नवीन लेखन...

मला भावलेला युरोप – भाग ३

फ्रान्समधील पॅरिस आणि इटलीतील रोम ही दोन शहरे अप्रतिम अशी कलेचे माहेरघरं आहेत हे मात्र नाकारता येणार नाहीच.दोन्ही देशांना मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय इतिहासाची पार्श्वभूमी आहे.पॅरिस शहराला म्युझियम्सचे शहर म्हणतात असा मी पूर्वी उल्लेख केलेला आहेच. राजेशाही अस्तित्वात असणाऱ्या फ्रान्समधील, राजे मात्र कलेचे भोक्ते होते. त्यांना कलेची उत्तम जाण होती आणि ते कलेचा सन्मानही करत असत.

उत्कृष्ट कलादालनं बघण्याचा योग या टूरमध्ये आला.व्हर्साईल पॅलेस नि लहूरे म्युझियम.ही दोन्हीही प्रचंड मोठी तर आहेतच, पण अक्षरशः डोळे दिपवणारी कलाकृती मग ती पेंटिंग्जच्या, मोठ्या मोठ्या पुतळ्यांच्या किंवा शिल्पाच्या स्वरूपात असोत, ती अगदी उत्तम पध्दतीने जतन करून ठेवली आहेत. खरे तर ही दोन्हीही ठिकाणे चार एक दिवसांत अभ्यासून पूर्ण होणारी नाहीतच. पर्यटना साठी गेलेल्या आपल्यासारख्यांना वेळेचे बंधन असते. जास्त दिवस थांबणे केवळ अशक्य.पण धावती भेट घेऊनही आपण त्यांचे कलेच्या क्षेत्रातील योगदान डोळे विस्फारून बघू लागतो.एक कला या दृष्टिकोनातून बघितले तर भारावून जातो.

दोन्हीही कलादालनं बघताना गाईडचे मार्गदर्शन गरजेचे आहे. आम्हाला गाईड म्हणून लाभलेली एक वीस-बावीस वर्षांची षोडशा अत्यंत खेळकर पद्धतीने निवेदन करत माहिती पुरवत होती.

‌व्हर्साईल पॅलेस

‌फ्रान्सचा राजा पंधरावा लुईस हा अतिशय प्रबळ असा राजा होता. कलासक्त मनाच्या या राजाने कलात्मक पद्धतीने विशाल राजवाडा बांधून त्याला मोठे कलाकेंद्र बनवण्याचे स्वप्न त्यांने बघितले होते.तो आणि त्याच्याबरोबरच नंतरच्या उदयोन्मुख राजांनी पॅलेस निर्माण करण्यात मोठा सहभाग नोंदवला. लुईस ने योग्य ती जागा शोधण्याचे काम करत , राजवाड्याचे डिझाईन बनवून घेतले व कामाला सुरुवात केली होती.

व्हर्साईल पॅलेस म्हणजे आठराव्या शतकातील फ्रेंच आर्किटेक्चर आणि कला यांचा एक अति उत्तम नमुना म्हणता येईल.

या राजवाड्याच्या सभोवती सतराव्या शतकात भौमितिक पध्दतीने रचना करत तयार केलेली मोठी बाग आहे.250 एकर जमिनीवर अतिशय आकर्षक असे गार्डन आणि वेगवेगळे नयनरम्य फाउंटन्स,लॉन्स यांची केलेली रचना आपल्या मनाला आणि डोळ्यांना मोहवून टाकणारी आहे.

पाच छोटे छोटे चॅपल्स म्हणजे छोटे छोटे चर्च हे एक आकर्षणच म्हणता येईल.सुबक खांब आणि संगमरवरी फरशी यांच्या सहाय्याने बनवलेले राजवाड्यातील हे चर्च मन:शांती मिळवून देतात.

मुळात राजवाडा याच हेतूने बांधलेला हा महाल अतिशय देखणा आहे.

या पॅलेस मध्ये एकूण सात मोठे मोठे दालनं आहेत.त्यापैकी सगळ्यात सुंदर आणि महत्वाचं आहे ते म्हणजे प्रचंड मोठा असणारा मिरर हॉल. एक अप्रतिम दालन. तब्बल ३५७ मिरर चा उपयोग करत तयार केलेले हे दालन विविध प्रकारचे आर्च (कमानी)आणि खिडक्या यांच्या साथीने अतिशय सुंदर अशी आकर्षक रचना करून बनवले आहे.आरसे आणि कमानी मोठ्या मोठ्या खिडक्या यांची योजना अशी आहे की, खिडकीबाहेर दिसणारे मोठे मोठे फाउंटन्स व लॉन्स त्यांची प्रतिमा मिररर्स वर पडते आणि त्यांचे परावर्तन संपूर्ण हॉल मध्ये. अतिशय विहंगम दृश्य दिसते दिवसाच्या वेळेला.स्त्री-पुरुष यांचे पुतळे आकर्षक पद्धतीने तयार केलेले आहेत.तसेच मानवी शरीराच्या काही अवयवांचे अप्रतीम शिल्पही आहेत यात.

२१४३ खिडक्या आणि ६७ जीने यांच्या साह्याने हा पॅलेस बनवलेला आहे.१७८९पर्यंत म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती पर्यंत हा पॅलेस सत्तेचे केंद्रस्थान होते. येथूनच राज्यकारभार चालवला जात असे.फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळात व्हर्साईल राजवाड्यातील मधील अनेक कलाकृती संरक्षित करण्यासाठी लहूरे म्युझियम मध्ये हालवण्यात आली होती.

लहूरे म्यूझियम

हे सुद्धा अठराव्या शतकात उदयाला आलेले एक उत्कृष्ट कला दालन.फ्रान्स ला आपली खास ओळख निर्माण करुन देणारे असे आहे.जागतिक पातळीवरचे सर्वात मोठे असे हे कलादालन. यांमधील शिल्प चित्र किंवा पुतळे यांचा व्यवस्थित अभ्यास करावयाचा असेल तर किमान सलग दोन वर्ष द्यावे लागतील एवढे प्रचंड मोठे म्यूझियम आहे हे! ज्यात एकूण ३०,००० कलाकृती आहेत!इ.स. १२०० मध्ये हे बांधले गेले पण इ.स.१६५० मध्ये पुन्हा नव्याने बांधण्यात आले.सुरुवातीला याचा उपयोग राजाच्या वयक्तिक उपभोगासाठी बांधलेली वास्तू असा होता. पण नंतर लोकांना बघण्यासाठी खुली करण्यात आली.इ. स. १७९३ मध्ये पहिले कलादालन (म्युझियम) म्हणून लहूरे म्युझियम प्रचलित झाले.

या म्युझियम मधे प्रवेश घेतानाचे मोठे आकर्षण म्हणजे तेथे असणारे पिरॅमिड्स,ज्यातून आपण प्रवेश घेतो.

पहिला फ्रेंक्लिन आणि पंधरावा लुईस यांनी आणि राहिलेली नेपोलियन यांनी यातील जास्तीत जास्त पेंटिंग्ज खरेदी केलेले आहेत.नंतर ते मूळ मालकाला परतही केले. अतिशय भव्य आणि नितांत सुंदर असे पेंटिंग्ज बघून आपण थक्क होऊन जातो. परिणामकारक रंग संगती वैशिष्ट्य पूर्ण आहेच. वेगवेगळे राजकीय प्रसंग,बायबल मधील ही काही प्रसंग,तसेच मोठी मोठी अशी स्त्री व पुरुष सौंदर्याची रेखीव शिल्प ,पुतळे,प्राणीजन्य पुतळे वगैरे बाबींची खूप सुंदर मांडणी आहे.

जगातले सर्वात सुंदर हास्य असणारी स्त्री, मोनालिसा हिचे लिओनार्दो द व्हींची यांनी काढलेले जगप्रसिद्ध चित्र याच म्युझियम मध्ये आहे. शिवाय वेनस डी मिलो या स्त्री चे सुध्दा प्रसिध्द पेंटिंग येथे आहे.या कलादालनाचे सात उप कलादालनही आहेत.ज्यात प्राचीन इजिप्शियन संस्कृती मधील पुराणवस्तू केंद्र आहे. अती पुर्वेकडची संस्कृती दर्शवणारे दालन आहे. आणि रोमन संस्कृतिला वाहिलेलं दालन ही आहे.सर्व प्रकारच्या शिल्पकलेला वाहिलेलं दालन अप्रतिमच! मोठे मोठे शिल्प पुतळ्यांच्या स्वरूपातही आहेत. त्यातील काही डेकोरेटिव्ह आर्ट तर काही ग्राफिक आर्ट दर्शवणारी आहेत.बरीचशी शिल्प आणि पुतळे हे विवस्त्र अवस्थतील आहेत. यामागचे कारण विचारले असता नैसर्गिक सौंदर्य जसेच्या तसे दाखवण्यावर भर आहे कलाकारांचा तसेच सुयोग्य शारीरिक प्रमाणबद्ध शरीर रचना कशी असावी याचे विवेचन या शिल्पांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले गेले.

खरे म्हणजे आपल्याला चार्-चौघां बरोबर ही शिल्पे बघताना संकोच वाटावा इतपत नैसर्गिक अवस्थेत आहेत ती!
पण एकूणच सर्वच कलाकारांच्या कलेला सलाम करावा अशाच सर्व कलाकृती या म्युझियममध्ये आहेत.

सिलिंग पेंटिंग्ज तर खूपच हटके, अप्रतिम असे एकापेक्षा एक सुंदर!हे सुंदर आर्किटेक्चर बघितल्याने या पेक्षा सुंदर आणखी कुठेही काहीच असू शकत नाही यावर आपण ठाम राहतो. आधुनिक पद्धतीने आणि अतिशय काळजीने ह्या कलाकृति आजही जपून ठेवलेल्या आहेत याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे

नकळतपणे आपण या सर्व सिस्टीम ची तुलना आपल्याशी करतो आणि याबाबतीत आपण किती मागासलेले आहोत या जाणिवेने खट्टू होतो.
पॅरिसला फॅशनची उगमस्थान असेही म्हणतात! जगातली कोणतीही फॅशन पहिल्यांदा सुरू होते ती पॅरिस मधून अशी ख्याती आहे या शहराची.
आमचे पॅरिस मधील सर्वात शेवटचे डेस्टिनेशन म्हणजे मनोरंजनाचा शो. कृत्रिम लाईट्स ने सजवलेला झगमगाटी असा डोळे दिपवून टाकणारा ली लिडो शो हा होय. हा या ठिकाणी १९७७ पासून चालू झाला.शो बघण्यासाठी मात्र ठराविक ड्रेस कोड आहे.पुरुषांना कॅज्यूअल ड्रेस व स्त्रियांना अंगभरुन कपडे असा.
ली लिडो शो बघण्यासाठी आपण ज्या रस्त्यावरून जातो तोच पॅरिसमधला प्रसिध्द Champs elysees असा रस्ता आहे. या रस्त्याचे रात्रीचे सौंदर्य अवर्णनीयच. येथे आले की, शम्मी कपूर वर चित्रित झालेले’ऐसा मौका फिर कहॉं मिलेगा’ हे गाणे ,अॅन इव्हिनिंग इन पॅरिस या सिनेमातले हमखास आठवतेच.

थेटरच्या प्रवेशालाच मोठमोठ्या चकाकणाऱ्या झुंबरांनी आपले स्वागत होते. प्रवेशद्वारा पासूनच चालू झालेला लखलखाट खेळ संपेपर्यंत कायमच असतो. भरपूर वाद्यांच्या संगतीने चालू असणाऱ्या ऑर्केस्ट्राच्या पार्श्वभूमीवर आपण जेवणाचा विविध ‘ पेयां ‘सह आस्वाद घेत असतो.ऑर्केस्ट्रा चालू असताना प्रेक्षकां मधील हौशी जोड्या आपली नृत्याची हौस येथे पूर्ण करतअसतात.हा शो म्हणजे चक्क कॅब्रे डान्सच आहे बऱ्याच नृत्यप्रकारांतून नृत्याचे प्रदर्शन विविध कलाकारां मार्फत केलं जातं. सारेच नृत्यप्रकार खरोखर वाखाणण्यासारखेच आहेत. कलाकारांनी साकारलेलं प्रत्येक नृत्य हे “त्यांनी सादर केलेली एक सुंदर कला” या दृष्टिकोनातूनच आपण हा शो बघितला तर भरपूर आनंद घेऊ शकतो आपण. त्यांच्या कला सादर करण्याच्या या लकबींना अक्षरश: काही तोडच नाही!हे मान्यच करावे लागते पण आपल्याला सवय नसणारे अंगप्रदर्शन बघताना मात्र संकोचायला होते निश्चितच.फ्रेंच लोक त्यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम या दृष्टीने त्याकडे बघतात. पण आपल्याला न झेपणारी अशीच ही संस्कृती होय. अंगप्रदर्शन असले तरीही कुठेही कलाकारांच्या चेहऱ्यावर व्हल्गर भाव नसतात म्हणून ते बघण्याची हिम्मत आपण करू शकतो. अतिशय सुंदर पद्धतीने सजवलेले हे ऑडिटोरियम १२०० प्रेक्षक बसतील एवढे मोठे आहे.स्टेज,त्यावरील नेपथ्य, सरकते स्टेज वगैरे तांत्रिक बाबी क्लासच आहेत! दीड तासाचा हा शो बघून बाहेर जेंव्हा पडतो, तेंव्हा अगदी निश:ब्द व्हायला झालेले असते.एकूणच पॅरिस शहर कलाकारांच्या कोणत्याही कलेचा सन्मान करणारे शहर आहे यावर ठाम विश्वास बसतो.या साऱ्यांच कलांचा आपणही एक कलाकार म्हणून आनंद घेतल्यास नक्कीच मजा येते.

भाग ३ समाप्त.
क्रमश:

– नंदिनी म देशपांडे

Avatar
About नंदिनी मधुकर देशपांडे 18 Articles
ललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला असून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..