माझ्या काकांनी मला पाकीस्थानातून भारतात आणले. पण आम्हाला भारतात आश्रय मिळाला नाही. निर्वासित होऊन जगावं लागलं आम्हाला. आपल्याच हक्काच्या मातृभूमीवर निराश्रित झालेल्या माझ्या अनेक बांधवांना मी मरणाचा आश्रय घेताना पाहिलंय. गेली अनेक वर्षे हे वादळ काळजात साठवून जगत आहोत आम्ही. पण आता बस्स…आता बस्स. आता एक घाव दोन तुकडे. (असे म्हणत बंदूक काढतो). (काही क्षण रंगंचावर शांतता… तेवढयात एक माणूस रंगमंचावर येतो)
मोहन – (टाळ्या वाजवीत) वाह नटसम्राट वाह, अप्रतिम, एक्सलेंट, माइंडब्लोइंग… चला राव कॅरेक्टरमधून बाहेर या आता…. मिस्टर परफेक्शनिस्ट…(हसत)
विनायक – (भानावर येत) ओहो… थॅंक्स यार… मी या रोलमध्ये इतका गुंतलो होतो की मला भानच राहिलं नाही.
मोहन – कसं असतं मित्रा, कलाकार एखादी भुमिका करत असताना त्या भुमिकेशी एकरुप असणं गरजेचं असतं, परंतु त्याच क्षणी त्याला हे कळलं पाहिजे की त्याची व्यक्तिगत आयुष्यातली भुमिका वेगळी आहे. नाहीतर त्याचा मनावर परिणाम होतो, याला सरळ साध्या सोप्या भाषेत, वेड लागणं असं म्हणतात.
विनायक – अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी वेडा आहे.
मोहन – छे छे, अगदी तसं नाही काय, पण… म्हणजे हा…. आता हे बघ ना, तुझा नेहमी असा अट्टाहास असतो की लेखनाच्या माध्यमातून समाजावर प्रबोधन करणं किंवा सामाजिक मानसिकता पालटणं वगैरे वगैरे….
विनायक – हो, मग?
मोहन – हे कितपत शक्य आहे, आता हे जे नाटक तु लिहितोयस “निर्वासितांवर अत्याचार” कदाचित हे सत्य असेलही..
विनायक – कदाचित नाही सत्यच आहे ते.
मोहन – हा.. ठीक आहे, पण ह्याची गरज काय? आणि कोण ऎकणार तुझं?
विनायक – ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली तेव्हा त्यांनी असा विचार केला नव्हता की माझी ज्ञानेश्वरी कोण वाचेल? समर्थ रामदासांनी जेव्हा दासबोध लिहिला तेव्हा त्यांच्या मनाला असा प्रश्न शिवला नाही की याचा आदर्श कोण घेईल? अरे आज इंग्लंडच्या युनिवर्सिटींनी व्यवस्थापन शास्त्रातील आदर्श ग्रंथ म्हणून दासबोधाची निवड केली आहे.
मोहन – ओके, म्हणजे तु स्वतःची तुलना ज्ञानेश्वर आणि रामदासांशी करु पाहतोयस.
विनायक – नाही… मी त्यांचा वारसा चालवू पाहतोय.
मोहन – अहं, मला नाही पटत हे.
विनायक – म्हणजे?
मोहन – म्हणजे? म्हणजे… ज्ञानेश्वर, रामदास, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक हे सगळे महान होते, मी सुद्धा मानतो ह्यांना, नाही असं नाही, पण हा भूतकाळ होता आणि भूतकाळात रमणं मला जमत नाही.
विनायक – बरोबर आहे म्हणा, तुझ्यासारख्या टेलिव्हीजन मिडीयावाल्याला इतिहास काय कळणार?
मोहन – अरे.. ह्यात टेलिव्हीजन मिडीया नि प्रिंट मिडीया यांचा संबंध येतोच कुठे?
विनायक – संबंध? त्या कसाबच्या आक्रमणात जो हवालदार हुतात्मा झाला, त्याच्या बायकोला प्रश्न काय विचारलास तु? “तुमचे मिस्टर वारले, आता तुम्हाला कसं वाटतंय?”, कसं वाटणार? उद्या तुला जर काही झालं तर तुझ्या बायकोला कसं वाटणार?
मोहन – हे बघ, ते माझं काम आहे. पण तुझ्यासारख्या प्रिंट मिडीयावाल्याला नाही कळणार हे.
विनायक – काम… फालतू प्रश्न विचारणे, खोटया बातम्या तयार करणे, हे जर काम असेल तर धन्यच आहे.
मोहन – मी पैशांसाठी काम करतो. समाजसेवा करण्याची मला खोड नाही आणि माझ्या कामावर माझी निष्ठा आहे.
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply