नवीन लेखन...

एकांकिका : मला काय त्याचे? (भाग ५)

भाग ४ पासून

विनायक – तुझ्या दु:खाला मीही खांदेकरी आहे. तुझ्या ताईने माझ्यावरही लहान भावाप्रमाणेच प्रेम केलं. माझीही ताई होती ती. दुःख मलाही झालं. पण तुझ्यासारखं खचून न जाता ताईने पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करतोय. अखंड भारताचं स्वप्न.

मोहन – तुला काय जातं रे बोलायला, तुला न बायका न पोरं….

विनायक – हे तु बोलतोयस, सगळं माहित असताना…. (भूतकाळात जातो) आम्हालाही वाटलं होतं, आमचा संसार असावा, मुलं व्हावी. रागिणीला तर मुलं प्रचंड आवडायची. रस्त्याने एखादं मुलं रडताना जरी दिसलं तरी लगेच ती त्याला उचलून घेणार, लाड करणार आणि मुलंही तिच्यासोबत रमून जायची रे. तिने अनाथ मुलांसाठी पुष्कळ केलं. ती सुद्धा अनाथ होती. तिचं असं म्हणणं होतं की जे मला भोगावं लागलं ते अन्य मुलांच्या बाबतीत होऊ नये. एक धडाडीची पत्रकार होती ती. एका पत्रकार परिषदेत आम्ही भेटलो, साधारण ओळख झाली. नंतर भेटी वाढल्या, धुक्यात गुंतलेल्या पहाटेच्या प्रकाशाप्रमाणे मी तिच्यात गुंतत गेलो आणि ती माझ्यात. ती सुद्धा कमाल होती. जितकी सुंदर तितकीच लढाऊ. तिच्यातला हाच गुण मला फार भाळला. आपला एक छोटासा चार काटक्यांचा संसार असावा असं आम्हाला वाटू लागलं. हेच स्वप्न रंगवत आम्ही कित्येक सुर्य मावळताना पाहिलेत. आणि एक दिवस…… प्रेमाचा सुर्य मावळला आणि अवकाशात युद्धाचे ढग जमा झाले. २६/११… मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस. अतिरेक्यांनी मुंबईवर हल्ला केला. या घटनेची बातमी कव्हर करायला रागिणी तिथे गेली. नेमक्या त्याच दिवशी मी मुंबईत नव्हतो. अतिरेकी बेभानपणे गोळीबार करत होते. समोर बायका आहेत, लहान मुलं आहेत त्यांना, कशाचीही पर्वा नव्हती. त्यांच्या अंगात जिहादी शैतान संचारला होता. रागिणीची रिपोर्टींग सुरु होती. इतक्यात एक लहान मुलगी रस्त्यात रडताना तिला दिसली. तुफान गोळीबार सुरुच होता. रागिणीने त्या मुलीकडे पाहिलं… शेवटी वाघिणीचं काळीज… क्षणाचाही विलंब न करता तिने त्या मुलीकडे धाव घेतली आणि त्या मुलीला उचलून पुन्हा परतु लागली, तीच एक गोळी तिच्या डोक्याला शिवुन गेली. वादळात सापडलेल्या ज्योतीसारखी थरथरत ती जमिनीवर कोसळली. तिने त्या मुलीला वाचवलं पण स्वतः मात्र…. (अतिशय दुःखी होत) ती ना जगली ना गेली… जीवन नि मरण यांच्या मधोमध कुढत राहिली…. कोमामध्ये गेली ती. आजही मी तिला भेटायला जातो, तिच्याशी बर्‍याच गप्पा मारतो, पण ती काहीच बोलत नाही रे. नाहीतर एरव्ही तिचं बोलणं संपायचंच नाही. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि तु म्हणतोस तुला न बायका न पोरं….

मोहन – मला माहीत आहे रे सारं, आय एम सॉरी, पण तु प्रत्येकाला स्वतःच्या चष्म्यातून पाहतोस. प्रत्येकाला तत्वांशी एकनिष्ठ राहता येत नाही. वेळेसकट बदलावं लागतं, बदलणं हे जीवंतपणाचं लक्षण आहे.

विनायक – बदलणं हे जीवंतपणाचं लक्षण आहे, खरंय.. पण देशाची वाताहत होत असताना गप्प बसणे हे षंढपणाचे लक्षण आहे.

मोहन – माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय आहे मी षंढ, षंढ आहे मी. पण एकेकाळी मी सुद्धा पहाड फोडीत जाणार्‍या जलप्रवाहाचा वारसदार होतो. पण आता जलाशय होऊन स्तब्ध झालोय. अरे माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते जेव्हा माझ्या देशभगीनींची अब्रू लूटली जाते. माझ्याही मुठी आवळल्या जातात जेव्हा माझ्या देशबांधवांची पशूप्रमाणे हत्या होते. पण जेव्हा मला माझ्या बायकोची आठवण येते, जी रोज रात्री आतूरतेने माझी वाट पाहत असते, तेव्हा माझ्या मस्तकातली आग क्षणात शांत होते. जेव्हा मी माझ्या पाच वर्षांच्या मुलीच्या निरागस चेहर्‍याकडे पाहतो, तेव्हा माझ्या आवळलेल्या मुठी सैल होतात. ह्या माझ्या हतबलतेला जर तुला षंढपणा म्हणायचा असेल तर होय, आहे मी षंढ.

विनायक – होय… होय षंढच आहेस तु, षंढच आहेस आणि तुझ्यासारखे अनेक लोक जे “मला काय त्याचे” ही प्रवृत्ती घेऊन जगतात. अरे तुमच्यासारख्याच सो-कॉल्ड समाजातल्या स्वतःला सेक्यूलर म्हणवून घेणार्‍या लोकांमुळेच ह्या देशाचं वाटोळं झालं. दुसर्‍याचं घर जळत असताना आपण गप्प बसायचं नसतं, कारण तिच आग आपल्याही घराला जाळू शकते, हे विसरायचं नसतं.

आपण आंघोळ करताना नेहमी एक मंत्र म्हणतो, “गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वति, नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सिंन्निधिं कुरु”. या मंत्रातील ती गंगा, ती यमुना, गोदावरी, नर्मदा, सरस्वति व ती कावेरी आजही भारतात राष्ट्रेक्याची जाणीव करुन देत आहे. पण ती सिंधु कुठे आहे? कुठे आहे सिंधु? त्या पापस्थानात? ज्या सिंधुसरितेला आम्ही आमची माय संबोधतो ती सिंधुसरिता पापस्थानात बंदिस्थ असताना आम्ही निर्लज्यपणे “नर्मदे सिंधु कावेरी” असं म्हणायचं? “मला काय त्याचे?” ही प्रवृत्ती म्हणजे या देशाला लागलेली कीड आहे. अरे जेव्हा जेव्हा प्रत्येक माणूस, मी आणि माझी जात, मी आणि माझं कुटूंब, मी भला माझं काम भलं, अशा संकूचीत मनस्थितीत सापडला तेव्हा तेव्हा आपले राष्ट्र पारतंत्र्यात गेले आहे. हे दुर्दैव आहे पण सत्य आहे. परकियांमुळे ह्या देशाचं जितकं नुकसान झालं नसेल, त्याहूनही अधिक नुकसान स्वकियांमुळे झालंय. ज्या भारतात प्रभू राम नि भगवान कृष्ण जन्मले होते, ती दिव्य भरतभूमी आज अपवित्र झाली आहे, ही शोकांतिका नव्हे का? हा प्रभू श्रीरामचंद्रांचा अपमान नव्हे का? हे पुर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे विडंबन नव्हे का? ज्या मातीत जगदंबा, कालीका, अंबा अशा शुर नि पराक्रमी स्त्रिया जन्मल्या त्याच मातीच्या स्त्रियांवर बलात्कार होणे हा षंढपणाचा कळस नव्हे का? अरे सांग ना तु ज्या ईश्वराला मानतोस त्या ईश्वराला स्मरुन सांग हा आपल्या पुण्य नि पितृभूमीचा अपमान नव्हे का? सांग ना, गप्प का बसलास?… दिवसेंदिवस आतंकवाद, बलात्कार, नक्षलवाद, भ्रष्टाचार फोफावतोय, वर आमचे नेते मंडळी काय म्हणतात? “बडे बडे शहरोमें ऎसी छोटी छोटी बातें होती रहती हैं”, अरे हिजडयांनो ज्या दिवशी तुमच्या घराला आग लागेल तेव्हा तुम्हाला कळेल….. अजूनही वेळ गेलेली नाही. “मला काय त्याचे” ही प्रवृत्ती फेकून टाका आणि राष्ट्रकल्याणासाठी सज्ज व्हा.

मोहन – (हताश होऊन) तु जे बोलतोयस ते मला कळतंय रे. पण तुझ्यासारखी दुःख झेलण्याची छाती सर्वांचीच होत नाही. सर्वांनाच तुझ्याइतकं विशाल ह्रदय लाभलेलं नसतं. आज तु जे बालतोयस ते मला मान्य आहे. आज – आता – ह्याक्षणी मला तुझ्यासोबत यावसं वाटतं, पण मी हतबल आहे रे, मला माफ कर, मी तुझी साथ नाही देऊ शकत, मला माफ कर विनायक.

विनायक – (अतिशय शांत स्वरात) ठीक आहे, तुझी इच्छा.

(काही क्षण दोघेही शांतता बाळगतात)

मोहन – विनायक, तुझं नाटक फार छान लिहून झालंय. ऑल द बेस्ट.

विनायक – थॅंक्स…

मोहन – एक विचारु?

विनायक – हो… विचार ना…

मोहन – तुला भिती नाही वाटत का रे?

विनायक – (मोहनकडे पाहून आत्मविशासाने म्हणतो) कि घेतले व्रत न आम्ही हे अंधतेने, लब्ध – प्रकाश – इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे, बुद्धयाचि वाण धरिले, करि हे सतीचे.

एकांकिका : मला काय त्याचे (भाग – ५)

भाग ४ पासून

(पडदा पडतो)

— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Avatar
About जयेश शत्रुघ्न मेस्त्री 12 Articles
हिंदूत्त्व या विषयावर परखडपणे लिहिणारे श्री जयेश मेस्त्री हे व्यवसायाने विमा (एल. आय. सी )आणि गुंतवणूक एजंट आहेत. ते हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..