मुंबईत व उपनगरांमध्ये दर दिवशी कुठे ना कुठे बाजार भरण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे, म्हणून मुंबई सात बेटांची असल्यापासून अर्थात त्याकाळी त्याचा आवाका निम्मा असेल पण तो त्या काळानुसार व तिथल्या वस्तीनुसार असायचा आज तर देशाच्या प्रत्येक छोट्या मोठ्या शहरांमध्ये अनेक बाजार भरतात, यामध्ये खाद्यपदार्थांपासून, टाचणी व राई असे सर्व वस्तू उपलब्ध असतात. मुंबईतल्या मालाड पश्चिमेस असलेला सोमवार बाजार या परिसराची ख्याती जुनी व ग्राहकोपयोगी वस्तुंसाठी लोकप्रिय आहे.
सोमवार बाजार या परिसराचं नाव मुळातच सोमवारी येथे बजार पेठ भरते यावरुन प्रचलित झालं; या भागाला जवळपास व येथे भरणार्या बाजाराला २०० वर्षांचा इतिहास आहे. मालाड गावठण, मनोरी, वळणई, मढ, आकसा सारख्या परिसरात पूर्वी वस्ती होत्या व त्यांना जोडणारी ही प्रमुख बाजारपेठ म्हणता येईल; तसंच उत्तर मुंबईतील काही मुख्य बाजारांपैकी सोमवार बाजार महत्वपूर्ण आहे.
सोमवार बाजार या परिसरात मासळी मंडई, भाज्या, फळभाज्या, किराणा मालाची दुकानं तर आहेतच, पण सोमवारी या परिसराला “ग्राहकी जत्रेचं” स्वरुप प्राप्त झालेलं असतं, व हा बाजार अगदी चिंचोली बंदर परिसरापर्यंत तर त्याचा अगदी उत्तर दिसेस असणार्या तुरेल पाखाडी मार्गापर्यंत ही बाजारपेठ विस्तारलेली दिसते;
दर सोमवारी सकाळी ६-७ वाजल्यापासून दुपारी ३:३० पर्यंत ही बाजारपेठ गर्दीनं पूर्ती गजबजलेली दिसते. सुमारे २ लाख ग्राहक ह्या सोमवार बाजाराला, त्यादिवशी भेट देतात असा अंदाज आहे; हा ग्राहक वर्ग संपूर्ण मुंबईहून येथे खरेदी करण्यासाठी येतो.
खाद्यपदार्थ सर्व प्रकारच्या घरगुती वस्तु, भांडी, खेळणी, स्टेशनरी, कपडे (जुने-नवे), पुजेचं सामान, चादरी, महिलांसाठीची आभुषणं, इमिटेशन ज्वेलरी, भंगार- (यामध्ये दर्जेदार पुरातन वस्तुंची विक्री केली जाते), सुकी मासळी, इत्यादी, एकंदरीतच ज्या वस्तुनआणि सामान आपल्याला दुकानात विकत मिळतं तोच माल अगदी “स्वस्त्यात आणि मस्त्यात” मिळतात. विशेष म्हणजे सण-उत्सवा दरम्यान अनेक वस्तु विक्रीसाठी दाखल होत असतात. या वस्तुंची विक्री करण्यासाठी अनेक विक्रेते मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या परिसरातून सोमवारी दाखल होतात. एप्रिल, मे, जून महिन्यात वसई व उत्तन गावातू पांढर्या कांद्याची विक्री करण्यासाठी या भागात तिथले शेतकरी दाखल होतात, अगदी बैलगाड्यांसकट काही तासातच कांद्यांच्या माळा हातोहात विकल्या जातात, म्हणून पांढरे कांदे खरेदी करण्यासाठी मुंबईतल्या काही ठिकाणांपैकी हे मुख्य ठिकाण मानलं जातं, याच काळात रानभाज्या, आंबे, विविध प्रकारच्या फळभांज्यांची विक्रीसुद्धा होते.
गेल्या दशकभरात मालाड पश्चिम व येथील गावठण भागांचा झपाट्यानं विकास होत आहे, या बाजारपेठांमुळे येथील स्थानिक विकास होत आहे. या बाजारपेठेमुळे येथील स्थानिक लोकांना रोजगार तर मिळाला आहे व अर्थकरणाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उलाढाल एका सोमवारी होते; मालाडच्या परिसरामध्ये सध्या “मॉल्स”, “फुड बाजार”, व “सुपर मार्केट्स” चा विळखा घातला गेला आहे पण अशा परिस्थितीत सुद्धा सोमवार बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक ग्राहकांचे पाय वळताना दिसतात.
आजच्या काळात मालाड या उपनगराला “सिलीकॉन व्हॅली” म्हणून पाहिलं जातं, पण या घडीला सुद्धा बाजार पेठेच्या माध्यमातून का असेना, एक सामाजिक, ऐतिहासिक वारसा रेटण्याचं काम सोमवार बाजारनं केलं आहे व येत्या काळात ही बाजारपेठ विस्तारणार यात काहीच शंका नाही.
— सागर मालाडकर
Leave a Reply