मलेरियाचे मुख्य लक्षण म्हणजे ताप येणे असून त्यासोबत इतर अनेक लक्षणे रुग्णात आढळतात , जी रोगाचे निदान करण्यास उपयुक्त ठरतात . बरेच वेळा रोगाची सुरवात सामान्यपणे आढळणारा फ्लू अथवा Viral Fever असावा त्याप्रमाणेच होते . डोके दुखणे , थकवा वाटणे , पोटात बारिकसे दुखणे , स्नायू व सांधे दुखणे , भूक मंदावणे व अन्नावरील वासना उडणे , उलट्या होणे आणि शरीर गलितगात्र होणे अशा प्रकारच्या लक्षणांनी सुरवात होते .
मलेरियाच्या तापामध्ये साधारणत : एक विशिष्ट पद्धत दिसून येते . अ ) अंगात कणकण वाटणे व अंग थंड पडणे – ही परिस्थिती २० मिनिटे ते १ तासापर्यंत टिकते ब ) नंतर प्रचंड हुडहुडी भरते जी दोन , तीन ब्लॅन्केटस् अंगावर घेऊनसुद्धा थांबत नाही . मलेरियामध्ये हुडहुडी हे फार महत्त्वाचे लक्षण आहे . यात थंडी भरून येताना रुग्णाची जी दमणूक होते तो अनुभव विलक्षण असतो . तो आयुष्यभर त्याच्या लक्षात राहतो . या बरोबर ताप वाढत जाऊन अगदी १०४ ° ते १०५ ° पर्यंत चढू शकतो . याचा काळ १ ते ४ तास टिकतो . अकस्मात होणारी तापामधील वाढ बरेचदा रात्रीपेक्षा दुपारी माध्यान्हीच्या कालानंतर जास्त असते . क ) नंतर दरदरून घाम येण्यास सुरवात होते . हा काळ साधारण २ ते ३ तास राहतो . एकूण तापाचा कालावधी ६ ते १२ तास असतो .
मलेरिया परोपजीवींच्या गटानुसार उदा . P. Vivax व P. Falciparum यामध्ये तापाची पद्धत वेगवेगळी असते . तापाचे कालचक्र ४८ किंवा ७२ तासानंतर पुन्हा परत सुरू होऊ शकते . त्यावरुन कोणत्या पद्धतीचा मलेरिया आहे याचे ढोबळ निदान करता येते .
Plasmodium Vivax Malaria ( Benign )
बहुतेक वेळा या प्रकारच्या परोपजीवांमुळे होणारा मलेरिया तुलनेने कमी
धोकादायक असतो . गंभीर स्वरूपाचे परिणाम सहसा आढळत नाहीत . परंतु Vivax गटाचे परोपजीवी ( Schizonts ) या स्थितीत असताना यकृतामध्ये ( Liver ) सुप्तावस्थेत राहतात . योग्य संधी मिळताच ते रक्तात शिरतात व पुन्हा मलेरियाचा ताप येऊन सोबत लक्षणेही दिसू लागतात . तो केव्हाही पुन्हा उद्भवू शकतो . याला ( Relapse ) परत येणारा ताप म्हणतात . त्यावेळी मात्र डास न चावताच हा ताप रुग्णाला परत आलेला असतो .
Plasmodium Falciparum Malaria
बरेच वेळा ताप येण्याची पद्धत वरील वर्णन केलेल्या पद्धतीप्रमाणे अजिबात नसते . या ठिकाणी काही वेळा रुग्णाला ताप १०० ° ते १०१ ° एवढाच असतो . काही वेळा सातत्याने दोन दिवस सतत ताप अंगात राहतो . थंडी किंवा हुडहुडी वाजण्याचे प्रमाण कमी जास्त होत असते . परंतु अशा रुग्णात मलेरियाच्या परोपजीवांचे प्रमाण जास्त असेल वा निदान बरोबर न झाल्याने औषधोपचार उशीरा चाल झाले असतील तर , किंवा हे परोपजीवी मलेरिया विरुद्ध वापरल्या जाणाऱ्या नेहमीच्या औषधांना प्रतिसाद न देणारे असतील तर मात्र हा रोग गंभीर स्वरूप धारण करू शकतो . खेदाची गोष्ट अशी की काही वेळा रुग्ण दगावूही शकतो .
Falciparum मुळे घातक स्वरूपातील होणारे मलेरियाचे ( Pernicious Malaria ) मुख्य तीन प्रकार आढळतात .
१ ) मेंदूत पसरणारा मलेरिया : ( Cerebral Malaria )
मेंदूमधील रक्ताच्या केशवाहिन्यातील ( Blood Capillaries ) तांबड्या रक्तपेशीत मलेरियाचे परोपजीवी पसरतात त्यामुळे मेंदूतील पेशींवर जबरदस्त आघात होतो . अशा रुग्णांना गुंगी वा सुस्ती येणे अशा लक्षणाने सुरवात होते . काही तासात रुग्ण पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत जातो . मानेच्या तसेच हातापायांच्या वेड्यावाकड्या हालचाली होतात . लहान मुलांमध्ये आकडी येते . काही वेळा लकव्यासारखी लक्षणे दिसू लागतात . ( Paralysis ) मलमूत्रावरील ताबा जाऊ शकतो . मेंदूमधील Hypothalamus भागावर परिणाम झाला तर ताप १०६ ° ते १०७ ° पर्यंत जाऊ शकतो . मृत्यूची शक्यता अशा वेळी जास्त असते .
२ ) Algid Malaria : शरीरातील सर्व रक्तवाहिन्या अशक्त झाल्याने रक्तप्रवाह हळूहळू थांबतो . नाडी मंद चालते व रक्तदाब कमी होत जातो . काही वेळा कॉलरा सारखे रेच ( हगवण सुरू होते , व त्यातून रक्त पडते .
३ ) Septicaemic Malaria : यामध्ये हृदय , रक्तवाहिन्या , फुप्फुसे , मुत्रपिंड इत्यादी सर्व अवयव हळूहळू निकामी होत जातात .
४ ) Black Water Fever : ( काळपट पिंगट रंगाची लघवी होणारा ताप ) रक्तातील हिमोग्लोबिन पासून बनलेले haemozoin हे काळपट रंगाचे कण व तांबड्या रक्तपेशींचे झालेले तुकडे हे सर्व लघवीमार्फत शरीराबाहेर पडू लागतात . अशा वेळी लघवीचा रंग Port wine किंवा कोकाकोलासारखा दिसत असतो. अनेकदा हे असे होण्याचे नक्की कारण उमजत नाही . काही वेळा मलेरियाच्या तापामुळे वाजणारी प्रचंड थंडी अथवा औषधांचा होणारा विचित्र परिणाम यामुळे हे घडून येत असावे . रुग्णास ताप असूनसूद्धा परोपजीवी रक्तात दिसत नाहीत . त्यामुळे रोगाचे निदान करणे कठीण जाते . कधी कधी मुत्रपिंडे निकामी झाल्यास रोग गंभीर स्वरूप धारण करतो .
मलेरियाचे रुग्ण तपासताना मुख्यतः खालील गोष्टी आढळतात .
१ ) फिकेपणा ( Anaemia )
रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते . ते काही वेळा धोकादायक पातळी पर्यंत कमी होते . ( Hb – 4G % or less ) प्रचंड थकवा वाटणे . काम करण्याची शक्ती अजिबात नसणे यामुळे रुग्ण निपचीत पडतो .
२ ) कावीळ : ( Jaundice )
काही रुग्णात मलेरिया बरोबर रक्तातील कावीळीची ( Bilirubin ) पातळी अधिक झालेली आढळते .
३ ) प्लीहा वाढणे : ( Enlarged Spleen )
ज्या रुग्णांमध्ये दीर्घकालीन मलेरियाची लक्षणे असतात , अशी रुग्णांमध्ये प्लीहा वाढलेली आढळते व त्यामुळे पोटही सुजलेले दिसते . क्वचित प्रसंगी अशा वाढलेल्या प्लीहेस इजा झाल्यास ती फाटते व पोटाच्या आत रक्तस्राव होऊन रुग्ण दगावतो.
या वैद्यकीय ज्ञानाचा गैरफायदा भारताच्या स्वातंत्र्यपूर्व कालात काही ब्रिटीश अधिकारी घेत असत . कामावर घेतलेले मजूर अनेकदा अशक्त असत . त्यांना नीट काम न केल्यास लाथा बुक्के मारून तुडवले जाई . अशा परिस्थितीत जर एखादा मजूर दगावला , तर खुनाचा आळ येऊ नये यासाठी ते अधिकारी बेलाशकपणे असे कारण सांगत , ‘ मजूराला मलेरियाचा त्रास होता . तो प्लीहा फुटल्याने मरण पावला ‘ .
४ ) काही रोग्यांमध्ये प्लीहा व यकृत दोन्हीमध्ये वाढ होते .
माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवी शिरण्याचे विविध मार्ग
१ ) अॅनॉफेलीस मादी डास मनुष्याला चावल्यानंतर त्यामुळे होणारा मलेरियाचा रोग हा एक नेहमीचा व महत्त्वाचा मार्ग आहे .
२ ) ज्या अॅनॉफेलीस मादी डासाच्या लाळेत Sporozoites अवस्थेतील परोपजीवी आहेत , अशा डासांमधील लाळ सशक्त माणसांना टोचून त्यांच्यात मलेरियाचा रोग निर्माण केला जातो काही ठिकाणी संशोधनाच्या दृष्टिकोनातून प्रयोग म्हणून असा प्रयत्न केला गेला आहे .
३ ) रक्तपेढीत अनेक लोकांचे रक्त घेतले जाते . त्यापैकी एखादा रक्तदाता मलेरियाचा रुग्ण असू शकतो . त्यावेळी त्याच्या रक्तात असणाऱ्या परोपजीवींचा प्रवेश तेथून पुढे ज्या रुग्णाला ते रक्त दिले जाईल त्याच्या शरीरात सरळपणे होतो व तेथे ते वाढून नंतर रुग्णाला नाहकपणे मलेरियाचा त्रास भोगावा लागतो . या कारणास्तव रक्तदात्याचे रक्त हे मलेरियाच्या परोपजीवांपासून मुक्त असल्याची खात्री रक्ताची तपासणी करून ठरविणे हे बंधनकारक आहे.
४ ) आईच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत असते . या गर्भाशयाला जोडून लागूनच Placenta म्हणजे वार असते ज्यातून बाळाचे पोषण केले जाते . सामान्यपणे आईच्या रक्तात जर कोणतेही जंतू किंवा इतर प्रकारचे परोपजीवी असतील तरी त्यांना थोपविण्याची क्षमता वारेमध्ये असते , अशा प्रकारे बाळाचा बचाव केला जातो . परंतु वारेच्या वाढीच्या प्रक्रियेत काही दोष निर्माण झाला असेल व अशा वेळी आईला मलेरियाचा रोग झाल्यास त्याचे परोपजीवी बाळाच्या रक्तात शिरून त्या बाळाला मलेरिया होऊ शकतो .
५ ) व्यसनाधीन लोकांच्या एकत्रित गटामध्ये एखाद्याला मलेरियाचा रोग झालेला असेल तर धुंदी येण्याकरिता तेथे वापरल्या जाणाऱ्या एकाच इंजेक्शनच्या सुईमधून मलेरियाचे परोपजीवी इतरांमध्ये पसरू शकतात .
वरील नमूद केलेल्या २ ते ५ या मार्गांनी पसरणारा मलेरियाचा रोग फार क्वचितच आढळतो .
औषधी उपाय म्हणून मलेरियाच्या परोपजीवींचा उपयोग ८० ते ९ ० वर्षांपूर्वी वैद्यकीय शास्त्रात केल्याची उदाहरणे आहेत . त्याचा मनोरंजक इतिहास थोडक्यात असा आहे .
Syphilis ( गुप्तरोग ) या रोगाचे रुग्ण त्याकाळी फार मोठ्या संख्येने आढळून येत . या रोगामध्ये काही रुग्णांना मेंदूत बाधा होत असे . त्याला Neurosyphilis वा general Paralysis of Insane असे म्हणत . असे लक्षात आले होते की या रोग्यांना जर नंतर मलेरिया झाला असेल तर ताप गेल्यानंतर Neurosyphilis मुळे होणारी लक्षणे नाहिशी होत व रोगी त्यामधून बाहेर येत असे . या निरीक्षणाचा उपयोग एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने केला जात असे .
Neurosyphilis असलेल्या रुग्णांना मच्छरदाणीत झोपवीत . ज्या मादी डासांच्या लाळेत मलेरियाचे परोपजीवी आहेत अशांना आत सोडीत . हे डास त्यांना चावल्यावर ह्या रूग्णांना मलेरियाचा ताप येत असे . ताप येण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यत रुग्णाला वेगळे झोपविण्यात येत असे . त्यावेळी रोग्याला मलेरियासाठी वापरले जाणारे कोणतेही औषध देण्यात येत नसे . ताप उतरल्यानंतर काही दिवसात Neurosyphilis मुळे होणाऱ्या लक्षणात बराच उतार पडत असे हा प्रकार काट्याने काटा काढावा यासारखा होता.
मलेरियाच्या परोपजीवांमुळे शरीरात निर्माण होणारी घातक विषारी द्रव्ये ( Malarial Toxins )
रुग्णामध्ये मलेरियाचा ताप वाढत असताना मलेरियाच्या परोपजीवींविरुद्ध रक्तातील तांबड्या व पांढऱ्या रक्तपेशी , तसेच अभयत्व देणाऱ्या पेशी ( immune cells ) यांच्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू होते . त्यावेळी अनेक विषारी द्रव्ये निर्माण होतात या द्रव्यांमुळे शरीरातील विविध संस्थांवर कमी जास्त स्वरूपाचे परिणाम घडतात . ही रासायनिक प्रक्रियेची शृंखला नियमबद्धपणे घडत असते .
शरीरात तयार होणारी प्रमुख विषारी द्रव्ये
१ ) Cytokinine २ ) Tumor Necrosis Factor ( TNF ) 3 ) Phospholipids and Phosphoglycans
शरीरात घडून येणारे महत्त्वाचे परिणाम
१ ) हिमोग्लोबिन ( Hb ) व तांबड्या रक्तपेशींचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यामुळे रुग्णाला धोक्याच्या पातळीपर्यंत नेणारा Anaemia होतो .
२ ) तापामध्ये अचानक होणारा चढ उतार
३ ) Plasmodium Falciparum मुळे मेंदूच्या पेशींमध्ये होणारे बदल .
४ ) शरीरातील संपूर्ण रक्तवाहिन्यांवर गंभीर परिणाम होऊन त्यांचे कार्य मंदावते व शक्तीपात होतो . ( Endotoxin Vascular Shock )
५ ) अचानकपणे जास्त प्रमाणात स्रवणाऱ्या Insulin मुळे रुग्णाच्या रक्तातील साखरेचे प्रमाण धोक्याच्या पातळीपर्यंत कमी होते .
वारंवार होणारा मलेरिया
मलेरियाचा ताप एकदा येऊन गेल्यानंतर त्याने पुन्हा पुन्हा आपला प्रताप त्याच रुग्णाला दाखविला नसता तर कदाचित मलेरिया या रोगाची समस्या ऐवढ्या तीव्रतेने जाणवली नसती . परंतु एकदा होऊन गेलेला मलेरिया पुढील ३ ते ४ वर्षांत एकदाच नव्हे तर चार ते पाच वेळा पुन्हा होण्याची शक्यता असते . वैद्यकीय इतिहासात काही रुग्णांत ४ ते ५ वर्षांच्या कालावधीत ३० ते ३५ वेळा मलेरिया झाल्याचे आढळून आल्याची नोंद आहे . हा रोग होण्याच्या आपत्तीची टांगती तलवार काही रुग्णांवर कायम असते . त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम घडून येतात . या वारंवार होणाऱ्या मलेरियाच्या रोगाची मुख्य कारणमिमांसा अशाप्रकारे आहे .
१ ) मानवी शरीरात साधारणपणे जंतू , परोपजीवी , विषाणू यांची लागण झाल्यानंतर कायम स्वरूपाची प्रतिबंधकारक शक्ती तयार होत असते . त्यामुळे त्या रोगांचा वारंवार उपसर्ग होण्याची शक्यता फार कमी असते . परंतु मलेरियाच्या परोपजीवांच्या बाबतीत मात्र पहिल्या तापानंतर शरीरात तयार होणाऱ्या प्रतिबंधकारक शक्तीची पातळी फारच कमी असल्याने यानंतर पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या तापाला रोखण्यास ती असमर्थ ठरते .
परोपजीवांच्या प्रत्येक अवस्थेची प्रतिजने ( Antigens ) भिन्न असल्यामुळे त्याला प्रतिबंधक ठरणारी प्रतिपिंडे ( Antibodies ) पुरेशा संख्येने तयार होत नाहीत . अर्थातच पुन्हा होणाऱ्या मलेरियाच्या परोपजीवांशी मुकाबला करणे प्रतिपिंडांना कठीण जाते आणि परोपजीवी मग शरीराचा ताबा घेतात .
२ ) काही काही रुग्णांनाच डास परत परत चावा घेतात . त्यामुळे तो रुग्ण पहिल्या तापातून बरा होतो न होतो तोच नवीन परोपजीवांची फौज त्याच्या शरीरात शिरते .
३ ) काही कारणाने औषधाचा डोस पूर्ण न करता उपचार अर्धवटच सोडून दिले जातात . तर अशा वेळी पहिलाच ताप उलटण्याची शक्यता असते .
४ ) Plasmodium Vivax या प्रकारच्या मलेरियाच्या तापामध्ये यकृतामध्ये ( Liver ) सुप्तपणे राहणारे परोपजीवी ६० ते १८० दिवसात परत आपले डोके वर काढतात व अशावेळी डास परत न चावताही मलेरियाचा ताप येण्यास सुरवात होते .
५ ) सामान्यत : Plasmodium Falciparum उलटण्याची शक्यता नसते . परंतु पहिल्याच तापातील रक्तात फिरणारे Falciparum चे प्रतिसाद न देणारे काही परोपजीवी औषधांना पूर्णपणे दाद न देणारे असतील तर अगदी २५ ते ३० दिवसात पुन्हा ताप येण्यास सुरवात होते . एखाद्या घरातील काहीच लोकांना वारंवार मलेरिया होतो , तर काही जणांना या रोगाची लागण कधीच होत नाही असे का या जटील प्रश्नाचे उत्तर मिळणे अवघड आहे .
मलेरियाची लक्षणे व चिन्हे या प्रकरणात मलेरियाचे रुग्ण सामान्यतः कोणत्या प्रकारचे आढळतात याचे विवेचन केले आहे . कित्येकदा रुग्णात दिसणारी लक्षणे डॉक्टरांना बुचकळ्यात टाकणारी असतात . अशा परिस्थितीत प्रयोगशाळेतील रक्ताच्या व लघवीच्या तपासण्या उपयुक्त ठरतात . अशा तऱ्हेच्या केसेस हॉस्पिटल व खाजगी डॉक्टर मंडळींसमोर आल्यावर रुग्णावर त्वरीत उपाययोजना करणे अत्यावश्यक असते . अशा पद्धतीच्या प्रत्यक्ष घडलेल्या केसेस् नाव व जागा बदलून पुढील वेगवेगळ्या प्रकरणात वेळोवेळी समाविष्ट केलेल्या आहेत .
ह्या सर्व केसेस् वाचल्यानंतर वाचकांना मलेरिया हा रोग प्रसंगी कशा रितीने गंभीर स्वरूप धारण करू शकतो यावर प्रकाश टाकण्याचा लेखकाचा उद्देश आहे .
केस नंबर १
श्रीमती निर्मला जोशी वय ५६ , पतीच्या निधनानंतर दादरमध्ये एकट्याच राहत होत्या . नोव्हेंबर महिन्यात दिवाळी निमित्त नाशिकमध्ये १५ दिवस व नंतर १० दिवस मध्यप्रदेश येथील कान्हा जंगल , पंचमढी या भागात फिरून दादरला परतल्या . घरात एकट्याच , आल्यावर प्रवासाचा शीण व पुढे अंगात कणकण , पाठोपाठ १०१ ° पर्यंत ताप चढला . फॅमिली डॉक्टरांनी नेहमीची औषधे दिली . थंडी वाजणे , हुडहुडी भरणे ही लक्षणे नव्हती . ठाण्यात राहणाऱ्या मुलीने आईला आपल्या घरी नेण्याचा आग्रहच धरला . ठाण्यात गेल्यावर ताप व सोबत उलट्या चालू झाल्याने १ दिवसानंतर काविळीची शंका आली . सकाळपासून निर्मलाबाईंची असंबद्ध बडबड मुलीला बुचकळ्यात पाडणारी होती . त्यांना ब्लड प्रेशर , डायबेटीस किंवा इतर कोणताही आजार नव्हता . दुपारनंतर चक्कर आली आणि अर्ध्या तासात त्या बेशुद्ध झाल्या . मुलीची तारांबळ उडाली . डॉक्टरांना घरी बोलावले . निर्मलाबाईंचे ब्लड प्रेशर अतिशय कमी झालेले परंतु ताप जास्त नव्हता . ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले गेले पुढील ४ ते ५ तासात पूर्णपणे शुद्ध हरपली . ( Semi Comatose ) तत्परतेने I.C.U मध्ये हलविण्यात आले . ५ तासात रक्ताच्या तपासणीमधून P. Falciparum Positive असल्याचे समजले हळूहळू काविळीचे प्रमाण वाढत होते . Blood Creatinine धोक्याच्या पातळीकडे वेगाने जात होते . मलेरियावरील अद्ययावत औषधे देण्यात येत होती . ३ दिवसात काहीही फरक नव्हता किंबहुना केस हाताबाहेर जाते की काय अशी शंका वाटू लागली . मुलींना त्याप्रमाणे कल्पनाही देण्यात आली होती जोशीबाईंच्या मूत्रपिंड व यकृतावर गंभीर परिणाम झाला होता . चौथ्या दिवसापासून मात्र मुंगीच्या पावलाने सुधारणा दिसू लागली . १० दिवसांनंतर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली . अतिशय अशक्तपणा होता . घरी परतल्यावर रक्ताच्या पुन्हा केलेल्या तपासणीत परत P. Falciparum चे परोपजीवी दिसल्याने तज्ञांच्या सल्यानुसार परत एकदा हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले . ताबडतोब मलेरियावरील औषधे सुरू करण्यात आली . अशक्तपणा हळूहळू कमी होत महिन्याभरात तब्येत सुधारली . कोणताही दुष्परिणाम राहिला नाही . त्यानंतर आता गेली १० वर्षे आनंदी आयुष्य जगत आहेत . या साऱ्या धक्कादायक अनुभवातून जोशीबाईंना दादर सोडून ठाण्यात वास्तव्यास जाणे सोईस्कर वाटले व त्या ठाणेकर झाल्या . या केसमध्ये डासांपासून मिळालेला प्रसाद हा दादरचा नसून नाशिक किंवा कान्हाच्या जंगलामधून मिळाला असावा अशी दाट शंका घेण्यास वाव आहे .
केस नं . २
सौ . मानसी पटवर्धन वय वर्षे ६१ , दादर मध्ये वास्तव्य , आठ दिवसासाठी परदेशी मलेशियाच्या सहलीस गेल्या . पहिले दोन दिवस समुद्रावरील खेळ , गार वारा बाधल्याचे निमित्त होऊन खूप थंडी भरून ताप आला . सोबत उलट्या त्यात अन्नावरची वासनाही गेली . १० वर्षांचा जुना डायबिटीस , खाणे बरोबर जात नसल्याने डायबिटीस वरील औषधे बंद केली . परदेशातील सहलीचे दोन दिवस त्रास तसाच सहन केला . पण अतिशय अशक्तपणा वाटू लागला लघवी कमी होण्यास सुरवात झाली. दुसऱ्या दिवसापासून तांबडी काळपट ( Port wine ) रंगाची लघवी होण्यास सुरवात झाली. दुपारपासून बोलण्यात असंबद्धता व गरगरणे सुरू झाले . बलवत्तर नशीब असल्याने मानसीताईंच्या परिचयातील एक डॉक्टर कोलालंपूर येथेच स्थायिक असल्याने ताबडतोब त्याच्या मदतीने हॉस्पिटलच्या I.C.U. मध्ये हलविले . Blood Pressure एकदम खाली आलेले व रक्तातील साखर ३५० मि . ग्रॅ . झालेली होती . E.C.G. नॉर्मल होता . बोरिवलीमधील मानसीताईंच्या पॅथॉलॉजिस्ट असलेल्या मुलाने मलेशियामधील डॉक्टरांशी संवाद साधला व फॅलसिफेरमची शक्यता व्यक्त केली . आमच्या देशात मलेरिया नाही असे मानणारे मलेशियामधील डॉक्टर ती शक्यता नाकारीत होते . शेवटी तिथेच दुसऱ्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले . त्यांनी भारतातून आलेला रुग्ण ही बाजू लक्षात घेऊन , मलेरियाच्या रक्त तपासणीसाठी ते दुसऱ्या ठिकाणी प्रयोगशाळेत पाठविले . तोपर्यत बोरिवलीचा मानसीताईंचा मुलगा मलेशियात आईजवळ जाऊन पोहोचला . दोन दिवसातच रक्ताचा रिपोर्ट Falciparum Positive असा आला . ताबडतोब योग्य औषधे देण्यात आली . आठ दिवसात तब्येतीला आराम पडला . रक्ताचा रिपोर्ट Negative आला . मानसीताई सुखरुपपणे मुलासोबत मुंबईला पोहोचल्या . या केसमध्ये P. Falciparum मलेरिया मधील Black Water Fever हे निदान केलेले असून यामधे लघवीचा बदललेला Port wine रंग हे महत्त्वाचे लक्षण आहे .
केस नंबर ३
श्री . मधुसुदन जोशी वय वर्षे ८२ , मधुमेहाचे गेले ३० वर्षांचे जुने दुखणे औषधांमुळे ताब्यात आहे . वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा वाढता त्रास , त्यामुळे मधून मधून लघवीचे Infection होत असे . दादर मध्ये वास्तव्य होते . घराला लागूनच नवीन ३५ मजली इमारतीचे बांधकाम गेली दोन वर्षे चालूच आहे . आजूबाजूला प्रचंड धूळ व डासांचा उपद्रव . त्यामुळे वारंवार खोकला , दम्याचा त्रास व तापही येत असे . लघवी व छातीचे Infection यावरच Antibiotics दिली जात होती . एकदा हुडहुडी भरुन ताप चढत असताना रक्त घेतले . त्यात Plasmodium Vivax चे परोपजीवी आढळले . लघवीचा रिपोर्ट नॉर्मल होता . Lung Infection मुळे रक्तातील पांढऱ्या पेशींच्या Polymorphs मध्ये वाढ झाली होती . आता पूर्वीच्या औषधांबरोबर मलेरिया विरुद्धची औषधेही देण्यास सुरवात केली . आठ दिवसात आराम पडला . ३ महिन्यानंतर पुन्हा तसाच ताप येण्यास सुरवात झाली . रक्ततपासणीत परत P. Vivax चे परोपजीवी मिळाले . परत मलेरिया विरुद्ध औषधांचा मारा करावा लागला . गेल्या दीड वर्षात ४ वेळा अशाच प्रकारे ताप येत आहे व मलेरियाचे रक्तातून निदान झाल्यावर पुन्हा पुन्हा त्यावरील औषधे द्यावी लागत आहेत . वाढत्या वयोमानामुळे व Antibiotics च्या वारंवार लागणाऱ्या वापरामुळे आता जोशीबुवांच्या शरीरातील प्रतिबंधक शक्ती कमी झालेली आहे . वारंवार होणारा Vivax मलेरिया जोशी आजोबांना खचितच त्रासदायक होत आहे.
–डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply