नवीन लेखन...

रंगभूषाकार कृष्णाकाका बोरकर

कृष्णा बोरकर यांचा जन्म १९३३ साली गोव्यातील बोरी या गावात झाला. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. पोर्तुगीज राजवटीत काही कुटूंबानी गोवा सोडले. त्याचबरोबर बोरकर कुटूंबानेही गोवा सोडले . त्यांनी तिथून तिथून स्थलांतर केले आणि बोरकर रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिंचखरी गावी आले. कृष्णकाका लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आई त्यांच्या बहिणीला घेऊन मुंबईत आली. तो १९३८-३९ चा काळ होता. मुबंईत आल्यावर सिद्धिविनायक मंदिराजवळील कलकत्तावाला चाळीत राहात होते. सुरुवातीला काही दिवस त्यांची रवानगी त्यांचे मुंबईतच राहणारे चुलतकाका , ज्योतिषी बोरकर यांच्याकडे झाली. पण नंतर पुन्हा ते कलकत्तावाला चाळीतच आईपाशी राहायला आले. त्यांच्या घराशेजारी नाटकासाठी पडदे रंगविण्याचे काम करणारे पांडुरंग हुले राहात होते. ते त्यांच्याकडे जाऊन बसायचे . ते कसे काम करतात ते पाहायचे .

त्यांची आवड लक्षात घेऊन ते कृष्णाकाकांना घेऊन एक दिवस दामोदर हॉलमध्ये एका नाटकाला गेले. तिथे नाटकासाठी हुले सांगतील तसे त्यांनी काम केले. त्या कामाचा मोबदला म्हणून त्यांना आठ आणे मिळाले. त्यांच्या दृष्टीने ते खुप मोठे होते. त्यांच्याबरोबर काम करत असतानाच त्यांना नाटकाबद्दल आवड निर्माण झाली. यातून ‘सूडाची प्रतिज्ञा’ या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकासाठी त्यांना स्वतंत्रपणे रंगभूषा करायची संधी मिळाली. तेव्हा ते ११ वर्षांचे होते . पण स्वतंत्रपणे काम करण्याचा तो अनुभव त्यांना खूप काही शिकवून गेला , ते अधिकाधिक या क्षेत्राकडे ओढले गेले . पुढे काही वर्षे भुलेश्वर येथे विविध प्रकारचे ड्रेस भाडय़ाने देणाऱ्या एका दुकानात त्यांनी काम केले. तिथे तेव्हा असलेले हे एकमात्र मराठी माणसाचे दुकान होते. महाराष्ट्र नाटक कंपनीचे वेषभूषाकार कमलाकर टिपणीस यांच्यामुळे एका चित्रपटासाठीही रंगभूषेचे काम केले.

कृष्णा बोरकर यांच्या आजवरच्या प्रवासात व्ही. शांताराम, राजकमल स्टुडिओ, ज्येष्ठ रंगभूषाकार बाबा वर्दम यांचेही महत्त्वाचे स्थान आहे. एकदा ‘राजकमल’चे मुख्य रंगभूषाकार बाबा वर्दम आलेले नसताना बोरकर यांनी ‘राजकमल’मधील ज्येष्ठ अभिनेते बाबुराव पेंढारकर यांची रंगभूषा केली. शांताराम बापू यांनी ठीक आहे, अशा शब्दात पावती दिली आणि नंतर चक्क स्वत:ची रंगभूषा बोरकर यांना करायला सांगितली. पुढे ‘राजकमल’मध्येच साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काही काळ त्यांनी नोकरी केली. ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ ‘मौसी’ आदी चित्रपटांसाठी त्यांना साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. काही वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘राजकमल’ सोडायचे ठरविले आणि ते शांताराम बापूना भेटायला गेले. ‘नोकरी सोडून चालला आहेस. आता कुठेही साहाय्यक रंगभूषाकार म्हणून काम करू नकोस. उत्तम काम कर आणि काही अडले, गरज लागली तर पुन्हा ‘राजकमल’मध्ये ये’, अशा शब्दांत शांताराम बापू यांनी पाठीवर थाप मारून प्रोत्साहन दिल्याची आठवण बोरकर यांनी मनाच्या कोपऱ्यात अद्यापही जपून ठेवली आहे. ‘राजकमल’चीच निर्मिती असलेल्या केशवराव दाते दिग्दर्शित ‘शिवसंभव’ या नाटकासाठी प्रमुख रंगभूषाकार म्हणून काम केले.दूरचित्रवाहिन्या व चित्रपटाच्या पडद्यावर किंवा नाटकात प्रेक्षकांना कलाकारांचा जो चेहरा पाहायला मिळतो तो त्याच्या मूळ चेहऱ्यापेक्षा कितीतरी वेगळा असतो. तो जसा आहे त्यापेक्षा वेगळा किंवा त्या भूमिकेची गरज म्हणून जसा आवश्यक आहे तसा दाखविला जातो. प्रेक्षकांना रंग लावलेले कलाकार पाहायला मिळतात पण त्यामागे असणारे हात आणि चेहरा अपवाद वगळता फारसा लोकांसमोर येत नाही. ते हात आणि चेहरा दुर्लक्षितच राहतो.

“गुड बाय डॉक्‍टर’ या नाटकातील रंगभूषेसाठी त्यांना “नाट्यदर्पण’चा “मॅन ऑफ दि इयर’ हा पुरस्कार मिळाला होता. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार त्यांना मिळाला होता. राज्य सरकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेबरोबरच अनेक संस्थांनी त्यांना गौरवले होते. वयाच्या अकराव्या वर्षी बोरकर यांच्या “सूडाची प्रतिज्ञा’ या कामगार रंगभूमीवर सादर झालेल्या नाटकापासून कारकिर्दीला सुरुवात झाली होती . राजकमल निर्मित व केशवराव दाते दिग्दर्शित “शिवसंभव’ या नाटकासाठी ते प्रमुख रंगभूषाकार होते. त्यानंतर पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित “पृथ्वी गोल आहे’ या व्यावसायिक नाटकात त्यांनी स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून काम केले . हे बोरकर यांचे स्वतंत्र रंगभूषाकार म्हणून पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर प्रभाकर पणशीकर व मोहन वाघ यांच्यासमवेत त्यांनी ‘नाटय़संपदा’मध्ये काम केले. कृष्णा बोरकर यांनी ‘ चंद्रलेखा ’च्या ‘गारंबीचा बापू’पासून ‘चंद्रलेखा’मध्ये ‘रंगभूषाकार’ म्हणून अनेक वर्षे काम केले. ‘चंद्रलेखा’च्या ‘गरुडझेप’, ‘स्वामी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘रमले मी’, ‘दीपस्तंभ’ ‘गगनभेदी’ ‘रणांगण’ आदी नाटकांसाठी बोरकर हेच रंगभूषाकार होते. ‘रणांगण’ नाटकातील १७ कलाकार आणि ६५ प्रकारच्या रंगभूषा करण्याचे आव्हानही त्यांनी लीलया पेलले. ‘रंगशारदा’ ‘श्री रंगशारदा’ या नाटय़संस्थांमधूनही त्यांनी रंगभूषाकार म्हणून काम केले. केशवराव दाते, बाबुराव पेंढारकर, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, वसंत शिंदे , मधुकर तोरडमल, डॉ. काशिनाथ घाणेकर, यशवंत दत्त आणि अन्य दिग्गज कलाकारांची रंगभूषा बोरकर यांनी केली आहे.

रंगभूषा म्हणजे नेमके काय? असे विचारले असता बोरकर म्हणाले, रंगभूषा म्हणजे केवळ चेहऱ्याला रंग लावणे नाही. सुंदर दिसणे म्हणजेही रंगभूषा नाही. तर नाटकाच्या संहितेप्रमाणे , त्या भूमिकेची गरज असेल त्यानुसार त्या कलाकाराचा चेहरा तयार करणे म्हणजे खरी रंगभूषा आहे. ‘गुड बाय डॉक्टर’ या नाटकात मधुकर तोरडमल यांना केलेल्या रंगभूषेची विशेष चर्चा झाली. कृष्णाकाकांच्या आजवरच्या रंगभूषाकार कारकीर्दीतील ती एक वेगळी रंगभूषा ठरली. या नाटकासाठी त्यांना रंगभूषेसाठी ‘नाटय़दर्पण’चा ‘मॅन ऑफ दी इयर’ हा पुरस्कार मिळाला होता. ‘ सुख पाहता ’ या नाटकात अभिनेते यशवंत दत्त यांना त्यांनी सहा वेगवेगळ्या भूमिकेसाठी रंगभूषा केली होती. अभिनेते सुधीर दळवी हे ‘साईबाबा’ म्हणून प्रसिद्ध झाले. त्या चित्रपटासाठी सुधीर दळवी यांना सुरुवातीला ट्रायलसाठी कृष्णांनाकाकानीच रंगभूषा केली होती. रंगभूषाकाराने नाटय़संहितेचे वाचन आणि अभ्यास केला पाहिजे. लेखकाने ती व्यक्तिरेखा कशी मांडली आहे त्यावर विचार करून त्या भूमिकेला अनुरूप अशी रंगभूषा करणे आवश्यक आहे. त्याने तालमीला उपस्थित राहून स्वत:चा म्हणून काही विचार केला पाहिजे.

कृष्णाकाका बोरकर यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद यांच्यासह अन्य विविध संस्थानीही बोरकर यांचा सन्मान केला . पत्नी कल्पना, तीन पुत्र, सुना आणि नातवंडे असा बोरकर यांचा परिवार आहे. आजवरच्या कृष्णकाकांनी आयुष्यात प्रामाणिकपणा कधीही सोडला नाही. खोटे बोलायचे नाही हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. मिळेल ते काम मग ते छोटे असो किंवा मोठे नेहमीच जीव ओतून केले. आयुष्यात पैशांच्या मागे कधी लागायचे नाही, हे तत्व शेवटपर्यंत पाळले होते. गगनभेदी , गरुडझेप , गारंबीचा बापू , गुडबाय डॉक्टर , दीपस्तंभ , दो आँखे बारा हाथ (चित्रपट) , नवरंग (चित्रपट) , पृथ्वी गोल आहे , मौसी (चित्रपट) , रमले मी , रणांगण : या नाटकातील १७ कलावंतांना ६५ प्रकारच्या रंगभूषा कराव्या लागल्या , शिवसंभव , सूडाची प्रतिज्ञा , स्वामी , हे बंध रेशमाचे या आणि अशा नाटकाच्या रंगभूषा केल्या. आपले संपूर्ण आयुष्य रंगभूषेसाठी वाहून घेणाऱ्या बोरकरांनी अलिकडील काही काळात वयोपरत्वे रंगभूषेच्या कामातून निवृत्ती घेतली होती. परंतु, कामातून निवृत्ती घेतली असली तरी, मुंबई विद्यापीठाच्या ‘अ‍ॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या अभ्यासक्रमात ते ‘रंगभूषा’ या विषय प्रात्यक्षिकासह काहीकाळ मार्गदर्शन करत होते.

कृष्णा काकांनी मधुकर तोरडमल यांचा ‘ गुड बाय डॉक्टर ‘ मधील मेकअप अंगावर काटा आणणारा होता. ते जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा ते बऱ्याच आठवणी सांगत. ठाण्यात जेव्हा नाट्यसंमेलन झाले तेव्हा तेथे असलेल्या माझ्या ‘स्वाक्षरी प्रदर्शनाला’ ‘कृष्णाकाका’ आवर्जून आले होते.

अशा आमच्या कृष्णाकाकानी १५ मे २०१७ रोजी या पृथ्वीच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..