युरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही.
सिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, रस्ता निर्मनुष्य असेल तरीही सिग्नल तोडून जाणारा ईसम तुम्हाला अजिबात दिसणार नाही. ग्रीन लाईट येईस्तोवर तो नक्कीच थांबतो.मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, पादचाऱ्यांना तेथे चालताना खूपच सुरक्षित वाटते. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता क्रॉस करताना सिग्नल नसेल तरीही दोन्ही बाजूची वाहतूक अक्षरशः थांबते.पादचाऱ्यांसाठी एवढा रिस्पेक्ट येथेच बघावयास मिळाला.शिवाय पायी चालणारांना घाई असेल तर सिग्नल पोलवर असणारे विशिष्ट बटण प्रेस करुन वाहनांना थांबवण्याची विनंतीही करता येते. एकाच रस्त्यावर एवढे सारे ट्रॅक्स म्हणजे विचार करा किती छान असतील हे रस्ते!
रस्त्यांवर अतिक्रमण, फेरीवाले,मोठे मोठे बॅनर वगैरे गोष्टी तर बादच आहेत तिकडे. वाहतुकीच्या वेळी दोन वाहनांमधील ठराविक आंतर ठेवण्याची पद्धत खूपच कौतुकास्पद. इंचभरही कमी जास्त अंतर दिसणार नाही. पार्किंग काय सुंदर व्यवस्था आहे म्हणून सांगू !कोणतीही गाडी काढावयास कोंडी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत मोठ्या मोठ्या मोकळ्या जागांवर शिस्तीत गाड्या पार्क केलेल्या दिसतात.जणू काही गाड्यांची शेतंच असावीत ती!
अशी सगळी वाहतूक व्यवस्था आहे म्हणूनच की काय, युरोपात छोट्या छोट्या बाळांना त्यांचे आई-बाबा कडेवर घेऊन फिरताना दिसलेच नाहीत कधी. छान छान बाबा गाड्यांमध्ये बसत ही गुबगुबीत गुलाबी बाळं डोळे किलकिले करत टुकूटुकू बघत बाहेर फिरण्याचा आनंद लुटत असतात.
जर्मनीच्या कोलोन शहरातील कॅथॅड्रल ची भेट संपवून आम्ही आता निघालो होतो ते आल्प्स पर्वतांच्या रांगांमधून सफर करत, करत थेट स्विझरलँड या स्वप्न भूमीवर पाऊल ठेवण्यासाठी. प्रचंड दाट अशा उंच उंच झाडांनी व्यापलेल्या ब्लॅक फॉरेस्ट मधून वळणावळणाच्या वाटेने चालू असणारा हा प्रवास, खूपच मोहरून टाकणारा ठरला. या पर्वतांवर जंगलांमध्ये असणारी झाडी एवढी दाट आहे, की झाडाच्या वरच्या शेंट्यांना सुद्धा सूर्यप्रकाश दिसत नाही.म्हणून झाडाच्या पानांचा रंग काळपट हिरवा दिसतो.दुरुन तर तो आपल्याला काळाच वाटतो.म्हणूनच हे ब्लॅक फॉरेस्ट.
जंगलाचे सौंदर्य बघत बघत रस्त्यात द्रुबा या ठिकाणी आम्ही थांबलो. अगदी जुने वाटणारे, पावसाच्या पाण्याच्या माऱ्याला सतत तोंड देत, खंबीरपणे उभे असणारे,जमिनीपासून थोडे उंच असे संपूर्णपणे लाकडात बनवलेले एक घर आम्ही बघितले. हे लाकडीच पण मजबूत घर म्हणजे, स्वित्झर्लंडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ‘कूकु क्लॉक्स ‘ची फॅक्टरी होती ती. लाकडातच बनवलेली पण वेगवेगळ्या आकारांची घड्याळं होती ती. या सर्व घडाळ्यांमध्ये समान असणारा धागा म्हणजे छोटा चिमणीवजा पक्षी.दर तासाला घरट्यातूनतून तोंड बाहेर काढावा तसा बाहेर आपला “कुकू”असा आवाज काढतो.म्हणूनच ही ‘कुकू क्लॉक्स’.अगदी एक करोड पर्यंत किंमती असणारी ही पारंपारिक घड्याळं जगभर निर्यात होतात.
कालानुरूप यांच्या रचनेत बदल ही होत गेलाय पण बनवली जातात आजही लाकडातच.
निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांनी पित पित, मधूनच सोबतीला पावसाची संगत.पर्वत राजीं वरून वाट काढणारे धवल पाण्याबरोबर मंजुळ नाद करणारे असंख्य झरे. हा प्रवास अव्याहत असाच चालूच रहावा संपूच नये कधी असे वाटणारे हे सौंदर्य मन आणि शरीर दोन्ही हलकं हलकं बनवत अंगावर रोमांच उभे करत होता. कुठेही नजर टाकली तरीही ते दृश्य कॅमेरात बंदिस्त करावयास हवेच. असे वाटणारा हा वेड लावणारा निसर्ग.
थोडीशी जरी सपाट जमीन दिसली तरीही, तेथे असणारे झोपडीवजा एखादं दोनच घरं, त्या घरांमधील माणसं कधीच दिसले नाहीत बाहेर तो भाग निराळा.पण अगदी एखादेच घर असेल तरीही पहाडांवर त्या घरात पर्यंत पोचण्यासाठी व्यवस्थित बांधलेला डांबरी रस्ता खूपच कौतुक वाटले या सर्वांचे. कायम अशा संपन्न निसर्गाच्या संगतीने राहणाऱ्या तेथील लोकांचा हेवा वाटला क्षणभर. स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिस कडे नेणाऱ्या या प्रवासामध्ये जाताना हृराईन वॉटरफॉल आहे. हा जर्मनी मधूनही आपल्याला बघता येतो आणि स्विझर्लंड मधूनही. अर्थातच दोन्हींची रुपं वेगवेगळी.नेउह्यूनसेन मधून दिसणारा या वॉटर फॉलचा नजारा, म्हणजे खरोखर वर्णन करावयास शब्द अक्षरश: थिटे पाडणारा….
निसर्गाच्या नानाविध आविष्कारांचा आस्वाद घेत घेत हृराईन नदीवर असणारा हा धबधबा म्हणजे निसर्ग सौंदर्याचा रुद्राविष्कार. तरीही हे दृश्य तेथेच खिळवून ठेवत होते हेही तेवढेच खरे.
धबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी हिरवट निळसर पाण्याने खळखळून वाहणाऱ्या नदीतून आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोटीतून प्रवास केला असे म्हणण्यापेक्षा, या नदीच्या विशाल पात्रातून नदीची अनेकानेक रूपं निरखत निरखत धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोंचलो. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा क्षण. आपल्या मनात एकाच वेळी असंख्य भावनांची मांदियाळी निर्माण करणारा ठरतो.एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच मार्गांवरून पण अतिशय उंचावरून पडतानाचे हे फेसाळलेले शुभ्र असे पाणी खोल खाली पडत असताना त्याच्या भेसूर आवाजामुळे उरात धडकी भरवते.सुरुवातीला निसर्गाच्या या अतिसुंदर रुपाला आपण अगदी जवळून बघत आहोत, या जाणिवेने होणारा आनंद तर रोमांच उठवणारा. त्याच वेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे संपूर्ण वातावरणात सर्व दूरपर्यंत पसरणाऱ्या दवांमुळे अतिशुभ्र रंगाच्या धुक्यातून आपण जात आहोत, हा होणारा भास रोमहर्षकच!या दवांमध्ये न्हाऊन निघण्याचा अनुभव अविस्मरणीय.
धबधब्याच्या रौद्र रूपाचे दर्शन आपण विविध पातळ्यांवरून घेतो ना,तेव्हा आपला हात जर निसटला तर…. या जाणिवेने जीवाचेच पाणी पाणी होते मात्र. अगदी उंच असणाऱ्या सुळक्याच्या एका टोकावरुन ज्यावेळी हा धबधबा आम्ही डोळ्यात साठवत होतो, त्या वेळी खरोखर निसर्गाला साष्टांग दंडवत घालावा असेच वाटले होते. किती अप्रतिम सौंदर्य होते ते!या निसर्गापुढे आपण माणूस म्हणजे अगदीच क:पदार्थ याची प्रचिती आली. नि क्षणभरात मनाला चिकटून बसलेला हा मी गळून गेला…..
निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार, आमच्या डोळ्यात,मनात, आणि स्पर्शातही शक्य तेवढा साठवून घेत आम्ही बोटीने पुन्हा नदीच्या काठावर येऊन पोहोंचलो. आमच्या गाडी बरोबर अतिसुंदर असा झ्यूरिच लेक संथपणे वाहता वाहता गर्द हिरव्या झाडांची हिरवाई, आकाशाची निळाई ,ढगांची धवलाई नि हवेची लहराई सोबत घेऊन वाहात होता.आजुबाजूच्या घरांचे प्रतिबिंब सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या या लेकच्या कडेकडेने आम्ही सायंकाळपर्यंत पोहोंचलो ते ल्यूझर्न या स्वर्गलोकीच्या उंबरठ्यापर्यंत !
भाग ५ समाप्त
क्रमश:
© नंदिनी म. देशपांडे
Leave a Reply