मलेरिया हा प्लासमोडियम प्रजातीच्या परजीवीमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. मलेरियाचा उल्लेख इजिप्तच्या फॉरोंमध्ये व चरक संहितेतही सापडतो. आधुनिक युगात सर रोनॉड रॉस या ब्रिटिश भारतीय सेनेच्या डॉक्टांनी मलेरिया डासांद्वारे पसरतो हे सिद्ध केले. व्हायव्याक्स, फॉलसिपॉरम, ओव्हेल व मलेरिए हे प्लासमोडियम प्रजातीचे चार मुख्य प्रकार आहेत. भारतात व्हायव्याक्स व फॉलसिपॉरम सर्वात अधिक प्रमाणात आढळून येतात. प्लासमोडियम मलेरिए कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात सर्वात अधिक दिसतो. प्लासमोडियम ओव्हेल आफ्रिका खंडात दिसतो. मलेरियाचा प्रसार अॅनॉफीलस प्रजातीच्या डासांच्या मादीने होतो. हे डास पाण्याच्या डबक्यांमध्ये, तलावात, पाण्याच्या टाक्यांमध्ये इत्यादी ठिकाणी प्रजनन करतात व आजार पसरतो. प्लासमोडियमचा विकास डासांमध्ये व मनुष्यांमध्ये पूर्ण होतो.
मलेरिया असलेल्या रुग्णाला चावल्याने प्लासमोडियम डासांमध्ये प्रवेश करतो. तो डासाच्या पोटात विकसित होऊन त्यांच्या लाळोत्पादक ग्रंथीत साठून राहतो. जेव्हा हा डास एखाद्या माणसाला चावतो तेव्हा त्याच्या सोंडे (प्रोबॉसीस) द्वारा प्लासमोडियमचे जिवाणू शरीरात प्रवेश करतात. शरीरात प्रवेश करताच हे जिवाणू यकृताच्या पेशींमध्ये विकसित होतात व त्या पेशी फोडून रक्तातल्या लाल पेशीत प्रवेश करतात. फॉलसिपॉरम जातीचे जिवाणू यकृतात लपून राहात नाही आणि म्हणून फॉलसिपॉरम मलेरिया बरा होताच परत उलटत नाही. व्हायव्याक्स व ओव्हेल हे जिवाणू यकृतात लपून राहतात आणि म्हणूनच हे आजार उलटू शकतात. रक्तातल्या लाल पेशीत विकास झाल्यावर हे जिवाणू पेशी नष्ट करून बाहेर येतात आणि थंडी तापाला सुरुवात होते. दर ४८ तासांत जिवाणू लाल पेशीतून बाहेर पडतात आणि म्हणून दर ४८ तासानंतर थंडी ताप येतो.
साधारण मलेरियात २ ते ३ दिवस आधी हात-पायदुखी, अंगातील कसकस, डोकेदुखी ही लक्षणे दिसतात. नंतर अचानक थंडी, वाजायला सुरुवात होते व हुडहुडीसुद्धा भरते. यानंतर ताप येतो व अर्ध्या तासाभरात खूप घाम येऊन ताप उतरतो. थंडी ताप असताना रक्ताचा नमुना सूक्ष्मदर्शकाद्वारे तपासल्यास मलेरियाचे जिवाणू आढळून येतात व या आजाराचे निदान होते. आजकाल मलेरिया अॅन्टिजेन चाचणीने अचूक निदान होणे शक्य आहे.
डॉ. मकरंद कुबल
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply