नवीन लेखन...

मला देव दिसला – भाग ३

परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जावून त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. पूजाअर्चा, पौराणीक ज्ञानकथा, देवस्थाने देवालयांच्या भेटी, भजनकिर्तन, नामस्मरण, मन-विचार आणि भावनांची शुध्दता, धार्मिक ग्रंथाचे वाचन, ध्यान साधनेचा सराव, त्या परमात्म्याच्या सगुण वा नंतर निर्गुण दिव्यतेची ओढ हे सारे मार्ग हलवले जात होते. संकल्प व दृढ निश्चयाला विश्वासाने सतत जागृत ठेवीत गेलो. वरील सर्व कार्यप्रणाली ही कर्मकांडाचाच एक भाग होती. हे खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होते. दाही दिशांनी भटकणाऱ्या चंचल मनाला एक दिशेने मार्गस्त करण्याचे प्रयत्न होते. लक्ष  केंद्रीत करण्याचे त्या साधनेमध्ये सामर्थ्य होते. खऱ्या अर्थाने मला नितांत आनंद असिम समाधान व मनाची प्रचंड शांतता लाभली ती ध्यान योगानेच.

बैठक –           माझी ध्यान योग धारणा साधारण अशी होती. एक ठरलेली जागा असे. लहान, स्वच्छ आणि जेथे वर्दळ (अर्थात घरातील) कमी प्रमाणात असेल अशी मऊ आसन व त्यावर रोज धुतलेले धुत वस्त्र आंथरलेले असे. मागे पाठीला आधार म्हणून एक मऊ उशी घेत असे. २० मिनीटे ध्यान धारणा करण्याचा सराव करीत असे. ध्यान रोज दोन वेळा केले जाई. सकाळी उठल्यानंतर व रात्री झोपेपूर्वी. ध्यान बैठक लावण्यापूर्वी शक्य तेवढे शुचिर्भूत अर्थात शरीराने स्वच्छ होवून बसत असे. २० मिनीटांच्या बैठकीसाठी अलार्म लावून घड्याळ ठेवण्याचा सराव प्रथम केला गेला. नंतर सवय होत गेली व शेवटी वेळेचे बंधन गळून पडले. साधी मांडी घालून सहज अशा आसनांत बसत असे. पाठीचा कणा शक्यतो सरळ, त्याला उशीचा आधार होताच. दोन्ही हात समोर व मांडीवर घडी घातलेले असे. मान, दात (जबडे) थोडेसे अलग,जीभ कसलाही स्पर्श रहीत न दाताला, न ओठाला, न गालाला स्पर्श केलेली अर्थात मला जी सुलभ, सहज व सरळ वाटली तीच बैठक मी अंगीकारण गोलो. प्रत्येक साधकाला त्याच्या त्याच्या देहाच्या ठेवणी प्रमाणे, सवयीनुसार तो योग्य अशा बैठकीचा आसन म्हणून उपयोग करू शकतो. नियम हे मार्गदर्शक असले तरी स्वानुभव हेच अंतीम असावे.

संकल्प:   हे ईश्वरी अनुष्ठान आहे. तो कृपा करेल का हे माहित नाही. परंतू त्याची कृपा व्हावी, दया व्हावी ही अपेक्षा करणे म्हणजेच एक विश्वास, श्रध्दा, भक्ती वा प्रेम व्यक्त केल्याप्रमाणे असेल. करू घातलेल्या कार्याच्या यशाबद्दल मनाची ती निश्चितता असेल. If shall be uplift of mind. मिळणाऱ्या आनंदाचे, समाधानाचे व शांततेचे स्वागत करण्याची ती मनाची तयारी असेल. तर करू या तसा संकल्प. हे परमेश्वरा, आई, श्री जगदंबे, परमपूज्य श्री. गुरूदेव सर्वाना प्रणाम

प्रार्थना – १) ऊँ गं गणपतये न महा……

२) सर्व मंगल मंगल शिवे सर्वाथ साधीके शरण्ये गौरी नारायणी नमोस्तुते

३)गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा गुरूर साक्षात परब्रम्ह तस्मैय श्री गुरूर नमह:

तुम्हा सर्वाच्या कृपेची, दयेची व आशिर्वादाची मी अपेक्षा करतो. माझं मन शांत होण्यास मदत करा. माझ ध्यान लागू द्या. चित्त एकाग्र होऊ द्या. मला ईश्वरी सहवासाचा आनंद मिळू द्या. मनाची शांती प्रदान करा.

ऊँ!   ऊँ!   ऊँ!

नेहमीच्या सवयीप्रमाणे मन हे शरीराच्या बाह्यांगामध्ये रममान असते. सभोवताल आणि देहाचा बाह्य स्पर्शेद्रिंय ह्याच्यामध्ये गुंतून असते. त्यामुळे सभोवतालच्या होणाऱ्या हालचाली, त्यांचे आवाज ह्याची जाणीव होत राहते. शरीराला काही भागात, पाठीला, पायाजवळ, मानेजवळ वा इतर ठिकाणी कळ लागते. अवघडल्याप्रमाणे वाटते, बधीरपणा वा मुंग्या आल्याचा भास होतो. काही भागात खाज येते, तेथील  हालचाली जाणवू लागतात. ह्या सर्वाचे कारण चंचल मन त्या त्या अंगाजवळ संपर्क करते व सौम्य वेदनांची (uncomfortable feeling) जाणीव होते. मनाच्या शांत करण्याच्या प्रयत्नामधली ही बाधा असते. आपल्या सहनशिलतेमध्ये मनाच्या निग्रहाने वाढ करणे गरजेचे असते. रोजच्या सवयीने हे हलके साध्य होते. बाहेरच्या मिळत जाणाऱ्या चेतना तुम्ही प्रयत्नाने घालवू शकतात. तुमची बैठक यशस्वी होते. २० मिनीटे वा अर्धातास तुम्ही केलेल्या बैठकीचा संकल्प यशस्वी होवू लागतो. ह्या सर्व वेळेमध्ये तुम्ही स्थिर बसू शकता व तुमची बाह्यांगाची जाणीव कमी होवून जाते. ही तुमची स्थीर बैठकच ध्यानाच्या दिशेने जाण्याचे पहिले पाऊल असते. मनाला तुम्ही एकप्रकारे बाह्यांगातून अंतरंगात घेवून जाण्याचा यशस्वी प्रयोग असतो. मनाचा एक चांगला गुणधर्म म्हणजे मन जरी चंचल असले तरी ते तुमच्या इच्छेला साथ देते, विरोध करीत नसते. तुमच्या ‘मन शांत’ करण्याच्या प्रयत्नाना बाधा करीत नाही.

प्रथम बैठक स्थिर होण्याचा प्रयत्न यशस्वी करणे  नंतर मनाला बाह्यांगातून अंतरंगात नेणे जरूरी असते. मनाला शरीराच्या आतील प्रत्येक इंद्रियाशी समरस करण्याचा प्रयत्न करावा लागेल. ह्याच मार्गाने मन एक एक अवयवाशी एकरूप होत सर्व देहाशी तादाला पावते. मानवी (वा कोणताही सजीव प्राणी) देह ही त्या निसर्गाची वा परमेश्वराची सर्वोत्तम कलाकृती आहे. कल्पनेने आणि आयोजनानी एकदम परिपूर्ण. त्याच्या सांघीक कार्यप्रणालीची माहिती कळताच कुणीही आश्चर्यचकीत व्हावे इतके यात भव्य आणि दिव्य आहे. देहामधले  अनेक अवयव (इंद्रिये) ही कोट्यावधी सेल्सनी बनलेली असतात. सेल्स अतिशय सूक्ष्म व देहाचा सर्वात लहान घटक भाग आहे आणि आश्चर्य म्हणजे जे कार्य संपूर्ण देहाकडून होत असते. तेच आणि तसेच कार्य त्या प्रत्येक सेल्सकडून केले जाते. जसे जगणे, वाढणे,मरणे,नष्ट होणे, उर्जा निर्माण करणे, तिचा उपयोग करणे इत्यादी. देह हा जशा ह्या बाबी पूर्ण करीत जीवन चक्र चालू ठेवतो, त्याच पध्दतीने ती एक स्वतंत्र सेल्स देखील अशीच चक्रमय जीवन जगते. उर्जा निर्माण करणे व जीवन चक्रासाठी देणे हाच प्रमुख जीवन उद्देश.

ध्यान? कुणाचे? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे ह्यासाच ‘ध्यान’ म्हणतात. (objeectess awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीवर पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतू जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत चेतनामय असते, कार्य करीत असते त्यांचे कार्य थांबवणे हे फार कठीण. त्यांचे कार्य हे नैसर्गीक जीवंतपणाचेच लक्षण असते.

‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे असते, तसेच त्या मार्गाने एक शोध घेतला जातो. ज्यांना खऱ्या अर्थाने ध्यान लागते, त्यालाच त्या शोधाचे आकलन होते. येथे अनुभव निराळे, प्रचिती निराळी, फलश्रुती देखील भिन्न असू शकते. फक्त एक मात्र सत्य सर्व साधकांना सारखेच जाणवते आणि तो म्हणजे ‘नितांत आनंद, ब्रम्हानंद (Extary of joy) संपूर्ण शांतता’ आणि ह्याच सत्याचा तो शोध असतो.

‘ध्यान’ म्हणजे काहीही न करणे हे जरी असले, तरी आम्हाला आमच्याच शरीर – मनाच्या प्रक्रीया कराव्याच लागतील. साधनाला साध्याकडे नेण्यासाठी ज्यामुळे आम्हीच आमच्या अंतरंगात अर्थात देहाच्या आत प्रवेश करून अवयवांशी संवाद साधून आणि त्या सूक्ष्म मूळ घटक ज्या भागात सेल्स आहेत त्यांच्या संपर्कामध्ये येवून प्रत्येक विश्लेशनाची एक सूक्ष्म पायरी असते. ज्यावर भव्यदिव्यतेचा डोलरा उभा रहात असतो, त्या मूळ घटकांपर्यत आम्ही जाणीवेच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न ‘ध्यानातून’ करणार आहोत. डोळे मिटून (वा उघडे – हे सवयीनंतर शक्य असते.) ध्यान धारणेच्या आसनस्थ झाल्यावर जाणीव होऊ लागते की तुम्ही शरीराने स्थीर, अचल होत आहात. शरीराच्या अस्तीत्वाची जाणीव कमी कमी होत जाते. फार प्रयत्नानंतर देहहीनतेचा भास होवू लागतो. परंतू हे सारे असत्य आहे. कारण देहहीन झाल्याचा 12 भास ही तुमची कल्पना असते. विचार असतो आणि विचाराचे अस्तीत्व मन चंचल असल्याचे दाखवितो.

आता मनला स्थीर करणे, शांत करणे हा ध्यान धारणेचा प्रमुख गाभा आहे. विचार रहित अवस्था साध्य करणे आहे. कोणतीही कल्पना द्रव्य, समाधान, हालचाली,भावनीक अविष्कार ह्या सर्व बुध्दीच्या विचार प्रणालीत निर्माण झालेल्या असतात. मेंदूचे प्रमुख कार्यच विचार उत्पन्न करणे हे आहे. वासना (वा इच्छा) (Desire) हा देहाचा नैसर्गीक गुणधर्म असतो. जो प्रत्येकाला जन्मता हा मिळालेला असतो. वासना विचारांच्या रूपाने मेंदूत चेतविल्या जातात, त्या उत्पन्न झालेल्या वासना मनावर आरूढ होवून शरीरात पसरण पावतात. त्या इंद्रियामार्फत त्यांचा कार्यभाग साधण्याचा प्रयत्न करतात. हे एक निसर्ग चक्र होते. हा एक जीवन संसार, विचारांची उत्पत्तीमात्र एका नंतर दुसरा विचार, नंतर तिसरा, चौथा ह्या अनुक्रमेतच होत जातो. मन त्यामुळे सतत चंचल अवस्थेत असते.

आम्हास प्रयत्न करून काही काळासाठी विचार रहीत स्थितीत जावयाचे आहे. म्हणजेच विचारांची उत्पती रोकावयाची आहे. प्रथम त्या विचारांचाच आसरा घ्यावा लागेल व नंतर त्यांचा त्याग करावा लागेल. स्थिर आसनस्थ झालेल्या शरीराच्या मनाला प्रथम आकाराच्या पोकळीत स्वैर प्रमाणे फिरू द्या. तुमच्या वैचारीक प्रयत्नाने हे शक्य आहे. ‘एका वेळी एक विचार’ ह्या निसर्गाच्या गुणधर्माचा फायदा घेत चला. रांगेत येणाऱ्या विचारांत इतर विचारांची घुसखोरी थांबवा. त्यांना प्रमुख विचारसरणीत येवू देवू नका. हे शक्य आहे. आकाशाच्या पोकळीत फक्त हवेचे अस्तीत्व असते. त्या हवेशी विचारांनीच एक रूप व्हा. हीच हवा तुमच्या जवळ येत आहे. ती तुमच्या नाकपुड्यातून नाकातून तुमच्या शरीरात प्रवेश करते. ह्याची जाण तुम्हास होते. ती हवा एका मर्यादेपर्यंत आंत गेलीली तुम्हास जाणवते. तीच हवा (अर्थात तीच कार्य करून) काही क्षणानंतर तुमच्याच नाकपुड्यातून शरीराच्या बाहेर जाते. एक भासणारी क्रिया, हवा नाकपुड्यातून शरीरात जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे व नंतर तीचा मार्ग उलटा होवून ती परत शरीराबाहेर जाणे. हे सतत होते. तुम्हास आता फक्त ही एकच क्रिया श्वास घेणे व श्वास सोडणे लक्ष केंद्रीत करावयाची आहे. ही क्रिया देखील तुमच्या विचारांच्या टापूतीलच असणारी आहे. हे विचार रहीत होणे नव्हे. परंतू इतर विचारांना सारून चित्त एक दिशेने एकाग्र करण्याचा हा अपेक्षित मार्ग आहे. ह्याचा प्रथम दरदिवशी सराव करावा लागेल. लक्ष श्वासोश्वासावर केंद्रीत करणे. एका संथ वाहणाऱ्या नदीमध्ये तुम्ही शिरता आहात. तुमची जाण येथपर्यंतच असते हे समजा. आता त्या नदीमधल्या पाण्याशी एकरूप व्हा, प्रवाहाला साथ घ्या. शांतपणे वाहत जा. का जायचे कसे जायचे केव्हा जायचे हे विसरून जा. प्रवाह तुम्हाला त्या विशाल सागरांत घेवून जाईल, तुम्ही कोणताही प्रयत्न न करता, मात्र तुमचा थोडासा प्रयत्न देखील तुमच्या संथ वाहण्याला बाधा आणेल.

आकाशातील हवा, नाकपुड्या जवळ येणे, शरीरात शिरणे येथपर्यंत अस्तित्वाची तुम्हालाच जाणीव होत होती. कारण ती विचारांनी घेरलेली होती. आता पुढचा प्रवास म्हणजे, वाहत जाणे हे निसर्गावर सोडा. आकाशातील पोकळीतील हवेबरोबर प्रथम तुम्ही जाणीवेने शरीरात शिरता परंतू आता ती जाणीव तुम्हास सोडावी लागेल. आता कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका. येथेच तुमची खरी परिक्षा असेल. प्रयत्न तुमचा. निसर्ग नेहमी तुमच्या प्रयत्नाना साथ देत असतो. विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या नाकपुड्यातून आत जाणाऱ्या हवेशी तूम्ही एकरूप व्हा. कोणत्याही विचाराला जवळ येवू देवू नका आणि तुम्ही एका अज्ञात जागेत, वातावरणात, पोकळीत जाल. तुमचा कोणताही प्रयत्न हा विचार असेल व तो तुमच्या यशात बाधा असेल. नदीच्या पाण्याने जसे तुम्हास समुद्राच्या पाण्यात वाहून नेले, त्याचप्रमाणे आकाशाच्या पोकळीतील हवा तुम्हास शरीराच्या एका विशाल दालनांत नेईल. परंतु ही अपेक्षा नसावी ध्येय नसावे वा येथे कल्पकता नसावी, कारण मग तो तुमचा विचार असेल व विचार म्हणजे शेवटी ‘असत्य’ म्हणूनच ठरेल. तुमचे प्रयत्न रहीत, विचाररहीत हवेबरोबर वहात जावून एका विशाल दालनांत शिरल्याची जाणीव होणे म्हणजेच तुमची ध्यान धारणा यशस्वी होत असल्याचे असेल. कोलीडोस्कोपधून बघीतलेली चित्रे जशी सतत बदलत जातात, त्याचे रंग बदलत राहतात, त्यांचा आकार बदलत राहतो तरी प्रत्येक प्रक्षेपण आनंद देणारेच असते. त्याच प्रमाणे ध्यानामधले अनुभव हे बदलणारे, भिन्न भिन्न असलेले असले तरी सर्वातून आनंदाची प्रचंड निर्मिती होत जाते. हा अनुभव त्याचमुळे वर्णन करता येण्यासारखा नसतो. विचाररहीत मनाची स्थिती, काही वेळेसाठी, तुम्ही आपल्या प्रयत्नाने, योगसाधनाने निर्माण करीत आहात. ध्यान धारणा लागते. कोणती प्रक्रीया शरीरसंबधाने घडत जाते हे समजणे मनोरंजक व ज्ञानवर्धक असेल. अर्थात हे फक्त समजण्यासाठी.  हवेबरोबर प्रथम विचाराचा प्रवाह नाकातून शरीरांत प्रवेश करतो. अर्थात या स्थितीपर्यत तुम्ही सतर्क असता. नंतर विचार थांबतात व तुमची फक्त जाणीव शक्ती पुढचा मार्ग आपोआप व सहज सुलभरितीने होत राहतो. तुमचा स्वताचा प्रयत्न ध्यान धारणेमध्ये फक्त  डूबन्याचा असतो. येथपर्यत सिमीत. नंतर मात्र जसा प्रवाह नेईल तशी ‘जाणीव’ पूढे पूढे जात राहते.

हवा नाकांमधून छातीत फूफ्फूसात जाते. निरनिराळ्या नलीकेमधून म्हणजे मोठ्या नलीकेमधून लहान लहान फांद्या बनत जाणाऱ्या नलीकेमध्ये व शेवटी केसनलीका वा त्यापेक्षाही सूक्ष्मनलीकेमध्ये पोहचते. येथे हवेचा संपर्क सूक्ष्म सेल्सचा शरीरामध्ये प्रवाही असलेल्या रक्त पेशी वा सेल्सचा देखील अंतरभाव असतो.            एकदा तुमच्या ‘जाणीव शक्तीचा’ शरीरातील सूक्ष्म सेल्स वा रक्त सेल्स शी संबध आला की त्याच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण शरीरात भ्रमण करतात. संपूर्ण अंतर शरीराची जणू तुम्हास जाणीव होवू लागते. मग ते फूफ्फूस असो, ह्रदय असो, आतड्या असोत. मेंदू असोत वा इतर कोणते इंद्रिय असोत. सर्वांशी तुमचा जाणीव शक्तीच्या रूपाने संपर्क येत जातो.

हे वर्णन फक्त समजण्यासाठी विश्लेशनात्मक पध्दतीने थोडक्यात व्यक्त केले गेले. जाणीवपूर्वक हवेचा प्रवाह प्रथम विचारांच्या माध्यमाने सुरू झालेला असतो. परंतू जेव्हा मन विचाररहीत केले जाते, तेव्हा हवेच्या मार्गाचे आकलन होत नसते. मात्र त्याचा प्रवास चालूच राहतो. नलीकेतून रक्तपेशीपर्यत व पूढे मेंदूपासून थेट नखापर्यत सर्व शरीरभर. ध्यान धारणेमधल्या प्रक्रियेमध्ये ह्या सर्व विचाररहीत प्रवासाची एक प्रकारे जाणीव होत असल्याचे भासते. हे सारे जरी स्पष्ट नसले, निश्चीत नसले, भिन्न भिन्न असले तरी त्यालाच दैवी अनुभव म्हणता येईल. जणू काही देह आणि जीव ह्या दोन्ही एकरूप असलेल्या माध्यमांशी संपर्क साधता आहात. देहांमध्ये शिरता आहांत आणि चेतनारूपी जीवाच्या सानिध्यात येत आहे. देहाचा सेल्सच्या रूपाने प्रत्येक भाग उर्जासंपन्न असतो. त्याची तुम्ही स्वत:च म्हणजे जीव हा जीवाचाच ‘जाणीव शक्ती’ मध्ये एकरूप होण्याचा प्रयत्न होतो. हे सारे तुम्ही प्रयत्नपूर्वक करीत नसतात. पण हे घडू लागते. होवू लागते. तुमची फक्त साथ, संकल्प, विश्वास, श्रध्दा, प्रेम ह्या कार्यचक्राला यशस्वी करते. देहामधल्या सर्व सूक्ष्म वा स्थूल भागांचा संपर्क, त्यांची जाणीव व त्यांच्या चेतनामय स्वरूपाशी एकरूपता एक भव्य-दिव्य अनुभव, आनंद व समाधान यांचा खजीना तुम्हास मिळालेला असतो. न इच्छा, न वासना, न भविष्य, न भूत, न आकार, न रंगरूप असा केवळ अनुभव अवर्णनीय प्रचंड शांती.

मी याचे नामकरण केले नाही व करू इच्छीत नाही. कारण तो अभिमानाला, वासनेला जागे करील. पुन्हा विचारचक्र सुरू होतील. मला एका सत्यमय वातावरणामधून संसारीक अर्थात मिथ्या जगांत नेईल. हे होणारच कारण मला माझ्या अल्प क्षमतेचे व अल्प अशा  वर्तमान काळाची जाणीव आहे. ईश्वर जो जसा असेल, त्याला जाणण्यासाठी मानवी इंद्रिये परीपूर्ण नाहीत. त्यांच्या मर्यादा, झेप,क्षमता ह्या अत्यंत अल्प आहेत. त्यामध्ये तो दिव्यपणा प्राप्त नाही की ज्यामुळे त्या परमात्म्याची, त्याच्या भव्यतेची जाणीव होवू शकेल. जर तो सर्व चराचरामध्ये जीव जंतूमध्ये मानवी देहामध्येही अंश रूपाने असेल तर त्याला आपल्याच अंत:करणात शोधणे वा समजणे योग्य होईल. हा प्रयत्न दिशाहीन खचितच नसेल. ह्याचसाठी “मी कोण आहे?” ह्याचे ज्ञान होणे अत्यंत गरजेचे आहे. त्या मी च्या शोधासाठी अंतरंगात शिरणे हे प्रथम व महत्वाचे पंचेद्रिय हे कोणत्याही गोष्टीबद्दल ज्ञान मिळवतात म्हणजे त्यातील गुणाविषयी समरस होतात, त्याचे रंग, रूप, स्पर्श, रस, गंध इत्यादी समजतात. मग ते भव्य दिव्य असोत वा सूक्ष्म स्थितीमध्ये असोत वस्तूची वा त्या दिव्यतेची जाण येणे हे शेवटी आपल्यावर कसा परिणाम करते ह्यावरच मुख्यता अवलंबून असेल.

ईश्वर भेटला, दिसला वा जाणला गेला हे जर सत्य घडले तर तेव्हाच जेव्हा मनाच्या आनंदाची, शांततेची, समाधानाची अस्सीम बरसात तुमच्यावर होईल. ह्या संसारीक जगांत ज्या ज्या गोष्टीमुळे तुम्हास प्रसन्नता वाटते त्या त्या गोष्टीमध्ये ईश्वराचे अस्तित्व असतेच. त्या अस्तित्वाची जाणीव प्रखरतेने होते. म्हणजेच तुम्ही ईश्वराच्या सानिध्यात जात आहात असे होईल. तेच तुमचे लक्ष साध्य असावे.

जे मिळाले त्याहून आणखी काही असेल का? हा प्रश्न तुमच्या मनी येत राहणे म्हणजेच अशांत, असमाधानी मनाला जागृत ठेवण्यासारखेच होईल. त्याला अंत असणार नाही. जर ईश्वर अनंत, अमर्याद असा असेल, तर तो मनाच्याही कल्पनेच्या बाहेर भव्यता पावलेला असेल. तुम्हास तुमच्या मनाच्या बुध्दीच्या विचाराने त्याला जाणणे शक्यच नाही. हा तुमच्या जाणीवेने त्याचे जे अवलोकन झाले असेल, ज्या नितांत अशा आनंदाचा (Extary of joy) अनुभव आला असेल, तोच समजा. सभोवतालच्या आणि संसारीक जीवनामधल्या सुखमय गोष्टींनी तुम्हास आनंद मिळाला असेल. तुम्ही समाधानी झाला असेल. ह्यापेक्षा जर जास्त आनंद तुम्हास त्या ईश्वरी जाणीवांमुळे झाला असेल तर तेच तुमचे ईश्वरी दर्शन समजा. वाचलेल्या, ऐकलेल्या आणि इतरांच्या त्यांच्या स्वत: अनुभवलेल्या ईश्वरी सगुण दर्शनाची कल्पना वा इच्छा तुम्हास पूर्णपणे सोडून घ्यावी लागेल. कारण ते तसे दर्शन म्हणजे तुमचे इच्छीत, अपेक्षीत दर्शन असेल. कदाचित त्यांनी आनंद व समाधान मिळेलही परंतू त्यात मनाची शांतता नसेल. पुन्हा पुन्हा तेच दर्शन मिळेल ह्याची आस असेल. तेथेच साशंकता निर्माण होईल. आत्मीक समाधान टिकणारे नसेल.

ज्या सगुण ईश्वरी स्वरूपाची कल्पना तुमच्या मनात पक्के घर करून असेल तर कदाचित तसेच तुम्हास दिसू शकते वा जाणवू शकते. भाव तसा देव म्हणतात, त्याप्रमाणे परंतू हा प्रयत्न अपूर्ण असाच ठरणारा असेल. तुम्हास असत्याच्या दालनात नेणारा असेल. तुमचे सगुण ईश्वराबद्दलचे ज्ञान आणि त्याचे इच्छीत दर्शन हेच मग तुमचे ध्येय बनते. ईश्वराला  जाणण्यापेक्षा त्याच्या दिव्यत्वाला अनुभवने, त्याच्याशी काही क्षणासाठी का होईना तादाल होणे, एकरूप होणे हे अंतीम ध्येय असावे. कारण जाणणे ह्यात कल्पनाविलास व ज्ञान ह्याचे योगदान असेल. ती अनश्चीततेबद्दलची जाण असेल. परंतू त्याला अनुभवने हा सत्याचाच शोध असेल. निर्गुण, निराकार आणि दिव्या शक्तीमध्ये मिसळून जाणे. एक नितांत आनंद, कल्पनातील अनुभव जीवनाचे अंतीम सत्य.समोर कुणीच नसते, तरी जणूकाही सर्व असते. त्यापेक्षा जास्त नसते. सर्वत्र केवळ आनंद, समाधान, शांतता. काय हवय तुम्हाला ह्या पेक्षा जास्त. ह्याचाच शोध बोध तुम्ही आपल्या प्रयत्नाने, तपश्चर्येने घेत होतात. मला फक्त त्या शांततेचा शोध होता,वेध होता, तगमग होती. सारे मिळाल्याप्रमाणे भासत होते. संपूर्ण समाधान. हेच जर सगुण रूपाने मला प्राप्त झाले असते. इष्ट देवतेचे दर्शन झाले असते, इच्छीत इश्वरी रूप माझ्या दृष्टीला पडले असते, तर माझ्या आनंदापुढे इच्छेच्या वा वासनांच्या रूपांत अपेक्षा निर्माण झाल्या असत्या. समोरचा दिसणारा भासणारा सगुण ईश्वर हा जरी भव्य दिव्य असला तरी तो माझ्याच स्वरूपाचा असता, मला त्याच्याशी भावनीक संवाद करण्यामध्ये आनंद वाटला असता. एक रूची निर्माण झाली असती. कुणालाही भेटल्यानंतर मग तो संत महात्मा का असेना होणारा संसारीक संवाद ही नैसर्गीक क्रियाच बनते. मला ते टाळता आले नसते. आणि तशा तथाकथित सगुण ईश्वरी दर्शनाची सत्यता प्रश्नाकींत राहीली असती. त्या मिळणाऱ्या आनंदाला समाधानाची साथ  मिळाली नसती.

मला माझ्याच कल्पनेनुसार ध्यान धारणेमध्ये जो ईश्वरी वा दिव्य म्हणा हवे तर अनुभव  आला त्याचे वर्णन करणे, मिळालेल्या आनंदाचे समाधानाचे मोजमाप करणे केवळ अशक्यच ठरणारे असेल. फक्त एक झाले तो अप्रतिम मनाच्या शांततेचा क्षण पुन्हा पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला गेला. मुख्य म्हणजे त्या नितांत आनंद अनुभवाचा, जाणीवेचा पुढे काही वा कोणता प्रवास असू शकेल हा विचारच नष्ट झाला. जे मिळाले, जाणले वा अनुभवले ते अंतीम सत्य आहे. हा विचार दृढ झाला. ह्याहून दुसरे आणखी काही नाही. हेच ते ईश्वरी दर्शन, अंतिम ध्येय, एक नितांत आनंद, समाधान आणि मनाची खरी शांतता. ह्याच विचारात धन्यता पावलो.   कुलस्वामिनी श्री.रेणुका देवी आणि  गुरू जेरे स्वामी यांचे  आभार मानले. त्यांना  साष्टांग दंडवत.

— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..