चित्रपटाच्या पांढऱ्या पडद्यावर दिसणारे सगळे खरे आणि म्हणून भावनांना अपील करणारे असते या वयातून मी गेलोय.
” समाज को बदल डालो ” नामक जेमिनीपट भुसावळच्या पांडुरंग टॉकीज मध्ये लागला होता, त्याच्या टायटलने मी थरारून गेलो होतो. समाजाला बदलून टाकण्याची असोशी माझ्यात तेव्हा का होती, कल्पना नाही. आणि रफीच्या आवाजातील ” समाज को बदल डालो ” हे गाणं रेडिओ वर लागलं की मस्त मुठी वगैरे वळायच्या. आता हसू येतं. सुदैवाने(?) हा चित्रपट मी बघितला नाही.
खामगावला “नया जमाना ” बघितला- धर्मेंद्र -हेमावाला !
“कितने दिन आँखे यू तरसेंगी ” वर आशेचे हिंदोळे सुरु करत ” नया जमाना आयेगा ” म्हणत लता उद्याचं चित्र दाखवत होती. तसं अजूनही काही झालं नाही.
” सांस भी कभी बहू थी ” हाही असाच नावावरून फसवा चित्रपट असावा. मी बघितला नाही पण गल्लीत चालणाऱ्या सासू-सुनांच्या भांडणांवर यात काही खरमरीत उतारा असावा असं खूप वाटून गेलं. पुन्हा ओम फस्स ! अजूनही सासू-सुनांमधून आडवा विस्तव जात नाही.
“रोटी कपडा और मकान ” सारखे सामाजिक नांव देऊन मनोजरावांनी स्वतःची “रोटी ” भाजून घेतली तेव्हा आम्ही नुकतीच पौगंडावस्था ओलांडली होती , पण फसणे तेच !
माझा मित्र म्हणाला होता- ” अरे, एकच प्याला जुनं झालं पण कोणी दारू पिणं सोडलं का?”
सगळंच मेक बिलिव्ह !
पण साहिर “बर्निंग ट्रेन ” मध्ये सांगून गेला –
” अपना तो ये इमान हैं
जो भी जितना साथ दे,
एहसान हैं ! “
तेव्हा डोळ्यांसमोर भक्क जाळ उमटून गेला.
आणि काल सकाळचं ” ललकार ” मधलं –
” आज गालो मुस्कुरालो, मैफिले सजालो
ना जाने कल कोई साथी छूट जाये
जीवन की डोर बडी कमजोर !! “
गेल्या महिन्याभरात या ओळी दोन-तीनदा खऱ्या ठरल्या आहेत.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply