१९८० चा जानेवारी महिना ! स्थानिक वर्तमानपत्रात वाचलं म्हणून मी आणि माझा मित्र राठोड याने आपापल्या कविता औदुंबराच्या साहित्य संमेलनासाठी (काव्यस्पर्धेसाठी) पाठविल्या. एक दिवस पोस्टकार्डवर स्पर्धेचा निर्णय आम्हांला कळविण्यात आला. बक्षीस मिळाले नसले तरीही काव्यवाचनाचे निमंत्रण होते.
दरवर्षी १५ जानेवारीला कवी सुधांशु “सदानंद साहित्य मंडळाच्या” वतीने एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करीत असत. (त्यांच्या पश्चात अजूनही ते सुरु आहे. आत्ता आत्तापर्यंत आम्हांला त्याचे निमंत्रण यायचे. हल्ली येत नाही.) पहिला वहिला काव्य सादरीकरणाचा अनुभव घ्यावा म्हणून आणि संक्रांतीची वालचंदला सुटी असल्याने मी ,राठोड ,सुधीर देशपांडे औदुंबरला गेलो. कविता सादर केल्या.
त्यावर्षी कु. राजलक्ष्मी नाईक हिला प्रथम आणि तिची मैत्रीण कु. अंजली फडके हिला दुसरे तर (त्यावेळी आकाशवाणी सांगलीवर निवेदक म्हणून काम करणारे उद्घोषक) श्री बंडा जोशी यांना तिसरे पारितोषिक मिळाले होते.
१५ मे १९८३ साली कु. राजलक्ष्मी भगवान नाईक ही सौ. राजलक्ष्मी नितीन देशपांडे बनून माझ्या आयुष्यात आली. म्हणून आम्हां उभयतांसाठी हे संमेलन आणि व्यासपीठ जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून राहिले आहे. त्यानंतर इस्लामपूरला असताना आम्ही नियमित या संमेलनात जात असू.
१९९१ साली अचानक रात्री कवी सुधांशुचे पत्र घेऊन संयोजक आमच्या घरी आले. मी कवी-संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारावे अशी त्यांत इच्छा व्यक्त केली होती. तोपर्यंत सुधांशु आमच्या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य झाले होते. माझ्या पत्नीला ते मुलगी मानत आणि तिच्या पहिल्या -वहिल्या “झंकार” या काव्यसंग्रहाला त्यांची सुरम्य प्रस्तावना होती. ( १९९२ साली माझ्या सासूबाईंच्या ” तुलसीदल” या नांवाने प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहालाही त्यांचीच प्रस्तावना होती आणि इस्लामपूरला सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्याच हस्ते झाले होते.)
मी होकार दिला. माझ्यासाठी तो बहुमान होता -कृष्णाकाठाने समोर ठेवलेला! मी संमेलनाला गेलो. त्यावर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते – प्रख्यात समाजवादी विचारवंत मा. नानासाहेब गोरे !
आज सकाळी मी आणि माझ्या पत्नीने या घटनेला(आमच्या पहिल्या भेटीच्या)आता किती वर्षे झालीत याचा सहज हिशेब केला.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply