल.
माॅरीस, त्या दिवशी तू ती माकडाच्या पंजाची कांहीतरी गोष्ट सांगायला सुरूवात केली होतीस, ती राहिलीच.”
पाहुणा घाईघाईने म्हणाला, “कांही नाही, कांही ऐकण्यासारखं नाही.”
मिसेस व्हाईट कुतुहलाने म्हणाल्या, “माकडाचा पंजा ?”
पाहुणा सार्जंट मेजर म्हणाला, “हो, ती एक जादूच होती म्हणा ना !”
त्याचे तिघेही श्रोते गोष्ट ऐकण्यासाठी पुढे झुकले.

पाहुण्याने नकळत रिकामाच प्याला ओठांना लावला व परत खाली ठेवला.
मिस्टर व्हाईटनी त्याचा प्याला पुन्हां भरला.
तो आपले खिसे चांचपत म्हणाला, “दिसायला तो एक सामान्य छोटासा मुद्दाम सुकवलेला माकडाचा पंजा आहे.”
त्याने खिशांतून काढून कांहीतरी टेबलावर ठेवले.
मिसेस व्हाईट चेहरा वांकडा करत मागे सरल्या पण मुलाने तो हातात घेऊन न्याहाळला.
मग मुलांकडून तो घेऊन मिस्टर व्हाईटनीही पाहिला आणि टेबलावर परत ठेवत विचारले, “ह्यांत विशेष असे काय आहे ?”
सार्जंट मेजर म्हणाला, “तो एका खऱ्या साधुने जादूने भारलेला आहे.
त्याला दाखवायचं होतं की दैव लोकांच्या जीवनावर राज्य करतं आणि जे त्यांत ढवळाढवळ करायचा प्रयत्न करतात, त्यांना पश्चात्ताप करावा लागतो.
त्याने त्यावर अशी तजवीज केली आहे की तीन वेगळ्या व्यक्ती तीन वेगळ्या इच्छा त्याच्याकडे मागू शकतील आणि त्या पूर्ण होतील.”

त्याची सांगण्याची पध्दत इतकी परिणामकारक होती की त्याच्या श्रोत्यांच हंसणं त्यांनाही खटकलं.
हर्बर्ट व्हाईटने चतुराईने विचारलं, “मग तूम्ही कां नाही मागितल्या तीन इच्छा ?”
सार्जंट मेजर शांतपणे म्हणाला, “मी मागितल्या.”
हें सांगतांना त्याचा चेहरा पांढरा पडला.
मिसेस व्हाईटनी विचारले, “आणि तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या ?”
“होय.”
सार्जंट मेजरचा प्याला दातांवर आपटल्याचा आवाज झाला.
मिसेस व्हाईटनी परत विचारले, “आणखी कोणी ह्या पंजाकडे तीन इच्छा मागितल्या होत्या ?”
सार्जंट मेजर म्हणाला, “पहिल्या माणसाच्या तीन इच्छा पूर्ण झाल्या.
त्याच्या पहिल्या दोन इच्छा मला ठाऊक नाहीत पण तिसरी इच्छा होती मरणाची.
तेव्हां हा पंजा माझ्याकडे आला.”
त्याने गंभीरतेने सांगितले व खोलीत शांतता पसरली.

मिसेस व्हाईटनी विचारले, “तुमच्या तीन इच्छा पूर्ण झाल्या तर आता तो तुम्हाला उपयोगी नाही.
मग कशाला ठेवला आहांत ?”
सार्जंट मेजर म्हणाले, “एक चमत्कारिक वस्तु म्हणून.
मी हा विकण्याचा विचारही केला पण बहुदा नाही विकणार.
त्याने आधीच खूप गडबड उडवली आहे.
बऱ्याच जणांना हे खरंही वाटत नाही म्हणून ते विकत घेणार नाहीत.
काही जणांना प्रथम इच्छा करून बघून मग पैसे द्यायचे असतात.”

मिस्टर व्हाईट म्हणाले, “तुलाच आणखी तीन इच्छा करतां आल्या असत्या तर तू मागितल्या असत्यास ?”
पाहुणा म्हणाला, “सांगतां येत नाही. सांगतां येत नाही.”
असं म्हणतं त्याने तो पंजा चिमटीत पकडला आणि पटकन शेकोटीत टाकला.
मिस्टर व्हाईट चपळाइने वांकले व त्यांनी तो पंजा परत बाहेर काढला.
सार्जंट मेजर म्हणाला, “तो जळालेलाच बरा.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “तुला नको असेल तर मला दे.”
सार्जंट मेजर म्हणाला, “शहाण्यासारखा तो परत शेकोटीत टाक.
तू जर तो ठेवलास तर जे काय होईल, त्याबद्दल नंतर मला दोष देऊ नकोस.”
मिस्टर व्हाईट पंजा हातात धरून म्हणाले, “कशा करायच्या इच्छा ?”
सार्जंट मेजर म्हणाला, “उजव्या हातांत असा उंच धरायचा आणि इच्छा मोठ्याने बोलून दाखवायची.
पण मी तुला पुन्हा परिणामाविषयी सावध करतोय.”
मिसेस व्हाईट हंसत म्हणाल्या, “अगदी अरेबियन नाईटसमधल्या गोष्टीसारखं वाटतय.
मागणार असलांत तर माझ्यासाठी चार हातमोज्यांचे जोड मागा”
आणि जेवणाचं टेबल लावायला त्या उठल्या.

तिघेही मोठ्याने हंसले आणि मिस्टर व्हाईटनी तो माकडाचा पंजा खिशांत टाकला.
त्यांना तसे हंसताना पाहून सार्जंट मेजर गंभीर झाला आणि म्हणाला, “मागणारच असलास तर कांही महत्त्वाचं माग.”
एवढ्यांत मिसेस व्हाईटनी जेवायला बोलावले.

जेवण आणि हास्यविनोद ह्यामधे त्या पंजाचा सगळ्यांना थोडा वेळ विसर पडला.
नंतर सार्जंट मेजर साहेबांनी नव्याच थरारक गोष्टींचा दुसरा हप्ता सुरू केला.
सार्जंट मेजर तिथून गेल्यावर हर्बर्ट म्हणाला, “तो ज्या चमत्कारिक गोष्टी सांगत होता त्यापेक्षा जर हा पंजा खरा नसेल तर आपल्याला त्याचा उपयोग होईल असं वाटत नाही.”
मिसेस व्हाईटनी नवऱ्याला विचारलं, “तुम्ही कांही पैसे दिले कां त्याला ह्या पंजासाठी ?”
मिस्टर व्हाईट चांचरत म्हणाले, “मामुली.
तो नकोच म्हणत होता.”
हर्बर्ट चेष्टेने म्हणाला, “बाबा, आता तर तुम्ही श्रीमंत होणार, राजा होणार, मग आईला घाबरायला नको.”
मग आईची थप्पड चुकवायला टेबलाभोवती धावला.
मिस्टर व्हाईटनी पंजा बाहेर काढला आणि ते म्हणाले, “काय मागायचं ? मला तर हवं ते सर्व मिळालंय.”
हर्बर्ट म्हणाला, “फक्त घराचे हप्ते बंद झाले तर पुरे ना तुम्हाला ?
मग तेवढेच दोनशे पौंड मागा.”

मिस्टर व्हाईटनी हातात तो पंजा उभा धरला आणि स्वत:च्या भोळसटपणाला हंसत, हर्बर्ट आपल्या आईकडे बघून डोळे मिचकावत असतांना, इच्छा मोठ्याने बोलून दाखवली, “मला दोनशे पौंड हवे आहेत.” (तेव्हांचे दोनशे पौंड म्हणजे आजचे दोन लाख पौंड किंवा सुमारे दोन कोटी रूपये)
मग मिस्टर व्हाईट चटका बसल्याप्रमाणे ओरडले आणि पंजा खाली टाकत म्हणाले, “हा हलला, एखादा साप हातांत वळवळावा तसं वाटलं मला क्षणभर.”
हर्बर्ट म्हणाला, “पैसे कुठे दिसत नाहीत आणि मला नाही वाटत आपल्याला ते कधी दिसतील.”
त्याने पंजा उचलून टेबलावर ठेवला.
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “तुम्हांला तसा भास झाला असेल.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “नाही, असो. कांही त्रास झाला नाही त्यामुळे पण तो हलला आणि मला क्षणभर धक्का बसला.”
पुन्हा ते शेकोटीजवळ बसले.
बाहेर वाऱ्याचा जोर अधिकच वाढला होता.
वर कुठलं तरी दार आपटत होतं.
तिघे गप्प बसले होते.
झोपायला जातांना हर्बर्ट म्हणाला, “बहुदा पौंड तुमच्या पलंगाला एका पिशवीत टांगलेले असतील.”
आणि एखादी भयानक गोष्ट तुमच्या कपाटावर बसलेली दिसेल.”
दुसऱ्या दिवशी सकाळी चांगलं उन्हं पडलं होतं.
वातावरण प्रसन्न होतं.
आदल्या दिवसाच्या आठवणीने हर्बर्टला हंसू येत होतं आणि त्याची जणू खूण म्हणून तो पंजा दीनवाणा होऊन बाजूच्या छोट्या टेबलावर पडला होता.
कोणाचाही त्याच्या शक्तीवर विश्वास नव्हता.
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “हे सैनिक सगळे असेच असतात.
आपण त्याचं ऐकत बसलो.
अशा कधी इच्छा पूर्ण होतात कां ?
समजा झाली तर दोनशे पौंड नको कां तुम्हाला ?”
हर्बर्ट चेष्टेच्या सुरात म्हणाला, “आकाशातून तुमच्या डोक्यावर पडतील कदाचित.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “सार्जंट म्हणाला कीं गोष्टी सहज योगायोगाने घडल्यासारख्या वाटतात.”
हर्बर्ट कामावर जायला निघत म्हणाला, “मी येईपर्यंत पैसे वापरायला सुरूवात करू नका.
मला वाटते, हे पैसे तुम्हाला आधाशी बनवतील.
तुम्ही आम्हालाही ओळख दाखवणार नाही.”
मिसेस व्हाईट त्यावर हंसल्या.
त्यांनी दाराशी जाऊन त्याला निरोप दिला.
त्यांना नवऱ्याच्या भोळसटपणाचं हंसू येत होतं.
तरीही दरवाजा वाजला तेव्हा घाईने जाऊन पोस्टमनने काय आणलंय ते पहायला त्या धांवल्याच आणि तें शिंप्याचं बिल आहे हे पाहून सार्जंट मेजरच्या थापांवर त्यांनी टीकाही केली.
त्या म्हणाल्या, “परत आल्यावर हर्बर्ट आणखीच चेष्टा करेल.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “ते खरं पण तो पंजा माझ्या हातात नक्कीच वळवळला, हे मी शपथेवर सांगेन.”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “तसं वाटलं तुम्हाला.”

एवढ्यांत मिसेस व्हाईट यांच लक्ष बाहेरून येणाऱ्या गृहस्थावर गेलं.
त्या व्यवस्थित कपड्यातला माणसाचा संबंध त्यांचं मन दोनशे पौंडाशी जोडू लागलं.
तो माणूस तीनदां फाटकापाशी आत यावं की न यावं ह्या विचारात घुटमळल्यासारखा वाटला.
शेवटी तो आत दरवाजाकडे आलाच.
मिसेस व्हाईटनी आपला ॲप्रन काढला व खुर्चीच्या गादीखाली टाकला.
मग त्यानी दार उघडलं.
तो परका माणूस अस्वस्थ दिसत होता.
मिसेस व्हाईट घरांतल्या पसाऱ्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत होत्या पण तो काय सांगतोय ते ऐकायला कोणत्याही वयस्क स्त्री प्रमाणे त्या उत्सुक होत्या.
तो बराच वेळ गप्पच होता.
शेवटी म्हणाला, “मला आपल्याला भेटायला सांगण्यात आलं…..मी मॅथ्यू आणि मिगिन्स कडून आलोय.”
मिसेस व्हाईट गडबडल्या, “कां ? काय झालं ? हर्बर्ट ठीक आहे ना ?”
मिस्टर व्हाईट त्यांना शांत करत म्हणाले, “तर्क करू नकोस. मला खात्री आहे, हे कांही वाईट बातमी घेऊन नाही आलेले.
नाही ना हो ?”
पाहुणा म्हणाला, “माफ करा पण…”
मिसेस व्हाईटनी विचारलं, “त्याला दुखापत झालीय कां ?”
तो परका माणूस म्हणाला, “हो ! खूप मोठी दुखापत पण आता त्याला कांही वेदना होणार नाहीत.”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “धन्यवाद, देवा.”
पण पुढच्या क्षणी त्या शब्दांचा दुसरा भयानक अर्थ ध्यानात येऊन दुःखाने व्याकुळ होऊन त्यांनी त्या माणसाकडे पाहिलं.
त्याने मान हलवली.

मिसेस व्हाईटनी मिस्टर व्हाईटचा आधार घेतला.
थोडा वेळ शांततेत गेला.
मग तो परका गृहस्थ हलकेच म्हणाला, “तो मशिनरीमधें सांपडला.”
मिस्टर व्हाईटनी तेच शब्द पुन्हां स्वत:शीच म्हटले, “मशीनरीत सांपडला.”
त्यांनी पत्नीचं सांत्वन करण्यासाठी तिचे हात दाबले, चाळीस वर्षांपूर्वी तिच्यावर नुकतंच प्रेम करू लागले होते तेव्हां दाबत असत, तसे.
मग त्या इसमाला म्हणाले, “तो आमचा एकुलता एक मुलगा होता. कठीण आहे.”
तो परका गृहस्थ त्यांच्याकडे पहायचं टाळत म्हणाला, “मला कंपनीतर्फे तुमचं सांत्वन करायला पाठवलं आहे.
कंपनी तुमच्या दुःखात सहभागी आहे.
मी फक्त नोकर आहे.
कंपनीने सांगितलय तें सांगतोय.”
कोणीही त्याला उत्तर दिलं नाही.
मिसेस व्हाईट यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता.
श्वासही ऐकू येत नव्हता.
मिस्टर व्हाईटना वाटत होतं की सार्जंट मेजरच्या सांगण्यातील सत्त्य इच्छापूर्तीच्या आधीच ऐकतोय की काय ?
तो गृहस्थ म्हणाला, “मॅथ्यू आणि मिगिन्स अपघाताची कोणतीही कायदेशीर जबाबदारी घेत नाही आहेत पण तुमच्या मुलाच्या आतापर्यंतच्या नोकरीबद्दल तुम्हाला मदत म्हणून एक रक्कम देऊ इच्छितात.”
मिस्टर व्हाईटनी पत्नीचा हात सोडला आणि मनांत भिती दाटून येत असतांनाच कसंबसं विचारलं ?
“किती रक्कम ?”
तो गृहस्थ म्हणाला, “दोनशे पौंड”.
पत्नीची किंचाळी कानांवर येण्याआधीच मिस्टर व्हाईट शुध्द हरपून जमीनीवर कोसळले.

गांवाबाहेरच्या नव्या दफनभूमीत मुलाच्या शवाचं दफन करून म्हातारा-म्हातारी घरी आले.
सर्व फारच झटपट घडलं होतं. प्रथम ते इतके सुन्न होते की त्यांना हे दुःख हलकं करणारं काहीं तरी घडेल अशी अपेक्षा वाटत होती.

मग हळूहळू अपेक्षेची जागा खिन्नतेने आणि खिन्नतेची निराशेने घेतली.
त्या दोघांना आता बोलायलाही विषय उरला नव्हता.
एका आठवड्यानंतर मिस्टर व्हाईटना रात्री जाग आली.
मिसेस व्हाईट खिडकीजवळ उभ्या राहून हुंदके देत होत्या.
त्यांनी पत्नीला हाक मारली व हळुवारपणे म्हणाले, “झोप बघू जागेवर.”
त्या परत आल्या.

मिस्टर व्हाईट परत झोपेच्या आधीन होणार तोंच मिसेस व्हाईट एकाएकी मोठ्याने ओरडल्या, “माकडाचा पंजा, माकडाचा पंजा”.
त्या उठल्या व म्हणाल्या, “कुठे आहे तो ? मला हवा आहे.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “खाली आहे. कां ?”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “तुमच्या लक्षांत कसं नाही आलं ?”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “काय ?”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “अजून दोन इच्छा मागायच्या बाकी आहेत.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “एक मागितली ते पुरे नाही कां झालं ?”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “नाही. चला, आता खाली चला.
आपण अजून एक इच्छा मागूया.
आपला मुलगा परत जिवंत मागूया.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “अरे देवा ! तु वेडी तर नाही झालीयस?”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “घेऊन या तो पंजा आणि मागा इच्छा…. माझा हर्बर्ट !”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “तू काय म्हणतेयस तें तुला कळत नाही !”
मिसेस व्हाईट म्हणाल्या, “आपली पहिली इच्छा पूर्ण झाली. दुसरी कां नाही होणार ?”
मिस्टर व्हाईट चांचरत म्हणाले, “तो योगायोग होता.”
मिसेस व्हाईटनी हातांनी धरून त्यांना जिन्याकडे ढकलले, “जा आणि घेऊन या तो पंजा”.
मिस्टर व्हाईट अंधारात चाचपडत खाली गेले.
त्या छोट्या टेबलावरून तो जादुई पंजा घेऊन वर आले.
तो वर आणतांना त्यांच्या मनांत एक अनामिक भिती दाटून आली.
इच्छापूर्तीचा काय परिणाम होईल ?
छिन्न भिन्न शरीर घेऊन हर्बर्ट परत येईल ? कशा अवस्थेत येईल?
ते पंजा घेऊन वर आले.
मिसेस व्हाईटचा चेहराही पांढरा झाला होता.
मिस्टर व्हाईटना पुन्हां भीती वाटू लागली.
मिसेस व्हाईट ओरडल्या, “इच्छा मागा त्याच्याकडे.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “हे योग्य नाही.”
मिसेस व्हाईट पुन्हा ओरडल्या, “मागा इच्छा”.
मिस्टर व्हाईटनी उजव्या हातात तो पंजा उभा धरला व ते म्हणाले, “मी इच्छा करतो की माझा मुलगा पुन्हां जिवंत व्हावा.”
तो जादुई पंजा त्यांच्या हातून गळून पडला आणि ते थकून खुर्चीत बसले.
मिसेस व्हाईट बाहेर पहाण्यासाठी खिडकीकडे गेल्या.
मिस्टर व्हाईट तिथेच बसून राहिले.
हातांतल्या मेणबत्तीच्या प्रकाशांत खोलीतल्या वस्तुंच्या भेवडावणाऱ्या सांवल्या नाचत होत्या.
मधूनमधून ते खिडकीशी उभ्या असलेल्या पत्नीकडे पहात होते.
मेणबत्ती पूर्ण जळून विझली.
कांही वेळाने निराश झालेल्या मिसेस व्हाईट परत येऊन झोंपल्या.
जादुई वस्तुचा कांही प्रभाव दिसला नाही म्हणून मिस्टर व्हाईटनी सुटकेचा श्वास सोडला.
दोघेही बोलत नव्हते पण जागे होते.
जरा कुठे ‘खुट्ट’ झालं की दोघांचे कान टवकारले जात होते.
काड्यापेटीतील काडी ओढून मिस्टर व्हाईट मेणबत्ती आणण्यासाठी खाली जाऊ लागले.
पेटलेली काडी शेवटच्या पायरीवर संपली.
ते दुसरी काडी घासून पेटवायला थांबले आणि हळू आवाजांत दारावर थाप ऐकू आली.
त्यांच्या हातून काड्यापेटी पडली, काड्या पसरल्या.
ते स्तब्ध उभे होते आणि पुन्हा दारावर थाप पडल्याचा आवाज आला.
ते घाबरून वर आपल्या खोलीत परत आले व त्यांनी दार लावून घेतले.
दरवाजावरच्या तिसऱ्या थापेचा आवाज सर्व घरभर घुमला.

मिसेस व्हाईट ओरडल्या, “कसला आवाज आहे ?”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “उंदीर गेला खाली.”
पण मिसेस व्हाईट बिछान्यात उठून बसल्या.
दारावरील थाप आता स्पष्ट ऐकू आली.
मिसेस व्हाईट ओरडल्या, “नक्कीच हर्बर्ट परत आला. हर्बर्ट.”
त्या दाराकडे धावल्या.
वाटेत मिस्टर व्हाईटनी त्यांना धरले, “काय करायला चाललीस ?”
त्या म्हणाल्या, “माझा मुलगा परत आलाय.
माझ्या लक्षांत नव्हतं.
दफनभूमी इथून दोन मैल दूर आहे.
मी त्याला दार उघडते.”
मिस्टर व्हाईट म्हणाले, “बाहेर जे कांही असेल त्याला आंत घेऊ नकोस. मेहरबानी कर.”
त्या म्हणाल्या, “स्वत:च्या मुलाला घाबरतां ? हर्बर्ट मी आलेच.”
दरवाजावर आणखी एक थाप पडली.
मिसेस व्हाईट नवऱ्याला ढकलून खाली धांवल्या.
ते हताशपणे जिन्यावर उभे राहिले.

दरवाजाच्या कड्या काढण्याचा आवाज आला.
मागून मिसेस व्हाईटचा रडका सूर आला, “ह्या वरच्या बोल्टला माझा हात पोहोचत नाही. या ना काढायला.”
पण तिचा नवरा वरच्या मजल्यावरच गुडघ्यांवर रांगत काळोखात जमिनीवर कांही शोधू लागला.
बाहेर जे कांही आलं होतं ते घरांत यायच्या आधी तो पंजा मिळायला हवा होता.
आता दरवाजावरच्या थापांचा आवाज सतत आणि जोराने येऊ लागला होता.
मिस्टर व्हाईटना पत्नीने खुर्ची दरवाजाकडे ओढून नेल्याचा आवाज आला.
मग बोल्ट खाली सरकवल्याचाही आवाज आला.
तेवढ्यातच तो पंजा त्यांच्या हाती लागला आणि त्यांनी त्यांची तिसरी व शेवटची इच्छा मागितली.
दारावरच्या थापांचा आवाज अचानक बंद झाला.
खुर्ची बाजूला ओढण्याचा व दरवाजा उघडल्याचाही आवाज त्यांनी ऐकला.
थंडगार वाऱ्याचा झोत घरात शिरला.
पत्नीने दुःखाने व निराशेने फोडलेला हंबरडा त्यांनी ऐकला व त्यांची हिंमत वाढली.
ते धावत तिच्याजवळ गेले.
बाहेर गेटपर्यंत व दूर रस्त्यावर त्यांनी नजर टाकली पण रस्त्यावरील दिव्यांच्या प्रकाशात त्यांना रस्ता सुध्दा पूर्ण रिकामा दिसला.

— अरविंद खानोलकर.

मूळ कथा – द मंकीज पॉ

मूळ लेखक – डब्ल्यू. डब्ल्यू. जेकबज्


तळटीपः जेकबज् हा त्याच्या काळांत विनोदी प्रहसन म्हणजे फार्स लिहिण्यासाठी खूप प्रसिध्द होता. तो अधूनमधून भय कथा लिहित असे. आजही तो “मंकीज पॉ” ह्या भयकथेसाठीच प्रसिध्द आहे. माणूस एखादी इच्छा करतो पण ती पूर्ण झाली तर परिणाम काय होतील याचा विचार करत नाही. ही कथा सुपरनॕचरल प्रकारांत मोडते. त्याने बऱ्याच कादंबऱ्या व लघुकथा लिहिल्या. त्यापैकी कांहीवर चित्रपटही आले. मंकीज पॉ ह्या कथेवर चित्रपट, नाटक, टीव्ही, इ. सर्व माध्यमांतून अनेक आविष्कार आले. मूळ इंग्रजी कथा ३८००हून अधिक शब्दांत लिहिलेली आहे. मी तिचं मराठी रूपांतर साधारण २३०० शब्दांत केलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..