भाग ३ पासून…
मोहन – होय निर्वासितांबद्दल.. पण मला वाटतं खरंतर आपले विचार निर्वासित असतात, बेघर झाल्याप्रमाणे सैरावैरा धावत असतात… विनायक तुला आवठतंय का? मुंबईत ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, तेव्हा आपण दोघांनी त्या ठिकाणी जाऊन पिडीतांना सहाय्य केले होते.
विनायक – होय… मला चांगलंच आठवतंय, जेव्हा जेव्हा राष्ट्रावर संकट आलं तेव्हा तेव्हा आपण कसलाही विचार न करता पुढाकार घेतला होता. मला चांगलंच आठवतंय. पण तुला हे आठवतंय. आश्चर्य आहे.
मोहन – (विषय टाळत/बदलत) आपण निर्वासितांबद्दल बोलत होतो.
विनायक – हंहं….
मोहन – तु मघाशी म्हणालास, काश्मिरच्या पंडीतांना अजून न्याय नाही मिळाला. पण त्यांना स्वतःला जर असं वाटत नसेल की आपल्याला न्याय मिळावा तर आपण त्यांच्याबद्दल इतका विचार का करावा? त्यांनी सुद्धा धडपड करायला हवी.
विनायक – पनून काश्मिर नावाची संघटना काश्मिरी निर्वासितांवर काम करतेय. आणि काश्मिरी निर्वासितांची मानसिकता भयंकर गंभीर आहे. काश्मिरी स्त्रियांची मासिक पाळी अवघ्या तारुण्यातच बंद होते. त्यांची प्रजननक्षमता थांबतेय. रात्री अपरात्री कुणी नराधम आपल्यावर पाशवी बलात्कार करतोय की काय? अशी भयाण स्वप्न पडून त्या झोपेतून उठतात. क्षणोक्षणी भितीचे वातावरण आहे. अशा अवस्थेत स्वतःला सावरणंच जमत नाही तर दाद काय मागणार रे?
मोहन – हहहं….. गंभीर समस्या आहे. पण मला नाही वाटत की कुठल्याही प्रकारच्या प्रयत्नांचा काही उपयोग होईल.
विनायक – का? असं का वाटतं तुला?
मोहन – इतिहास साक्षी आहे.
विनायक – मला वाटतं तु इतिहास व्यवस्थित वाचला नाहीस. शेवटी विजय सत्याचा होतो.
मोहन – शेवटी विजय सत्याचा होतो म्हणजे विजय होईपर्यंत सत्याचा शेवट होतो.
विनायक – माझा पूर्ण विश्वास आहे, विजय सत्याचाच होणार. प्राक्तनाच्या जबडयात हात घालून विजय खेचून काढू.
मोहन – हा हा हा… असं नसतं रे, असं नसतं,… मला वाटतं देवाने तुला चुकीच्या युगात जन्माला घातलं, तु सत्ययुगात जन्माला येणार होतास चुकून कलीयुगात आलास. विनायक हे जग फार विचीत्र आहे रे. प्रत्येकाला इथे ऍडजस्टमेंट करावीच लागते. हेच सत्य आहे.
विनायक – हहं… ऍडजस्टमेंट… ऍडजस्टमेंट… ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाला करा ऍडजस्टमेंट, काश्मिरमध्ये दंगल झाली करा ऍडजस्टमेंट, अतिरेक्यांनी गोळीबार केला करा ऍडजस्टमेंट, भर दिवसा आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जातेय करा ऍडजस्टमेंट, रोज रोज भ्रष्टाचाराच्या बातम्या येत आहेत पण आपण फक्त ऍडजस्टमेंटच करायचं, का? तर आम्ही सुरक्षित आहोत ना? आमचं घर जळत नाही ना? मग आम्हाला काय त्याचे?
मोहन – होय…. होय… मला काय त्याचे? मला काय त्याचे? जगात काही होवो, मला काय त्याचे? भ्रष्टाचार, आतंकवाद, बलात्कार काही असो, अरे मला काय त्याचे? मला फक्त एकंच कळतं दिवसभर राब राब राबणं आणि स्वतःच्या कुटूंबाचं पालपोषण करणं.
विनायक – किती बदलला आहेस तु? किती बदलला आहेस? स्वार्थी झालाइस… दुसर्याचं सोड रे पण स्वतःच्या बहिणीवर झालेला अत्याचार सुद्धा विसरलास?
मोहन – का? का त्रास देतोयस? का आठवण करुन देतोयस जे मी विसरु पाहतोय? अन्यायाच्या आणि अत्याचारांच्या निर्दयी पाषाणांनी बांधलेल्या उंच उंच भिंतींमुळे माझ्या मनातल्या आशा गुदमरुन पडल्यात. तिची अस्पष्ट साद भिंतींआडून माझ्या कानावर येऊन आदळते आणि माझे दुःख अनावर होतात. माझी ताई…. माझी ताई… आई बाबा वारल्यानंतर माझ्या ताईनेच माझा सांभाळ केला. माझं शिक्षण पूर्ण केलं, एवढंच नाही तर माझं लग्नही लावून दिलं. माझ्यासाठी तिने स्वतः लग्न नाही केलं. पुष्कळ त्याग केला रे तिने आमच्यासाठी. आम्ही सगळे सुखी होतो आणि एक दिवस आमच्या सुखाला कुणाची तरी नजर लागली. आकाशात फुललेला स्वप्नांचा मोहर अचानक गळून पडला. तुला तर सारंच माहिती आहे. आपण दोघांनीही अखंड भारत नावाचं पाक्षिक सुरु केलं होतं. त्याच्या वर्धापनदिनानिमित्त “अल्पसंख्यांक आणि आरक्षण” याविषयावर माझं जहाल भाषण झालं, टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या रात्री मी घरी परतल्यानंतर मला एक धमकीचा फोन आला. मी त्याकडे फार लक्ष दिलं नाही. कारण हे सगळं सवयीचं झालं होतं. काही दिवसांनी मला पोलिस स्टेशनमधून फोन आला की एका बॉडीची ओळख पटवायची आहे. मी क्षणाचाही विलंब न करता पोलिस स्टेशनला धाव घेतली, तर पाहतो काय? शवगृहात माझी ताई पहूडली होती. ती बॉडी माझ्या ताईची होती. एका भिक्कारडया पंथवेड्याने माझ्या ताईचा बलात्कार करुन खून केला होता. तो पकडला गेला, पण तो अल्पवयीन निघाला. बालसुधारगृहात त्याला पाठवण्यात आलं. म्हणे अल्पवयीन? अरे मग बलात्कार आणि खून करताना त्या भडव्याला कळलं नाही का आपण अल्पवयीन आहोत ते? त्याला जी शिक्षा झाली ती झाली, पण ज्या पंथवेडया मानसिकतेमुळे त्याने हे दळभद्री कृत्य केलं ती पंथवेडी मानसिकता अजुनही मोकाट फिरतेय….. त्या घटनेने मी फार खचून गेलो. माझ्या कुटूंबाची जबाबदारी माझ्यावर होतीच. तेव्हाच मी ठरवलं की या मुर्दाड जगात जगायचं असेल तर “मला काय त्याचे” ही वृत्ती धारण केलीच पाहिजे. नाही तर सगळंच असह्य झालं होतं रे.
क्रमशः
पुढील भाग लवकरच
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply