साडे अकरा वाजता मेसरूम मध्ये लंच करायला गेलो तर फक्त मी, ज्याला रिलीव्ह करणार होतो तो सेकंड इंजिनियर,इलेक्ट्रिकल ऑफिसर आणि ट्रेनी असे चौघेच जेवायला होतो. कॅप्टन आणि चीफ इंजिनियर सकाळी हेवी ब्रेकफास्ट करतात म्हणून दुपारी जेवत नाहीत असं ट्रेनी बोलला. पण बाकीचे इंडोनेशियन कुठं आहेत, कोणीच कसे जेवायला नाहीत असा विचार जेवता जेवता मनात आला. तेवढ्यात लाऊड स्पीकर वर अल्ला हो अकबर अल्लाह अशा आवाजात आजान सुरु झाली. इंडोनेशियातील जहाजावर पहिल्यांदाच आल्याने या गोष्टीची कल्पना नव्हती. जहाजावर मुस्लिम क्रु साठी एक प्रेअर रूम आणि ख्रिश्चनां साठी एक लहान चर्च रूम होती. आजान सुरु होऊन संपली पण तोपर्यंत असं वाटलं की मोहल्ल्यात आहोत की काय आपण. सगळे इंडोनेशियन एकामागोमाग एक प्रेअर रूम मध्ये गेले आणि नमाज पठण झाल्यावर मेस रूम मध्ये जेवायला आले. या जहाजावर येण्यापूर्वी सगळ्या जहाजावर एकूण एक अधिकारी आणि खलाशी भारतीय असायचे. भारताच्या लक्षद्वीप बेटांपैकी एक असलेल्या मिनीकॉय आयलंड वरील कमीत कमी चार जण आणि ईतर मिळून पाच सहा जण मुस्लिम असायचेच. तीन चार जण ख्रिश्चन सुद्धा असायचे पण कुठल्याही जहाजावर चर्च, मंदिर किंवा मशीद नसायची. आमचे जहाज इंडोनेशियाच्याच हद्दीत राहणार असल्याने आणि जवळपास पन्नास एक इंडोनेशियन जहाजावर असल्याने त्यांच्यासाठी प्रेयर रूम आणि लाऊड स्पीकरची सोय केली गेली होती.
जकार्ता एअरपोर्ट, क्रु चेंज आणि इव्हन हॉटेल मध्ये पण प्रेयर रूम बघितल्याचं आठवायला लागले.
सेकंड इंजिनियर म्हणून जॉईन झाल्यावर आता क्रु मॅनेजमेंट आणि जॉब प्लॅनिंग करायची होती. चीफ इंजिनियर वयाने आणि अनुभवाने खूप मोठा होता पण पुढील सात दिवसांनी तो सुद्धा घरी जाऊन त्याच्या जागी दुसरा चीफ इंजिनियर येणार होता. जुनियर इंजिनियर्स आणि क्रु सगळेच इंडोनेशियन होते. फक्त इलेक्ट्रिकल ऑफिसर म्हणजे बत्ती साब आणि ट्रेनी इलेक्ट्रिकल ऑफिसर हे भारतीय होते. कॅप्टन सुद्धा भारतीय होता पण आमच्या कामाशी त्याचा फारसा संबंध नव्हता. फक्त ऑफिशियल वर्क किंवा इंजिन आणि मशिनरी मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर त्याला कळवायला लागायचे मग तो पुढे ऑफिस किंवा संबंधित लोकांशी संपर्क करायचा अर्थातच चीफ इंजिनियर त्याला सांगून मला तशा सूचना करायचा.
आम्ही सगळेच भारतीय आपापसात हिंदीत बोलायचो तर इंडोनेशियन त्यांच्या भाषेत. पण इंडोनेशियन खलाशी आणि अधिकाऱ्यांशी बोलताना इंग्रजीतून बोलावे लागायचे. चीफ इंजिनियर मागील पंधरा वर्ष याच जहाजावर येत असल्याने त्याला इंडोनेशियन भाषा बऱ्यापैकी बोलता सुद्धा येत होती.
दुपारी तीन वाजता चहा प्यायला कॅप्टन आणि चीफ खाली इंजिन कंट्रोल रूम मध्ये आले. दुधाचा टेट्रा पॅक रिकामा असल्याने कॅप्टन ने एका मोटोरमन ला बोलावले आणि ब्रिन्ग सुसु फ्रॉम स्टोअर असे सांगितले.
इंडोनेशियन भाषेत दुधाला सुसु असा शब्द आहे. हळू हळू एका एका इंडोनेशियन शब्दाचा अर्थ समजणार होता. पाण्याला एअर, आणि हवेला आंगीन,गरम ला पन्हास, हळू हळू ला हाती हाती, नवीन ला बारू.
एखादी वस्तू खराब झाली असेल किंवा त्यात प्रॉब्लेम असेल तर तिचा मसाला झालाय. त्यामुळे कुठे काही झाले की इंडोनेशियन येऊन सांगायचे बिग मसाला.
मुंबईहून येताना बॉस ने सूचना देऊनच पाठवले होते, की इंडोनेशियन लोकांच्या जास्त मागे लागू नकोस, शक्य तेवढे गोड बोलून कामं करवून घेत जा. त्यांच्या प्रेअर असतात त्यासाठी अडवत नको जाऊस, ते लोकं धार्मिक बाबतीत लुडबुड सहन करत नाहीत. चीफ इंजिनियर आणि कॅप्टन ने सुद्धा जहाजावर तसेच सांगितले.
आमच्या जहाजात स्टोअर होत असलेले क्रूड ऑइल महिन्यातून दोन किंवा तीन वेळा कार्गो ऑपरेशन द्वारे म्हणजेच पम्प करून समुद्रातून गेलेल्या पाईप लाईन द्वारे पाचशे मिटर अंतरावर येऊन उभ्या राहिलेल्या जहाजात ट्रान्सफर केला जात असतो, मग ते जहाज ऑइल रिफायनरी पर्यंत वाहून नेण्याचे काम करत असे. नवीन चीफ इंजिनियर जॉईन झाल्यावर चार दिवसानी कार्गो ऑपरेशन सुरु असताना एका मोठ्या पाईप मधून ज्यातून कुलिंग सी वॉटर समुद्रात सोडले जाते तिथून लीक सुरु झाले, सुरवातीला थेंब थेंब पाणी यायला लागले नंतर धार लागली आणि काही वेळातच जोरात पिचकारी बाहेर पडू लागली पण काही वेळातच कार्गो ऑपेरेशन संपलं आणि ती सिस्टीम बंद करुन त्याला लागणाऱ्या कुलिंग वॉटरचा पम्प बंद केला. एक फूट व्यासाचा लोखंडी पाईप आणि तोसुद्धा इंग्रजी एस आकारात आणि खूप उंचावर. जवळपास पाचशे किलो वजन असलेला पाईप दुरुस्त करण्यासाठी खालून उभं राहण्याकरिता पाईप आणि फळ्यांच्या साहाय्याने स्टेजिंग बनवली. त्या पाईप च्या खाली इतरही लहान लहान पाईप असल्याने त्याला खोलून वर्कशॉप मध्ये आणायला खूप अवघड होते.
फिटर आणि इतर सगळ्यांना पाईप खोलण्यासाठी पंधरा फूट उंचीवर उभं राहायचे होते, प्रत्येकाला सेफ्टी बेल्ट घालून काम करायला सांगितले. सेफ्टी बेल्ट घातल्यावर त्याची दोरी आणि हुक अशा ठिकाणी अडकवायला लागतो की तोल जाऊन खाली पडणाऱ्या व्यक्तीचे वजन हुक अडकवलेली जागा त्या व्यक्तीचे वजन तोलू शकेल. एका खलाशाने त्याचा हुक एका प्लास्टिक पी व्ही सी पाईपला अडकवला. मी आणि चीफ इंजिनियर दोघेही खालून बघत होतो, माझ्याकडे बघून चीफ इंजिनियरने डोक्याला हात लावला आणि बोलला हे बघ असं असत यांचे स्वतः खाली पडतील आणि डोकं फोडून घेतील नाहीतर हातपाय मोडून घेतील आणि आपल्या डोक्याला ताप करतील. यांना एकटं सोडून आणि भरवसा ठेऊन काम नको करत जाऊ हे काही आपले भारतीय खलाशी नाहीयेत न सांगता कामं करणारे. पाईप खोलून दुरुस्त करण्यापलीकडे असल्याने नवीन पाईप बनवायला लागला त्याकामात सहा दिवस गेले अडचणीच्या जागेत असूनही तो पाईप बसवला आणि ट्रायल घेऊन बघितली, सगळं काही ठीक आहे बघून चीफ इंजिनियर जामच खुश झाला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना दिवसभर सुट्टी दिली.
पण खरोखरच इंडोनेशियन सोबत कामं करताना सतत सोबत राहावे लागायचे कारण बहुतेक वेळा त्यांना इंग्रजीतून सांगितलेले कळलेलच नसायचे. समजल का विचारल्यावर हो म्हणून माना डोलवायचे, साधी साधी कामं करायला पाठवून नंतर बघायला गेल्यावर डोक्याला हात लावायची वेळ यायची की कुठल्या कुठे याला काम सांगितले.
इंडोनेशियन लोकांना काही विचारले किंवा सांगितल्यावर उत्तर देताना प्रत्येक शब्दाच्या शेवटी ला बोलायचे. जसे की त्यांना विचारले की तू हे काम करशील का तर बोलणार यस आय विल डूला. सगळं ठीक आहे ना विचारल्यावर बोलणार ऑल ओकेला. डोन्ट वरीला, आय एम गोईंगला. कधी कधी मला पण त्यांच्याबद्दल वाटायचं च्याआयला.
कितीही महत्वाचे काम असले तरी त्यांच्या नमाज पठणाची वेळ झाली की ते काम थांबवून जातात असं ऐकलं होतं पण मला तसा अनुभव कोणाकडूनच आला नाही. उलट कॉफी ब्रेक किंवा जेवणाची वेळ होतं आली की मीच त्यांना त्यांच्या भाषेत बोलायचो, मकान डुलु,मकान डुलु म्हणजे जेवायला चला जेवायला चला.
© प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनियर,
B. E. (Mech ), DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply