नवीन लेखन...

मला भावलेले सेंटजॉन

हॅलिफॅक्सहून चार तासाच्या प्रवासानंतर आम्ही सेंटजॉनला पोहोचलो. कॅनडातील प्रवास म्हणजे सुंदर निसर्ग सौंदर्याची मेजवाणीच ! स्वच्छ, सुंदर रस्ते आणि रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार वनराई, दूरवर कुठे तरी पर्वत वजा टेकड्यांच्या रांगा, त्यांच्या माथ्यावर गोठलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि त्यावर पडणाऱ्या सुर्य किरणांचे परावर्तन होऊन निर्माण होणाऱ्या विविध रंगी छटा…..सारेच कसे विलोभनिय, आनंद देणारे नि मनाला भुरळ घालणारे ! प्रवासाचे चार तास केंव्हा निघून गेले समजलेच नाही. दुपारी तीनच्या सुमारास आम्ही सेंट जॉनला येऊन पोहोचलो. ठरल्याप्रमाणे एका हॉटेलसमोर आमची कार थांबली. अतुलच्या (जावईबापू) महाराष्ट्रीय मित्रांनी तिथेच आमचे स्वागत केले. आम्ही येणार असल्याचे त्यांना आधीच कळविले होते. अनोळखी प्रदेशात मराठी माणसं भेटल्याचा आनंद कांही वेगळाच असतो. एकमेकांचा परिचय करून घेतला नि दुपारच्या भोजणासाठी आम्ही हॉटेलमध्ये गेलो.

कॅनडाच्या न्युब्रुन्सविक राज्यातील सेंट जॉन हे प्राचीन, ऐतिहासिक व सांस्कृतिक शहर. आकाराने लहान; परंतु पाचुच्या बेटासारखे सुंदर! रस्त्यावर ना माणसांची गर्दी; ना गाड्यांचा गोंगाट. रुंद, स्वच्छ नि सुंदर रस्ते. त्याच्या दुतर्फा उंच व रंगरंगोटी केलेल्या निटनेटक्या इमारती. फुटपाथवरून क्वचितच चालत जाणारी माणसं, पण रस्त्यावरून अविश्रांत संथगतीने धावणाऱ्या गाड्या……सारेच कसे शांत नि शिस्तबद्ध!‘आम्ही स्वप्नांच्या दुनियेत तर नाही ना’, असा प्रथम दर्शनीच भास झाला.

याच अनोळखी शहरात जावईबापूंची नोकरी होती. आठवड्यातून सुटीचे दोन दिवस ते हॅलिफॅक्सला जायचे. हॉटेलमध्ये दुपारचे भोजन आटोपून आम्ही फ्लॅटवर आलो. कंपनीतील त्यांच्या आनखी कांही भारतीय मित्रांची तिथे भेट झाली. त्यांच्याशी गप्पागोष्टी झाल्यानंतर आम्ही कांहीवेळ विश्रांती घेतली. आता आठवडाभर इथेच आमचा मुक्काम होता.

उन्हाळ्यात संध्याकाळी साडेआठ-नऊ नंतरच इथे सुर्यास्त होतो. फेरफटका मारण्याच्या निमित्ताने सहाच्या सुमारास आम्ही घराबाहेर पडलो. सेंटजॉन नदीच्या काठावर शहर वसले आहे. त्यामुळेच शहराचे नावही सेंटजॉन पडले असावे. शहर आणि परिसरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. आम्ही सर्वप्रथम हारबर पॅसेजवर गेलो. नदी व सागराच्या संगमावरचं हे ठिकाण. सुरवातीलाच हरणासारख्या दिसणाऱ्या मुस प्राण्याच्या ब्रांझच्या पुतळ्याने आमचे लक्ष वेधून घेतले. उत्तर अमेरिका खंडातील हा एक महत्वाचा प्राणी !

समुद्र किनाऱ्याच्या काठावरील हॉलिडे इन एक्सप्रेस हॉटेलपासून हारबर पॅसेजला सुरवात होते. आम्ही फेरफटका मारण्यासाठी त्यावर पाय टाकला नि डाव्या बाजुला असलेल्या फंडीच्या उपसागराची किमया पाहून थक्कच झालो. सेंट जॉन नदी इथेच समुद्राला येऊन मिळते. सागरातील गमती-जमती नि निसर्ग सौंदर्याचा पर्यटकांना आनंद लुटता यावा यासाठीच हारबर पॅसेज बनविण्यात आला असावा.

वेळ संध्याकाळची होती, परंतु अजूनही सुर्य किरणानी समुद्राच्या पृष्ठभागावर सोनेंरी झालर पांघरली होती.  त्यामुळे समुद्राचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. हे विलोभनीय दृश्य पहाण्यात मन रमून गेले,  त्यामुळे गारठा शरीराला झोंबला तरी मनाला एक आगळी उबारी मिळत होती. एकिकडे विस्तीर्ण पसरलेला सागर तर दुसरीकडे सुंदर व टुमदार इमारती …..! एकिकडे निसर्गाची किमया तर, दुसरीकडे मानवाच्या बुध्दी कौशल्यातून अवतरलेली वास्तूकला! दोघांची एकमेकावर मात करण्यासाठी चाललेली स्पर्धाच जणू! मनाच्या एकाग्रतेने नजरेच्या दुर्बिणीतून अंतकरणाच्या कप्यात हे दृश्य साठवून ठेवण्याचा प्रयत्न करीत होतो, तोच अचानक सूर्य ढगाआड लपला. आकाश ढगानी गच्च भरून आले नि सुर्यास्ताआधीच धरतीवर काळाकुट्ट अंधार पसरला. पावसाचे मोठमोठाले थेंब टप्प-टप्प समुद्राच्या पाण्यावर पडू लागले. त्यामुळे पाण्यात निर्माण होणारी सुंदर वलये मन मोहित करू लागली. वारा  शांत होता. त्यामुळे समुद्रात लाटांच तांडव नव्हतं. अधून-मधून एखाद-दुसरी लाट संथ गतीने यायची नि किनाऱ्याच्या मगरमिठीत लुप्त व्हायची. लाटाचा पाठशिवणीचा हा खेळ पहाण्यात आम्ही रमून गेलो.

नुकताच कुठे हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरवात झाली होती; परंतु आम्हा नवख्या प्रवाशांना गारठून टाकणारी थंडी अद्यापही वातावरणातून गेली नव्हती. हारबर पॅसेजवर लोकांची वर्दळही कमी नव्हती. अंगभर लोकरीचे कपडे घातलेले लोक गरम कॉफीचे घुटके घेत समुद्राच्या किनाऱ्यावर गमतीने फिरत होते. नवविवाहित गोरी जोडपी हातात हात घालून बेदिक्कतपणे फेरफटका मारीत होती. त्यांचा इंग्रजीतील संवाद आमच्या डोकीवरून जायचा. इंग्रजीचा शिक्षक असूनही त्यांच्या उच्चाराचे अलगद आकलन होण्यासारखे नव्हते. पण आम्हा अनोळखी माणसांशी सुद्धा “हाऽय, हॅलोऽ’ करणारे त्यांचे शब्द न कळत आमच्या मनात आदर भाव निर्माण करीत. या नवख्या वातावरणाशी आम्ही नवखे पर्यटक एकरूप झालो नि त्यांच्या लाघवी बोलण्याने त्यांचे केंव्हा झालो समजलेच नाही.

शहराची माहिती व इतिहास सांगणाऱ्या पाट्या ठिकठिकाणी लावल्या होत्या. त्यावर लिहिलेली माहिती वाचून ज्ञानात भर पडत होती. सुंदर नि स्वच्छ वाटेवरून गप्पा-गोष्टी करीत जाणारे नवखे लोक….त्यांची इंग्रजी बोलण्याची पद्धत, निर्भिड पण मनमोकळा स्वभाव माझ्या मनाला भावला. कधीच न पाहिलेलं सातासमुद्रापलिकडचं आगळ विश्व निरिखून जाणून घेण्यात वेळ केंव्हा निघून गेला समजलेच नाही.

समुद्रात धक्याशेजारी एक मोठे जहाज हवेत धूर सोडीत उभे होते. दूर अंतरावर आनखी एक जहाज बंदराकडे येताना दिसत होते. दुसऱ्या बाजुला किनाऱ्या लगत छोट्या-छोट्या होड्यांची रांग लागली होती. एखाद-दुसरी होडी पर्यटकांना घेऊन समुद्रात फेरफटका मारीत होती. नदी नि समुद्र एकरूप झाल्याने नदीचे पात्र कोणते आणि समुद्राला कुठून सुरूवात होते …. समजतच नव्हते.

वाढत्या संध्याकाळबरोबरच लोकांची वर्दळही वाढतच होती. बंदराशेजारी कॅनडाचा राष्ट्रीय ध्वज दिमाखात फडकत होता. लावण्यवतीच्या खोप्यात तुरा शोभावा असे छोटे परंतु सुंदर लाईट हाऊस किनाऱ्यावरच उभे होते. हॅलिफॅक्समधील पेगीच्या खाडीवरील लाईट हाऊस या आधिच पाहिले होते. त्यामुळे त्याच्या कार्याची माहिती ज्ञात होतीच. त्याच्या विरुद्ध बाजुला रस्त्यापलिकडे असलेल्या उंच व भव्य इमारती मन वेधून घेत होत्या. एका बाजुला खुल्या उपहारगृहात खवय्यांची गर्दी दाटली होती. बंदर परिसरात फेरफटका मारण्यास येणारे लोक गरम अल्पोपहार व कॉफीचा आस्वाद घेत होते. समुद्रावरून वाहत येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे शरीराला थंडी झोंबत होती. त्यामुळे कॉफीचे घुटके घेत फिरण्यातली मजा कांही औरच होती.

हारबर पॅसेजवरील एका पाटीवरील बंदराची माहिती वाचली. न्यु ब्रुन्सवीकच्या फंडी उपसागराच्या किनारपट्टीवरील हे नैसर्गिक बंदर. याचे क्षेत्र 45 हेक्टर (110 एकर) आहे. सॅम्युअल डी चांप्लेन 1604 मध्ये नव्या जगाच्या शोधार्थ समुद्र प्रवासाला निघाला नि सर्वप्रथम त्याने या बंदराचा शोध लावला. पुढे हेच बंदर विकसित झाले नि इथून मालाची ने-आण सुरू झाली. मुख्य बंदराच्या शेजारीच “कोर्टनी बे’ येथे जहाज बांधनी उद्योगही प्रगत झाला आहे. अति वेगाने जाणारे प्रसिद्ध ‘मार्को पोलो'(1851) जहाज येथेच तयार करण्यात आले आहे. पहिल्या महायुध्द काळात या बंदराला मोठे महत्व प्राप्त झाले होते.

* सीटी मार्केट

सेंट जॉनचं सिटी मार्केट पर्यटकांच आकर्षण असल्याचं आम्ही ऐकलं होतं. मुख्य रस्त्याच्या बाजुलाच असलेल्या एका भव्य इमारतीत आम्ही प्रवेश केला नि तिथलं दृश्य पाहून थक्कच झालो. प्राचीन इनडोअर मार्केट म्हणून त्याची ख्याती आहे. मार्केटच्या इमारतीला बाहेरून अद्यापही प्राचीन वास्तुकलेचं रूप आहे. मात्र आतील भागाला आधुनिकतेचा मुलामा दिला आहे. आपल्या मार्केटप्रमाणे तिथे ना गडबड, ना गोंधळ, ना गोंगाट!सगळ कसं शांत नि सुस्थितीत. ना मागामागी, ना सौदेबाजी ! आपणास हवी ती वस्तु घ्यायची नि सोबतच्या गुडस्कार्टमध्ये ठेवायची. व्यापारी नि ग्राहकांमध्ये तितकाच प्रामाणिकपणा ! मालाचा दर्जा उत्तम…. खराब मालाच्या विक्रीला इथे वाव नाही. त्यामुळे फसवाफसवीचा प्रकार ऐकायलाही मिळत नाही.

स्थानिक हस्तकला वस्तूपासून ते विविध खाद्य पदार्थांपर्यंत मानवी जीवनाला आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी इथे आकर्षकपणे मांडल्या होत्या. त्यांची खरेदी करण्यापेक्षा त्यांची आकर्षक मांडणी, तिथली स्वच्छता आणि निटनेटकेपणा पहातच रहावा असा! हॅलिफॅक्समधील विविध मॉल मी आधीच पाहिले होते. परंतु मॉल संस्कृतीपेक्षाही इथे कांहीसं वेगळेपण जाणवत होतं. इथल्या मार्केटला आधुनिकतेची झालर तर होतीच, शिवाय प्राचीन इतिहास आणि संस्कृतीचं त्याला वलय होतं.

भाजीपाला, फळे, मासे, मांस, धान्याचे प्रकार, मुलांसाठीच्या खेळण्या, सौंदर्य प्रसाधने, किराणा व स्टेशनरी साहित्य, मोबाईल, संगणक, दागिने, लहानमोठी यंत्रे, भांडी, तयार कपडे, शालोपयोगी वस्तू, क्रीडा साहित्य….. सारं एकाच संकुलात उपलब्ध होतं. वैविधता, गुणात्मकता, स्वादिष्टपणा नि विश्वासार्हता ही या मार्केटची वैशिष्ट्ये !

वस्तुंच्या प्रदर्शनाबरोबरच वैविविध्यपूर्ण सांस्कृतिक दर्शनही येथे घडले. ग्राहकांमध्ये गोरे इंग्रज व फ्रेंच तर मोठ्या संख्येने होतेच शिवाय चीनी व भारतीय ग्राहकही निश्चितच नगन्य नव्हते. फ्रेंच व इंग्रज नवीन वसाहत निर्माण करण्यासाठी इथे आले. इथल्या मूळ (रेड इंडियन) रहीवाशांशी त्यांनी संघर्ष केला नि ते इथेच स्थाईक झाले. त्यानीच प्राचीन काळी स्थापन केलेल्या बाजारपेठेचे अस्तित्व आजही कायम आहे. त्याचं प्राचिन स्वरूप जाऊन त्याला आधूनिक रूप मिळालं इतकच.

चार मजली या इमारतीतील व्यापारी दालनं पहात आम्ही दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडलो. दोन तासाचा अवधी कसा गेला समजलेच नाही. व्यापारी संकुलातून बाहेर पडलो तो समोरच समुद्र! शहराच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत व्यापारी संकुलाची इमारत पसरली आहे. यावरूनच त्याची भव्यता लक्षात येते.

….. मनोहर (बी. बी. देसाई)

बी. बी. देसाई
About बी. बी. देसाई 23 Articles
लेखन : पुनर्वसन कादंबरी, ‘मला भावलेला कॅनडा’ प्रवास वर्णन प्रकाशनाच्या वाटेवर, दैनिक "सकाळ' व "बेळगाव वार्ता'मधून विविध विषयांवर 20 वर्षे लेखन, ज्वाला, जिव्हाळा, अमरदीप दिवाळी अंकातून कथा, लेख व कविता प्रसिद्ध, अमरदीप दिवाळी अंकाचे सात वर्षे संपादक म्हणून कार्य हव्यास : लेखन, वाचन, विविध विषयांवर व्याख्याने, सामाजिक कार्यात सहभाग
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..