आठवणीतील माणसं हे सदर लिहिताना अनेक चेहरे डोळ्यासमोर आले अन रेखाटले गेले पण काल घोडपदेव नाक्यावर लागलेला भाऊ यांचा फलक पाहिला आणि श्याम हुले नावाचं व्यक्तिमत्व अलगद अंत:चक्षूसमोर उभं राहिलं. त्यांच्या स्मृतीगंधाची दरवळ मनात रेंगाळू लागली. काळाच्या ओघात आपण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली पाहतो आणि विसरून जातो. फक्त आजूबाजूच्या आणि रोज च्या जीवनातील व्यक्ती लक्षात राहतात आणि अशा अनेक वल्ली काळाच्या उदरात गडप होऊन जातात. अशीच एक व्यक्ती श्याम हुले मनाला भावलेल्या या व्यक्तीबद्दल लिहावे आणि चार लोकांना सांगावे, अगदी मनापासून वाटले.
रांगोळी किंवा रंगावली आणि भारतीय संस्कृतीचे अतूट समीकरण. कुठल्याही शुभ प्रसंगी रांगोळीला स्थान असतं या कलेने व्यावसायिक रूप धारण केलं नसलं तरी या रांगोळीत नांव कमावलेल्या पैकी श्याम हुले हे एक आपल्या विभागाला लाभलेले स्नेहशील सौहार्द. त्यांचा *जनजागृती* उदघाटन प्रसंगी रांगोळीतून साकारलेला वाघ शिवसेनाप्रमुखांना जागच्या जागी खिळवून ठेवतो. दाताच्या जबड्यात गुलाबाची पाकळीच्या लाल छटेमागील कारण काय….? असं शिवसेनाप्रमुखांनी विचारल्यावर भाऊंनी दिलेले उत्तर ‘वाघ म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे वाघ.जो पर्यंत वाघ शांत आहे तो पर्यंत शांत आहे.पण कोणी आडवा आला तर त्याला फाडून खाल्याशिवाय राहणार नाही.ही लाल छटा म्हणजे रक्त दर्शविते. आजही किती तरी तत्कालीन कार्यकर्त्यांना आठवत असेलच. शिवसेनेला वाघ कोणी दिला असेल तर या भाऊंनी.‘ त्याशिवाय त्यांनी कॅनव्हास पेपरवर बाळासाहेबांचे रेखाटलेले चित्र सर्वश्रुत आहे. त्यामुळे या उत्तम गुणी चित्रकाराचे नांव दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या मुखातून घेतले गेले तेव्हा या माणसाची पत काय होती ते आपल्या लक्षात येईलच. गुणवंत मांजरेकरांच्या रांगोळी प्रदर्शनात भाऊंच्या दोन रांगोळ्या असायच्या. भाऊंच्या पाण्यावर काढलेल्या रांगोळी लक्षवेधी ठरत असत. प्रदर्शनात कमलाकर गोंजीसारख्या प्रतिभावंत रांगोळीकारांच्या सोबतीला रांगोळी हा एक बहुमानच. ही एक अशी कला आहे की, रांगोळीत जमीन आणि बोटं यांचा स्पर्श होत नाही.त्यामुळे ती अस्पर्शित राहिली. शासकीय स्तरावर उदासीनता या अर्थाने अस्पर्शित राहिली त्यामुळे यांचा गौरव कधी झाला नाही.
आम्ही लहान असताना या व्यक्तीला आणि ते रेखाटत असलेल्या कलेल्या अगदी जवळून पाहिले आहे. त्याचा नेत्रसुखद आनंद घेतलेला आहे.पालनजी रतनजी चाळीतून जाता येताना नेहमीच दर्शन घडले. साधा माणूस हातात ब्रश घेऊन आपल्या कलेला तंत्र,मंत्र आणि मर्म यातून प्रत्यक्षात उतरविणारा …. रंग आणि रेषा यांच्या माध्यमातून कला साकार करणारा चित्रकार एक ख्यातकीर्त व्यक्तिमत्व श्याम हुले ( भाऊ) यांच्या रूपातून सहवास लाभणे हे आमचे भाग्य समजतो. त्यांच्या कलेतील तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन थोडेही ढासळू न देता त्यांनी केलेली कल्पनारम्य, उत्कृष्ट प्रतिमा मोहित केल्याशिवाय राहत नव्हती. भाऊ या कलेत इतके रमून गेले की, त्यांना कुणाशी सवडीने बोलायला देखील वेळ मिळत नसे. पण व्यवस्थितपणा आणि व्यावसायिकपणा त्यांना कधी जमलाच नाही. अगदी लोक देतील त्या पैश्यावर कामे केली. सेनेचे काम करताना पैसे कधी मागितले नाही. वाजवून पैसे कधी घेतलेच नाही. कोणी दिले नाही त्याचे दु:ख त्यांनी मानले नाही. मुळात ते मृदुभाषी आणि कमी बोलणारे. कुणावर कधी हुकुमत गाजविणे किंवा अधिकारवाणीने बोलण्याची सवय कधी जडून दिली नाही.त्याला ते तरी काय करणार….!
शिवसेना स्थापन झाली तेव्हा आपल्या विभागात काही मोजून कार्यकर्ते होते. तेव्हा स्थानिक सत्ताधारी आणि त्यांच्या गुंडासमोर उघडपणे काम करण्याची कुणाची हिम्मत नव्हती. त्याकाळी श्याम हुले,दत्ता घाग, दत्ता चव्हाण ( पालनजी रतनजी चाळ ) , शिवसेनेचा ढाल म्हणून संबोधले गेलेले संभा घाडगे ( वाणी चाळ,), गोविंद शिंदे ( बुवाची चाळ ) गंगाराम साळुंके ( खोजा चाळ ) अनंत मारणे ( मारुती माळी चाळ ) अन्य काही मंडळींनी सेनेची बीजे ह्या घोडपदेव सभोवतालच्या परिसरात रोवली. ही नांव आजच्या पिढीला माहित नसतीलच. ह्या छान्दिष्टांच्या मळ्यातून एकेक मोती जोडले गेले. ते आजतागायत गुंफण्याचे काम आजची पिढी करते असं आपण समजू. आता मोती मिळत नाहीत. मोत्यांनी माळेत गुंफून घेण्याऐवजी कुणाच्या तरी करंगळीत शोभिवंत म्हणून जगणे पसंत केले आहे.
तत्कालीन नगरसेवक विजय लोके यांनी अनेकांच्या जीवनगौरवार्थ महापालिकेत सर्वाधिक नामकरण प्रस्ताव मंजूर केले होते. पण पाट्यांचे अनावरण केले नव्हते.महापालिकेने पाट्या लावल्या पण त्या काळाच्या ओघात गडप झाल्या. घोडपदेव नाक्यावर कै.बाबुराव मेटकरी चौक असाच तिष्ठत आहे. त्यांची साधी पाटी देखील आजतागायत लावलेली नाही. असंच श्याम हुले चौक विषयी घडले. मला श्याम हुले चौक विषयी झालेल्या राजकारणात पडायचे नाही. एखादा फलक पाहिला की,आम्ही श्याम आर्टची ती बारीक अक्षरे शोधीत असायचो. कारण ती वळणदार अक्षरातून त्या त्या पेंटरची प्रतिमा दिसून येत होती. आज त्या वळणदार सुंदर अक्षरांचा जमाना गेला पण खंत अशी की,श्यामभाऊ पेंटरच्या निमुळत्या बोटातून साकारलेला अविष्कार आज पाहायला मिळत नाही. काही म्हणा त्या काळात गुंफलेल्या माळेतील गडप झालेल्या या मोत्याविषयी आम्हाला आजही आदर आहे.
*अशोक भेके*
Leave a Reply